मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

विकाश घोषचं घरी येणं, वैष्णव कवितांवर चर्चा करणं सुरू असतं. कल्याणी त्याच्यात गुंतलीय. एका कवितेत कृष्णाला भेटायला निघालेल्या राधेचा संदर्भ येतो. कुणाला आपण दिसू नये यासाठी त्या निळ्या रात्रीसारखा, त्या निळ्या कृष्णासारखा निळा शृंगार करून निघालेली राधा. निळ्या बांगडय़ा, निळी साडी.. डोळ्यात काजळ.. पण अंधारात अचानक तिचा गोरा चेहरा चमकून जातो. म्हणून ती म्हणते.. ‘माझा गोरा वर्ण घे आणि मला श्याम वर्ण दे..’ म्हणजे मग मला कुणी ओळखू शकणार नाही. कल्याणी नकळत तिच्या जागी स्वत:ला बघतेय. तसाच शृंगार करून रात्री निघालीय विकाशच्या झोपडीकडे.. ‘तुम्हारी हंसती आंखे मुझे फूलों पर रुकी शबनम की याद दिलाती है..’ हे विकाशचं वाक्य मनातून जात नाहीये.

‘मोरा गोरा अंग लइ ले..’ (गुलजार)

यात ‘ले ले’ आणि ‘दे दे’ असं न म्हणता ‘लई ले’, ‘दई दे’ हे म्हणणं किती गोड वाटतं. लगेच त्याला ग्रामीण बोलीचा सुगंध आला. काहीतरी मिळालंय.. काहीतरी गमावलंय. संकोच, लज्जा मला थांबवतेय, पण तुझा मोह माझा हात धरून तुझ्याकडे ओढून नेतोय. पाण्यातलं स्वत:चं प्रतिबिंब बघताना तिच्या चेहऱ्यावरचा तो निष्पाप आनंद.. ते मोहरून जाणं.. हळूच स्वत:चं गुपित स्वत:शी बोलायलाही घरातून बाहेर येणं.. तिच्या स्वभावाचा या गाण्यात किती विचार केलाय! प्रत्येक प्रेमिका वेगळी.. तिचा अनुराग वेगळा.. व्यक्त होणं वेगळं.. गाण्यातला  सगळ्यात सुंदर भाग म्हणजे-

‘बदरी हटा के चंदा चुपके से झांके चंदा

तोहे राहू लागे बैरी मुस्काये जी जलायके..’

‘तोहे राहू लागे’ हा किती गोड शाप आहे! आणि इथे लतादीदींच्या आवाजातही एक लटका राग आणि ‘बैरी’वर वेगळी फिरत आहे. मला बघतोयस ढगाआडून.. आणि हसतोयस जीवघेणं! हे रुसणं, हसणं आणि लटक्या रागानं बघणं.. हे फक्त नूतनच करू शकते. तो अनुराग, त्याची ओढ तिच्या डोळ्यांत दिसते. आवाज आणि अभिनय यांचं इतकं अद्वैत फार क्वचित अनुभवायला मिळतं. या एका गाण्यात नूतनची सगळी कारकीर्द तोलून धरण्याची ताकद आहे. तिच्या नाचऱ्या पावलांना त्या तबल्याची जोड.. ढगाआडून बघणाऱ्या चंद्राचा लपंडाव दाखवणारे ग्लोकेंस्पेल आणि स्वरमंडलचं कॉम्बिनेशन! ‘प सा’ हा पीस चार वेळा येतो तो हा पाठशिवणीचा खेळ दाखवण्यासाठी!

शेवटच्या अंतऱ्यात तिची नाचरी पावलं अचूक त्या मेंडोलीनच्या संगतीनं जातात आणि समोर विकाशची झोपडी. ‘त्या’चं हे घर. पण मधे एक काटेरी कुंपण आहेच. पटकन् खिडकी उघडणारा विकाश आणि लाजून तिथून पळून येणारी कल्याणी.. मागे मेंडोलीनचा वेगात वाजणारा पीस. हळूच घरात येऊन पुन्हा ‘मोरा गोरा अंग’ गुणगुणणं! टेकिंगची, अरेंजिंगची कमाल आहे ही! हे सगळं ठरवून करता येतं? काय प्रतिभा म्हणायची?

बर्मनदांच्या चालीत मधाळ गोडवा आहे. सुरुवातीचं मेंडोलीन.. हळूच येणारे घुंगुर.. आणि मधूनच प्रवेशणारे चायना ब्लॉक्स.. किती वेगळं झालंय गाणं! कुणाही सामान्य माणसाला वाटलं असतं की इथे ‘मो’वर सम असेल, पण नाही.. ‘गोरा’ शब्दाच्या दुसऱ्या अक्षरावर सम ठेवल्यामुळे- म्हणजे ‘रा’वर ठेका सुरू झाल्यानं गाण्याचं वजन, त्याचा टोनच बदललाय.

कल्याणी आणि विकाशमधल्या नाजूक नात्याला विचित्र घटनांमुळे वेगळंच वळण लागतं. आजारी असताना अपरात्री आलेला विकाश.. त्याला आणि कल्याणीला एकत्र बघून उठलेलं वादळ.. ती आपली पत्नी आहे असं विकाशनं सांगणं.. नाइलाजाने बाबुजींनी या विवाहाला परवानगी देणं.. हे सगळं फार वेगानं घडतं. विकाशची पूर्ण सुटका झालेली नसल्यानं त्याला शहरात जावं लागतं. लग्नाचं वचन देऊन तो निघून जातो. डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघणाऱ्या कल्याणीवर विकाशनं तिकडे लग्न केल्याचं ऐकून वीज कोसळते. गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यामुळे तिला गावात राहणं अशक्य होतं. बिचाऱ्या वडिलांना आपल्यामुळे नाही नाही ते ऐकावं लागतंय, या अपराधी भावनेनं कल्याणी घर सोडून जायला निघते. लहानपणापासून जिथे वाढलो, खेळलो, ते गाव, त्या आठवणी आणि सर्वात प्रिय असलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना सोडून जाताना कल्याणीला प्रचंड यातना होतात.

‘ओ जाने वाले हो सके तो लौट के आना..’

(शैलेन्द्र)

किती भयंकर असतं घर सोडून जाणं.. आपला कण न् कण त्या घरात, भिंतींत, तिथल्या प्रत्येक वस्तूत विखुरलेला असतो. अजून आपला गंध तिथे रेंगाळत असेल. आपलं अस्तित्व या घराबाहेर, या गावाबाहेर कधी नव्हतंच..

‘बचपन के तेरे मीत तेरे संग के सहारे..’

सवयीच्या मैत्रिणी, सगेसोबती.. सगळ्यांच्या नजरा उद्या आपल्याला शोधतील. आपल्या जाण्यानं बाबुजी दु:खात वेडे होतील.

‘दे दे के ये आवाज कोई हर घडी बुलाये!’

या हाका कुणाच्या? ‘कल्याणी!’ अशी हाक आता बाबुजी कुणाला मारतील? पुन:पुन्हा वळून बघताना जीव गलबलून जातो. तिच्या जाणाऱ्या पावलांचे ठसे वाळूत उमटत जातात. तिकडे जाणारा पुन्हा कधीच परत येत नाही हे कटू सत्य आहे. पुन्हा दिसतील का बाबुजी मला?

सुरुवातीची बासरी एक खिन्न भाव घेऊन उमटते.. ‘पनिसा’ ही मेंडोलीन आणि गिटारवर असलेली फ्रेज सतत एक आघात करत राहते. खर्जात जाणारी व्हायोलिन्स पाठ सोडत नाहीत आणि तो तार स्वरातला स्त्रीस्वरातला हुंकार या सगळ्याला सहवेदनेची झालर लावतो. मुकेशचा आवाज खरोखर ते आक्रंदन जिवंत करतो. वरच्या स्वरात ‘दे दे के आवाज’ म्हणताना त्यातला एक हंबरडा ऐकू येतो. मनाविरुद्ध आपलं गाव, आपली माणसं सोडताना जे धागे तुटतात त्यांना कोण सांधणार? ‘पूछेगी हर निगाह कल तेरा ठिकाना’मध्ये ‘ठि’वर अचानक लागणारा कोमल निषाद मात्र काळजाचा तळ ढवळून टाकतो. हे गाव, ही माणसं हे तर प्रतीक आहे. या दुनियेतून निघून जाताना खरोखर हे बंध आपण सहज तोडू शकतो का? आपल्या  आठवणींनी खरंच कुणी रडणार असतं का? की हा आपला एक भ्रम आहे? ज्या हाका आपल्याला ऐकू येतात, तो आपणच निर्माण केलेला एक फसवा पाश असतो का? अनेक प्रश्न मनात उभे करणारं हे गाणं प्रत्येक वेळी रडवतं.. अनेक जखमांवरची खपली काढतं, हे मात्र खरं.

शहरात मैत्रिणीच्या नवऱ्याच्या ओळखीनं एका रुग्णालयात मोलकरणीचं काम कल्याणी स्वीकारते. तिथल्या एका हिस्टेरिया झालेल्या विचित्र मनोवृत्तीच्या महिलेची सेवा करण्याचं बिकट काम तिच्यावर येतं. बाबुजी तिला शोधत शहरात येतात आणि अपघातात मरण पावतात. त्या आघातानं खचलेल्या कल्याणीवर खरा वज्राघात होतो ते त्या रुग्ण स्त्रीचा नवरा विकाश आहे हे बघून! बाबुजींचं निश्चल शरीर बघून परतणारी कल्याणी त्याच धक्क्यात असताना हा आघात मात्र सहन करू शकत नाही. ती स्त्री तिला घालूनपाडून बोलते. एकीकडे समोरच्या इमारतीत वेल्डिंगचं काम चाललंय त्याच्या ठिणग्या, घणाचे घाव जणू कल्याणीच्या मेंदूत पडतायत. नाजूक जुईच्या पाकळ्यांचा दगडानं ठेचून चेंदामेंदा करावा तशी कल्याणीच्या मनाची अवस्था होते. तिची सहनशक्ती संपते. त्याच अवस्थेत ती चहात विष घालून त्या स्त्रीला संपवते. खरं तर तिला खून करायचा असतो तिच्या नशिबाचा! विकाश जेव्हा कल्याणीला बघतो तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसतो. आपल्या पत्नीनं आत्महत्या केली असावी असं सांगून तो कल्याणीला वाचवायला बघतो. पण त्या क्षणी कल्याणीचा संयम संपतो. प्रचंड भावनातिरेकानं ती सांगते की, ‘ही आत्महत्या नाही. मी हत्या केलीय.’ कल्याणीला तुरुंगवास होतो..

इथे फ्लॅशबॅक संपतो.

आता जेलरसाहेबांनी देवेंद्रच्या आईला राजी केलेलं असतं. ‘तुला या कैदेतून त्या संसाराच्या कैदेत पाठवतोय..’ असा प्रेमळ आशीर्वाद घेऊन निघालेली कल्याणी.. तिच्या सोबत वॉर्डन सुशीला.. कुठली तरी नवी उमेद घेऊन पुन्हा आयुष्याचा सामना करायला कल्याणी सिद्ध झालीय. एक नवीन आयुष्य वाट बघतंय.

आणि अचानक.. बंदरावरच्या खोपटवजा वेटिंग रूममध्ये पुन्हा विकाश भेटतो. टीबीने जर्जर झालेला.. त्याची खोकल्याची उबळ ऐकून कल्याणी त्याला पाणी द्यायला जाते. विकाश चमकतो. तिची माफी मागतो. त्याच्यासोबत आलेला त्याचा सहकारी कल्याणीला सांगतो की, अतिशय नाइलाजानं विकाशला दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागलं.. तसा संघटनेचा आदेश होता. देशापुढे स्वत:च्या प्रेमाचं बलिदान विकाशला द्यावं लागलंय. इथे कल्याणीच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होते. अशा जर्जर अवस्थेत विकाश त्याच्या गावी जाणार असतो. एकटा. असहाय. एका खोलीत बसलेली कल्याणी. दुसऱ्या खोलीत विकाश. मध्ये एक भिंत (भूतकाळाची?)! विचारांचं काहूर.. आणि या पाश्र्वभूमीवर मागे ‘ओ रे मांझी ऽऽऽ’ अशी पुकार..

‘मेरे साजन है उस पार’( शैलेन्द्र)

‘मैं मन मार, हू इस पार, ओ मेरे मांझी ले चल पार..’

‘तो’ पल्याड  आहे. मी इथं मन मारूनच असहायपणे बसलेय. मला त्याच्याकडे घेऊन चल.. सचिनदांच्याच आवाजात ही पुकार अशी भिडू शकते. कारण तो आवाज अतिशय नैसर्गिक, कसलंही पॉलिश नसलेला रांगडा आणि निरागस आहे. ‘मेरा नामही मिटा देना’चे स्वराला दिलेले हेलकावे असोत किंवा‘ओ रे मांझी’ या हाकेची आर्तता असो. ‘मत खेल’ हे वारंवार बजावणं असो.. जे काही आहे ते थेट भिडतं.. ही चाल माधुर्याच्या निकषांच्या पलीकडे जाणारी.. अलंकार नसलेल्या विरक्त, नि:संग जोगिणीसारखी भासते मला. निर्वाणीचा सूर लागलाय त्यात. सुरुवातीचा ‘उस पार’ हा रिषभावर आणि नंतरचा मध्यमावर कसा? मधलं अंतर दाखवण्यासाठी?

‘मांझी गीतं’ म्हणजे बंगालच्या लोकसंगीताचा एक अविभाज्य भाग. या काठावरून त्या काठावर जाणं.. जणू दोन वेगळी विश्वं.. ऐलतीर आणि पैलतीर यासुद्धा किती सापेक्ष संकल्पना असाव्यात! ज्याला आपण ‘ऐलतीर’ म्हणतो तो त्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्यांसाठी ‘पैलतीर’! तो ‘मांझी’ म्हणजे कदाचित नियती, ईश्वर, पल्याड नेणारा.. तिथे माझा प्राणविसावा आहे आणि ही नदी वैरीण झालीय. नको आता इथे गुंतवूस.. इथले हिशोब मिटवून टाक. तसे गुण नव्हतेच माझ्यात काही.. पण माझे अवगुणही विसरून जा.. इथून त्याच्याकडे जाताना हा तीर सोडावा लागतोय.. खरं तर या ‘बिदाई’ची, या क्षणाची मी मृत्यूनंतरही वाट बघितली असती! मला माहितीय- ‘तिकडचं’ आयुष्य म्हणजेसुद्धा आगीशी खेळ आहे. देवेंद्रसोबतच्या लौकिक सुखाच्या संसारापेक्षा विकाशबरोबरचं खडतर आयुष्य स्वीकारावं? स्वत:हून आगीवर झेप घ्यावी पतंगासारखी? ती पुढे होणारी होरपळही मला ‘या आगीशी खेळू नकोस’ म्हणतेय. पण खेळू दे तो खेळ मला. कारण मी त्याची युगानुयुगांची बंदिनी आणि संगीनीही. त्याची एक-एक हाक माझ्या पदराला खेचून बोलावतेय मला..

इकडे ट्रेन सुटतेय.. तिकडे विकाशची बोट.. प्रचंड तडफड कल्याणीच्या चेहऱ्यावर! ती ओढ विकाशकडे जाण्याची! आता त्याला सोडून देऊ मी? अशा अवस्थेत? आणि सुखाकडे धावत जाऊ? त्याचा दोष नसताना? देवेंद्र हा भविष्यकाळ आहे. पण विकाश ही वस्तुस्थिती आहे. माझं पहिलं प्रेम आहे. ते कसं नाकारू? तिची घालमेल कमालीची वाढते.. नाही.. मला विकाशकडे गेलंच पाहिजे.. हाच तो क्षण.. ऐलतीर सोडण्याचा.. अद्वैताकडे नेणारा.. तडफड शांत करणारा! आता नाही थांबायचं. इथं नाही गुंतायचं. एका क्षणी बोटीच्या दिशेनं धावत सुटणारी कल्याणी.. डोळ्यांत एक आशेचा किरण सांभाळून बसलेला विकाश.. जीव तोडून तिचं धावत येणं आणि त्याच्या पायावर, मिठीत कोसळणं.. हे सगळं अत्युच्च बिंदूला पोचतं.. बोटीच्या मागे जाणाऱ्या धुरात तो भूतकाळ विरून जातो. आपले कढ मात्र अनावर होतात. गरम अश्रू हीच दाद असू शकते या क्षणी.. धीर देणारा  फक्त सचिनदांचा आवाज असतो..

‘मैं ‘बंदिनी’ पिया की,

मै संगिनी हूं साजन की..

मुझे आज की विदाका

मर केभी रहता इंतजार!’

(उत्तरार्ध)