मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com
विनोद आणि गीताचं प्रेम हळूहळू उमलत असताना अचानक तिच्या वडिलांच्या हातात मीराचं पत्र पडतं.. आलेला मुलगा सुनील नाही, विनोद आहे हे कळल्यावर त्यांच्या चिमुकल्या जगात भूकंप झालाय. यात ए. के. हंगल आणि दीना पाठक यांचा अभिनय कमाल दर्जाचा आहे. दोघांनी त्या भूमिकांचे इतके बारकावे टिपलेत, की प्रत्येकाला त्यांच्यात आपले काळजी करणारे, किंचित जरी खोटं बोलावं लागलं तरी त्याचा ताण येऊन घामाघूम होणारे भाबडे वडील आणि केवळ पोरीच्या ‘भल्या’साठी चतुराईने वागणारी मध्यमवर्गीय आई दिसावी. गीताचे वडील आणि मुख्यत्वे आई तिला विनोदच्या प्रभावातून बाहेर काढून सुनीलच्या दिशेने वळवतायत.. पण आता खूप उशीर झालाय. सुनील हे एक ‘स्थळ’ आहे. कागदावर उत्तम बायोडाटा असलेलं. पण विनोद हा ‘जिवाभावाचा सखा’ आहे.. तिला आतून ओळखणारा. सुनीलमध्ये काही वैगुण्य नाही. पण त्याचं किंचित रूक्ष असणं आपल्यालाही जाणवतं. महत्त्वाचं म्हणजे ‘गीता’ हे त्याच्यासाठीसुद्धा एक ‘स्थळ’ आहे. अपघातानं अवचितपणे एखाद्या वळणावर भेटून एकमेकांकडे आकर्षित होणं वेगळं असतं. तिथे एकमेकांची बाकी माहिती गौण असते. पण आता सुनीलच्या मनातही गीताबद्दल भावना निर्माण झाल्यात. रीतीप्रमाणे त्यालाही भोजनाचं आमंत्रण देण्यात येतं. विनोदही (चाचीजींच्या मनाविरुद्ध!) त्याच्या बरोबर जातो. इथं ‘तुम्हाराही नाम सुनील है ना?’ असं विचारायला चाचीजी विसरत नाहीत. (पुन्हा जोखीम नको!) विनोदला गाण्याचा आग्रह होतो. एकत्र गाण्याची ही संधी विनोद सोडत नाही. हार्मोनियम मागवली जाते. विनोद आणि गीता एका सुंदर द्वंद्वगीतात रंगून जातात.
‘तू जो मेरे सूर में..
तू जो मेरे सूर में सूर मिला ले, संग गा ले, तो जिंदगी हो जाये सफल!
तू जो मेरे मन का घर बना ले, मन लगा ले तो जिंदगी हो जाये सफल..’
किती साध्या शब्दांत व्यक्त झाल्यात या भावना? अजून काय हवं असतं? दोन सुसंवादी स्वर एकत्र आले की त्यातून संगीत उमलतं.. न जुळलेल्या तारा केवळ विसंवाद निर्माण करतात. न जुळणारे स्वर स्वत:च्या जागी कितीही परिपूर्ण असले तरी त्यातून संगीत नाही निर्माण होऊ शकत. जिथे संगीत नाही, तिथे आयुष्य नाहीच!
‘चांदनी रातों में, हाथ लिये हाथों में, डूबे रहे एक दूसरे की ‘रसभरी’ बातों में!’
स्वप्न काय? तर- चांदणं अंथरलेलं असावं.. निळाईत न्हालेली रात्र असावी.. हातात हात असावेत आणि.. अखंड, न संपणाऱ्या गप्पा माराव्यात.. गूज सांगावं.. हसावं, रुसावं! त्यावेळी थेट ‘मैं उनसे प्यार कर लूंगी, बातें हजार कर लूंगी’ म्हणणारी नर्गिस आठवते. आणि हा ‘रसभरी’ शब्द किती छान आहे! इथे ‘मदभरी’सुद्धा म्हणता आलं असतं. पण ‘रसभरी’ला एक सुंदर निरागसपणा आहे. हे प्रेम जीव लावणारं आहे. सहवासासाठी आसुसलेलं असलं तरी ‘मादक’ नाही. खरं तर अजून या प्रेमाला वयात यायचंच आहे.
‘तू जो मेरे संग में मुस्कुरा ले, गुनगुना ले.. तो जिंदगी हो जाये सफल..’ ही भावनाच अत्यंत गोड आहे.
‘क्यूं हम बहारों सें खुशियां उधार ले? क्यूं ना मिल के हमही खुद अपना जीवन संवार ले..’ इथे येशूदासजींचा आवाज कमालीचा सुंदर लागलाय. ‘बहारों सें’ म्हणताना ‘हा’ अक्षरावरचा षड्ज अतिशय गोड, गोलाकार आणि सुखद.. आणि त्याला जोडून येणारा व्हायोलिन्सचा अवरोही ‘फिलर’ अप्रतिम आहे.
कलाकार कधीही एकटा नसतो, हेच खरं! ‘हम कलंदरों का न कुछ हाल पूछिए, तनहा भी बैठते है तो महफिल लिये हुए!’ हे किती खरं आहे! ज्यांच्या तनामनात अखंड स्वर झंकारतायत त्यांना आनंदाची उधारउसनवारी करावीच लागत नाही. हा आनंद कुठल्याही बा गोष्टींवर अवलंबून नसतोच.. विनोद आणि गीता यांचं संगीतमय असणं.. संगीताचा स्पर्श झाल्यावर तिच्या स्वभावात आलेली एक वेगळीच समज या शब्दांत दिसते. ‘माझ्या पायवाटेवर तू दीप उजळलेस तर हे आयुष्य सार्थकी लागेल!’ ही कृतज्ञता आहे. ‘तो बंदगी हो जाये सफल..’ म्हणताना ‘बंदगीऽऽऽ’ शब्दावरचा शुद्ध मध्यम फार टोकदार लागलाय. त्या स्वरात ते समर्पण आहे.. ती लगन आहे.
गाण्याची रचना रवींद्र जैन अतिशय विचारपूर्वक करत. इथेही निवडलेले राग, त्यातले स्वर, काही विवादी स्वर, गाण्याचा ताल, त्यात वापरलेली वाद्यं.. या सगळ्यात विचार दिसतो. आणि गाण्याचं टेकिंगसुद्धा उत्कृष्ट झालेलं आहे. एकंदरीतच सगळं जमून आलंय. बागेश्रीच्या आजूबाजूला मुक्त विहरणारी ही रचना.. पण शुद्ध गंधाराचा सुंदर वापर एक वेगळी छटा घेऊन येतो. दोघांनी मिळून सरगम गाणं.. गीतानं धिटाईनं काही जागा घेणं.. त्याला विनोदनं दाद देणं.. अशा अनेक बारकाव्यांनी हे गाणं नटलंय. पहिल्या अंतऱ्याच्या आधीच्या संगीतात बासरी आणि सुनीलच्या मनात पल्लवित होणारी आशा एकदमच आरोही दिशेने बहरते. खरं तर हे गाणं गाताना गीता आणि विनोदच्या चेहऱ्यावरचे भावच इतके बोलके आहेत की त्यांचं टय़ूनिंग जमलंय हे कुणाच्याही लक्षात यावं.
गीताच्या मनात काय आहे हे चाचपून बघायचा सुनीलचा प्रयत्न आहे. तिला तो एकदा विचारतोसुद्धा. पण तिच्या मनात काहूर आहे. काहीच बोलत नाही ती. तिला बोलतं करण्यासाठी पिकनिकचा बेत आखला जातो. गीता बेचैन आहे. सुनील एका वेगळ्याच मूडमध्ये जीप चालवतोय. विनोद गाणं सुरू करतो..
‘आज से पहले आज से ज्यादा खमुशी आज तक नहीं मिली
इतनी सुहानी ऐसी मीठी घडी आज तक नहीं मिली..
इसको संजोग कहे या किस्मत का लेखा हम जो अचानक मिले है?
मन चाहे साथी पाकर हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले है!
तकदीरों को जोड दे ऐसी कडी आज तक नहीं मिली!’
या काव्याला एक सुंदर प्रवाही लय आहे.
‘इसी खमुशी को ढूंढ रहे थे.. यही आज तक नहीं मिली..’ ही ओळ सांगून जाते की, ‘हा’ आनंद काही वेगळा असतो. मनासारखा जोडीदार मिळाल्यावर क्षण आनंदात न्हाऊनच येतात. याच आनंदाची तर आस होती आजवर. ‘यही’ आज तक नहीं मिली!
रवींद्र जैन यांनी या गाण्याची नेहमीपेक्षा वेगळी हाताळणी केलीय. हलकाफुलका पिकनिक मूड पकडलाय. वरकरणी साधं वाटणारं हे गाणं विनोदच्या मानसिक अवस्थेचं सुंदर चित्रण करतं. या गाण्याचं मर्म त्याच्या काव्यात आहे. कारण पिकनिकला जाताना असलेला आनंदी मूड येताना मात्र उदास झालाय. आपल्याला चुकून इंजिनीयर समजण्यात आलं होतं.. सुनील सर गीताशी विवाह करू इच्छिताहेत.. ही सगळी कटू सत्यं अचानक विनोदवर आदळतात. मोठं मन दाखवत विनोद गीताला सांगतो की, ‘सुनीलच तुझ्यासाठी योग्य आहे..’ येताना मात्र या गाण्यातून विनोदची व्यथा शब्दरूप घेते..
‘दिल में तूफान उठा है होटों पे नगमा आंखों में आंसू खमुशी के!
सपनों के पास पहुंच के सपनों से दूरी ऐसा न हो संग किसी के
कोई कहे ना मंजिल मुझको मिली, आज तक नहीं मिली!’
जी स्वप्नं पाहिली, ज्यांचा पाठलाग केला, ज्यांत रमलो, ती सत्यात येताहेत असं वाटता वाटता अचानक हातातून पाऱ्यासारखी ती निसटून गेली.. असं कुणाचंही होऊ नये. आपल्याला मंझिल मिळालीय असं कधीच म्हणू नये, कारण ओठाशी आलेला प्याला क्षणार्धात दूर लोटला जाऊ शकतो, हेच सत्य आहे. ‘मैंने जिंदगी में कभी हार नहीं मानी विनोद!’ हे काहीसं अहंकारयुक्त बोलणंसुद्धा सुनीलचा स्वभाव दाखवून गेलेलं असतं. म्हणजे तो गीताला मिळवल्याशिवाय राहणार नाही, हेही विनोद जाणून आहे. सौम्य स्वभावाच्या, आपलं प्रेम आक्रमकपणे न मांडू शकणाऱ्या व्यक्तींचं प्रेम कितीही उत्कट असलं तरी त्याला यशाची चव क्वचितच चाखायला मिळते..
सुनील लग्नाला तयार आहे समजल्यावर सगाईची तयारी होते. पण गीताचा उदास चेहरा चाचाजींच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.. विनोद मीटिंगचं निमित्त करून मुंबईला जायला निघतो. त्याची देहबोलीसुद्धा पराभूत आहे. सुनीललाही काहीतरी वेगळं जाणवतं. इकडे गीता मात्र निर्धारानं आई आणि बहिणीला ठणकावून सांगते की, ‘मी विनोदशीच लग्न करणार आहे.’ विनोदच्या पराभूत मानसिकतेच्या तुलनेत कमी शिकलेल्या, साध्यासुध्या गीताचं स्वत:च्या मनाशी, भावनांशी प्रामाणिक असणं फार ठळकपणे भिडतं.. ‘मैं कोई खिलौना नहीं हूं’.. हे ती सांगू शकते. आणि ज्या अर्थी सुनीलच्या जागी विनोद आधी आला, यात परमेश्वरी योजनाच होती, हेही सांगायला ती विसरत नाही. विनोदला स्टेशनवर गाठायला ती दिपूबरोबर घाईघाईनं निघते. गाडी सुटताना जीव तोडून धावते. नजर विनोदला शोधते, पण तो भेटत नाही.. गाडी निघून जाते. आयुष्यभराचीच ही आता चुकामूक आहे असं वाटून गीता स्तब्ध होते. मुसमुसणारा लहानसा दिपू हे खरं म्हणजे गीताच्या निरागस मनाचंच प्रतीक आहे. विमनस्क होऊन बाहेर आल्यावर सुनील गाडी घेऊन आलेला दिसतो.. एक अक्षर न बोलता ती त्याच्याबरोबर घरी आल्यावर तिला एक सुंदर सुखद धक्का बसतो. विनोद घरीच असतो. सुनीलनं या दोघांच्या मनातलं जाणून समंजस माघार घेतलेली असते. आणि उलट, स्वत:कडे मोठेपणा घेऊन ही सगाई तो पार पाडतो. दोन संवादी स्वरांमधला एक विसंवादी स्वर स्वत: त्यातून बाहेर पडतो आणि सुरेल संगीत चहूकडे झंकारू लागतं.. कारण हे स्वर युगानुयुगं एकमेकांशी जुळलेले असतात. त्यांना कोण वेगळं करणार? सुनील सांगतो त्याप्रमाणे विनोदला अशाच खंबीर प्रेयसीची गरज असते.. कारण विनोद जरी चंद्र, सूर्य आणि नदीनाल्यांत, यमक, छंदात रमणारा असला तरी गीताचं प्रेम मात्र भिल्लासारखं असतं. बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं! (उत्तरार्ध)