ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीतील बिनीचे नेते केशवराव जेधे यांच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने डॉ. य. दि. फडकेलिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन आज रोजी (७ नोव्हेंबर) केशवराव जेधे फाउंडेशनतर्फे होत आहे. या नव्या आवृत्तीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेतील संपादित अंश..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहिडखोऱ्यातील भोर तरफचे देशमुख कान्होजी जेधे यांनी प्रतापगडाच्या लढाईपूर्वी अफझलखानाने पाठवलेले आदिलशाहाचे शाही फर्मान धुडकावले. त्यांनी मुलाबाळांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर बेलरोटीवर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घेतली आणि वतनावर पाणी सोडले. सह्यद्रीच्या कडेकपाऱ्यांत हिंदवी स्वराज्य आकाराला येत असताना त्याला दोन्ही हातांनी आधार देण्याचे काम ज्या जेधेंनी केलं, त्याच गौरवशाली घराण्याचा वारसा लाभला केशवराव जेधेंना! जेधेंच्या पुणे शाखेत जन्मलेल्या केशवराव जेधेंनी जेधे घराण्याची उज्ज्वल परंपरा पुढे नेली.

जेधे घराण्याचा इतिहास पाहिला तर इमानेइतबारे, नि:स्पृहपणे कर्तव्य हाच धर्म मानून इतरांसाठी झोकून देणे हेच जेधे घराण्याचे ब्रीद असल्याचे दिसते. त्याला केशवरावांचे निरपेक्ष आणि विशुद्ध कार्यदेखील अपवाद नाही. केशवरावांचे जीवनचरित्र य. दि. फडकेंच्या लेखणीने लिहिले गेले आहे, हीच खरी केशवरावांना आदरांजली आहे. य. दि. लिखित जीवनचरित्र म्हणजे केवळ समग्र व्यक्तिचित्रण न राहता तो तत्कालीन कालखंडाचा आरसा असणार हे मी जाणून होतो, त्यामुळे प्रस्तावनेची विनंती मी चटकन् स्वीकारली. शिवाय केशवराव जेधे हे १९५७ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून संसदेवर निवडून गेले होते. त्यांच्या चरित्रग्रंथाला माझी प्रस्तावना असावी, हा विलक्षण योग आहे असे मी मानतो. य. दिं.ना देवाज्ञा होऊन बरीच वर्षे लोटल्यानंतर हे चरित्र पुस्तकरूपाने माझ्या प्रस्तावनेसाठी येते आहे याचे आश्चर्यदेखील वाटते. असो. प्रास्ताविक लिहिणे माझ्या भाग्यात होते, हे काही थोडके नाही.

‘केशवराव जेधे’ हे जीवनचरित्र पान उलटवत जावे तसे केशवरावांच्या व्यक्तिमत्त्वातील छटा खुलवत जाते असे काही नाही. केशवराव बात: कसे होते, त्यांचे बालपण कसे गेले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मूस कशी घडली असा कालानुक्रमे धांडोळा य. दि. घेत नाहीत. केशवरावांच्या स्वभावातील कंगोरे ते अधूनमधून मांडतात. वाचकांना प्रास्ताविकात याची आधीच जाणीव करून देतो. कारण हीच बाब खरी उत्कंठा वाढवणारी आहे. नेहमीच्या पद्धतीने रेखाटलेले जीवनचरित्र नसेल तर मग पानोपानी काय असेल याची आगाऊ कल्पना देतो. विसाव्या शतकाच्या पहाटवेळेपासून स्वातंत्र्यसूर्याच्या अभ्युदयानंतर एका दशकापर्यंतच्या अनेक सामाजिक-राजकीय नाटय़मय घडामोडींचा हा एक चलत्पट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा चलत्पट वाचकांना पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवेल आणि वाचून झाल्यानंतर भूतकाळाची पुन्हा भ्रमंती घडवेल.

पुस्तकाचे शीर्षक सुचवण्याची मला मुभा दिली असती तर मी ते नाव ‘जेधे मॅन्शन’ असे ठेवले असते आणि शीर्षकाखाली ‘केशवराव जेधेंच्या धगधगत्या कारकीर्दीचा धांडोळा’ असे उपशीर्षक लिहिले असते. कारण जेधे मॅन्शन ही पुण्यातील केवळ वास्तू नसून, ते विसाव्या शतकातील चळवळींचे एक प्रमुख केंद्र होते. जेधे मॅन्शनमधील राबता वाढवण्याचे श्रेय खरे केशवरावांपेक्षा थोरले असलेले बाबूराव जेधे यांना जाते. त्यांचे व्यक्तिदर्शन विस्ताराने जेधे मॅन्शनमध्ये मांडता आले असते. केशवरावांच्या कारकीर्दीची झेप दिल्लीपर्यंत पोहोचली आणि तिचा ऊहापोह चरित्रात होत आहे याचा मला एक वेगळा आनंद होतो. कारण याच भागात माझी राजकीय कारकीर्द आकाराला आली.

विद्येचे माहेरघर असलेले पुणे अनेक विचार-आचारांच्या मंथनाचे, अभिसरणाचे केंद्र आहे. पुणे शहराचा इतिहास पाहिला असता तिथे ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन मुख्य समाजप्रवाह निर्माण होण्याचे कारण समजेल. पुण्याच्या जहागिरीतून शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभारले आणि याच पुण्यातून पेशवाईच्या माध्यमातून मराठा साम्राज्याची सूत्रे हलवली गेली. लाल महालात आणि शनिवारवाडय़ात एक ठरावीक अंतर राहिले तरी मुठेचे दुथडी भरलेले, तर कधी जमिनीत खोल मुरलेले स्वातंत्र्याभिमानी पाणी या दोन समाजप्रवाहांना फार तोडूनही देत नव्हते. माझ्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांनी सब्राह्मण अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य घडविण्याचा जो चमत्कार साधला, तो शिवोत्तर काळात कुणालाही जमला नाही, ही अंतर्मुख करणारी शोकांतिका आहे. कारण असे असते तर देशाची राजकीय सूत्रे महाराष्ट्राबाहेर कधीच गेली नसती. पुस्तक सावकाश आणि सावधपणे वाचावे, वाचकाच्या मन:पटलावर ही भावना जरूर उमटेल.

जेधे मॅन्शनमधून ब्राह्मणेतर चळवळीच्या पोषणाचे कार्य होत होते. कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींची बाबूराव जेधेंवर विशेष मर्जी होती. त्यामुळे शाहू छत्रपतींचे वेदमान्य पुरोगामित्व, महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार आणि ब्राह्मणेतरांचा कट्टर ब्राह्मणविरोध यांना खतपाणी याच मॅन्शनमधून मिळाले. केशवरावांच्या जीवनचरित्रात मला मैत्रीचे तीन पर्व पाहावयास मिळतात. पहिले जेधे-जवळकर, दुसरे जेधे-गाडगीळ आणि तिसरे जेधे-मोरे अशा विभागणीत त्यांचे चरित्र साकारते. पहिल्या पर्वात ब्राह्मण-ब्राह्मणेतर धुमश्चक्री पाहावयास मिळते. या पर्वात नेतेमंडळींचा प्रगल्भपणा अजिबात दिसत नाही, तर केवळ प्रक्षुब्धपणा दिसतो. जवळकरांच्या जळजळीत लेखणीने इतकी आग ओकली आहे की तिचा वाचतानाही चटका बसतो.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अर्धा तप रखडले हे दुर्दैवाने सांगावेसे वाटते. श्रीशिवस्मारक कोनशिला कार्यक्रम हे जातिविशिष्ट स्मारक असू नये, हे गव्हर्नरचे म्हणणे होते. शाहू महाराजांनीदेखील केवळ मराठा समाजाचे ते स्मारक असावे हा विचार सोडून दिला होता. स्मारक जातिविशिष्ट असणार नाही याची हमी मिळाल्यावरच ब्रिटनच्या युवराजाने कोनशिलेची स्थापना केली. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची संभावना करणाऱ्या इंग्रजांना छत्रपतींना आदरांजली द्यावी लागली याकडे सकारात्मकतेने पाहावयास हवे होते; पण तेही काही जणांना रुचले नाही. केशवरावदेखील त्यांपैकीच एक होते. नंतर केशवरावांनी अंग काढले. पण मला वाटते, शिवछत्रपती स्मारक बांधताना असा वाद होणे दुर्दैवी होते. त्याचे लोकार्पण झाल्यावर तिथे कोणी यावे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग होता. पुढे जाऊन केशवरावांची विचारसरणी कमालीची व्यापक झाली. प्रस्तुत चरित्र केशवरावांच्या दृष्टिकोनातील अशा स्थित्यंतरांचा प्रवास वाचकांना घडवते.

पुणे तेथे काय उणे असे आपण म्हणतो. पुतळ्यांच्या बाबतीत तर पुण्यात अजिबात वानवा नाही. पुतळ्यांवरून होणाऱ्या वादांवर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची उभारणी कोणी करावी, समारंभाला कोण असावे/ नसावे यावरून वाद झाले; परंतु टिळकांच्या आणि महात्मा फुलेंच्या पुतळा उभारणीवरूनच ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमध्ये संघर्ष झाला. त्या कटुतेची बीजे अजूनही मूळ धरतात आणि नवनवे कोंब आगडोंब उसळवतात. हल्लीचे दादोजी कोंडदेवांचा लाल महालातील पुतळा हटवणे असो वा संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवणे असो! या दोन्ही प्रकरणांत मोठा वादंग झाला. पण जेधेंच्या चरित्रातील पुतळा प्रकरणे वाचली की आपली पिढी बरीचशी समजूतदार आहे असे वाटते.

चरित्रात पुतळा प्रकरणापेक्षा गणेशोत्सव मेळे आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल जेधेंनी सुरू केलेले छत्रपती मेळे अधिक जळजळीत आहेत. दलितांनीदेखील श्रीकृष्ण मेळे घेतले. गणेशोत्सव मेळ्यांमध्ये टिळकवाद्यांनी नेमस्त, सुधारकांवर गलिच्छ भाषेत कवने गायली. दिनकरराव जवळकरांनीदेखील त्याच पातळीवरून प्रत्युत्तरपर कवने लिहिली. त्यावर कोटी ‘देशाचे दुष्मन’ या जवळकरांनी लिहिलेल्या व केशवरावांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाने केली. या साऱ्या चिखलफेकीत स्त्रियांच्या पदरावर का शिंतोडे उडवले गेले, हे कळत नाही. सावित्रीबाईंना गावगुंडांकडून त्रास झाला होताच, तसाच प्रकार धनवडे नावाच्या इसमाने एका ब्राह्मण स्त्रीशी केला. एकंदरीत स्त्रीसन्मानाची रक्षा करणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श कुणीच ठेवला नाही, हा विचार पुस्तक वाचताना मन उद्विग्न करतो. ‘देशाचे दुष्मन’ पुस्तकात टिळक-चिपळूणकरांची बदनामी केली गेली म्हणून जेधे-जवळकरांना तुरुंगवास झाला. अपिलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकीलपत्र स्वीकारले आणि आपल्या कुशाग्र बुद्धीची चुणूक दाखवली, तेव्हा एकदाचे जेधे-जवळकर आरोपमुक्त झाले! चरित्रात जेधेंची दलितांबद्दल भूमिका समजून घेताना बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षांच्या ठिणग्या आपले डोळे दिपवतील. बाबासाहेबांना ब्राह्मण त्याज्य नव्हते. मात्र, ब्राह्मण्यवादी ब्राह्मणांना त्यांचा प्रखर विरोध असे. अनंत विनायक चित्रे, गंगाधरपंत सहस्रबुद्धे, टिपणीस असे पुरोगामी ब्राह्मण सहकारी चवदार तळ्याच्या सत्याग्रहात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. या घटनांचे केशवराव जेधे साक्षीदार होते. मनुस्मृती ग्रंथ जाळला याचे केशवरावांनी अभिनंदन केले.

प्रारंभी केशवराव जेधेंवर जवळकरांचा प्रभाव असला तरी त्यांचे स्वत:चे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. जेधेंना विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्या अस्पृश्योद्धारक कार्याचा नितांत आदर होता. शैक्षणिक कार्यातदेखील जेधे मागे नव्हते. जेधे मॅन्शनमधून ‘श्री शिवाजी मराठा सोसायटी’, ‘अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषद’ वगैरे संस्थांच्या शिक्षणप्रसार कार्याकडे सातत्याने लक्ष दिले गेले. केशवरावांची कारकीर्द अशा रीतीने नंतरच्या पर्वात अधिक संतुलित झाली. प्रौढत्वाच्या वाटचालीत केशवराव हळूहळू महात्मा गांधीजींच्या विचारांकडे खेचले गेले. महात्मा गांधीजींचे नेतृत्व आसेतू हिमाचल का स्वीकारले गेले, याचे थोडक्यात गमक या चरित्रात आढळते. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक तिन्ही प्रांतांतील प्रगतीसाठी महात्मा गांधी पुढे होते. समाज आणि राजकारण या जोडीने राष्ट्राचा गाडा पुढे नेण्याचे धोरण गांधीजींनी स्वीकारले, हे इतर नेतृत्वांनी केले नाही, त्यामुळे गांधी महात्मा झाले.. असे बारकावे या चरित्रात टिपले गेले आहेत.

केशवरावांनी ब्राह्मणेतर चळवळीचा विरोध पत्करून काँग्रेसचा रस्ता धरला आणि त्यांच्या कारकीर्दीचे दुसरे पर्व सुरू झाले. काकासाहेब गाडगीळांसारखा अभ्यासू, गुणी मित्र त्यांना लाभला. मध्यवर्ती कायदेमंडळापर्यंतचा राजकीय प्रवास वाचताना केशवरावांतील सद्वर्तन, तळमळ, करारीपणा यांचा प्रत्यय येईल. प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षाची वाढ केली, काँग्रेस खेडय़ापाडय़ांत नेली. केशवराव घटना समितीचे सदस्यदेखील झाले. दुसरे पर्व हाच त्यांच्या कारकीर्दीचा उच्चबिंदू होता.

केशवराव जरी नावाजलेल्या उद्योग घराण्यातील होते, तरी त्यांना सामान्य शेतकरी, कामगारांबद्दल अधिक कणव होती. ही कणव पक्षांतर्गत शेतकरी-कामगार संघ स्थापनेपर्यंत घेऊन गेली. पुढे याचाच स्वतंत्र पक्ष झाला. केशवरावांना हे चुकलेले पाऊल किंवा भरकटलेले पाऊल वाटले. त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली. परंतु मला वाटते, यात त्यांचे काही चुकले नाही. आजही महाराष्ट्रातील काही भागांवर पारंपरिक पकड असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची मुहूर्तमेढ त्यांच्या प्रयत्नाने रोवली गेली होती, हे त्यांचे यश म्हणावे लागेल. परंतु कारकीर्दीच्या शेवटी काकासाहेबांनी जेधेंना पुन्हा काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात परत आणले. या सगळ्या जीवनप्रवासाचे स्वत: केशवराव जेधेंनी प्रेमाताई कंटक यांच्याशी बोलताना स्वचरित्राच्या तीन अंकांविषयी अगदी नेमके वर्णन केले आहे. ‘पहिल्या अंकात सामाजिक अन्यायाविरुद्ध भांडलो, दुसऱ्या अंकात काकासाहेबांबरोबर स्वातंत्र्यासाठी झगडलो आणि तिसरा अंक शोकांतिका ठरला,’ असे ते अगदी समर्पक वर्णन आहे. य. दि. पुस्तकाच्या शेवटाकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम या स्वातंत्र्योत्तर काळातील मोठय़ा संघर्षांवर प्रकाश टाकताना जेधेंच्या योगदानाची झलक दाखवतात. द्विभाषिक मुंबई राज्याला विरोध करणारी पहिली सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात पुढाकार घेतला. केशवराव, नाना पाटील, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव यांनी चळवळीचे लोण खेडोपाडी पोहोचवले आणि संघर्षांचा वणवा पेटवला. य. दि.कृत ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या खंडातील क्षणचित्रे या चरित्रात जागोजागी दिसतात. ‘केशवराव जेधे’ चरित्रातील प्रत्येक परिच्छेद महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा बोध करून देतो. राजकीय-सामाजिक मतांतरे, वैचारिक मतभेद, व्यक्तिगत मतभेद, गट-तट आणि मेळ-समेट अशी सर्व प्रकारची आवर्तने अनुभवावयास येतात. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक य. दि. लिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ ऐतिहासिक ऐवज म्हणून साहित्यरसिक कायम आपल्या संग्रही ठेवतील असा मला विश्वास आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book about keshavrao jedhe indian politician zws
Show comments