अंजली कुलकर्णी lokrang@expressindia.com

कवी  सौमित्र यांचा ‘बाउल’  हा दुसरा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ‘..आणि तरीही मी’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानं त्यांच्या कवितेच्या अनोख्या जातकुळीची ओळख पटवली होती. ‘बाउल’ हा त्यांचा नवा संग्रहदेखील त्यांच्यातील वेगळेपण ठळक करणारा आहे. मुख्य म्हणजे सौमित्र या कवीला कुठल्याही रूढ साच्यात बसवता येत नाही आणि ‘साचे मोडणारा कवी’ असाही शिक्का मिरवण्याची हौस त्यांच्या कवितेला नाही. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली फकिरी वृत्ती त्यांच्या कवितेतही दिसून येते.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
article about battle between world champion ding liren and d gukesh
गुकेशच्या प्रयत्नांना यश मिळणार?
Loksatta chaturang  Temperament Obsessive Compulsive Personality Disorder
स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…

‘बाउल’ हे या संग्रहाचे शीर्षक याच फकीर वृत्तीकडे निर्देश करणारे आहे. कवितासंग्रहाच्या सुरुवातीच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘बाउल ’ हा झेन, सूफी आणि हिंदू संत-परंपरांचं मिश्रण असलेला बंगालमधला एक पंथ अथवा लोक म्हणूयात. ‘मॅड अफेक्टेड बाय विंड ’..’वाऱ्यानं बहकलेला’! असे हे एकतारीकार. ते सतत रस्त्यावर असणारे. एका गावात, एका शहरात, एका घरात, एका झाडाखाली ते एका रात्रीपलीकडे कधीही न थांबणारे. फक्त उत्स्फूर्त जगण्यावर विश्वास असणारे.

या संग्रहातील सर्व कवितांमधून कवीची म्हणा वा कवितागत नायकाची म्हणा- ही उन्मुक्त भटकेपणात, उत्स्फूर्ततेत ऊर्जा शोधणारी वृत्ती भरून राहिली आहे.

‘गावातला शेवटचा जागा माणूस

नुकताच झोपी गेला असेल तेव्हा निघावं

निघताना मूर्ख असावं तर्क शोधू नये

साखरझोपेतच सोडावं गाव, शहर वाटेतलं’

इतकं नितळ  निर्हेतुकत्व जपत, निरभ्र मनानं, साऱ्या लौकिक इच्छा-आकांक्षांच्या, ईष्र्या-हव्यासांच्या पल्याड पोहोचत सततची भटकंती करणाऱ्या आणि जगाला प्रेम आणि मानवतेचा प्रकाश वाटत फिरणाऱ्या झेन, सुफी, महानुभाव पंथांच्या शैलीची ओढ त्याच्या पेशींमध्येच आहे. म्हणूनच दुनियादारीचे जगणे जगता जगता अकस्मात तो बाहेर पडतो. भटकत राहतो. आणि कधीतरी पुन्हा परतूनही येतो. अर्थात हा प्रवास बाहेरचा आहे, तसा आतलाही आहे. भूतकाळाचा आहे, तसा वर्तमानाचाही आहे.

‘भूतकाळाच्या धुराची वलयं सोडत

सिगारेटच्या एकेका झुरक्यासोबत

आपोआप वर्तमानात चालत आलो’

एक प्रकारे ‘मं जिंदगी का साथ निभाता चला गया’ अशा स्वरूपाची ही कलंदरी आहे.

वस्तुत: हा सगळा स्वशोधाचा, अंतशरेधाचा  प्रवास आहे. ‘स्व’अस्तित्वाविषयी, मानवी अस्तित्वाविषयी, अस्तित्वाच्या प्रयोजनाविषयी पूर्वापार माणसाच्या मनात प्रश्न, संभ्रम, कुतूहल यांचे असंख्य कल्लोळ उठत आले आहेत. या सगळ्या गुंत्यांच्या मुळाशी जाऊन तिथलं काहीतरी शोधण्याचा ध्यास माणसाला लागतो आणि मग अशी माणसं जगण्यातून आपसूक बाहेर पडून चालायला लागतात. या ध्यासामध्येच ‘बाउल’मधल्या सगळ्या कवितांचा जन्मस्रोत आहे. अंतशरेधाच्या या अस्वस्थ ध्यासात कवितागत ‘मी’ घराबाहेर पडतो. भटकतो. हे भटकणं म्हणजे केवळ प्रेक्षणीय स्थळांचा आस्वाद वा आनंद घेत केलेली मौज नव्हे, तर हा सगळा अस्वस्थ मनाचा शोधप्रवास आहे. या प्रवासात शोधायचं काय आहे आणि काय सापडल्यानं शांततेचं ठिकाण गवसणार आहे, याचा या  ‘मी’ला अंदाज नाही. त्याचा अंदाज करण्यात त्याला स्वारस्यही नाही. खरं सांगायचं तर त्याला काही सापडवण्यापेक्षा शोधण्याच्या प्रवासाची ओढ आहे. ही मनाची अनिवार अपरिहार्यता त्याला ‘आत’ आणि ‘बाहेर’ भटकायला लावते. हे भटकणं शारीरिक तर आहेच, पण मानसिक पातळीवरही आहे. कधी कधी तर आठ-आठ दिवस एका खोलीत बंद राहूनही हा जाणिवांचा मलोगणती प्रवास सुरूच असतो. मनाच्याही आतल्या मनात कित्येकदा कितीतरी अनाकलनीय उलथापालथी सुरू असतात, गूढ घडामोडी घडत असतात, याची कित्येकदा आपल्या स्वतलाही जाणीव नसते. नेणिवेच्या पातळीवर सुरू असणाऱ्या या घडामोडींविषयी कवीला कुतूहल आहे. स्वतच्या अंतकरणाचा तळ ढवळून तिथे खोलवर नेमकं काय दडलंय, ते वर काढून न्याहाळण्याचा ध्यास कवीला लागतो. या ध्यासाच्या या साऱ्या कविता आहेत.

या प्रवासात जीवनानं बहाल केलेले अनेकविध अनुभव आहेत, विचार, स्पंदनं,  वेदना, संवेदना यांनी गजबजलेलं विश्व आहे. जन्माला आल्यापासून आपल्याशी नात्यानं- बिननात्यानं, रक्तानं-बिनरक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं जोडलेल्या/ तोडलेल्या माणसांनी भरलेला गोतावळा आहे. या सगळ्या माणसांशी आपण हरघडी सहकंप पावत असतो. ही नाती आपल्यावर काही ना काही परिणाम करत असतात, आपल्याला घडत/ बिघडवत असतात. त्यांच्यात गुंतायचं नाही असं ठरवलं तरी आपण आतडय़ानं त्यांच्यात गुंतलेलो असतो, हे कित्येक वेळा आपल्यालाही ठाऊक नसतं. ‘बाउल’ या संग्रहात अशा नातेसंबंधांचा धांडोळा घेणाऱ्या काही कविता आहेत. आई, वडील, मुलगा, मित्र, एवढेच नव्हे तर रस्त्यावर भेटलेली अनोळखी माणसंही इथे भावविश्वाचा भाग होऊन येतात. मुंबईतील ज्या बकाल परिसरात त्यांच्या आयुष्याची प्रारंभीची वर्षे गेली, त्या परिसराचा प्रभाव त्यांच्या संवेदन अन् घडणीवर पडलेला जाणवतो.

‘कपाट’ या कवितेत सौमित्र यांनी लिहिले आहे की..

‘ते कपाट उघडल्यावर

मला कळालेल्या तिच्यापेक्षा

बंद कपाटातील आम्ही एकमेकांना आवडतो’

स्त्री-पुरुष संबंधांवर इतकं प्रगल्भ, समंजस आणि स्वीकारशील भाष्य यातल्या कवितांना फार उंचीवर नेऊन ठेवतं.

‘चोवीस चोवीस तेवीस चोवीस’ या कवितेत ते लिहितात..

‘म्हणूनच मी बाहेर पडून सतत काही नवीन करून

तुझी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतो

तू मात्र तुझ्या असण्यानेच तृप्त असतेस’

एवढय़ा पराकोटीच्या शब्दांत स्त्रीच्या स्त्री असण्याचा गौरव ते करतात.

कविता लिहिणं ही एक अत्यंत गंभीरपणे करण्याची बाब आहे, ही कवीची भूमिका त्याच्या कवितांमधून विशेषत्वानं जाणवते. या संग्रहात कवी तसंच कविताविषयक काही कविता आहेत. उदा. ‘कवितावाचन’ या कवितेत कवीने म्हटलं आहे की..

‘कुठे तरी

कधी तरी कविता छापून आल्यावरच

कळावं साऱ्यांना

कवीमध्ये तेव्हाच काही मरून गेल्याचं..’

कविता लिहिणं ही केवळ उथळपणे करण्याचा व्यवहार नसून कवीच्या जगण्याचा, त्याच्या संवेदनांचा तो एक संपृक्त अर्क आहे याचं सूचनच अशा कवितेतून येतं.

या सगळ्या स्वशोधाच्या प्रवासात सौमित्र यांनी केलेली चित्रपट, नाटक इ. अभिनय क्षेत्रातील मुशाफिरी हादेखील एक अपरिहार्य भाग आहे. कविता असो वा थिएटर- कवीची आत्मशोधाची अस्वस्थ तळमळ किती तीव्र आणि उत्कट आहे याचं प्रत्यंतर ‘एका नटाची, नटराजाची प्रार्थना’ या कवितेत येते.

कविता, थिएटर, भटकंती, आतल्या जाणिवांचा प्रवास आणि शोध हे सगळं आहेच; परंतु ज्यानं आपण वेढलेले असतो तो सभोवताल आपण टाळू शकत नाही. कवीच्या संवेदनविश्वाचा तो एक अटळ भाग बनलेला असतो. हा सगळा झमेला मागे टाकून जगण्याचा प्रयत्न फोल ठरतो. सगळीकडून सर्व प्रकारच्या विपरीततेनं भरलेला महानगरातला अस्वस्थ भोवताल त्याच्या अंगावर चाल करून येतो. हिंसा आणि द्वेष यांनी घेरलेल्या वर्तमानात लोकशाहीची पावलोपावली विटंबना होताना दिसते. त्यातून आलेल्या हतबलतेतून एक चीड नसानसांत साठत येते. सौमित्र लिहितात..

‘दर तासा- दीड तासांनी येणारी अस्वस्थता

जाळून टाकण्यासाठी मी पेटवतो सिगारेट’

असे अस्वस्थ उद्गार कवितांच्या ओळी-ओळींतून भेटत राहतात. माणसं, समाज, शहर, देश, नातेसंबंध या साऱ्यांपासून तुटलेपणाची एक विकल जाणीव कुरतडत राहते. ‘स्व’पासूनही तुटलेलं अस्तित्व संभ्रमात लोंबकळत राहतं.

हा सगळा अस्तित्ववादी जाणिवांचा आविष्कार त्यांच्या कवितांमध्ये अत्यंत टिपेला पोहोचतो. सगळ्या कवितांमधून एक आर्त सूर ऐकू येतो. ही काळीज चिरणारी आर्तता कवितागत नायकाच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून राहिली आहे. ही आर्तता, व्याकुळता त्याला कुठेच स्वस्थता लाभू देत नाही याची खोल जाणीव या कविता करून देतात.

सौमित्र यांची शैली हा सगळा संवेदनांचा कल्लोळ विलक्षण ताकदीने पेलून धरते. त्यांच्या भाषेतील आवेग, नाटय़मयता, चित्रमयता, भावशीलता पराकोटीची प्रत्ययकारी आहे. एखाद्या नाटकातील पात्र स्वतशी संवाद करीत बोलत राहावे त्याप्रमाणे सौमित्र कवितेतून बोलत राहतात. वाचताना त्यांच्या कवितेच्या ओळी त्यांच्या घनगंभीर आवाजात ऐकू येऊ लागतात. कवितेसोबत समूहमनापासून अंतर्मनापर्यंतचा हा बाउलपणा आपल्याही मनात भिनत जातो, हेच या कवितांचं संचित म्हणावं लागेल. चित्रकार सुभाष अवचट यांनी केलेलं मुखपृष्ठ आणि सौमित्र यांच्या कवितांची मुळं ज्या परिसरात खोलवर गेलेली आहेत, त्या खारदांडय़ातील सौमित्र यांची छायाचित्रं संग्रहाच्या अमूल्यतेत भर घालतात.

‘बाउल’- सौमित्र, पॉप्युलर प्रकाशन,

पृष्ठे- २४८, मूल्य- ४७५ रुपये.

Story img Loader