वा. ल. कुळकर्णी यांच्याविषयी जुन्या पिढीतले मराठी प्राध्यापक, लेखक आणि वाङ्मयीन मासिकांचे संपादक अतिशय आदराने बोलतात. वा. ल. हे मराठी साहित्यसमीक्षेत एकेकाळी दबदबा असणारं नाव! ‘मराठी साहित्यसमीक्षेत वा. लं.चं नेमकं स्थान काय?’ यासंदर्भात ‘गुरुवर्य वा. ल.’ या पुस्तकात समाविष्ट केलेल्या एका लेखात नरहर कुरुंदकर लिहितात- ‘‘मराठीत कोणाही टीकाकारापेक्षा वा. लं.ची रसिकता अस्सल, निदरेष व अप्रतिहत आहे; हे एक सत्य आहे. १८१८ ते १८८५ हा प्रारंभीचा काळ सोडला तर १८८५ ते १९४५ आणि १९४५ ते आजतागायत असे मराठी वाङ्मयाचे स्थूलमानाने दोन मुख्य गट पडतात. यांपैकी पहिल्या गटाचे युगप्रवर्तक समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आहेत; तर दुसऱ्या गटातील युगप्रवर्तक समीक्षक स्वत: वा. ल. आहेत; हे असेच दुसरे सत्य आहे.’’
कुरुंदकरांचा हा लेख मराठवाडा साहित्य परिषदेने काढलेल्या वा. ल. विशेषांकातून घेतलेला आहे. १९६५ साली वा. ल. हैद्राबाद इथे भरलेल्या ४६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी हा अंक काढला होता. २०११-१२ हे वा. लं.चे जन्मशताब्दी र्वष. त्यानिमित्ताने ‘गुरुवर्य वा. ल.’ या स्मृतिग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘हौसेला मोल नाही’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे, तसंच गुरुऋण व्यक्त करण्यालाही मोल नसतं, असं हा ग्रंथ पाहून वाटतं. २६-२७ वर्षांपूर्वी वा. लं.वर त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त एक गौरवग्रंथ प्रकाशित झाला होता. तो श्री. पु. भागवत आणि इतरांनी संपादित केला होता. गौरवग्रंथ असूनही त्याची पृष्ठमर्यादा २५० पानांच्या वर नसावी. वा. लं.च्या १५-१६ पुस्तकांपैकी कोणतेही पुस्तक २५० पानांच्या आतच आहे. पण ‘गुरुवर्य वा. ल.’ हा स्मृतिग्रंथ ४०० पानांचा आहे आणि यातील बहुतेक लेख हे १५-२० वर्षांपूर्वी कुठे ना कुठे प्रकाशित झालेले आहेत. जे नव्याने समाविष्ट केलेले लेख आहेत, त्यांचा दर्जा सुमार म्हणावा इतका वाईट आहे. यातल्या एकंदर लेखांची संख्या आहे ४३. त्यात सुधीर रसाळ यांचे दोन, रामदास भटकळ यांचे तीन, नरेन्द्र चपळगावकर यांचे दोन, विजया राजाध्यक्ष यांचे दोन लेख आहेत. मंगेश पाडगांवकर यांची एक छोटीशी आठवण आहे. श्री. पु. भागवत, नरहर कुरुंदकर, रामदास भटकळ यांचे लेख आणि विजया राजाध्यक्ष यांनी घेतलेली वा. लं.ची मुलाखत सोडली तर बाकी सर्व लेख जुजबी आठवणीवजाच आहेत. काही लेख तर अगदी पानभराचेच आहेत. शिवाय या लेखांचा क्रमही व्यवस्थित नाही. संपादनाची कोणतेही शिस्त पाळलेली दिसत नाही. त्यामुळे ग्रंथाची पृष्ठसंख्या विनाकारण वाढली आहे. संपादनाची काटेकोर शिस्त लावून ती ४०० पानांवरून किमान २०० वर आणली असती तर हा ग्रंथ वाचनीय होऊ शकला असता. सध्याच्या स्वरूपात तो तसा झालेला नाही. वा. लं.च्या विद्यार्थ्यांचा हा प्रताप पाहायला वा. ल. हयात नाहीत, ही फार म्हणजे फारच सुदैवाची गोष्ट आहे.
‘गुरुवर्य वा. ल.’ : संकलन- संपादन : शिल्पा तेंडुलकर, चांदणवेल प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- ३९८,
मूल्य : ३०० रुपये.
जुजबी आठवणीवजा..
वा. ल. कुळकर्णी यांच्याविषयी जुन्या पिढीतले मराठी प्राध्यापक, लेखक आणि वाङ्मयीन मासिकांचे संपादक अतिशय आदराने बोलतात. वा. ल. हे मराठी साहित्यसमीक्षेत एकेकाळी दबदबा असणारं नाव! ‘मराठी साहित्यसमीक्षेत वा. लं.चं नेमकं स्थान काय?’ यासंदर्भात ‘गुरुवर्य वा. ल.’ या पुस्तकात समाविष्ट केलेल्या एका लेखात नरहर कुरुंदकर लिहितात- ‘‘मराठीत कोणाही टीकाकारापेक्षा वा. लं.ची रसिकता अस्सल, निदरेष व अप्रतिहत आहे; हे एक सत्य आहे.

First published on: 23-12-2012 at 12:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book guruvarya v l kulkarni