‘साहित्यपालवीचे रंग आणि रूप’ असं या लेखसंग्रहाचं नाव असलं तरी हा आहे, पुस्तक परीक्षणांचा संग्रह. लेखकाने वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा आणि सहा प्रस्तावनांचा समावेश या संग्रहात आहे. लेखकाने सुरुवातीच्या निवेदनात साहित्याला प्रसारमाध्यमे – विशेषत वर्तमानपत्रं – आता पूर्वीसारखी प्रसिद्धी देत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. पण गंमत म्हणजे यातील सहा प्रस्तावना वगळता बाकी बहुतेक लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधूनच प्रकाशित झाले आहेत. डॉ. जर्नादन वाघमारे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, बा. ह. कल्याणकर, बाबा भांड या प्रस्थापित लेखकांबरोबर बंकट पाटील, एकनाथ आबूज, ग. पि. कनुरकर, सुनंदा गोरे, अनिरुद्ध नाईक, राजा मुकुंद, दत्तात्रय उकंडे, प्रकाश ताडले, शंकर वाडेवाले या नव्या लेखकांच्या पुस्तकांवरही लिहिलं आहे, हा या पुस्तकाचा एक विशेष म्हणून सांगता येईल. १९७५ नंतर लिहू लागलेल्या या लेखकांची घेतलेली जाणीवपूर्वक दखल आहे. मराठवाडय़ातील ग्रामीण भागांमध्ये राहून लिहू लागलेल्या तरुण लेखकांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा परिचय यातून होऊ शकतो.
‘साहित्यपालवीचे रंग आणि रूप ’- डॉ. वासुदेव मुलाटे,
स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद,पृष्ठे – १६१, मूल्य – १८० रुपये.
कादंबरीवजा दीर्घकथाही वेंकट आणि दिव्या या उच्चशिक्षित तरुण जोडप्याची गोष्ट आहे. म्हटलं तर कादंबरी म्हटलं तर दीर्घकथा. वेंकट आणि दिव्याने बायो-डायव्हर्सिटी या विषयामध्ये पीएच.डी. केलेली आहे. तरीही मोठय़ा शहरामधली, एसी केबीनमधली नोकरी सोडून ते बंगळुरूजवळच्या एका जंगलात अभ्यास करायला जातात. त्यामुळे आयुष्यभर शहरात वाढलेल्या दिव्याच्या मनातले विचारांचे तरंग हा या कादंबरीचा प्रधान विषय. आपल्या आवडीचं काम मन लावून, जीव ओतून करणं आणि त्यासाठी कायम पाठीशी असणाऱ्या जोडीदाराचा समंजसपणा, इतक्या साध्या गोष्टीवर या कादंबरी वा दीर्घकथेचा डोलारा उभा आहे. लेखिकने त्यात आपल्या परीने प्राण फुंकायचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना आजच्या करिअरिस्ट तरुण-तरुणीची गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे ‘आजच्या जगण्याचं वेगळं भान देणारी वेगळी कादंबरी’ असं मलपृष्ठावर वर्णन असलं तरी ही काहीशी सरधोपटच कादंबरी आहे, किंबहुना प्रदीर्घ कथा आहे.
‘निजखूण’ – नीलिमा बोरवणकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – १२८, मूल्य – १५० रुपये.