महाराष्ट्राला व मराठीला अभिमानास्पद वाटावी अशी कोशपरंपरा आहे. २०१० साली महत्प्रयासाने पूर्णत्वाला गेलेला गोव्याच्या (कै.) श्रीराम कामत यांचा ‘मराठी विश्वचरित्रकोश’ हा या मणिमालेत गुंफला गेलेला आणखी एक उज्ज्वल मुक्तामणी!
‘कोश’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘खजिना’ असा आहे आणि ‘खजिना’ म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर ‘द्रव्य’, ‘संपत्ती’, ‘धनदौलत’ हे शब्द उभे राहतात. त्या खजिन्यात भर टाकून द्रव्यसंचय करीत राहिल्यास तो वाढतो व सुरक्षित राहतो आणि त्यातली संपत्ती वेळीअवेळी काढून वारेमाप खर्च करीत राहिल्यास खजिना रिता व्हायला वेळ लागत नाही. याउलट शब्दकोश, ज्ञानकोश, यासारख्या कोशांचं लक्षण विलक्षण आहे-
अपूर्व : कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्।।
अशा प्रकारच्या कोशांतली शब्दसंपत्ती वा ज्ञानसंपत्ती वारंवार काढून तिचा विनियोग करीत राहिल्यास त्या ज्ञानाच्या उपयोजनामुळे ज्ञान अधिकाधिक वाढते व तो कोश अधिकाधिक समृद्ध होतो आणि त्यातील ज्ञानसंचय तसाच बंदिस्त राहिल्यास कालांतराने तो कुंठित होऊन विस्मृतीत जातो.
ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर हे कामतांचे आराध्यदैवत! त्यांचे स्मरण करून श्रीराम कामतांनी १९७६ साली हा प्रकल्प हाती घेतला आणि आयुष्यभराचा ध्यास घेऊन या प्रकल्पाला आयुष्य वाहिले. हा जगन्नाथाचा रथ ओढण्याच्या कामी अनेक तज्ज्ञांचा हातभार लागला असला तरी रथाचे सारथ्य मात्र श्रीकृष्णाऐवजी या श्रीरामाने केले. ‘कीं घेतलें व्रत न हें अम्हिं अंधतेने। बुद्धय़ाचि वाण धरिलें करिं हें सतीचें।’ हा बाणा त्यांनी अखेपर्यंत जपला. २०१० साली कोशकार्याबरोबरच त्यांच्याही जीवनाची इतिश्री झाली.
१९७० साली जेव्हा त्यांनी आपले श्वशुर कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या षष्टय़ब्दिनिमित्त ‘मांडवी’ नियतकालिकाचा अखेरचा अंक काढून त्याचे उद्यापन केले व ‘विश्वचरित्रकोशा’चा नवा संकल्प सोडला, तेव्हापासूनच त्यांनी या महत्कार्याची पायाभरणी सुरू केली. या कार्यासाठी जेव्हा त्यांनी आपल्या सांसारिक अर्थार्जनाची साधने त्यागली, तेव्हा त्याच्या संसाररथाचे दुसरे चाक उचलून धरण्यासाठी त्यांच्या पत्नी गीता कामत यांची अजोड साथ त्यांना लाभली. त्यांच्या पाठिंब्यावर आणि आर्थिक पाठबळावर विसंबून कामत यांनी १९७० ते १९७६ या काळात या जगङ्व्याळ प्रकल्पासाठी भरपूर वाचन करून आवश्यक ती पूर्वतयारी केली. १९७६ साली परवरी येथे त्यांनी विश्वचरित्र संशोधन केंद्राची स्थापना केली आणि या श्रीरामाने हे शिवधनुष्य उचलले व यशस्वीपणे पेललेही!
‘विश्वचरित्रकोशा’चा पहिला खंड २००० साली प्रसिद्ध झाला. त्या खंडाला संपादक श्रीराम कामत यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व मननीय अशी प्रस्तावना लिहिली असून, तीमध्ये एकंदर जागतिक कोशवाङ्मयासंबंधीच्या त्यांच्या सखोल ज्ञानसंचिताचे प्रतिबिंब पडले आहे. जगातील कोशवाङ्मयाचा प्रारंभ, आजवर ठिकठिकाणी झालेले कोशरचनेचे प्रयत्न, शब्दकोश, संज्ञाकोश, व्यक्तिचरित्रकोश अशांसारखे विविध कोशप्रकार, एकेका ज्ञानशाखेगणिक तयार होणारे विशेषीकृत कोश अशा अनेक अंगांनी त्यांनी जो आढावा त्यात घेतला आहे, तो वाचून वाचकाची मती गुंग होते. याचा अर्थ असा की, प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक ती बैठक त्यांनी कमावली होती.
कोश-प्रकल्पाला प्रारंभ करण्यासाठी किमान आवश्यक ते द्रव्यबळ व मनुष्यबळ जमवल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या साहाय्याने कोशाची रूपरेषा ठरवली. प्रथम त्यांनी मानवी ज्ञानक्षेत्राचे ७४० पैलू निश्चित केले व कोणाकोणाची संक्षिप्त चरित्रे समाविष्ट करावी यासंबंधीचे काही निकष ठरवले, ते असे- (१) मानवी ज्ञानाला मूलभूत योगदान, (२) मानवी ज्ञानाला क्रांतिकारक योगदान, (३) मानवी ज्ञानाचा विकास व संशोधन यासाठी जन्मभर परिश्रम आणि (४) या निकषांमध्ये बसणाऱ्या व्यक्ती जगातील कोणत्याही प्रदेशात असल्या तरी त्यांचा समावेश.
या एकेका विषयातील तज्ज्ञ म्हणून २५३ व्यक्तींची निवड करण्यात आली. चरित्र-नोंदींसाठी १५०० तज्ज्ञांचा सहभाग मिळाला. सर्व तज्ज्ञांच्या प्रयत्नातून सुरुवातीला दोन लाख नावे पुढे आली. त्यापैकी २०,००० नावांची यादी निश्चित करण्यात आली. २००० ते २०१० या प्रदीर्घ कालावधीत जे खंड क्रमश: प्रकाशित झाले त्यांची सरासरी पृष्ठसंख्या १००० असून आजमितीला एकूण पृष्ठसंख्या ५१२३ एवढी झालेली आहे. ६ मे २००० रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पहिला खंड प्रकाशित झाला.
‘विश्वचरित्रकोशा’तील सर्व नोंदी सर्वसाधारणपणे त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून लिहून घेतल्या असल्या तरी काही वेळा त्या मुदतीत येऊ शकल्या नाहीत. म्हणून काही नोंदी विश्वचरित्र संशोधन केंद्रातील कार्यकर्त्यांनीही संदर्भ ग्रंथांच्या आधारे स्वत: तयार केल्या. मात्र त्या विषयतज्ज्ञांकडून तपासून घेण्यात आल्या. या कोशात ७४० ज्ञानक्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी केलेल्या वैशिष्टय़पूर्ण व्यक्तींचा जसा समावेश करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे अपकीर्तीमुळे कुख्यात झालेल्या; पण तरीही जागतिक इतिहासात लक्षणीय ठरलेल्या व्यक्तींचाही यात समावेश केलेला आहे. काही झाले तरी कोणत्याही महाकाय प्रकल्पाला व्यावहारिक पृष्ठसंख्येचे बंधन पाळावे लागत असल्याने काही क्षेत्रांबाबतीत प्रातिनिधिक निवड करणे त्यांना भाग पडले आहे. तरीही आशिया व आफ्रिका खंडांतील तुलनेने अप्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश त्यात करण्यात आला आहे. बहुतेक नोंदी प्रथम आडनाव व मग नावाची आद्याक्षरे या क्रमाने घेतलेल्या असल्या तरी काही अपवादात्मक बाबतीत प्रसिद्ध टोपणनावांनिशीही (उदा. कुसुमाग्रज, अनिल, इ.) नोंदी केल्या आहेत. या सर्व नोंदींची अकारविल्हे सूची अखेरच्या सहाव्या खंडात अखेरीस दिलेली आहे. सर्वसाधारणपणे ‘मराठी विश्वकोशा’ची परिभाषा व संक्षेप-पद्धती यात अवलंबिलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी तर आहेच.
संकल्पित कोशाचा पहिला खंड २००० साली प्रकाशित झाल्यानंतर २००२ साली दुसरा खंड, २००५ साली तिसरा खंड व त्यानंतर २००९ सालापर्यंत पुढील तीन खंड सिद्ध झाले. फक्त प्रत्यक्षात ते प्रकाशित होण्यासाठी २०१० साल उजाडले. या संपूर्ण काळात श्रीराम कामत यांनी मुख्य संपादक व व्यवस्थापक या दोन्ही जबाबदाऱ्या मोठय़ा शर्थीने निभावल्या. या उपक्रमासाठी लागणारे द्रव्यबळ व मनुष्यबळ गाठीला जोडण्यासाठी त्यांना काय काय अग्निदिव्ये करावी लागली त्याची कहाणी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. एक गोष्ट खरी की, गोव्यात वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सत्ता आली तरी त्या सर्वानी आपापले पक्षभेद विसरून एकमुखाने या प्रकल्पाची पाठराखण केली आणि दरवर्षी तीन लाख रुपये याप्रमाणे अनुदानाची परंपरा चालू ठेवली. त्याचप्रमाणे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखालील म्हैसूरचे केंद्रीय भारतीय भाषा संस्थान आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनीही या कोशास भरीव आर्थिक साहाय्य दिले.
दुर्दैवाची बाब अशी की, या प्रकल्पाचे प्रेरणास्थान असलेल्या गीता कामत यांचे नोव्हेंबर २००८ मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यानंतर अखेरचा खंड उपान्त्य अवस्थेत असताना खुद्द श्रीराम कामत यांचे फेब्रुवारी २०१० मध्ये देहावसान झाले. जणू अपत्यजन्माची घटिका समीप येताक्षणी कृतकृत्य होऊन या दाम्पत्याने अखेरचा श्वास सोडला असावा. त्यानंतर त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांनी २०१० साली अखेरचा खंड प्रकाशित केला. हा ग्रंथराज म्हणजे ‘भगवद्गीते’त वर्णिल्याप्रमाणे जणू ‘विश्वरूपदर्शनयोग’च होय!
‘मराठी विश्वचरित्रकोश’, संपादक : श्रीराम कामत, विश्वचरित्र संशोधन केंद्र, परवरी, गोवा, खंड : १ ते ६, पृष्ठसंख्या : ५१२३, किंमत : प्रतिखंड : १५०० रुपये.

लेखातील दुरुस्ती
अतुल पेठे
‘लोकरंग’(३० डिसेंबर) मधील ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या तिसऱ्या खंडावरील लेखात मी काही त्रुटी दाखवल्या होत्या. त्याबद्दल नंतर लेखकाशी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे लक्षात आले आणि पटले. या खंडांची शपथ ही मुख्यत्वे १९८५ पर्यंतची रंगभूमी असल्यामुळे यापूर्वीचीच प्रसिद्ध झालेली अथवा केली गेलेली नाटके आणि नाटककार ही त्याची मर्यादा आहे. तसेच मराठी रंगभूमीवर नवा प्रवाह आणणारे नाटक ही त्यांची निवड आहे. तसेच दिग्दर्शकांच्या दृष्टीने काही अभ्यास करण्याकरता इथे कुठलीही साधने अथवा दस्तावेजीकरण नाही, ही मोठीच समस्या आहे आणि मला ते अर्थातच मान्य आहे.

Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
tasty Bundi modak
बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बुंदीचा मोदक; नोट करा साहित्य आणि कृती
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
Ganesh Chaturthi 2024 Quiz
Ganesh Chaturthi 2024: आपल्या लाडक्या गणपती बाप्पांविषयी तुम्हाला किती माहिती आहे? या प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीस जिंका!
marathi sahitya sammelan delhi marathi news
दिल्लीत अडकलेले ‘मराठी’…