अभिनेत्री व लेखिका अनुराधा राजाध्यक्ष यांच्या ‘संवाद स्वत:शी’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्या होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या लेखनाविषयी व्यक्त केलेलं मनोगत..
म्हटलं तर सगळ्यांचंच सगळं काही छान आणि सुरळीत चाललेलं असतं. कुणी पहाटेचा गजर लावून, तर कुणी सूर्य डोक्यावर आला तरी अंथरुणात लोळून दिवसांचा रतीब घालत असतं. म्हणजे त्यांच्या त्यांच्या परीनं सगळ्यांचंच सगळं काही छान आणि सुरळीत चाललेलं असतं. कुणाला उन्हात घाम गाळावा लागतो. कुणाला चोवीस तास एसी हवा असतो. साधा चहाच, पण तीन रुपयांत, तीस रुपयांत आणि तीनशे रुपयांतही उपलब्ध असतो. तो तसा तसा पिणाऱ्यांना परवडतही असतो. कष्टकऱ्यांना कामाची, शेतकऱ्यांना पिकाची, नोकरदाराला पगाराची, कुणाला धंदा वाढीची, निर्यातीची, शेअर्सची, मार्काची, बढतीची, परराष्ट्रीय धोरणांची, भ्रष्टाचाराची वगैरे वगैरे चिंता असते, त्या त्या हुद्दय़ानुसार.. म्हणूनच बहुतेकांकडे नसतो वेळ करायला विचार..
ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तरच यश मिळतं, हा चांगलाच आहे संस्कार.. पण म्हणून वाटेवर आडव्या आलेल्या गोष्टींसाठी देणं-घेणंच नसल्यासारखा असावा का संवेदनशून्य व्यवहार. ही संवेदनशून्यता नाइलाजानं येते म्हणे.. नाइलाज वेळ नसण्याचा, नाइलाज माझ्या एकटय़ामुळे थोडीच जग बदलणार आहे, या रामबाण प्रश्नाचा.. तर कधी कधी माझा ज्या प्रश्नाशी अर्थाअर्थी काही संबंधच नाही त्यात मी कशाला नाक खुपसू, या अलिप्ततेचा!
या सगळ्याचाच मीही एक अविभाज्य हिस्सा झाले असते नक्कीच. पण आईनं ते घडू दिलं नाही आणि वरवर शांत दिसणाऱ्या बाबांनी जागरूक धाडसाला, परिणामांना घाबरून कधी खीळ घातली नाही. मला चांगलाच आठवतोय तो प्रसंग. माझी छेड काढणाऱ्या एका मुलाची, महाविद्यालयात तक्रार केल्यावर महाविद्यलयानं त्याच्यावर कडक कारवाई केली होती आणि ती कारवाई केली जाऊ नये म्हणून मी माघार घ्यावी, अशी त्या मुलानं घरी येऊन धमकी देण्याची अरेरावी केली होती. असे प्रसंग चित्रपटात बघताना घासून गुळगुळीत झाल्यासारखे वाटतात. पण प्रत्यक्षात घडले की निर्णयक्षमतेची कसोटी घेणारे ठरतात. त्यातून हा प्रसंग घडला तो काळ १९८३चा. पण त्या वेळी बाबांनी त्याला सांगितलं, ‘‘माझी मुलगी चुकलेली नाही. तुझ्या निमित्तानं एका भयानक वृत्तीला नामशेष करण्यासाठी तिनं उचललेलं हे धाडसी पाऊल, कदाचित तुला तिचं आणखी बरं-वाईट करण्याची दुर्बुद्धीही देईल. म्हणजे खून, बलात्कार.. काहीही.. पण एकच सांगतो, असं काही झालं म्हणून आम्ही उद्ध्वस्त वगैरे होणार नाही. मात्र या ‘कदाचित’ घडणाऱ्या घटनांना घाबरून मी माझ्या मुलीला माघार घ्यायला लावली ना, तर तिचं आयुष्य ‘आम्ही’ उद्ध्वस्त केलं असं होईल. आणि शक्यता तर तू बदलण्याचीसुद्धा आहेच की! ती शक्यता तुला एक चांगला माणूसही घडवेल. आणि माझा चांगुलपणावर विश्वास आहे.’’ तो मुलगा निमूटपणे निघून गेला. नंतर त्याच्या आई-वडिलांनी येऊन माफीही मागितली. माझे बाबा एसटीमध्ये कारकून होते. हे मी एवढय़ासाठीच सांगते आहे की त्यांच्या अशा बोलण्यामागे कोणताही तथाकथित हुद्दा, खुर्ची नव्हती हे लक्षात यावं.
चौथीत असतानाच नाशिकच्या त्या वेळच्या नगरपालिकेच्या सभागृहात आईनं मला भाषण करायला लावलं होतं- ‘नाशिकचे रस्ते’ या विषयावर. ‘पावसाळ्यात वेगळे गमबूट घालावेच लागत नाहीत, गुडघाभर चिखलच ते काम करतो,’ असं उपहासात्मक भाषण ही ‘संवाद स्वत:शी’ची सुरुवात होती, असंच म्हणावं लागेल. आई नेहमी म्हणायची, ‘‘फारतर काय होईल, कदाचित परिस्थिती जैसे थे राहील.. पण त्यातला कदाचित शब्द महत्त्वाचा आहे ना! तो हेच सांगतो की परिस्थिती बदलण्याची शक्यता आपल्या कृतीनं निर्माण होईल. मग ही शक्यता अजमावून पाहायला काय हरकत आहे.’’ व्यक्त होणं सवयीचं कसं बनलं हे कळावं म्हणून हे उल्लेख!
माझं पुस्तक केवळ डोळस वाचकांसाठीच नव्हे तर ते ब्रेलमध्येही यावं या माझ्या इच्छेला फलस्वरूप मिळालं. हा आनंद अवर्णनीयच आहे. आईनं घडवलं आणि सासूबाईंनी घडलेलं टिकवलं, म्हणून तर हा मनसोक्त संवाद स्वत:शी करता आला. या सर्वाच्या मी सदैव ऋणात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा