नव्वदोत्तर काळ हा जागतिकीकरणामुळे वेगाने बदलत चाललेला आहे. जागतिकीकरण ही व्यामिश्र आणि चांगल्या-वाईटाचे मिश्रण असलेली आर्थिक, सांस्कृतिक घटना आहे. जागतिकीकरणाकडे विश्राम गुप्ते वस्तुनिष्ठ, अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहत असले तरी त्याविषयी ते अनुकूल आहेत असे जाणवते. ‘या काळात नवी मूल्यरचना निर्माण होते आहे, त्यातून अभूतपूर्व ताणतणाव निर्माण होत आहेत. मानसिक स्थैर्य, ज्येष्ठांबद्दल धाक, चिरंतन मूल्यांबद्दल आदर, इतिहासाबद्दल रम्य समजूत या जमीनदारी अवस्थेत रुजणाऱ्या मूल्यांची सद्दी संपलेली आहे, त्याऐवजी लोकशाही आणि समतेवर आधारित नव्या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना होते आहे. एकविसाव्या शतकात पारंपरिक सामाजिक उतरंड मोडली जाऊन एक आडवी समाजव्यवस्था अस्तित्वात येते आहे ही गोष्ट खेदजनक नाही, असं पोस्टमॉडर्निझमचं तत्त्व सांगतं.’ विश्राम गुप्ते यांनी याप्रमाणे उत्तरआधुनिकतेचा ठोस पाया घेतलेला आहे. ‘उत्तर आधुनिक जाणीव ही विचार करण्याची आणि संहिता वाचनाची अनोखी शैली’ कशी आहे याचे प्रत्यंतर गुप्ते यांनी या आठ कवींच्या बावीस कवितासंग्रहातील प्रातिनिधिक कवितांची उदाहरणे देत प्रत्येक कवीवर स्वतंत्रपणे जे भाष्य केले आहे त्यातून येत राहते. गुप्ते यांनी अत्यंत आस्थेवाईकपणाने नव्वदोत्तर कविता वाचलेली आहे. नव्वदोत्तर कवितेसंबंधी निरीक्षण मांडताना साठोत्तरी कवितेचाच नव्हे तर त्याआधीच्या आधुनिक-मर्ढेकर समकालीन कवींचा आणि त्यापूर्वीच्या रोमॅण्टिक कवितेचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे हेही या निबंधात दिसत राहते. याशिवाय उत्तम कवितेची अभिजात जाण त्यांना आहे. त्यामुळे नव्वदोत्तरी कवितेचा आशय बारकाव्यानिशी उलगडून दाखवताना, तीत व्यक्त होणाऱ्या ताणांमागचा कार्यकारणभाव समजावून देताना या कवितेची व्यामिश्रता ते स्पष्ट करतात.
एरवी, सामान्य वाचक गोंधळून जाईल, दचकून बाजूला सरकेल, या कवितेपासून चार हात दूर राहणेच पसंत करील अशा गुंतागुंतीच्या आशयाच्या आणि लोकविलक्षण अभिव्यक्तीचा हेतुपुरस्सर वापर करण्याच्या, भाषेचे व शैलीचे करकरीत प्रयोग करणाऱ्या नव्वदोत्तर कवितेला विश्राम गुप्ते अतिशय शांतपणे, समजुतीने जवळून जाणून घेताना दिसतात. त्यांचे विश्लेषण अत्यंत धारदार आहे, आणि विवेचन सुस्पष्ट आहे. या कवींच्या मर्यादाही ते मर्मज्ञपणे दाखवून देतात. हेमंत दिवटे जागतिकीकरणाकडे एक सांस्कृतिक संकट म्हणून बघतात. उत्तरआधुनिक स्थितीबद्दल शोक व्यक्त करतात, जागतिकीकरणातून व्यक्त होणारा आशावादी आशय त्यांच्या कवितेतून व्यक्त होत नाही. लिंगगंड, लिंगशोक आणि लिंगभाग या तीन मर्यादेबाहेर संजीव खांडेकरांची कविता येत नाही आणि त्यामुळे प्रतिमांची नेत्रदीपक आतषबाजी करूनही कवितेचं विधान उभं राहत नाही, अशा प्रकारची तल्लख निरीक्षणे ते नोंदवतात.
विश्राम गुप्ते यांच्या दीर्घ निबंधात प्रत्येक कवीच्या कवितेचा शोध कमालीच्या संवेदनशीलतेने घेतलेला आहे. उदाहरणार्थ, मंगेश काळे यांच्या कवितेतून प्रकटणारे अस्तित्ववादी व्याकूळतेचे संदर्भ त्यांना जाणवतात, ‘शक्तिपाताचे सूत्र’ या कवितेत प्रखर आत्मताडन आहे, ‘तृतीय पुरुषाचे आगमन’ ही कविता काळाच्या संदर्भात भीषण संकेत देणारी आहे. ही निरीक्षणे या कवितांचे बारकाईने आणि संवेदनक्षम मनाने वाचन केल्याशिवाय येऊ शकत नाहीत, पण त्याचबरोबर, ‘ही प्रदीर्घ कविता अतिप्रयोगशील आणि अतिनिवेदनशील वाटते. शैलीचा अतिरेक करणारी ही कविता प्रायोगिकतेच्या ओझ्याखाली दबलेलं कलात्मक विधान आहे’ असा थेट आणि नि:संदिग्ध निष्कर्ष ते मांडतात. ‘शब्दांशी खेळणाऱ्या श्रीधरचे शब्द आणि तो वापरत असलेला सादृश्यभाव शाळकरी बालिश उत्साहाने व्यक्त होतो. श्रीधरच्या कवितांची संवेदनशीलता अपवादापुरती नवी दिसते. एरव्ही ती भावुक भाषेत, सांकेतिक प्रतिमांच्या रूपात, रोमँटिक आवेशात पण नव्या जॉर्गन्समध्ये बोलते,’ हा श्रीधर तिळवेसंबंधीचा अभिप्राय, ‘सलील वाघ यांची कविता विरोधाभासी आहे, ती एकाच वेळी रोमँटिक आणि उत्तर आधुनिक आहे,’, ‘अस्तित्ववादी चिंतातुरता आणि उत्तर आधुनिक माणसाच्या आत्म्याचा आक्रोश हे सचिन केतकरच्या कवितेचं मुख्य विधान आहे,’, ‘वर्जेशच्या कविता ‘स्व’ आणि सामाजिकतेच्या संघर्षांतून निर्माण होणाऱ्या ताणतणावाबद्दल आहेत, परंतु कवीच्या भयभीत पवित्र्यामुळे ही आस कवितेमध्ये अपूर्ण राहते,’- ही या कवितांसंबंधीची काही विधाने गुप्ते यांच्या एकूण समीक्षादृष्टीची मार्मिकता दाखवून देणारी आहेत.
नव्वदोत्तर काळातले हे आठ आणि इतरही कवी त्यांच्या आधीच्या सौंदर्यवादी, परात्मतावादी-अस्तित्ववादी, कृषिवादी, परिवर्तनवादी, देशीवादी इत्यादी प्रकारच्या कवितेहून वेगळी आणि नव्या जाणीवेची कविता नव्या भाषेत लिहीत असल्याच्या आविर्भावात काहीशा आत्मप्रौढीच्या चढय़ा सुरात बोलत आणि लिहीत आहेत. या सर्वच प्रकारच्या नव्वदपूर्व कवितेची समीक्षा काहीशा सहानुभूतीने, आस्थेने व गांभीर्याने केलीही गेली आहे व केली जात आहे. नव्वदोत्तर कवी रूढ समीक्षेला आणि समीक्षकांना ‘फाटय़ावर मारण्याचा’ पवित्रा घेत आत्ममग्न वृत्तीने स्वत:च्या जाणिवा प्रकट करीत राहिले. ‘आपल्याला प्रस्थापित समीक्षक स्वीकारत नाहीत’ अशी न्यूनत्वाची भावना किंवा न्यूनगंड या नव्वदोत्तर कवींमध्ये असेल असे मला तरी वाटत नाही. लोकप्रिय कवितेच्या संवेदनशीलतेला नाकारून ते जर कविता लिहीत आहेत तर लोकप्रिय किंवा तत्सम अभिरुचीच्या समीक्षकांची आस त्यांना असणारच नाही. उलट विश्राम गुप्ते म्हणतात त्याप्रमाणे ‘जुन्या कवितेच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक अधिसत्तेची विरचना’ करणारी ही नवी कविता, ‘तात्पुरत्या भौतिकवादी, वास्तववादी, प्रक्रियानिष्ठ, अनियंत्रित आणि मुक्तछंदवादी मूल्यांचा जागर करते.’ या ‘नवोत्तर’ कवितेच्या जाणिवेचा धांडोळा घेत ‘नव्या शतकातल्या सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, तात्त्विक आणि आर्थिक ऊर्जेच्या स्रोतांचं आणि प्रभावाचं भान या कवितेत आहे की नाही हे तपासून पाहणारा हा निबंध आणखी एका दृष्टीने लक्षणीय ठरतो. ‘नवोत्तर’ (नव्वदोत्तर कवितेला व जाणीवेला गुप्ते ‘नवोत्तर’ असा शब्द वापरतात.) कविता ही संस्कृतीबद्दलची कविता आहे. ‘मूल्यपरिवर्तनातून माणसं उदास होतात, डिप्रेस्ड, हिंसक होतात, भांबावून जातात, बाह्य़ बदल, त्यातून अंतर्गत उलथापालथ, त्यातून संभ्रम आणि अखेरीस दु:ख हा बदलांना दिलेला स्वाभाविक मानवी प्रतिसाद हे आठ कवी देताहेत’ अशी आस्थेवाईक भूमिका घेऊनही पोस्टमॉडर्न दृष्टीचा भक्कम पाया स्वीकारल्याने विश्राम गुप्ते यांनी या आठही कवींच्या संदर्भात जे मूलभूत प्रश्न विचारले आहेत ते त्यांना अद्याप कुणी विचारले नव्हते, ज्या दिशेने या कवींनी विचारही केला नव्हता, असे आहेत. या आठ कवींनी जागतिकीकरणाचा अनुभव व्यक्तिनिष्ठ चष्म्यातून प्रक्षेपित केला, पण हा अनुभव सत्याची प्रतिकृती आहे की सत्याचा विपर्यास, हा एक प्रश्न. ‘पोस्टमॉडर्न दर्शन महान किंवा सनातन परंपरेवर संशय व्यक्त करतं. परंपरेचं महासत्त्व सापेक्ष आहे, ते निरपेक्ष नाही ही भूमिका या आठ कवींपैकी किती जणांना मंजूर होईल, हा दुसरा प्रश्न. कारण या आठ कवींना परंपरेचा पुरेसा अभिमान आहे. (प्रत्येक कवीवरच्या लेखात गुप्ते यांनी ते पद्धतशीरपणे लक्षात आणून दिले आहे.) या तात्त्विक प्रश्नांव्यतिरिक्त, ‘हेमंत आणि तीव्र बौद्धिक असूनही, (ज्यामुळे संजीवच्या कवितांचं अंतर्गत जग शुष्क राहतं) संजीव केतकरसुद्धा जागतिकीकरणाकडे बायनरी लॉजिकमधूनच बघताहेत, श्रीधर तिळवे यांची कविता ‘जागतिकीकरणाची सांकेतिक समीक्षा करते, या काळाबद्दल रॅडिकल विधान करीत नाही,’, ‘महानगरी, नवोत्तर, प्रयोगशील, जॉर्गन्सचा अतिरेकी वापर करणाऱ्या मन्या जोशीच्या विडंबनात्मक कवितेला निहिलिझम प्रसारित करायचा आहे काय?’ – अशी जी निरीक्षणे आणि प्रश्न गुप्ते यांनी नोंदवले आहेत तेही या कवींना स्वत:च्या कवितेचा विचार करायला लावणारे आहेत.
गंभीर पण खेळकर, समीक्षात्मक पण अजिबात क्लिष्ट नसलेला, परखड व मर्मग्राही असा विश्राम गुप्ते यांचा आठ महानगरी कवींची सांगोपांग चिकित्सा करणारा, तल्लख, तिरकस शैलीतला हा प्रदीर्घ निबंध नवोत्तरी जाणीव आणि त्या जाणीवेतून लिहिली जाणारी कविता समजावून घेण्याच्या दृष्टीने या कवितेपासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या सर्व स्तरांवरच्या वाचकांनी, आस्थेवाईक पण कवितेची जाण असणारा समीक्षक आपल्या कवितेला नेमकेपणाने भिडून तिच्यातल्या अंतर्गत विसंगतीवर कसे बोट ठेवतो हे समजून घेण्यासाठी कवींनी आणि एखादा समीक्षालेख कसा असावा, कसा सखोल, चिकित्सक, सर्वागीण आणि आपली काहीएक तात्त्विक भूमिका घेऊन आणि ती कुठेही विचलित होऊ न देता कसा लिहावा याचे मॉडेल म्हणून मराठीच्या एकूण एक प्राध्यापकांनी वाचलाच पाहिजे. मला स्वत:ला पुन: पुन्हा हा लेख वाचताना मिळालेला बौद्धिक आनंद अवर्णनीय आहे. या लेखाबद्दल विश्राम गुप्ते यांचे आणि मौलिक, अंतर्दृष्टी देणारा हा निबंध खास अंक काढून छापल्याबद्दल संपादकद्वयीचे मन:पूर्वक आभार.
अतिरिक्त (मार्च २०१३) – संपा. दा. गो. काळे, दिनकर मनवर, पाने – २०८, मूल्य – २०० रुपये.
नव्वदोत्तर कवितेची झाडाझडती
‘अतिरिक्त’ या अनियतकालिकाचा ताजा अंक आवर्जून दखल घ्यावा असा आहे. ‘अतिरिक्त’ हे अनियतकालिक कवी दिनकर मनवर आणि दा. गो. काळे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-06-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book reivew atirikta march