रॉय किणीकर यांच्या जन्मशताब्दीचे (२००८) औचित्य साधून या अवलियाच्या सर्व १४ प्रकाशित पुस्तकांची पुनर्मुद्रणे उपलब्ध झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी- २०१३ च्या जानेवारीत आणखी अप्रकाशित रॉय किणीकर नव्याने पुस्तकरूपात आले, ते हे- ‘शिल्पायन’! भारतीय शिल्पकलेबद्दल रॉय किणीकरांनी वेळोवेळी काढलेल्या टिपणांमधून तयार झालेल्या चार निबंधांचा (‘लघु’निबंध नव्हे; विषयव्याप्ती आणि शब्दसंख्या या दोन्ही दृष्टीने निबंधांचा!) हा संग्रह. हे पुस्तक वाचकाला केवळ शब्दांमध्ये जखडून न ठेवता भारतीय आणि प्रसंगी अन्य संस्कृतींच्या कालातीत प्रदेशात नेऊन उघडय़ा डोळ्यांनी शाश्वत मानवी अनुभवांच्या रूपसौंदर्याकडे पाहायला लावणारे आहे. त्यामुळे ते उत्तम व देखणे व्हावे यासाठी रॉय किणीकर यांचे पुत्र अनिल किणीकरही लक्ष घालत होते.
रॉय किणीकर हे मूळचे कवी. काळानुसार संस्कृती समृद्ध होत गेली असली आणि देशोदेशी तिची रूपे निरनिराळी घडली असली, तरी कवीला त्याच्या काव्यक्षणी हे देशकालाचे बंधन राहत नसते. उलट, या देशकालाच्या सीमा भेदून संस्कृतीच्या असीम प्रदेशात विहरण्याचा परवाना कवींकडे असतो. हे विधान अलंकारिक वाटेल; पण रॉय किणीकर हे असा असीम परवाना मिळालेले कवी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे ‘उत्तररात्र’ या चार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक! किणीकरांच्या आजवरच्या पुस्तकांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या पुस्तकातला काळ आणि देश ओळखू येऊ नये अशा एका प्रदेशात ते वाचकाला घेऊन जातात. मानवी सुख-दु:खांच्या प्याल्यातले जीवनद्रव्य कसे कालातीत आहे, हे दाखवतात. एका समाजाशी, एका भौगोलिक सीमेत घडलेल्या इतिहासाशी, एका दशकाशी किंवा शतकाशी बांधून न घेणारे किणीकर (बहुधा त्यांच्याही नकळत) अनेकान्तवादी ठरतात. एका स्थितीचे निरनिराळे कोन ते उलगडून दाखवतात.
नेमके हेच सौष्ठव या नव्या पुस्तकातून भेटते. दिव्यांची विविध प्रकारची घडण, बैलाची चित्रे आणि शिल्पे, हत्तीची शिल्पे, खजुराहो आणि कोणार्कची मिथुनशिल्पे (कामशिल्पे) हे या चार निबंधांचे वण्र्यविषय आहेत. यातले वर्णन फक्त शिल्पांपाशी, चित्रांपाशी वा दिव्यांच्या घडणीपाशी थांबत नाही, तर रूपनिर्मितीचा आस्वाद हे निमित्तमात्र ठरते आणि आपण खरा आस्वाद संस्कृतीचाच घेतो आहोत, हे लेखकाला कळले होते, तसे ते वाचकालाही कळते. आस्वाद बिनडोक ‘वाहवा’सारखा नसतो. त्यासाठी आधी आस्था असावी लागते. त्या आस्थेतून जाणकारीची, अभ्यासाची आस तयार होते. आणि मग झालेल्या अभ्यासातून आलेली विचारसमृद्धी नुसती मिरवायची नसून, पुन्हा कुठेतरी ती गुंतवायची आहे याचे भान असावे लागते. हे सारे पैलू रॉय किणीकरी आस्वादातून दिसतात.. कळतात. पुस्तकाच्या अखेरीस प्रत्येक प्रकरणासाठीच्या संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. प्रस्तावनेसह पाच प्रकरणांच्या पाच याद्यांत आनंद कुमारस्वामींची दोन पुस्तके अनेकदा आहेत. ए. एल. बॅशमचे ‘अ वंडर दॅट वॉज इंडिया’ आहे आणि के. के. मुन्शींचे ‘इंडियन इन्हेरिटन्स’ आहे. १९७० च्या पूर्वार्धापर्यंत भारतीय दृश्यकलांचा इतिहास सांगताना वेदपूर्व काळापासून मुघल काळापर्यंतच्या संस्कृतींची साक्ष काढण्याची जी पद्धत दिसते, ती म्हटले तर रॉय किणीकरांनीही पाळली आहे. मात्र, एक मोठा फरक : कलेतिहासाच्या त्या पुस्तकांमध्ये लेखकाने ‘मनचे काही सांगणे’ हा मोठाच गुन्हा. तो किणीकर अगदी शंभरदा करतात.. ठरवून करतात.  इतिहासाचा हा निवेदक पडद्याआड राहत नाही. तो ‘जिवंत’ होऊन वाचकांसमोर येतो.
अशा जिवंत निवेदनावर साहजिकच ‘सब्जेक्टिव्ह’ असल्याचे आरोप होणार असतात. ते किणीकरांवरही होवोत. तसे झाल्यास या निवेदकाचा ‘सब्जेक्टिव्ह’पणा हा आपल्या धर्माची, पंथाची, देशाची वा आपल्याला आवडत्या कालखंडाची, स्वत:ला ज्यात अधिक गती आहे त्याच विषयाची ‘लाल’ करणारा नाही, हेही सिद्ध होईल. ‘मानवाची जीवनेच्छा’ हा एवढाच किणीकरांचा ‘सब्जेक्ट’! कामभावनेबद्दल ते वारंवार बोलतात. परंतु कोणत्याही धर्मतत्त्वज्ञानाने मानवी जीवनेच्छा पुढे नेणाऱ्या या भावनेकडे निकोपपणे न पाहिल्याची त्यांची कैफियत ही त्यांची एकटय़ाची किंवा त्यांच्यावर ज्या राजकीय विचारांचा (कम्युनिस्ट) ठसा एकेकाळी होता, त्याही विचारांतून आलेल्या धर्मटीकेची नसते. उलट, किणीकरांचा ‘जीवनेच्छा’विचार पुढे नेला की मग चीन-रशियात पोथीनिष्ठांची पीछेहाट का झाली, हेही समजू शकेल. पण हे विषयांतर झाले.
जैन, बौद्ध आणि वैदिक धर्मामधल्या प्रतीकांची तुलना किणीकर लीलया करतात. पण ते काही या पुस्तकाचे वैशिष्टय़ नव्हे. स्वभावच आहे तो या पुस्तकाचा. या धर्मानी धर्मव्यवहारासाठी जो प्रतीकविचार अंगीकारला, त्याची तौलनिक चिकित्सा करण्यासाठी किणीकरांकडे वेळच नाही. त्यांना क्षण न् क्षण ‘जगायचा’ आहे. चांगल्या अर्थाने भोगायचाही आहे. प्रतीके जुनी आहेत, त्यांचे अर्थ सनातन आहेत, याची जाणीव किणीकरांना जरूर आहे; पण ही प्रतीके ‘आज.. आत्ता’ आपल्यासमोर असल्याचे भान त्यांना आहे. म्हणजे किणीकर बोलताहेत ते या प्राचीन धर्माचे अर्थ आजही आपल्यापर्यंत कसे झिरपतात, त्याबद्दल.
दिव्यांबद्दल लिहिताना किणीकर अग्नी आणि प्रकाशापासून सुरुवात करतात आणि दिव्याविषयी ‘एकदा भावना निर्माण झाल्यावर त्या दीपाला कलात्मक रूप द्यावे असे वाटणे स्वाभाविक होते..’ अशा एका साध्या वाक्यात कलाकुसरीच्या मानवी प्रेरणेचे मर्म सहज सांगून टाकतात! कारागिरी हे मूल्य आहे, कलाकुसर ही प्रेरणा आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या वस्तू (दिवे) हे त्या- त्या काळच्या सांस्कृतिक कल्पनांच्या अधीन राहूनच बनवल्या गेल्या आहेत. ‘कलाकृती’ची पाश्चात्त्य, आधुनिक व्याख्या वस्तू घडवण्यामागच्या व्यक्तिगत प्रज्ञेला आणि म्हणून कलाकृतीच्या ‘अद्वितीयपणा’ला महत्त्व देते. तर दिव्यांसारख्या वस्तू सामूहिक (संस्कृतिजन्य) प्रज्ञेचा एक भाग असतात. हा भेद आस्वादकाच्या अधिकारात किणीकर मिटवून टाकतात. (तसा तो अभ्यासू समीक्षक व चित्रकार द. ग. गोडसे यांनीही मिटवू पाहिला होता. पण गोडसे यांनी अखेर ‘अद्वितीय’ कलाघटितांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. गोडसे यांच्याबद्दल पुन्हा बोलूच.) नेपाळच्या जाळीदार दिव्यातून येणाऱ्या छायाप्रकाशाचा अनुभव सांगताना ते अशा प्रकारच्या अनेक दिव्यांबद्दल बोलताहेत, हे वाचकाला कळते. म्हटले तर हे दिव्यांचे छापच. मोराचा दिवा, लक्ष्मीचा दिवा, लामणदिवा.. अशा दिव्यांबद्दल किणीकर आस्थेने लिहीत जातात तेव्हा तो त्यांनी एका कलावस्तूचा घेतलेला आस्वाद उरत नाही.. तोही सामूहिक पातळीवर जातो. ज्याच्या त्याच्या आठवणींतला जुना दिवा किणीकर उजळून काढतात!
इथे भारतीय वा अन्य संस्कृतींच्या इतिहासाबद्दल लिहिण्याचा ‘सूर’ किणीकरांना कसा सापडला आहे, हे कळते. त्या सुरातून आता किणीकरांची सरगम, ताना, बोल-ताना हे सारे सुरू होणार असते. फक्त कलावस्तूंच्या आस्वादापाशी वाचकाला सोडून न देता आपल्या वण्र्यविषयाबद्दलच्या चालीरीती, कथा, म्हणी, लोकगीते, कविकल्पना आणि पिढय़ान् पिढय़ा चालत आलेली उखाण्यांसारखी कोडी (उदाहरणार्थ : ‘एवढीशी टिटवी, सारे तळे आटवी’ = पणती) हे सारे ‘कल्चरल बॅगेज’ किणीकर वाचकाला देतात. ‘सांस्कृतिक संचित’ असा बऱ्याचदा वापरला जाणारा मराठी शब्द आहे. हल्ली तर तो उच्चारताच ‘आता साचलेलेच काहीतरी माथी मारले जाणार’ अशी भीतीही वाटते. पण या संचिताकडे किणीकर साधनसामग्री म्हणून पाहतात. कारण त्यांना हे सारे घेऊन पुढे जायचे आहे.
पुढे कुठे जाणार? जगण्याकडे! हत्ती आणि बैल यांच्या सौष्ठवाचे गुणगानही गतकाळाबद्दल हुंदके देण्यासाठी नव्हे, तर आजघडीला सौष्ठवाची बहुअंगी जाणीव देण्यासाठीच किणीकरांनी केले असावे. अदब आणि आब, पौरुष आणि शक्ती हे गुण या सौष्ठवात आहेत, हे वाचकाला स्वत:हून समजावे इतपत वेल्हाळपणे किणीकर लिहितात. हत्ती आणि वृषभाबद्दल देशोदेशींच्या चालीरीतींची उजळणी किणीकरांच्या लेखणीतून होते आणि ‘भारतीय जीवनात आणि चित्रसाहित्यातच नव्हे, तर जागतिक जीवनात, संस्कृतीत आणि साहित्यातदेखील बैलाचे स्थान अद्वितीय व अनन्यसाधारण आहे’, असा सारांश काढून ही लेखणीची सतार थांबते. सतारीने समेवर येऊन झाल्यावरही पुन्हा चार-दोन अस्फुट, असंदर्भ सूर वाजवावेत, तसा याही लेखाचा शेवट बैलासाठी निरनिराळ्या भाषांत कोणते शब्द आहेत, याच्या यादीने होतो. हेदेखील या पुस्तकाचे एक विचित्र वैशिष्टय़च! दीपशिल्प, गजशिल्प आणि वृषभशिल्प या तिन्ही लेखांचे शेवट सुघटित नाहीत. त्याऐवजी ते कसे आहेत, याचे वर्णन वर आहे. त्यामुळे लेखनवस्तूचे नुकसान होत नाही; ‘हे काय निराळेच?’ असे मात्र वाटते.
पुस्तकातला अखेरचा लेख वाचण्याची पात्रता वाचकामध्ये यावी म्हणूनच आधीचे सारे लेख लिहिले गेलेत की काय असा संशयही घेण्यास जागा आहे. ‘कामशिल्प’ हा तो अखेरचा लेख. कोणार्क  आणि खजुराहो येथील मंदिरांच्या ‘मेखला’ पाहून लिहिलेला. आधीचे सारे लेख एकेका मोठय़ा विषयाबद्दल होते. त्या विषयाचे आविष्कार कसकसे आणि किती विविध आहेत याचे सव्‍‌र्हेक्षण करणारे होते. ‘कामशिल्प’ हा मात्र कोणार्क आणि खजुराहोच्या ‘शिल्पसभां’ची आस्वादक आणि तत्त्वचिंतक समीक्षा करणारा लेख आहे. (‘शिल्पसभा’ हा किणीकरांनी ‘ओपन गॅलरी’साठी योजलेला शब्द आहे.) यातील तत्त्वचिंतन हे पुन्हा शिल्पविषयाबद्दल सध्या असलेल्या प्रतिक्रियांच्या अंगाने जाते. ‘मना कल्पना तें नको वीषयांची’ असे माणसाला बजावणाऱ्या सर्वच परंपरांशी इथे किणीकर उभा दावा मांडतात. ‘ब्रह्मसत्य जगन्मिथ्या’ या तत्त्वज्ञानाच्या मोकाट हत्तीला ते रोखतात. नीतिकल्पनांच्या जोखडाखाली सौंदर्यास्वादासाठी निकामीच झालेल्या निगरगट्टांनाही आस्वादाची मखमली झूल चढवू पाहणारा हा लेख. ती झूल वाचक पांघरतीलच याची खात्री नाही; पण कामशिल्पांच्या आस्वादाचा दिवा उजळून किणीकर जातात. कामशिल्प या विषयापासून त्यांना समीक्षकी अंतर बाळगता येत नाही. मग ‘प्रपंचविन्मुख करणाऱ्या रि-अ‍ॅक्शनरी तत्त्वज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी खजुराहो, कोणार्क वगैरे मंदिरांवरील मैथुनशिल्पे क्रांतिकारक शिल्पकारांनी घडवली असावीत असे माझे निश्चित मत आहे,’ असे एक वाक्यही येते. या मंदिरांची त्यावेळच्या तत्त्वज्ञानांशी कालसंगती लावून हे विधान सिद्ध करावे, असे त्या कालसंगतीचा उल्लेख करणाऱ्या किणीकरांना वाटत नाही.. वाटले नसतेच. कारण त्यांचा पिंड संशोधकी नसून आस्वादकाचा आहे. आणि हा आस्वादक आता आपल्या आस्वाद्यवस्तूला कुणीतरी नावे ठेवते आहे म्हणून काहीसा दुखावलाही गेला आहे. पुढे ‘हे पाषाण अभिमंत्रित आहेत’, ‘पाषाणात अवतरलेल्या त्या देवांगना होत्या’ अशी अनेक विधाने आहेत. तीही समीक्षकाची नसून एका प्रेमिकाची आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.  
प्रलोभन आणि परिपालन अशी कार्ये मंदिरांसंदर्भात ही कामशिल्पे पार पाडतात, हे किणीकरांना मान्य आहेच. पण त्यांच्यातला आस्वादक कलेतिहासाच्या निष्कर्षांच्या या नेहमीच्या वाटा ओलांडून पुढे जातो. काम-मोक्षातले एकत्व पाहतो. ‘कामपूर्तीनंतरच्या विकलांगांतल्या कैवल्याचा क्षण पकडणे तसे सोपे नसते. त्यासाठी मनाळ (स्र्२८ूँीीि’’्रू ) दृष्टी असावी लागते. मैथुनशिल्पांत व्यक्त होणारी आतुरता, उत्कंठा, अधीरता किती अस्पष्ट आणि किती अस्फुट असते! ‘..कोकिळेच्या पंचमात राजहंसाची लवचिक कंठरेषा भिजवून काढलेली ती मैथुनचित्रं आहेत!’ – हे शब्द किणीकरांचेच!
इंग्रजीत आनंद कुमारस्वामी यांनी कलेतिहास लिहिताना सार्वकालिक आस्वादतत्त्वे (जी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पाश्चात्य आधुनिक कलेलाही लागू पडत होती.) न अव्हेरता उलट त्यांची समतानता ऐतिहासिक तथ्यांशी साधण्याची परंपरा सुरू केली. कुमारस्वामी पुरावस्तूसंशोधक न उरता कलासमीक्षक ठरतात, ते यामुळे. ही परंपरा मराठीत द. ग. गोडसे यांनी वेगळ्या अंगाने पुढे नेली. इतिहास, इतिहासाचे क्षण, त्यातून निर्माण झालेले कथाबंध हेही गोडसे यांनी अभ्यासले आणि ‘पोत’, ‘शक्तिसौष्ठव’ या संकल्पनांची मराठीतील अर्थव्याप्ती आपल्या लिखाणाने वाढवून त्यांनी ती समृद्ध केली. या परंपरेचा भक्कम आधार रॉय किणीकरांना उपलब्ध असल्याचे हे पुस्तक वाचताना जाणवते. ‘आधार उपलब्ध होता’ म्हणजे त्या आधाराने किणीकर चालत नसूनही तो कुठेतरी होता. ‘आमच्या सांस्कृतिक इतिहासातून जी आली ती आमची कलाकृतीच; निव्वळ ‘कलावस्तू’ नव्हे,’ हे कुमारस्वामींनी ठणकावले. पुढे गोडसे यांनी तर अपरिचित इतिहासातील ‘कलाक्षण’ शोधले. याच सुमारास सामान्यजनांना थेट भिडू शकणारे कलेतिहासातले नेमके धागे शोधण्याचे काम किणीकर करीत राहिले! या विषयसूत्रांचा गोफ वेळ मिळेल तेव्हा विणत राहिले.
इतिहास कळण्याचा हेतू हे पुस्तक वाचताना लांब ठेवावा. रॉय किणीकरांची उत्कटता (माहितीच्या कितीही लडी उलगडून दाखवल्या तरीही) समीक्षकापेक्षा कवीला शोभणारी आहे, हा आक्षेप लक्षात ठेवून या पुस्तकातले अमूर्तकाव्य आपल्याला काय सांगते आहे, ते ऐकावे. संस्कृतीचा संस्कार कसा घ्यायचा असतो, याची दिशा मग हे पुस्तक दाखवील. संस्कृती म्हणजे काहीतरी मौल्यवान, असे नसते. मूल्ये आपल्यातच असतात, ती संस्कृतीने आपल्याकडे दिलेली असतात, याचा साक्षात्कार या पुस्तकाच्या अक्षरश: पाना-पानांमधून होत राहण्याच्या शक्यता मग खुल्या होतील. हे पुस्तक कलेतिहास शिकवणार नाही; शिकता आलेच, तर जगण्याची तऱ्हा यातून शिकता येईल.
‘शिल्पायन’- रॉय किणीकर, मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने- १३६ , मूल्य- १५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा