ओसामा बिन लादेन.. पृथ्वीतलावरील चालू युगातील सर्वात मोठा दहशतवादी म्हणून ज्याची संभावना केली गेली असा क्रूरकर्मा; पण तितक्याच थंड डोक्याचा कुख्यात माणूस. लादेन कोण होता, त्याने काय केलं, इथपासून ते- तो कुठे राहायचा, कसा मारला गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत नसलेली सज्ञान व्यक्ती सहसासहजी शोधूनही सापडणार नाही. पण जागतिक महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेसह अवघ्या जगात आपली दहशत निर्माण करणाऱ्या या ‘अल् कायदा’प्रमुखाबद्दलचं कुतूहल शमत नाही. त्यामुळेच २ मे २०११ पासून- लादेन मारला गेला तो दिवस- आजपर्यंत ओसामा बिन लादेन आणि त्याची दहशतवादी संघटना अल् कायदा यांना केंद्रस्थानी ठेवून बरंच लिखाण पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेलं आहे. अगदी लादेनला मारणाऱ्या अमेरिकेच्या सीलच्या पथकातील एका कमांडोनेही ‘असा मेला लादेन’ यावर पुस्तक लिहिलं. पण लादेनला जाणून घेण्याची वाचकांची ओढ आणि त्याच्याबद्दलची अप्रकाशित माहिती जगाला सांगण्याची लेखक-पत्रकारांची इच्छा यामुळे ओसामावरील पुस्तकांची चळत वाढतच चालली आहे. यातील बऱ्याच लेखकांनी आपल्या पुस्तकांची बरीच पानं लादेनचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी निगडित घटना यांचं अतिरंजित वर्णन करण्यातच वाया घालवल्याचं दिसून येतं. पण लादेनला प्रत्यक्ष भेटणाऱ्या मोजक्या पत्रकारांपकी एक असलेल्या पीटर बर्गन यांनी लिहिलेलं ‘मॅनहंट’ हे पुस्तक या चळतीमध्ये सर्वात वरच्या क्रमात मोडेल असं आहे. केवळ लादेनच नव्हे, तर ् कायदाविषयीच्या प्रचंड माहितीचा दस्तावेज असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल.
सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले पीटर बर्गन हे मध्यपूर्व देशांतील घडामोडींचे अभ्यासक पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी ओसामा बिन लादेन आणि अल कायदा यांच्याविषयी यापूर्वी लिहिलेली दोन पुस्तकं ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत. ‘मॅनहंट’ हे लादेनवरील त्यांचं तिसरं पुस्तक. ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा आणि त्यांना पछाडणारा लादेन यांच्यातील ‘पकडापकडी’वर हे पुस्तक प्रकाश टाकतं. ९/११च्या हल्ल्यानंतर लादेनच्या शोधात निघालेल्या अमेरिकी गुप्तचर यंत्रणा २ मे २०११ रोजीच्या रात्री पाकिस्तानातील अ‍ॅबटाबाद येथील एका बंगलीत लपून बसलेल्या लादेनपर्यंत कशा पोहोचल्या, या प्रवासाचं वर्णन करणारं हे पुस्तक आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन प्रवासी विमानं धडकवून शेकडो बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामागे लादेन असल्याचं समजल्यापासून अमेरिकेनं आक्रमकपणे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पण जवळजवळ दहा र्वष लादेन अमेरिकेसह साऱ्या जगातील दहशतवादविरोधी यंत्रणांना चुकवत होता आणि दहशतवादी कारवाया घडवत होता. या दहा वर्षांत अनेकदा अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या फौजा लादेनच्या जवळ पोहोचल्या, पण प्रत्येक वेळी त्यांच्या हाती तुरी देऊन ओसामा निसटला. बर्गन यांनी या पाठलागाचा इतिवृत्तांत ‘मॅनहंट’मध्ये मांडला आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या आश्रयाखाली असलेल्या लादेनचं पलायन, तोराबोरा प्रांतातल्या गुहांमधील त्याची ‘लपाछपी’, त्याच्या असण्याच्या शक्यतेनं पाकिस्तानातील दुर्गम डोंगराळ भागात झालेले ड्रोन हल्ले आणि सरतेशेवटी अ‍ॅबटाबादमधील ‘ती’ रात्र, यांचं बर्गन यांनी केवळ वर्णनच केलेलं नाही, तर त्यातील सूक्ष्म तपशीलही नोंदवले आहेत.
मात्र, हे पुस्तक ‘मॅनहंट’पर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. लादेन आणि अल् कायदावर आधी लिहिलेल्या दोन पुस्तकांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत आणि प्रचंड माहिती गोळा करत बर्गन यांनी ‘मॅनहंट’ नावाचा ‘ओसामानामा’च तयार केला आहे. ९/११ ते २ मे २०११ या १० वर्षांतील लादेन आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए यांच्यात सुरू असलेल्या उंदीर-मांजराच्या खेळापलीकडे जाऊन बर्गन यांनी लादेन आणि अल कायदाची जीवनपीठिकाच मांडली आहे. लादेनच्या अनेक लग्नांचे किस्से, त्याच्या बायकांच्या तऱ्हा, त्याचं कुटुंब, त्याच्या सवयी या सर्वाची बर्गन यांनी आतल्या गोटातील माहिती पुरवली आहे. इतकंच नव्हे तर अ‍ॅबटाबादमधील ज्या घरात अमेरिकेच्या सील्जनी लादेनला ठार केले, त्या घरात नंतर जाण्याची संधी बर्गन यांना मिळाली. त्यामुळे त्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याचं जिवंत चित्र त्यांनी पुस्तकातून उभं केलं आहे. ही संधी मिळालेले ते बहुधा एकमेव परदेशी पत्रकार असावेत. कारण लादेनच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच त्याची बंगली पाडण्यात आली. मात्र, बर्गन यांनी हे सारं प्रत्यक्ष पाहिलं असल्याने त्या घरातील छोटय़ात छोटी गोष्टही त्यांनी पुस्तकात नोंदवली आहे. लादेनची मुलं त्या घरातच कशी अरबी शिकत, त्याच्या प्रत्येक पत्नीसाठी वेगळा शयनकक्ष कसा बनवण्यात आला, स्वत: लादेन छोटय़ा खिडक्या असलेल्या खोलीत कसा राहत होता, त्याची मोकळं फिरण्याची जागा अशी आधी प्रसिद्ध न झालेली माहिती बर्गन यांनी ‘मॅनहंट’मध्ये पुरवली आहे.
या पुस्तकातील लादेनपाठोपाठ दुसरी महत्त्वाची भूमिका सीआयएची आहे. लादेनला पकडण्यासाठी सीआयएने कशी व्यूहरचना केली, त्यांच्या आधीच्या मोहिमा कशा फसल्या, वेगवेगळ्या दहशतवाद्यांकडून, खबऱ्यांकडून लादेनबाबत मिळणाऱ्या सुईएवढय़ा माहितीचं पृथ:करण करून ती एका धाग्यात कशी गुंफण्यात आली याचं रोमांचक आणि अचंबा करायला लावणारं वर्णन बर्गन यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, ही सगळी माहिती त्यांनी सीआयए, अमेरिकी संरक्षण- परराष्ट्र खाते यांच्यातील आजी-माजी अधिकाऱ्यांना बोलतं करून मांडली आहे. त्यामुळे या माहितीबाबत शंका घेण्याचा प्रश्नच नाही. सीआयएमधील पुरुषप्रधान विचारसरणीला मागे टाकून काही महिलांनी स्वतंत्रपणे/एकत्रितपणे लादेनच्या अ‍ॅबटाबादमधील घराचा माग काढण्यात कसं यश मिळवलं, हेदेखील बर्गन यांनी मांडलं आहे. तपासकांनी जितक्या बारकाईनं लादेनच्या पाऊलखुणा शोधल्या तितक्याच बारकाव्यानिशी बर्गन यांनी त्यांचं वर्णन ‘मॅनहंट’मध्ये केलं आहे.  
या पुस्तकात बर्गन यांनी अल् कायदाचा जन्म, जडणघडण आणि पडझड हा घटनाक्रमही उलगडून दाखवला आहे. ९/११च्या हल्ल्यानंतर एकीकडे जगभर अल कायदाची दहशत वाढत असताना प्रत्यक्ष संघटनात्मक पातळीवर ती विस्कटत चालली होती. अमेरिकेच्या आक्रमक पवित्र्यामुळे लादेनचे अनेक कमांडर ९/११नंतर काही महिन्यांतच मारले गेले. संघटनेकडील पशांचा ओघही आटू लागल्याने लादेनची कुतरओढ होत गेली. अ‍ॅबटाबादमधील घरात राहतानादेखील लादेनचं कुटुंब काटकसरीत राहत होतं, या सगळ्या गोष्टींचं तपशीलवार वर्णन ‘मॅनहंट’मध्ये आहे. ते वाचताना, अल् कायदा आणि लादेन हे संपूर्ण जगाला भासले तितके भयप्रद नव्हते, याची कल्पना येते. त्याचवेळी लादेनचा बाऊ करून अमेरिकेच्या गुप्तचर खात्यासाठीची आíथक तरतूद कशी वाढत गेली, याचाही अंदाज येतो.
बर्गन यांनी लादेनची अतिरंजित गोष्ट सांगण्याऐवजी सीआयए, पाकिस्तानी-अफगणिस्तानी पत्रकार-विश्लेषक, अमेरिकेच्या प्रशासनातील अधिकारी यांनी दिलेली माहिती, अ‍ॅबटाबादमधील घरातून हस्तगत झालेली कागदपत्रं आणि अन्य उपलब्ध दस्तावेजांची साखळी वाचकांसमोर ठेवली आहे. या पुस्तकाची शेवटची सत्तरेक पानं ही केवळ संदर्भसूची आणि टिपा यांनी भरलेली आहेत. यावरून बर्गन यांनी पुस्तक लिहिताना किती मोठय़ा प्रमाणावर संशोधन केलं याचा अंदाज येतो. लादेन आणि अल् कायदावर लिहिलेल्या आधीच्या दोन पुस्तकांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा बर्गन यांनी करून घेतला आहे.
बाजारात ‘बेस्टसेलर’ ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. ‘बेस्टसेलर’ पुस्तकांची लोकप्रियता ‘कॅश’ करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं ‘मॅनहंट’बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. ‘मॅनहंट’ हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. ‘मॅनहंट’ हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.    
‘मॅनहंट’- पीटर बर्गन, मराठी अनुवाद- रवी आमले, डायमंड पब्लिकेशन, पुणे, पाने- ३२२, मूल्य- ३९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा