‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा माशेलकरांनी सातत्यानं पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे, तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते,’ म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत अनेक व्यवसायात माशेलकरांनी मार्गदर्शन केलं आहे, ही माहिती या पुस्तकात तुकडय़ा-तुकडय़ांत दिली आहे.
माशेलकरांचं चरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींच्या चरित्रातील कथावस्तू, नाटय़ आणि संघर्ष हे नेहमीच कादंबरीपेक्षा अद्भुत असतात. अशा व्यक्तित्वांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील युद्धाच्या प्रसंगांवर मात करत आपलं वेगळेपण कसं जपलं, हा कुतूहलाचा आणि प्रेरणेचा भाग असतो. या चरित्रात माशेलकरांनी मिळालेले सन्मान, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांनी भूषवलेली पदं यांचा सविस्तर उल्लेख आहे. पण माशेलकरांनी कठीण काळात निभावून नेलेले प्रसंग, त्यावर केलेली मात, त्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची माहिती कमी प्रमाणात आहे. थोडक्यात, या पुस्तकात माशेलकरांचं कर्तृत्व मांडलं गेलं आहे, पण त्यामागील व्यक्तित्व समोर येत नाही.
चरित्रलेखनात चरित्रनायकाचा जन्म, शिक्षण, त्याची कामगिरी यांचा उल्लेख या प्राथमिक बाबी झाल्या. तर त्याचा दृष्टिकोन, त्याचे सामाजिक जीवन आणि संबंध, आयुष्यात आलेले प्रसंग, त्यावर केलेली मात किंवा त्याचे पुढील आयुष्यावर पडलेले सावट, प्रतिकूलतेला अनुकूल करण्यात आलेले यशापयश, त्यामागील प्रयत्न आणि त्यावरील स्वत:चा ठसा याचे सविस्तर चित्रण अनेकांना दिशा आणि प्रेरणा देऊ शकते. अशा व्यक्तींचं चरित्र हे नेहमी त्यांनी व्यतीत केलेल्या काळाचं व समाजपुरुषाचंही चरित्र असतं. त्यातून अप्रत्यक्षरीत्या अनेक तत्कालीन संदर्भाचं दस्तावेजीकरण होत असतं.
माशेलकरांच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीवर स्वतंत्र प्रकरणं व्हावीत इतकं त्यात जाणून घेण्यासारखं आहे. पण या पुस्तकाच्या मांडणीत प्रकरणांना स्थान नाही. त्यामुळे अनेक गोष्टींची अनावश्यक पुनरावृत्ती झालेली आहे. याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यातील साऱ्या घटनांची कालसंगत मांडणी चरित्रात आढळत नाही. चरित्रलेखनात एक प्रकारची तटस्थता अपेक्षित असते. चरित्रनायकाच्या चांगल्या गोष्टींसोबत त्याच्या कठीण वा वादळी काळातील गोष्टीही मांडल्या पाहिजेत. त्यातून चरित्रनायकाचं कर्तृत्व आणि व्यक्तित्व उजळून निघतं. त्यांचा उल्लेख चरित्राचा समतोल दाखवतो.
चरित्राची मांडणी, मुद्दे आणि भाष्य यांची सरमिसळ झाली आहे. लेखकाचं कोणतं भाष्य आणि माशेलकरांचं कोणतं यातील सीमारेषा धूसर आहेत. त्यामुळे अनेकदा कोणाचे भाष्य आहे आणि कुठपर्यंत आहे, याबाबतीत गोंधळ होतो. परिशिष्टांची मांडणी अधिक विचारपूर्वक हवी होती. त्यांच्या नावे पुस्तकांची आणि पेटं्टसची यादी स्वतंत्र परिशिष्टात हवी होती. ती आकडेवारीत दिली आहे. पहिल्या परिशिष्टातील महासंचालकांच्या यादीसमोर त्यांचा कालावधी स्वाभाविकपणे अपेक्षित होता, तर दुसरे परिशिष्ट अप्रस्तुत वाटते. त्या जागी त्यांच्या पेटंट्सचे उल्लेख हवे होते. संदर्भसूची प्रभावित करणारी आहे. पण त्यातील आशय-मुद्दे चरित्रात आढळत नाहीत. उदा. प्रज्ञावंताची दैनंदिनी या गानू यांच्या लेखउल्लेखामुळे उत्सुकता वाढते. पण माशेलकरांचा दिवस कसा सुरू होतो आणि मावळतो म्हणजेच ते वेळेचा सुनियोजितपणे वापर कसा करतात याबाबत चरित्रात काहीही आढळत नाही.
‘माशेलकर- एका दृष्टिक्षेपात’ हा एका परिशिष्टाचा विषय आहे, पण तो परिशिष्टाबाहेर स्वतंत्र दिला आहे. हा दृष्टिक्षेप २० पानांमध्ये पसरला असल्याने वाचणाऱ्याचा अंत पाहतो. लेखकावर वेळेचं दडपण आल्यानं त्यांची घाई झाली असावी असं वाटतं.
त्यांच्या अनेक भाषणांत उल्लेख येऊन गेलेल्या नरहर भावे शिक्षक आणि त्यांच्या ‘िभगातून एकत्रित होणाऱ्या किरणांसारखी एकाग्रता ठेव मग यशाची ज्योत त्यातून निर्माण होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे’ या प्रेरणादायी वचनाचा उल्लेख या चरित्रात आढळत नाही. माशेलकरांचे नातेवाईक, बालपणीचे मित्र आणि समकालीन सहकारी, त्यांची पत्रं, मदत यांचे उल्लेख आणि संदर्भ आवश्यक ठरतात. माणसाच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आणि व्यक्ती कारणीभूत असतात. त्यांचा शोध, मुलाखती आणि साहाय्य ही चरित्रलेखनाची महत्त्वाची साधनं आहेत.
माशेलकर यांच्याविषयी जाणून घ्यायचं तर प्राथमिक साधन म्हणून त्यांच्या चरित्राची गरज होतीच. एकंदरीत संशोधनाच्या क्षेत्रातील सध्याची हेळसांड, देशाच्या अर्थसंकल्पातील कमी तरतुदींमुळे दिसून येणारी उदासीनता आणि तरुणांपुढे अपवादानं असलेले या क्षेत्रातील ‘रोल मॉडेल्स’ या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत चरित्राची आवश्यकता प्रकर्षांने जाणवते. विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात आलेल्या आजच्या पिढीमधील मरगळ दूर करण्यासाठी जी मंडळी नेतृत्व करू शकतील अशांमध्ये माशेलकर अग्रणी आहेत. गुणवत्तेची शिडी कधी संपत नाही आणि जे मिळवले त्यापेक्षा अधिक चांगलं साध्य करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे, हे या चरित्राचं सार आहे. अशा पुस्तकामुळे पोषक वातावरण तयार होतं. पण माशेलकर आत्मचरित्र कधी लिहितील याकडे मात्र लक्ष लागून राहील इतपत कुतूहल या पुस्तकानं निर्माण केलं आहे.
‘डॉ. रघुनाथ माशेलकर- भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता’ – अ. पां. देशपांडे, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे- १७०, किंमत- २२५ रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा