नुकत्याच प्रकाशित झालेल्या आणि बाजारात आलेल्या नव्याकोऱ्या पुस्तकांची ओळख करून देणारे साप्ताहिक सदर…
भारतीय तत्त्वज्ञान, साहित्य आणि समाज यांची उकल करताना जात-धर्माचा विचार अपरिहार्य ठरतो. कारण भारतीय जनमानस जात-धर्माशी परंपरेनेच बांधले गेलेले आहे. ते पाश्चात्त्य राष्ट्रांसारखे एकधर्मी नाही. जातीय, धार्मिक विविधता जगातल्या इतर देशांमध्ये क्वचितच आढळेल इतक्या मोठय़ा प्रमाणावर भारतात आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान, साहित्य आणि समाज यांचा अभ्यास जात, धर्म, वर्ग यांच्या अनुषंगाने होत आला आहे, केला गेला आहे. आणि त्याचा केवळ मार्क्‍सवादी अभ्यासकच नव्हे तर इतरांनीही पुरस्कार केला आहे. पण ही मांडणी नाकारून अधिक व्यापक भूमिका मांडण्याचा प्रयत्न डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सुरुवातीपासून केला आहे. त्यांची मांडणी आणि लेखन आक्रमक आणि आवेशी असते. ही त्यांची वैशिष्टय़े प्रस्तुत पुस्तकातही उतरलेली दिसतात. मार्क्‍सवादी अभ्यासक कॉ. शरद पाटील यांच्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा आणि भूमिकेचा प्रतिवाद करणे हा या पुस्तकाचा विषय आहे. त्यामुळे सुरुवातीच्या मनोगतातच ते ‘‘कॉ. पाटलांचे ‘माफुआ’ (मार्क्‍सवाद-फुले-आंबेडकरवाद) हे तत्त्वज्ञान अर्धवट असून ‘ब्राह्मणी-अब्राह्मणी’ सिद्धान्त हा जातीयवादी आहे,’’ अशी भूमिका घेतात. ‘कोणतेही सौंदर्यशास्त्र जात, धर्म, पंथ, देश अशा संकुचित संदर्भानी बंदिस्त नसते,’ असे म्हणत सबनीसांनी कॉ. पाटील यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. त्यांची ही भूमिका स्तुत्य असली तरी विवाद्य आहे एवढे नक्की. संशोधनाच्या क्षेत्रात इतका चढा सूर लावण्याची आवश्यकता असते का, असा हे पुस्तक वाचताना प्रश्न पडतो. तर्कशुद्धता आणि प्रत्यय यांनी सिद्ध झाल्यानंतरच कुठलीही भूमिका ग्राह्य़ मानली जाते, तिला स्वीकारार्हता मिळत असते. सबनीस यांची भूमिकाही त्या कसोटीवर उतरल्यावरच तिला मान्यता मिळेल. पण त्यासाठी अभिनिवेशी सत्यान्वेष सोडून तटस्थ अभ्यासकाच्या भूमिकेतून आपली भूमिका मांडण्याची दक्षता त्यांना घ्यावी लागेल. कारण ती नाही घेतली तर चांगल्या अभ्यासाकडेही अभ्यासक-समीक्षक आणि वाचकही डोळेझाक करण्याची दाट शक्यता असते. तसे या पुस्तकाचे होऊ नये.
‘ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र’ – डॉ. श्रीपाल सबनीस, दिलीपराज प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २०६, मूल्य – २२० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा