गुरू दत्त! हिंदी चित्रपटसृष्टीतील आख्यायिका बनलेला चित्रपटकार. आपल्या चित्रपटांतून कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य साधणारा संवेदनशील निर्माता-दिग्दर्शक (अन् अभिनेताही)! ‘सी. आय. डी.’, ‘प्यासा’, ‘कागज़्ा के फूल’, ‘चौदहवी का चाँद’, ‘साहिब, बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांनी चित्रपट समीक्षक, जाणकार तसंच सर्वसामान्य रसिकांना मोहिनी घालणारा प्रतिभावान चित्रपटकर्मी! गुरूदत्तच्या अकाली निधनाने त्याच्या चाहत्यांची त्याच्या गहन-गूढ व्यक्तित्वाबद्दलची प्यास आणखीनच वृद्धिंगत झाली. म्हणूनच गुरू दत्तवरच्या कुठल्याही नव्या लिखाणाला आजही मागणी आहे. त्याच्या अकाली आत्महत्येचं गूढ चित्रपटरसिकांना नेहमीच हळवं करत आलेलं आहे.
परंतु गुरू दत्त एक प्रतिभावंत, संवेदनशील कलाकार म्हणून प्रत्यक्षात कसा होता? व्यक्तिगत जीवनातलं त्याचं वर्तन, व्यवहार कसा होता? त्याच्या सृजनप्रक्रियेचा त्याच्या चित्रपटांतून धांडोळा घेता येतो. त्याच्या चित्रपटाची वैशिष्टय़ं त्यातून आकळून येतात. त्याच्या चित्रप्रतिमा, त्यामागचा कलात्मक विचार त्यातून जाणून घेता येतो. परंतु ही सृजनप्रक्रिया नेमकी घडली कशी? या विलक्षण प्रतिभेच्या कलावंताच्या व्यक्तिगत आयुष्याचे पडसाद त्याच्या चित्रपटांतून कितपत उमटताना दिसतात? आत्महत्येच्या टोकाला जाण्याएवढं असं काय घडलं होतं त्याच्या आयुष्यात?.. या आणि अशा प्रश्नांची पूर्णपणे समाधानकारक उत्तरं अजूनही रसिकांना सापडलेली नाहीत. ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त’ या सत्या सरनलिखित पुस्तकात यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात. आणि त्यामुळे गुरू दत्त या नावाभोवती असलेलं गूढ बऱ्यापैकी उकलतं. याचं कारण हे पुस्तक साकारलंय गुरू दत्तचे अत्यंत निकटचे मित्र आणि सृजन-सहकारी अबरार अल्वी यांच्या आठवणींच्या आधारे!
१९५४ ते १९६४ या दशकात अबरार अल्वी यांना गुरू दत्त फिल्म्स्चा चित्रपटलेखक, दिग्दर्शन साहाय्यक, सुहृद, मार्गदर्शक आणि हितचिंतक अशा अनेकविध भूमिकांत गुरू दत्त यांचा निकटतम सहवास लाभला. या दहा वर्षांत दोघांच्या साहचर्यातून गुरूदत्त फिल्म्स्चे काही संस्मरणीय चित्रपट निर्माण झाले. गुरूदत्तनी रत्नपारखी नजरेनं सर्वार्थानं चाळण लावून जवळ केलेल्या अबरार अल्वी यांच्यातला समर्थ दिग्दर्शकही त्यांनी हेरला होता. म्हणूनच ‘साहिब, बीबी और गुलाम’चं दिग्दर्शन त्यांनी अत्यंत विश्वासाने अबरार अल्वींवर सोपवलं होतं. या चित्रपटासंबंधातले अल्वींचे सारे सृजननिर्णय गुरू दत्तनी मान्य केले. अगदी त्यांना ते पटोत वा न पटोत! अपवाद फक्त ‘साहिब, बीबी..’तल्या गाण्यांच्या चित्रीकरणाचा! त्यावर मात्र गुरू दत्तना आपली ‘सिग्नेचर’ अनिवार्य वाटली. अबरार अल्वींनीही काहीसं कुरकुरत का होईना, ते मान्य केलं. त्याचं कारण चित्रपटातील गाण्यांच्या अर्थवाही व कलात्मक चित्रणात गुरू दत्त यांचा हात धरणारा हिंदी चित्रसृष्टीत दुसरा कुणीही नव्हता.
गुरू दत्त यांनी ‘साहिब, बीबी..’च्या श्रेयनामावलीत अबरार अल्वी यांना त्याचे दिग्दर्शक म्हणून उचित श्रेय दिलेलं असलं तरी समीक्षक आणि गुरू दत्तच्या चाहत्यांना मात्र तो चित्रपट गुरू दत्तनीच दिग्दर्शित केलेला असणार असंच आजवर वाटत आलेलं आहे. खरं तर अबरार अल्वींच्या प्रतिभेवर केला गेलेला हा घोर अन्याय आहे. आणि हा दुखरा सल आयुष्यभर ते मनीमानसी बाळगून राहिले. त्याबद्दलची मनस्वी चीड, हताशा कधीच त्यांच्या मनातून गेली नाही. (त्यानंतर त्यांनी कुठलाही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. एका अर्थी एका अतिशय संवेदनशील दिग्दर्शकाचा अकारण जन्मत:च मृत्यू घडविण्यात आला.) परंतु असं असलं तरीही गुरू दत्त फिल्म्समधील आपल्या दिवसांबद्दल सत्या सरन यांच्याशी बोलताना अल्वी यांनी आपल्या या वैफल्याचं सावट गुरू दत्तचं मूल्यमापन करताना जराही येऊ दिलेलं नाही, हे या पुस्तकात पदोपदी जाणवतं. त्याचवेळी आपल्या आणि गुरू दत्तमधील संबंधांबाबत पुरेशी तटस्थ विश्लेषकताही त्यांच्या या कथनात प्रत्ययाला येते. गुरू दत्त हे एक महान चित्रपटकार असले, तरी माणूस म्हणून त्यांच्यात इतरांप्रमाणेच गुण-दोष होते. या पुस्तकात अबरार अल्वी गुरू दत्तच्या कर्तृत्वाबाबत पुरेपूर आदर बाळगून त्यासंबंधातही मनमोकळेपणी बोलले आहेत. मात्र गुरू दत्त यांच्या व्यक्तिगत जीवनातील अपयशाबद्दल सांगताना ते कुठंही ‘जजमेंटल’ होत नाहीत, वा त्याच्या आत्महत्येकरता कुणाला दोषीही ठरवीत नाहीत. गुरूदत्त व त्यांची पत्नी गीता यांच्यातल्या बेबनावाबद्दल ते अतिशय संयमानं व्यक्त होतात. गुरू दत्तने आत्महत्या केली त्या दिवसाचा घटनाक्रम उलगडताना गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात त्या दिवशी झालेल्या कडाक्याच्या भांडणाचा उल्लेख त्यांनी केला असला तरीही त्याचं(च) पर्यवसान गुरू दत्तच्या आत्महत्येत झालं असं ते ठोसपणे म्हणत नाहीत. गीता दत्त ही अपरिपक्व, असमंजस आणि संशयी स्त्री होती. गुरू दत्तसारख्या अत्यंत संवेदनशील कलावंताला (त्याच्या गुण-दोषांसह) समजून घेण्यात ती कमी पडली, हे आपलं मत मात्र ते नोंदवतात. वहिदा रेहमान ही गुरूदत्त यांच्यासाठी नक्कीच अनुरूप सहधर्मचारिणी ठरली असती असं अबरार अल्वी तसंच गुरू दत्त फिल्म्समधील अनेकांना वाटत असे. परंतु म्हणून त्यांनी गीता दत्तशी काडीमोड घेऊन वहिदाला जवळ करावं, असं त्यांनी कधीही सुचवलं नाही. परंतु त्याचबरोबर खोटय़ा सामाजिक प्रतिष्ठेकरता गीता दत्तबरोबरचा आपला संसार टिकावा म्हणून गुरू दत्तनी पुढच्या काळात वहिदाला निर्दयपणे तोडून टाकलं, हेही अबरारना आवडलं नव्हतं. एक प्रकारे गुरूदत्त यांनी स्वत:च आपल्या जीवनवाहिनीची नस कापून टाकली अशी अल्वी यांची यासंबंधात भावना होती. वहिदाचा विरह, विस्कटलेला संसार टिकवण्यासाठीचा सामाजिक दबाव आणि याचदरम्यान मोठय़ा अपेक्षेनं निर्माण केलेल्या कलात्मक चित्रपटाला मिळालेलं अपयश या सर्व जीवघेण्या ताणांनी गुरू दत्तचा बळी घेतला असावा, ही शक्यताही नाकारता येत नाही.
‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त’ हे पुस्तक जितकं गुरू दत्तच्या चित्रपट कारकीर्दीवर, त्यांच्या सृजनप्रक्रियेवर प्रकाश टाकतं, तितकंच अबरार अल्वींच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या चित्रपटप्रवासाचाही समांतर आलेख रेखाटतं. अबरार अल्वींच्या चित्रपटांतील प्रवेशापासून ते सिद्धहस्त चित्रपटलेखक म्हणून झालेल्या त्यांच्या प्रस्थापनेपर्यंतची वाटचाल या पुस्तकात आली आहे. हा एका अद्वैताचा प्रवास आहे. गुरू दत्तच्या चित्रपट कारकीर्दीला आणि त्यांच्या चित्रभाषेला एक वेगळं, प्रगल्भ वळण देण्यात अल्वी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सुरुवातीला कमर्शियल चित्रपटांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तशीच वाटचाल करणाऱ्या गुरू दत्त यांच्यातील संवेदनशीलतेला आवाहन करून अल्वी यांनी जाणीवपूर्वक त्यांना कलात्मक चित्रपटांकडे वळवलं. गुरू दत्त यांच्या उपजत प्रतिभेला अल्वींनी दिलेली ही कलाटणी ‘प्यासा’, ‘कागज़्ा के फूल’, ‘साहिब, बीबी और गुलाम’सारख्या चित्रपटांच्या निर्मितीस कारणीभूत ठरली.
अल्वींनी केवळ गुरू दत्तच्या चित्रपटांनाच वेगळं वळण दिलं असं नाही, तर हिंदी चित्रपटांतील तोवरची कृत्रिम संवादशैली बदलण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जीवनातले वास्तव अनुभव आणि त्यांचं चित्रपटात केलेलं रूपांतरण, तसं करताना त्या प्रत्यक्षानुभावत करावे लागलेले बदल यांचं या पुस्तकात केलेलं वर्णन वाचकांच्या ज्ञानात भर घालणारं आहे. ‘प्यासा’ची कथा ही अबरार अल्वी यांना प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या एका वेश्येवर आधारीत आहे. गुरू दत्त आणि अबरार अल्वी यांनी तिला ‘प्यासा’तून कलात्मक परिमाण दिलं. गुरू दत्त यांनी त्यांच्या चित्रपटांतून केलेले वेगवेगळे तंत्र व शैलीचे प्रयोगही अल्वींनी कथन केले आहेत. त्यानिमित्तानं गुरू दत्तच्या चित्रपटांतील कलावंत, संगीतकार, गीतकार, छायाचित्रणकार अशा अनेकांचा परिचय, त्यांची कामाची पद्धती, त्यांचे नाना गंड यांबद्दलचं अल्वींचं निरीक्षणही ओघात त्यांनी नोंदवलं आहे.
वहिदा रेहमान हे गुरू दत्तचं ‘फाइंड’ असल्याचं म्हटलं जातं. गुरू दत्त व अल्वी हे दोघे एकदा हैदराबादला गेले असताना एक नृत्यांगना म्हणून अकल्पितपणे झालेली तिची पहिली भेट, तिला मुंबईला आणण्यात गुरू दत्तनं घेतलेला पुढाकार, तिच्यातली अभिनेत्री फुलावी म्हणून गुरू दत्तनं घेतलेले कष्ट, पुढं आपल्या या ‘निर्मिती’त कळत-नकळतपणे झालेली त्याची भावनिक-मानसिक गुंतणूक आणि स्वाभाविकपणे त्याचे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात उमटलेले पडसाद हे सारं अल्वींनी अत्यंत संयमितपणे निवेदन केलं आहे. ‘गुरू दत्त- एक संवेदनशील चित्रपटकार’ व ‘गुरू दत्त- एक माणूस’ अशा दोन्ही अंगांनी त्यांनी त्यांचं विश्लेषण केलं आहे. त्यात त्यांच्याबद्दलच्या आदराचा भाग तर आहेच; त्याचबरोबर त्यांच्यातल्या काही दोषांकडेही ते निर्देश करतात. परंतु त्यात त्यांच्यातल्या उणिवा दाखवण्याचा अट्टहास नाही. त्यामुळेच त्यांचं हे कथन विश्वासार्ह आणि प्रांजळ वाटतं.
गुरू दत्तच्या निधनानंतर गुरू दत्त फिल्मस्ची पताका पुढेही फडकत राहावी म्हणून अबरार अल्वींनी आपल्या परीनं सर्व ते प्रयत्न केले. गुरू दत्तचा अर्धवट राहिलेला चित्रपट ‘बहारे फिर भी आएगी’ पूर्णत्वाला नेऊन तो प्रदर्शित केला. मात्र, तो सपशेल कोसळला. पुढे अबरार अल्वींनी इतरांकरताही चित्रपटलेखन केलं. परंतु गुरू दत्तसोबतचा त्यांचा सहप्रवास जसा अर्थपूर्ण ठरला, तो करिश्मा त्यांच्या पुढील वाटचालीत अपवादात्मकच प्रत्ययाला आला. या पुस्तकात गुरू दत्त व अबरार अल्वी यांच्या साहचर्यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णकाळ कसा घडला, हे वाचकाला कळतं. त्याचे कर्तेकरविते आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींची कामगिरी त्यातून कळून येते. अल्वींचं प्रगल्भ, सखोल, कष्टाळू व्यक्तिमत्त्वही त्यातून आपल्यासमोर उभं राहतं.
या पुस्तकाची लेखनशैली हा एक आगळावेगळा प्रयोग आहे. अबरार अल्वींचं प्रत्यक्ष अनुभवकथन आणि या पुस्तकाच्या लेखिका सत्या सरन यांचं स्वनिवेदन असा मिश्र शैलीत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. असं असलं तरी पुस्तक वाचताना कुठंही अडखळायला होत नाही वा रसभंगही होत नाही, हे विशेष. प्रत्येक प्रकरणाला गुरू दत्तच्या सिनेमांतील गाण्यांच्या ओळीचं दिलेलं शीर्षक हाही एक आगळा प्रयोग म्हणायला हवा. मिलिंद चंपानेरकर यांनी अत्यंत ओघवत्या, रसाळ शैलीत हा अनुवाद केलेला आहे. पुस्तकाच्या शेवटी गुरू दत्त आणि अबरार अल्वी यांची दिलेली फिल्मोग्राफी अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरावी.
‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त’- सत्या सरन, अनुवाद : मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २५९, मूल्य- २५० रुपये.
बहारे फिर कभी न आयी…
गुरू दत्त! हिंदी चित्रपटसृष्टीतील आख्यायिका बनलेला चित्रपटकार. आपल्या चित्रपटांतून कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य साधणारा संवेदनशील निर्माता-दिग्दर्शक (अन् अभिनेताही)!
First published on: 04-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review