‘आ गळ’ ही महेंद्र कदम यांची कादंबरी आपले अस्तित्व दाखवून देणारी एक चांगली कादंबरी आहे. या कादंबरीत तीन पिढय़ांचा संघर्ष आहे. नायक मकरंद सराटे आपल्या संयुक्त कुटुंबापासून कादंबरीच्या निवेदनाला सुरुवात करतो. कादंबरीची सुरुवात भव्य अशी आहे, परंतु कुटुंब कथेच्या निबीड अरण्यात जाता जाता ही कादंबरी अत्यंत निमुळती अशी एका अग्रावर उभारलेली कुटुंबकथा होते. तरीही ‘आगळ’चे उत्कृष्टपण आकाराला येत नाही. ही कादंबरी पृष्ठसंख्येने मोठी आहे, पण मोठी पृष्ठसंख्या आणि दीर्घ कथानक म्हणजे व्यापक पट नव्हे, तर कथोपकथांचा विस्तार, गुंतागुंतीची व्यामिश्र, सुघड, ताशीव अशी एकमूस बांधणी आणि मानवी नात्यांचा व समाजाचा काहीएक अन्वय असणारे कथानक म्हणून ‘आगळ’कडे पाहावे लागेल.
या कादंबरीत तीन पिढय़ा आहेत. सराटे हे संयुक्त कुटुंब. विधवा आजीने आपल्या धाकात मुला-सुनांना ठेवलेले. आजी होती तोवर हे संयुक्त कुटुंब राहिले. नंतर फार काळ राहू शकले नाही. नायक मकरंद एका नॉन ग्रँट कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कामाला लागतो आणि हे एकत्र कुटुंब विभक्त होतं. हे भारतीय समाजाचे आजचे वास्तव आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीने आपल्या सदस्यांना गुण्यागोविंदाने वागवत बाराबलुतेदारांनाही जगवले. संयुक्त कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व नसते. अशा संस्कारांतून मकरंदाचे वडील लहानाचे मोठे झाले. आणि अगदी प्रौढ वयात त्यांना विभक्त व्हावे लागले, ते स्त्रियांतील कलह आणि बेबनाव यामुळे. मकरंदाला नोकरी लागली. ग्रँट मिळाल्यावर तो नोकरीवाल्या बायकोसोबत राहू लागतो. कनिष्ठ नोकरी उत्तम होते आणि उत्तम शेती कनिष्ठ होऊन शेतकऱ्याचे दारिद्र्य तसेच राहते. पांढरपेशा जगण्याला प्रतिष्ठा येते. इथेच कादंबरीच्या कथानकाचे संघर्ष केंद्र आणि तीन पिढीतील पहिल्या संघर्षांला सुरुवात होते. नोकरीवाल्याने गाडा ओढायचा असतो ही मकरंदच्या वडिलांची समज आणि नोकरीवाल्यांनी स्वत:चेच पाहावयाचे ही मकरंदच्या पत्नीची (नीलाची) समज. पण मकरंदची गाव आणि घर अशी दोन्हीकडे ओढ.
कादंबरीतला तिसरा संघर्ष नव्या जीवनशैलीचा आहे. पुण्यासारख्या शहरात शिकणाऱ्या मुलीची बदलती जीवनशैली बाप म्हणून मकरंदच्या मनात चिंता निर्माण करते. मकरंदची मुलगी म्हणजे वाडय़ाची ‘आगळ’ न पाहिलेली तिसरी पिढी. ती आपल्या जीवनाचा अत्यंत वस्तुनिष्ठ विचार करते. मकरंदच्या आजीचा संघर्ष सुनांविषयीच्या संशयी वृत्तीचा होता. दुसरा संघर्ष, वडील-मुलगा असा आणि तिसरा संघर्ष मात्र जगण्याच्या जाणिवेचा, जीवनशैलीचा असा आहे. तीन पिढय़ांमधील हा संघर्ष कौटुंबिक नातेसंबंधांवर सामाजिक अंगाने प्रकाश टाकणारा आहे. संयुक्त कुटुंबाचे एकत्र कुटुंब आणि आत्यंतिक महत्त्वाकांक्षेपायी, ध्येयाकांक्षेपायी एकत्र कुटुंबाचे विखंड ‘आगळ’मधून दिसते. जगताना कुटुंबात नातेसंबंधांचा घराला बांधून ठेवणारा वर्तनाचा अर्निबध अलिखित करार होत असतो. तो करार अधिक सुंदर करण्यासाठी सुखऐश्वर्यात जगण्यासाठी माणसं ध्येयानं पछाडून अधिक खासगी होत आहेत, याचे अत्यंत वस्तुनिष्ठ, सुंदर दिग्दर्शन ‘आगळ’मधून होते.
या कादंबरीत मनोविश्लेषणाला बराच वाव आहे. ही बाब समकालीन कादंबऱ्यांत कमी झालेली दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे कादंबरीची सुरुवात मोठी विलक्षण, व्यापक, विस्तृत विश्वाला कवेत घेणारी वाटते, परंतु हा विषय तिथेच तुटतो. संयुक्त कुटुंबातील भावकीचे पुढे काय होते याचा उल्लेखही कादंबरीकार करत नाही. म्हणून ही निमुळती होत गेलेली कुटुंबकथा आहे, असे सुरुवातीलाच म्हटले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लोककथनाची उत्तम अशी शैली लेखकाच्या हातून गळून पडते. त्याऐवजी कादंबरीकाराने मराठी कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात वापरत तशी ‘वाचक हो’, ‘लोक हो’ अशी थेट संवादरीत वापरली आहे. परंतु कथानक रुद्ध होणार नाही, ते प्रवाही राहील, पाल्हाळ होणार नाही याची मात्र दक्षता घेतली आहे. सुरुवातीला सापडणारा सूर, लय, शैली मध्येच सोडण्याची मराठी कादंबरीची रीतच होऊन बसली आहे. अपवाद भालचंद्र नेमाडे यांचा.
कुटुंब संस्थेत नात्याचा वीण अत्यंत घट्ट आणि तितकाच नाजूक असतो. तो पीळ ढिला होऊ लागला म्हणजे जीवनाचा आळा फिस्कटतो. समाजाचे संघटन याच नात्यामधून होते. उत्तम सामाजिकता हे कादंबरीचे अंगभूत वैशिष्टय़ असते. ‘आगळ’ एका कुटंबाची कथा जरी असली, तरी सांप्रत कुटुंबसंस्थेची कुचंबणा अत्यंत व्यामिश्र व संयत रूपात ही कथा सांगते.
मनोविश्लेषणातून समजून घेतल्यास मकरंद हा समंजस नायक आहे. आपल्या पत्नीवर खेकसतसुद्धा नाही. संवादात विसंवाद होईल असे वाटताना तो नर्मविनोदाने प्रसंगाला कलाटणी देतो. गावी वडील, भाऊ, भावजय, पुतण्या यांच्याशी शेवटच्या प्रसंगात संवाद साधणारा मकरंद पाहिला म्हणजे कादंबरीकार कसोटीला उतरतो म्हणजे काय, ते कळते. आपले बोलणे खंडित न करताच त्या सर्वाशी तो अत्यंत प्रभावी संवाद साधतो. ते एक भाषणच म्हटले पाहिजे. त्यामध्ये स्वत:विषयीचा त्रागा, उपहास तो स्पष्ट करतो. स्वत:चा षंढ म्हणूनही उपहास करतो.
भारतीय समाजात जातवाद हे सनातन वास्तव आहे. ते अतिभयावह आहे. नवीन पिढी अत्यंत तीक्ष्ण बुद्धीची आहे. तिला आपण जातवादाचीच दीक्षा देत आहोत. या जातवादाचे विच्छेदन आगळमध्ये कौशल्याने केले आहे. प्राध्यापिका दातेबाई एक ब्राह्मण म्हणून अख्खा स्टाफ पूर्वग्रहदृष्टीने पाहतो. दातेबाई स्टाफमधील अनेक पुरुष प्राध्यापकांशी कोणत्याही विषयावर अत्यंत खुलेपणाने बोलतात. मकरंदच्या कौटुंबिक प्रश्नावरही त्या वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात आणि ब्राह्मण समाजाची आज जी झोडपाझोडपी चालू आहे, त्याचा त्या युक्तिवादाने, बुद्धिवादाने शांतपणे समाचार घेतात. ही गरज होती. जातवादंग, एखाद्या समाजाला जाणीवपूर्वक वक्रदृष्टीने पाहणे हे निकोप समाजसुधारणेसाठी घातक असते. हा विषय कदमांनी अत्यंत जबाबदारीने पेलला आहे.
दुसरा विषय म्हणजे नोकरी करणारी स्त्री व नोकरी न करता घरात, शेतात, मोलमुजरी करणारी स्त्री. हा आजचा संघर्षविषय आहे. नोकरी करणारी स्त्री म्हणून नीलाचा मकरंद उदोउदो करतो आहे असे त्याच्या वडिलांना वाटते. या अशिक्षित वडिलांच्या तोंडून कादंबरीकाराने एक विचार पेरला आहे. स्त्रियांच्या मोलमजुरीचा, त्यांच्या शेतवाडीमधील कामाचा विचार झालाच नाही. ती सनातन काळापासून नोकरी करत आली आहे. हा विचार नव्याने आला आहे.
‘आगळ’च्या आत्मनिवेदनाला लय आहे. कादंबरीकार नायकाला कधी लोककथनाच्या भूमिकेत नेतो, तर कधी शिक्षकाच्या. एरवी त्याला सामान्य पातळीवर ठेवतो. या कादंबरीत नव्या पिढीच्या भाषेचा प्रयोग केला आहे, पण तो फसला आहे. एकाच वेळी शुद्ध मराठी आणि शुद्ध इंग्लिश. हिंग्लिश-मिंग्लिश अशी नव्या पिढीची भाषा आहे, पण नव्या पिढीचे विचार, राहणीमान, कपडालत्ता, खाणेपिणे, जीवनाकडे पाहण्याची बेदरकार वृत्ती हे विशेष फार सुंदरपणे मांडले आहेत. नायक बायकोचे गाऱ्हाणे चार पानांत सांगतो, पण वेगवेगळ्या प्रकारात ते खंडित करून सांगतो. कादंबरीचा शेवट नवऱ्याचा नंदीबैल झाल्याचे दाखवून हा बैल आपल्या पुतण्याला जीवनविषयक काहीएक कानमंत्र देतो. ‘आगळ’ खेडय़ातून शहरात गेलेल्याची कथा नाही, कुटुंब व्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नांची कादंबरी आहे.
‘आगळ ’- महेंद्र कदम,
लोकवाङ्मय गृह, मुंबईर्.
पृष्ठे -२५२ ,                   किंमत – २५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा