श्रद्धा कुंभोजकर

इतिहास म्हणजे उपलब्ध असणाऱ्या खाणाखुणांच्या आधारानं रचलेली गतकाळाची कहाणी असते. शक्य तिथे आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणीदेखील मिळतील त्या पुराव्यांचा सुगावा लावण्यासाठी इतिहासकाराला धडपडावं लागतं. अशी धडपड करून, विस्मृतीच्या सावटात जगणाऱ्या अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचं काम पी. साईनाथ यांनी ‘द लास्ट हिरोज्’ या पुस्तकाद्वारे करून आधुनिक भारतीय इतिहासात नवी भर घातली आहे. या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या संशोधक पत्रकाराच्या ‘द लास्ट हिरोज्- फुटसोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या इंग्रजी पुस्तकाचा मेधा काळे यांनी केलेला अनुवाद ‘अखेरचे शिलेदार- भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचं पायदळ’ या नावानं मराठीत प्रकाशित झाला आहे. इतिहास समजून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक काही महत्त्वपूर्ण दिशा दाखवतं.

three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
institutions values and provisions in indian constitution
संविधानभान : आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”
Indian culture from the perspective of Sane Guruji
साने गुरुजींच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृति
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट

स्वराज्य आणि स्वातंत्र्य या दोन संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक माणसं अनेक वाटांनी लढत राहिली. शोभाराम गेहेरवार, बाजी मोहम्मद, एन. संकरय्या, लक्ष्मी पांडा, थेलू आणि लोक्खी महातो, एच. एस. दोरेस्वामी, आर नल्लकन्न असे देशाच्या विविध प्रांतातले स्वातंत्र्यसैनिक स्वराज्य- म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढले आणि जिंकले. महाराष्ट्रामधून हौसाबाई पाटील, कॅप्टन भाऊ लाड, गणपती यादव हेही या मांदियाळीत सामील होते. या वयोवृद्ध माणसांच्या प्रत्यक्ष भेटी आणि मुलाखती घेऊन त्यांच्या कहाण्या या पुस्तकात सांगितल्या आहेत.

ही माणसं पुढेही अनेक प्रकारांची स्वातंत्र्य – हा शब्द अनेकवचनात आहे- मिळावी म्हणून प्रयत्न करत राहिली. हे स्वातंत्र्यलढय़ाचे नायक होते, पण त्यांच्यावर प्रकाशझोत पडले नाहीत. इतकंच काय, अनेकांना स्वातंत्र्यसैनिक असल्याची सरकारी मान्यतासुद्धा मिळाली नाही. तरीही ते लढले आणि जिंकले. अशा माणसांच्या कहाण्या हे पुस्तक संवेदनशील मनानं आणि शोधपत्रकाराच्या सतर्क नजरेतून वाचकांसमोर मांडतं.

छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांमधून इतिहासकाराला त्या काळाची नस पकडावी लागते. कारण या बारकाव्यांतून मोठय़ा कहाण्यांमध्ये रंग भरले जातात, त्यातल्या तपशिलांची खातरजमा केली जाते, अर्थ स्पष्ट केला जातो. ओदिशामध्ये पाणीमोडा नावाचं गाव होतं, त्याचं नाव पडलं बदमाष गाव. का? तर त्या गावातल्या एकूणएक जातवर्गामधल्या स्त्रीपुरुषांनी छोडो भारत आंदोलनात उडी घेतली होती. चामरू परिदा हा तरुण तुरुंगात होता. इंग्रजांनी कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी शे-पाचशे रुपयांचं आमिष दाखवायला सुरुवात केली होती. त्यातली खरी गोम ही होती की, भारतीय लोक हे आघाडीवर मरण्यासाठी पाठवले जाणार होते. ही गोष्ट उघडकीला आणून चामरूने अनेक कैद्यांना युद्धात जाण्यापासून वाचवलं. तो आधीच तुरुंगात होता. तरी सरकारनं त्याच्यावर दंड ठोठावला. दंडाची वसुली करायला पोलीस चामरूच्या घरी थडकले. केतकी परिदा- त्याच्या आई घरात होत्या. पोलिसांना त्यांनी सांगितलं, ‘‘चामरूच काय, गावातली एकूणएक मुलं तुरुंगात आहेत. मी कुणाकुणाचा दंड भरणार? मी काही दंडिबड भरणार नाही.’’ पोलीस हताश झाले. ‘निदान विळेकोयते तरी जप्त करून नेतो’ म्हणाले. त्यावर केतकी परिदा म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे विळेबिळे नाहीत. पण माझ्याकडे हे शेणाचा सडा टाकण्याचं पाणी आहे. त्यानी मी आता अंगण सारवणार आहे. तेव्हा तुम्ही इथून हला कसे!’’ मजा म्हणजे पोलिसांनीही काढता पाय घेतला. असे बारकावे सांगणाऱ्या गोष्टींतून घटना तर कळतातच, पण एकूणच त्या भारलेल्या काळात पोलिसांना लोक कसे घाबरेनासे झाले होते, त्या जनतेच्या धैर्याचंही दर्शन वाचकांना घडतं. इतिहासकारांनाही त्या काळाची नस सापडावी लागते.

कधीकधी हे बारकावे, तपशीलदेखील मिळत नाहीत. अशा वेळी इतिहासकाराला आपल्या संदर्भ साधनांचं वाचन करून त्यातले गर्भित अर्थ पाहावे लागतात. भबानी महातोंनी या लेखकाला सरळसरळ सांगितलं, ‘‘त्या तसल्या चळवळी-बिळवळींशी माझा काही संबंध नव्हता हो. माझे पती या असल्या गोष्टी करत. माझं काम म्हणजे शेती करणं, पीकपाणी पाहणं आणि पती तुरुंगात नसतील तेव्हा त्यांच्या मित्रांसाठी ढीगभर स्वयंपाक रांधणं.’’ आता अशा बाईंना कोण स्वातंत्र्यसैनिक म्हणणार? आपल्या सरकारनं तरी तसं म्हटलं नाही. पण या सगळय़ा रामरगाडय़ाचा गर्भितार्थ समजून घेऊन लेखक जेव्हा आपल्याला सांगतो की, वरवर साधी घरकामं करणारी ही स्त्री प्रत्यक्षात एकटीनं पीकपाणी काढून, त्याचं अन्न रांधून, पतीच्या सोबतीनं ‘छोडो भारत’ आंदोलनात भूमिगत असणाऱ्या क्रांतिकारकांसाठी ते पाठवत होती तेव्हा आपल्याला थरारून जायला होतं. शब्दांचा गर्भितार्थ समजून घेणं हे इतिहासकाराचं मोठंच कसब आहे.

इतिहास लिहिणाऱ्यापर्यंत गतकाळाचे पुरावे पोचले तरी त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून खातरजमा करून घेणंही गरजेचं असतं. जबाबदारीनं इतिहास लिहिणाऱ्या प्रत्येक इतिहासकाराला पुराव्यांना प्रश्न विचारावेच लागतात. मल्लू स्वराज्यम् यांच्या कहाणीमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढय़ांचे तपशील येतात. मल्लू स्वराज्यम् या चौऱ्याऐंशी वर्षीय स्वातंत्र्यसैनिक होत्या- त्यांना लेखकानं विचारलं, ‘‘या लढय़ात गोफणगुंडा हे शस्त्र पुरेसं होतं का?’’ बाईंना जी तिरीमिरी आली- त्यांनी भर कार्यक्रमात गोफण फिरवून उपस्थितांना प्रात्यक्षिकच दिलं. आणि म्हणाल्या, ‘‘आमच्या काळात गोफणगुंडा हेच आमचं हत्यार होतं. आता तुमच्या हाती लॅपटॉप नि मोबाइल फोन आहेत. ते वापरा.’’ अशा पद्धतीनं तपशिलांसाठी आणखी सखोल चौकशी केली की इतिहासाच्या कहाणीचे वेगवेगळे पदर अधिक स्पष्टपणे समजून घेता येतात. त्या कहाणीचा अस्सलपणा वाचणाऱ्यापर्यंत झिरपतो.

इतिहासातल्या कहाण्यांमध्ये सगळं छानदार नसतं. अनेक अस्वस्थ करणारी सत्यदेखील इतिहासात असतात. इतिहासकाराला त्यापासून पळ काढता येत नाही. लेखक पी. साईनाथ यांनी  बाजी मोहम्मद, एन संकरय्या, भगत सिंग झुग्गियां यांच्या कहाण्यांमधून असे असंख्य तपशील दिलेत, ज्यातून स्वातंत्र्यलढय़ाबद्दल आपली जी एक नेहमीची समज असते तिला धक्का लागतो. आपली समजूत असते की स्वातंत्र्याचा लढा म्हणजे भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालणारे राष्ट्रवादी विरुद्ध इंग्रज सरकार चालवणारे साम्राज्यवादी अशी सरळ लढत होती. पण हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी पायपीट करणारं हे अनवाणी पायदळ अनेक प्रकारच्या समूहांना कवेत घेणारं होतं. यात पोलिसांनी केलेल्या अन्याय्य अटकेसाठी त्यांना झापणारे न्यायाधीश आहेत. काँग्रेसखेरीज दुसऱ्या कम्युनिस्टांसारख्या पक्षांचेही लोक या लढय़ात आघाडीवर दिसतात. आणि शाळकरी मुलांनी ‘ब्रिटानिया मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या म्हणून त्यांना मारहाण करून शाळेतून काढून टाकणारे भारतीय शिक्षकही दिसतात. ‘जमाखर्च स्वातंत्र्याचा’ मांडायची वेळ आल्यावर यातल्या अनेक शिलेदारांना साधी स्वातंत्र्यसैनिकाची ओळखही नाकारण्याचं पाप स्वतंत्र भारतदेशानं केलं हे लेखक दाखवून देतो. अशी अस्वस्थ करणारी सत्यंही प्रकाशात आणायला लेखक मागेपुढे पाहात नाही. म्हणजे इतिहासकाराला संवेदनाहीन असायला हवं असं नाही. याच्या अगदी उलट परिस्थिती असावी लागते. इतिहासकाराला संवेदनशील असावं लागतं. त्याची संदर्भसाधनं आणि वाचक यांच्या आत्मसन्मानाचं भान त्याला ठेवावं लागतं. हे जाणून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या पायदळाची मानवी बाजू लेखक अगदी नजाकतीनं चित्रित करतो. गणपती यादव सांगतात की, त्यांची पन्नास र्वष वापरलेली जुनी सायकल कुणी तरी चोरली. तेव्हा लेखक मिष्किल टिप्पणी करतात, बहुतेक तो एखादा चुकार पुराणवस्तूंचा विक्रेता असणार. पुढच्याच परिच्छेदात गणपती यादवांनी लेखकाचे हात हातात घेऊन केलेला ‘ये हृदयींचे ते हृदयीं’ पोचवणारा संवाद लेखकानं अशा संवेदनशीलतेनं केलाय की, वाचणाराही हेलावून जातो. देमतीदेई सलिहान यांची मुलाखत होते. त्यांनी केलेल्या अपार कष्टांची साधी नोंददेखील सरकारदरबारी घेतली जात नाही याचा संताप आणि दु:ख यांमुळे एरवी गडबडदंगा करणाऱ्या लेखकाच्या साथीदारांवर अबोल दु:खाचं सावट कसं पडलं हे वाचताना आपल्यालाही तो शोकसंताप जाणवतो. सलिहानवरच्या अन्यायामुळे गदगदून लेखकानं एक कविताही केली आहे. पण ती कविता मुख्य कहाणीमध्ये न देता परिशिष्टामध्ये देण्याचा संयमही त्यांनी दाखवलाय.

एकूण, द लास्ट हिरोज् हे मौखिक इतिहासलेखनाचं एक सुंदर उदाहरण ठरेल. मराठीमध्ये ते आणताना मेधा काळे यांनी कथनाचा ओघ कायम राहील अशी शैली वापरली आहे. शब्द न् शब्दाचं अक्षरश: भाषांतर न करता त्यांनी वाचकाचं लक्ष खिळून राहील अशी समकालीन, ओघवती भाषा वापरली आहे. खास करून संवादांमधला जिवंतपणा आणि बोलीभाषेचा ठसका सुंदर आहे. हे पुस्तक लिहिण्याच्या लेखकाच्या उद्देशांशी ते सुसंगतच आहे. संदर्भसूचीचं भाषांतर करताना काही सुधारणा करता येतील, त्या पुढच्या आवृत्तीत नक्की समाविष्ट होतील.  द लास्ट हिरोज्- अखेरचे शिलेदार या सारखी पुस्तकं अत्यावश्यक असतात. आपण आज जे आणि जसे आहोत ते कसे काय झालो, हे समजायला त्यांचा उपयोग होतो. आज आपण जे कमावलंय ते कमावण्यासाठी आपल्याला कोणकोणते लढे द्यावे लागले याचा लेखाजोखा ती मांडतात. आपण कुठे चुकलो, आपल्या कायकाय चुका झाल्या आणि हा प्रवास पुढे कसा सुरू ठेवता येईल याच्या दिशा अशा पुस्तकांमुळे स्पष्ट होतात. त्यामुळे लेखक, अनुवादनकर्ती आणि प्रकाशकांना धन्यवाद देऊन हे पुस्तक जरूर वाचायला हवं.

‘अखेरचे शिलेदार- भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचं पायदळ’, – पी. साईनाथ, अनुवाद : मेधा काळे, मधुश्री प्रकाशन, पाने- २२२, किंमत- ३५० रुपये.

shraddhakumbhojkar@gmail.com

Story img Loader