आज भारतीय इंग्रजी लिखाणाला जी बाजारी मागणी आलीय, त्यात या तथाकथित भारतीय, हिंदू संस्कृतीचे बुरखे फाडणारी, इथल्या अस्पृश्यतेचे, जातीयतेचे, बाबासाहेबांच्या चळवळीचे, धर्मातराचे तपशील अभिनया रमेश यांच्यासारख्या सशक्त लेखक-कवीकडून जगाला कळले तर ‘आध्यात्मिक गुरू’, ‘स्पिरिच्युअल लँड’ म्हणून या संस्कृतीकडे बघणाऱ्या जगाचे डोळे उघडतील आणि त्यांच्या समयांखालील अंधार आणि रांगोळ्यांखालची विषमभूमी जगासमोर येईल.
अ भिनया रमेश यांच्या ‘असंस्कृती’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचं त्यांचं आग्रहपूर्ण निमंत्रण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी स्वीकारू शकलो नाही याबद्दल क्षमस्व. तरीही यानिमित्ताने त्यांच्या कवितेबद्दल थोडं बोलावं या कारणाने हे पत्र..
‘कविता उदंड झाली’ असं ऐकूनही आता पन्नासहून अधिक र्वष होत येतील, तरीही कविता लिहिली जातेय, सादर केली जातेय आणि प्रकाशितही होतेय. कवितेचा मी काही नियमित वाचक नाही. पण तिला शत्रू मानणाराही नाही. त्यामुळे कुणी आग्रहाने वाचायला दिली अथवा सहज वाचनात आली तर थांबून वाचतोही. ओळखीच्या, प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशा कवी मंडळींत अभिनया रमेश हे नाव माझ्या कधी वाचनात आले नव्हते. त्या अर्थाने मी पहिल्यांदाच त्यांची कविता वाचली. ‘त्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक असून ब्रिटिश हाय कमिशनच्या अवॉर्डी, लंडन विद्यापीठातून एम. ए. झालेल्या आहेत,’ एवढाच त्रोटक परिचय या संग्रहातून कळतो.
या अशा पाश्र्वभूमीवर मला त्यांच्या कवितेआधी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन यासाठी करायचे आहे की, आपल्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वत:च चितारलंय! मराठीत नामदेव ढसाळ, वसंत आबाजी डहाके, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे अशा मोठय़ा कवींनी आपल्या कवितांसाठी चित्रे, मुखपृष्ठे तयार केलीत. अलीकडे कविता महाजन यांचे नाव घेता येईल. याव्यतिरिक्तही काही नावं असतील. पण कवितेआधी मी त्यांच्या या चित्राने प्रभावित झालो. कारण चित्रं ही अभिव्यक्त होण्याची मनुष्यप्राण्याची भाषेआधीचीही मूळ प्रेरणा आहे. त्यात अभिनया अशा परंपरेतून आल्यात- ज्यांना अक्षरओळखही नाकारली गेली होती! त्या अर्थाने अभिनया यांचं चित्र आदिम प्रेरणेची आधुनिक अभिव्यक्ती वाटते. त्यांनी कवितेसोबत चित्रं काढणंही सुरू ठेवावं अशी त्यांना विनंती करतो.
‘असंस्कृती’ या संग्रहात एकंदर ५५ कविता आहेत. पैकी आठ मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आहेत. एकंदर कवितालेखनातही अभिनया इंग्रजी शब्दांचा न बिचकता वापर करतात. सध्याच्या युगात आवडो- न आवडो, सगळ्याच भाषांमध्ये झालेला इंग्रजीचा संकर हा रोजच्या जगण्याचा, रोजच्या संवादाच्या भाषेचा एक अपरिहार्य भाग झालाय. आणि इंग्रजी विषयाचे अध्यापन करतेय तर जरा दाखवतेच माझे प्रभुत्व- असा कुठलाही अभिनिवेश वा आव न आणता त्या इंग्रजी शब्दांचा सहज वापर करतात. या सहज वापरामुळे ते शब्द खटकत नाहीत की कवितेच्या आस्वादात काही अडथळा येत नाही.
‘असंस्कृती’ या शीर्षकातून त्यांनी या कवितांचा रोख स्पष्ट केलाय आणि कवितांतून तो अधोरेखितही केलाय. अभिनयांचं मला माहीत नसलेलं वय बघता त्यांना जातीयतेचे, विषमतेचे थेट चटके बसले असण्याची शक्यता कमी आहे. पण वारसाहक्कानं ते जाणिवेच्या पातळीवर नक्कीच मिळालेले आहेत, हे त्यांच्या कवितांतून कळतं. शिवाय अगदी आजच्या जागतिकीकरणाच्या उरबडव्या वातावरणातही जातीयतेचे, धर्माधतेचे जे तरल अनुभव येतात, ते काही वेळा थेट अस्पृश्यतेपेक्षाही अधिक दाहक वाटतात. त्या ज्या अध्यापन क्षेत्रात काम करतात, त्या महाविद्यालयीन- आणि विशेषत: विद्यापीठीय वातावरणात ही दाहकता अधिकच जाणवत असावी. कारण हिंदी सिनेमातल्या खानदानी दुश्मनीसारखीच ‘शिक्षणच नाकारलेल्यां’चं आजचं शैक्षणिक, प्रशासकीय वर्चस्व शिक्षण नाकारणाऱ्यांच्या आताच्या पिढय़ांना नियमांच्या चौकटीतही ‘सलत’ राहतं, हा आधुनिक सामाजिक इतिहास आहे. अशांकडून जेव्हा सातत्याने संस्कृतीचे गोडवे गायले जातात, तेव्हाचा सहजोद्गार म्हणजे ‘असंस्कृती’!
अभिनयांची कविता दलित कविता आहे का? ती दलित साहित्यात बसते का? का ती आंबेडकरी, बौद्ध कविता आहे? की आणखी काही? याविषयी संबंधित मंडळी चर्चा, वाद करतील. मला स्वत:ला ती दलित जाणिवेची आधुनिक कविता वाटते. आधुनिक यासाठी, की आशयाने ती पूर्वसूरींशी नातं जोडणारी असली तरी अभिव्यक्त होतानाचा तिचा स्वर आजचा आहे. तिची रचना, मांडणी आजची आहे. त्यातल्या इंग्रजीच्या वापरामुळे मी हे म्हणतोय असं नाही, तर आज लिहिल्या जाणाऱ्या कवितेच्या मांडणीचा, लयीचा, शब्दांचा कुठलाही दाब अभिनयांच्या कवितेवर दिसत नाही. त्या अर्थाने ती मला आधुनिक वाटते. अनुकरणातून मुक्त वाटते. आजच्या भाषेतली वाटते.
‘रक्त आटवलंस’ या पहिल्याच कवितेसह ‘रंग’, ‘भीमा कोरेगाव त्यांनी’, ‘कटअ‍ॅकठए’,  ‘ख’ु४१ॠ’, ‘प्रियंका’, ‘सखे’ या कविता मुळातूनच वाचायला हव्यात. या संपूर्ण कवितासंग्रहात स्वत:ला समाजाभिमुख ठेवतानाच ‘तू’, ‘वडील वारले तेव्हा’, ‘शोनाच्या पहिल्या वाढदिवसास’ अशा काही व्यक्तिगत जीवनाशी निगडित कविताही येतात. पण त्यातला अंत:स्वरही पुन्हा मूळ जाणिवेशीच जोडला जाणारा आहे. त्यामुळे या संग्रहातील त्यांची उपस्थिती खटकत नाही.
इंग्रजी साहित्य वाचावं इतका माझा त्या भाषेशी परिचय नाही. पण तरीही हे बरे आहे, हे किचकट आहे, हे कंटाळवाणे आहे, हे आजच्या भाषेत ‘पेपी’ आहे, एवढं वाचून कळण्याइतपत त्या भाषेशी ओळख आहे. या संग्रहात आठ कविता इंग्रजीत आहेत. त्या वाचल्यावर मात्र असं प्रकर्षांनं वाटतं की, अभिनयाने इंग्रजीतच लिहावं. याचं कारण मराठी कवितेत असलेल्या सहजतेपेक्षा त्यांच्या इंग्रजी लिखाणात सहजता आहे. आणि आज भारतीय इंग्रजी लिखाणाला जी बाजारी मागणी आलीय, त्यात या तथाकथित भारतीय, हिंदू संस्कृतीचे बुरखे फाडणारी, इथल्या अस्पृश्यतेचे, जातीयतेचे, बाबासाहेबांच्या चळवळीचे, धर्मातराचे तपशील अभिनयांसारख्या सशक्त लेखक-कवीकडून जगाला कळले तर ‘आध्यात्मिक गुरू’, ‘स्पिरिच्युअल लँड’ म्हणून या संस्कृतीकडे बघणाऱ्या जगाचे डोळे उघडतील आणि त्यांच्या समयांखालील अंधार आणि रांगोळ्यांखालची विषमभूमी जगासमोर येईल.
गेल्या पन्नास वर्षांतले दलित, आंबेडकरी, बौद्ध, आदिवासी, स्त्री-साहित्य मराठीतून इतर भाषांत क्वचितच गेलंय. अशावेळी अभिनयांसारखे थेट इंग्रजीत व्यक्त होणारे लेखक हे या विचारांसाठी नवे आशास्थान आहे. आपल्या बहुतांश पिढय़ा इंग्रज आणि अमेरिकेच्या दावणीला बांधून आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झगडणाऱ्यांना शुभेच्छा देत आपण नव्या जागतिक भाषेत व्यक्त होत वेदनेचा परिघ वैश्विक करू या. त्यासाठी अभिनयांना शुभेच्छा देऊ या.
अभिनयांच्या कवितांचा तपशिलात विचार करण्याची ही जागा नव्हे, पण आधुनिक होताना, इंग्रजीशी जवळीक करताना, नव्या जगात जगतानाही त्यांची एक मूळ जाणीव, प्रेरणा कशी देशीच राहते, हे सांगताना मला त्यांची ‘आमचं काका म्हनत्याती’ ही कविता उद्धृत करण्याचा मोह टाळता येत नाहीए. ती कविता..
आमचं काका म्हनत्याती
त्या दिसी
इद्यापिठात
एक उंडगा प्रोफेसर भेटला.
त्यानं
बाबासाहेब कोलंबियात
फेल झाले
हा जावईशोध लावला.
आरं येडय़ा
आईनस्टाईन बी बॅकबेंचर हुता.
अन् तु रं गडय़ा
जगतुया त्येंच्याच नावानं ना?
बामणाचं पाय चाटून मार्क मिळवलंसा
अन् आता मातुर बामणासारखा
स्टेटमेंट माराया लागलासा
काय म्हनावं काय तुला
तुला काय हाय का नाय?
बाबा कुटं
अन् तू कुटं
थोडं ठिवावं की.
अभिनयांसारख्या उच्चशिक्षित कवयित्रीने कृतघ्नतेची झाडाझडती आपल्या आधीच्या पिढीच्या भाषेत, तळमळीत थेट मांडावी यातच अशा गोष्टीचं दुखरेपण एक्सलन्सच्या एव्हरेस्टला जाऊनही कमी होत नाही, हेच दर्शवतं. कवितेची शेवटची ओळ ‘थोडं ठिवावं की’ ही आमच्या आजच्या राजकीय स्थितीलाही चपखल बसते. या एकाच ओळीत अभिनयांनी ज्या हजारो गोष्टी सांगितल्यात, त्यामुळेच त्यांचं कवीपण अधिक मोठं होतं आणि त्यांच्यातल्या चांगल्या, खऱ्या कवीची ओळख देतं.
शेवटी आपण हे मान्यच केलं पाहिजे की, ज्याने कोणी मनाने, अंत:प्रेरणेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बोट धरून प्रवास सुरू केलाय, तो किंवा ती कितीही महान म्हणून मिरवणाऱ्या संस्कृतीचा ‘असंस्कृती’ असं उच्चरवाने म्हणायला अजिबात कचरणार नाही.
या धैर्यशील पिढीत अभिनया कांबळेंचं मी स्वागत करतो.
‘असंस्कृती’ – अभिनया रमेश, प्रतिशब्द प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे  – ८४, मूल्य – १०० रुपये.