म. जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ लिहून आज सव्वाशे र्वष उलटून गेली. या सव्वाशे वर्षांत भारतातला- विशेषत: महाराष्ट्रातला शेतकरी ‘सुधारला की खचला?’ असा प्रश्न उपस्थित केल्यास, याचं उत्तर दुर्दैवानं नक्कीच- ‘खचला, तोही भयंकर खचला,’ असंच द्यावं लागतं. त्यामुळं फुल्यांच्या ‘आसूडा’चं महत्त्व पूर्वीपेक्षा आजच्या काळात अधिकच अधोरेखित होतं.  
म. फुले-महर्षी शिंदे-म. गांधी यांच्या विचारांची अक्षम्य उपेक्षा म्हणजे आजचं भयंकर वास्तव. त्यामुळंच या संबंधानं काही लिहू पाहणाऱ्या लेखकाला फुले-िशदे-गांधी अधिक जवळचे वाटत असतील तर ते अतिशय साहजिक म्हणावं लागेल. कारण फुले-िशदे-गांधींचा मूलभूत विचार दिवसागणिक अधिकाधिक लागू होतो आहे, असंच आजचं चित्र आहे. ही प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे राजन गवस यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘ब, बळीचा’ ही वैशिष्टय़पूर्ण, पण महत्त्वाची कादंबरी होय.
‘तणकट’नंतर तब्बल १३ वर्षांनी राजन गवस यांची ‘ब, बळीचा’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. तिचा घाट अगदी निराळा आहे. तीत कथे अंतर्गत कथा अशी तिपेडी रचना आहे. म्हणजेच तीन कथा समांतरपणे पुढे पुढे सरकत जातात. एक- भांडय़ांचा व्यापार करणाऱ्या दिपूशेठने कोणकेरी या लेखकाच्या घेतलेल्या शोधाची; दोन- लेखक कोणकेरीने त्याच्या डायरीत केलेल्या नोंदी, म. फुल्यांना आणि कांतारामजींना लिहिलेली पत्रे आणि डायरीच्या पानांतून प्रकट होणाऱ्या त्याच्या संवेदनशील व अस्वस्थ मनाची; तीन- लेखक कोणकेरीनं चित्रपटासाठी लिहिलेल्या पटकथेतील आडव्याप्पा या शेतकऱ्याची.
या कादंबरीला कोणी एक असा नायक नाही, तर दिपूशेठ, लेखक कोणकेरी आणि आडव्याप्पा असे तीन स्वतंत्र नायक म्हणता येतील. या तिघांच्या तीन स्वतंत्र कथा, स्वतंत्र तऱ्हा. एकाच स्थानाहून एकाच दिशेने निघालेल्या. तिघांचं अंत:सूत्र एकच- शोध. पण या तिघांचा शोध वेगवेगळा आहे. लेखक कोणकेरीचं अचानक गायब होणं दिपूशेठसाठी त्रासदायक ठरतं. कारण त्याच्यामागे पोलीस लागतात. पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी दिपूशेठला कोणकेरी हवा असतो. म्हणजे मित्रत्व वगरे असतं असं नाही, पण त्याच्या धडपडीतून व्यापारीवृत्ती जरूर दिसते. कोणकेरीला मात्र शेतकरी- तोही आजचा शेतकरी शोधायचा असतो. एकीकडे तो व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्याच्या शोधासाठी धडपडत असतो व त्यातून आलेल्या अनुभवाला पटकथेच्या माध्यमातून आडव्याप्पाच्या रूपाने मूर्त स्वरूप देत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिपूशेठ व कोणकेरी यांच्या माध्यमातून गवस इथल्या आजच्या व्यवस्थेचाच काहीएक शोध घेत शेतकीच्या पडझडीची ‘गाथा’च लिहिताहेत, अशी ही रचना आहे. म्हणजे हा तिहेरी शोध झाला.
कोणकेरीने एका चित्रपटासाठी जी पटकथा लिहिलेली असते, ती पटकथा म्हणजे आडव्याप्पा या शेतकऱ्याची कथा. त्या येऊ घातलेल्या चित्रपटाचं नाव असतं- ‘उफराळ’. कादंबरी वाचता वाचता मध्ये मध्ये या पटकथेतील एकेक दृश्ये येतात. दृश्यानंतर मग कधी कोणकेरीच्या डायरीतील पानं, त्यातील त्याने वेळोवेळी केलेल्या नोंदी येतात, मनाच्या भयंकर अस्वस्थेतून-उलघालीतून जोतीरावांना-कांतारामजींना लिहिलेली पत्रे येतात, तर कधी अचानक बेपत्ता झालेल्या लेखक कोणकेरीच्या शोधाच्या अनुषंगानं दिपूशेठची चित्रणं येतात. या तिन्ही कथा एकमेकांत गुंफलेल्या असल्यानं एकदा का ही गुंफण लक्षात आली की मग कादंबरीच्या आकलनाला काही अडसर येत नाही.
पटकथेतील दृश्यांतून आडव्याप्पाची शोकान्तकारी कथा चित्ररूपाने उलगडत जाते. या कथेला आजच्या बदलत्या काळाची पाश्र्वभूमी आहे. पुढारी, व्यापारी, नोकरदार आणि भांडवलदार ही ‘उफराळी व्यवस्था’ म्हणजे भारतीय कृषी-समाज व्यवस्थेला लागलेली रक्तपिपासू भूतं. शेती-शेतकरी-पर्यावरण-निसर्ग यांना पूर्ण भिकेला लावणं यातच त्यांच्या मनाची शांती आहे. आजचा शेतकरी या चार रक्ताला चटावलेल्या भूतांच्या ‘उफराळी’त पूर्णपणे अडकला आहे, हे दुर्धर दु:ख लेखक आडव्याप्पाच्या कथेमार्फत अधोरेखित करतो.
पटकथेतील ही दृश्ये नुसती दृश्ये नव्हेत तर एकंदर ग्रामसंस्कृती व कृषिजनसंस्कृतीवर टाकलेले अनेकविध दृष्टिक्षेप आहेत. ते डोळस आहेत. आजचं दाहक वास्तव रेखाटणारे आहेत. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणावं लागेल, या अर्थाने जुन्या कृषी-ग्रामपरंपरेतील काही चांगल्या गोष्टी निसटून जाताहेत, याबद्दलची तळमळ आणि जागतिकीकरणातून ज्या प्रकारची उद्ध्वस्तकारी नवी भांडवली विकृत व्यवस्था येत आहे, तिच्याबद्दलचा सुप्त रोष वा अस्वस्थता आहे. केवळ पटकथेतील ही सर्व दृश्ये एकत्रित जरी केली तरी एका शेतकऱ्याच्या आयुष्यावरील स्वतंत्र कादंबरी तयार होईल इतका कसदार ऐवज या पटकथेत आहे.
सदसद्विवेक व माणुसकी अजून शिल्लक असलेल्या आजच्या ‘कॉमन मॅन’च्या मनातील बोचरी धग म्हणजे या कादंबरीत ठिकठिकाणी आलेले मार्मिक संवाद वा वाक्ये होय. हा कॉमन मॅन शहरी नाही, तर पक्का खेडय़ातील व कृषिसंस्कृतीचा पाईक आहे. त्यामुळे तर ही धग आणखीच काळजाला चटके देते. उदा. तुझं चलन खेळतंय. घरात नोकरदार हाय. आमचं चलन फिरतच न्हाई गाऽऽ म्हणून इचार कराय लागतोय (पान ७२). आता आई-बाबाजवळ आडग्यानी ऱ्हायाचं, शिकल्याल्यानी शेरात (पान ८०). हे ग्रामीण, दलित लेखक स्वत:ची वाढच होऊ देत नाहीत. त्यांच्यात खुलेपणा नसतो. त्यामुळं ब्रॉड नाही विचार करता येत (पान ११६). शेतकऱ्याच्या घरातल्या पोरानंच शेतकरी शोधायचा (पान १८६). परंपरागत बियाणे गेली. नवी फसवणूक दारी आली.. खतेही बोगस.. जे जे बोगस ते ते खपवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे शेतकरी (पान २१३). इ.इ. वाक्ये वाचली की त्यातली खोली वाचणारालाही अस्वस्थ केल्यावाचून राहत नाही. अशी वाक्ये काही एकाएकी सुचत नाहीत, तर ती बराच काळच्या चिंतनातून-मानसिक घुसमटीतून तयार होऊन मनाच्या एका कोपऱ्यात धुमाकूळ घालत असतात. ज्यांना ग्रामीण साहित्यात ‘चिंतनशीलते’चा अभाव जाणवतो त्यांनी ‘ब, बळीचा’ जरूर वाचावी.
एकोणिसाव्या शतकातील जोतीरावांचं एकूण कार्य म्हणजे त्यापुढिलांसाठीचा एक मानदंड आहे. इथल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक वा अन्य कोणत्याही बाबतीत जोतीरावांना टाळून पुढे जाता येत नाही. त्यातही विशेषत: फुल्यांनी शेतकीसंबंधाने जे कार्य केलं ते अद्वितीय असंच आहे. एकविसाव्या शतकातील तरुणालाही फुले आपले वाटावेत यातच जोतीरावांच्या ऐतिहासिक कार्याची व त्यांच्या अक्षरविचारांची स्थलकालातितता ध्यानात येते. त्यामुळे कोणकेरीनं जोतीरावांना पत्रं लिहिणं ही बाब ओघानेच आली. कोणकेरी पत्र लिहून ‘हल्लीचा वृतान्त’ जोतीरावांना कळवतो. जोतीरावांच्या साक्षीनं तो आजच्या व्यवस्थेची छानणी करतो. अशी एकंदर दहा पत्रे तो जोतीरावांना लिहितो. स्वाभाविकच त्यातून तो अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. ही सर्व पत्रे ‘ब-बळीचा’ला एक निराळी उंची देऊन जातात. या पत्रांतून जसं आजचं विदारक सामाजिक वास्तव प्रतििबबित होतं, तसंच लेखक कोणकेरीच्या मनातील आंदोलित तगमग, पोटतिडीक, सामाजिक जाणीव-बांधीलकी आणि अस्वस्थताही प्रतििबबित होते. त्यामुळे ही पत्रे वाचणं हाही एक वेगळा अनुभव आहे.
नतिक अध:पतन, मूल्यांची पायमल्ली आणि अपेक्षाभंग आदींमुळे अतिशय अस्वस्थ झालेल्या लेखकाने बहुजन समाजात शिरलेल्या विविध अपप्रवृत्तींवर साहजिकच तटस्थपणाने बोट ठेवलं आहे. सर्वसामान्यपणे बहुजन समाजातील शिक्षितांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांनाच हरताळ फासला जाऊ लागला. आपल्याच लोकांनी ‘इडापिडा’ लादायला सुरुवात केली. फुल्यांचा संघर्ष तत्कालीन सनातन ब्राह्मणीव्यवस्थेशी होता. ज्या शूद्रातिशूद्रांच्या न्यायासाठी व मूलभूत हक्कांसाठी त्यांनी बंड पुकारलं, त्याच शूद्रातिशूद्र- बहुजन समाजातील शिक्षित आज कुणाचं, कसं शोषण करत आहेत, डाव उलटा पडतोय हा लेखकाच्या चिंतेचा व अस्वस्थतेचा विषय आहे.
कुणब्यांची-कष्टकऱ्यांची पोरं शिकली. शिक्षक-पोलीस अधिकारी-ग्रामसेवक-तलाठी-तहसीलदार-जिल्हाधिकारी-पुढारी-कृषी अधिकारी-कारकून-प्राध्यापक-डॉक्टर-इंजिनीअर वगरे पदे भूषवती झाली. नव्या व्यवस्थेत कर्मचारी-नोकरदार होऊन ‘साहेब’ झाली खरी, पण ती आता आपलं बूड, आपली बहुजन कृषिजनपरंपरा विसरून या भांडवली-बाजारू व्यवस्थेचं समर्थन करत व या व्यवस्थेचे फायदे चाटत आपल्याच अडाणी शेतकऱ्यांचं-शेतमजुरांचं, खेडय़ांतील लोकांचं बेमालूम शोषण करत दाबजोर पसा कमावण्याच्या मागे लागली आहेत, हे रोज प्रत्ययास येणारं पराकोटीचं दु:ख या कादंबरीतल्या पानापानांतून-शब्दाशब्दांतून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.
हे व्यक्त होणं आजच्या काळाच्या पाश्र्वभूमीवर औचित्यपूर्ण तर आहेच, शिवाय अपरिहार्यही. कारण हाच या कादंबरीचा ‘गाभा’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपलेच दात आपलेच ओठ. कुंपणच शेत खात असेल तर सांगणार कुणाला, अशी ही स्थिती. संवेदनशील मनाला ही बोच बोचणारच. पण यावरून कुणी ‘संपूर्ण बहुजन समाज म्हणजे वाईटच’ असं समजू नये. कारण एका अर्थानं ही बहुजन समाजाची केलेली परखड समीक्षाच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
शेतकऱ्यांच्या चळवळी व संघटना यामधून काही जण शेतकऱ्यांचं नाव घेत व त्यांचे प्रश्न हाताळत मोठे नेते झाले खरे; पण शेतकरी मात्र आहे त्यापेक्षा जास्तच भिकेला लागला, ही वस्तुस्थिती आहे. या चळवळी वा संघटना फक्त कांदा, ऊस, कापूस अशा पानभरती-नगदी पिकांभोवतीच घोटाळत राहिल्या. अन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, तीळ वगरे पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल, कोरडवाहू आणि दहा एकरांखाली जमीन असणाऱ्या अल्पभूधारकांच्या प्रश्नांबद्दल त्या फारशा काही बोलत नाहीत, हे वास्तवही लेखक शेतकरी चळवळीचे नेते कांतारामजी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त करतो. एवढेच नव्हे तर ‘शेतकऱ्यांची संघटना म्हणजे केवळ बागायतदार शेतकऱ्यांचं नाटक’ असंही तो उपहासानं म्हणतो. त्याचा हा उपहास अनाठायी नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या उपहासाला ‘जिस तन लागे, वही तन जाणे। बिजा क्या जाणे गव्हारा रे।’ची घट्ट बठक आहे.
शेती ही मुख्यत: मानवी नातेसंबंधांशी- मानवी लोकसंस्कृतीशी, पशु-पक्षी-प्राणी आणि मुख्यत: निसर्गाशी अंतर्बाह्य़ घट्ट जोडलेली आहे. गवस तिला ‘कृषिजनसंस्कृती’ म्हणतात, ते यामुळेच. तुकोबांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असं जे म्हटलंय, त्यामागेही हाच विचार आहे. हा दुवाच जर निखळला तर प्राय: ग्रामजीवनाचा सर्व डोलाराच कोसळणार, हे नक्की. या अर्थानं गवस जे सांगू पाहतायत त्यामागे हे भयावह गíभत संसूचन दडलेलं आहे. फुले-िशदे-गांधी ही विचारपरंपरा अधोरेखित करत कृषिसंस्कृतीच्या वाटचालीचा आजचा टप्पा गवस मांडतायत, असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरणार नाही. शेती-शेतकरी यांबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने लेखक-कोणकेरीने कांतारामजींना व जोतीरावांना लिहिलेली व चिंतनशीलतेची खोल डूब असलेली ही पत्रे मुळातून वाचण्याजोगी आहेत. आजच्या सामाजिक स्थितिगतीची झाडाझडती घेणारी आहेत.
या कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रसंगोपात आलेले तुकोबांचे अभंग, भारूड आदी होय. वास्तविक शेतकऱ्यांचा संतपरंपरेशी असलेला हा आध्यात्मिक धागा नवीन गोष्ट नसली तरी त्यांच्या जीवनातील या अध्यात्माचे महत्त्व मात्र जरूर खूप आहे. या धाग्यामुळे शेतकऱ्याला आपण करत असलेल्या ढोर मेहनतीत ‘कष्ट’ जाणवत तर नाहीतच, पण उलट परिस्थितीशी संघर्ष करण्याचं बळही त्यामुळे मिळतं. पारंपरिक अभंग, भजन-कीर्तन, लोकगीतांचा अतिशय समर्पक वापर करत गवस यांनी आपली ‘तुकोबा-शिवबा-जोतीबा’ ही परंपरा अधिक ठळक केली आहे. परिणामी कादंबरीत अधूनमधून टाळ-मृदंग यांची सौम्य, परंतु परिणामकारक किणकिण पाश्र्वसंगीताप्रमाणे वाजत राहते. यादृष्टीनं पान १०७ वरील कीर्तन आणि १८१वरील मन हेलावणारं गीत वाचण्याजोगं आहे.
निसर्ग आणि शेती यांचं नातं अतूट आहे. याचं प्रत्यंतर कोणकेरीच्या नोंदींतून येतं. कोणकेरी शेतकरी शोधता शोधता एका निर्जन डोंगरावर चिगऱ्याच्या साहाय्यानं पोचतो व तिथल्या म्हातारबाला भेटतो, हा प्रसंग किंवा माडीच्या डोंगरावरील ज्ञानमहाराजांना भेटतो हा प्रसंग यादृष्टीनं पाहण्यासारखा आहे. धनगर-आदिवासी यांचं निसर्गाशी असलेलं नातंही यानिमित्तानं उलगडत जातं. शेतकरी शोधता शोधता कोणकेरी निसर्गाच्याही गूढतेचा शोध घेतो. अशा अनेकांगी दृष्टिकोनांतून या कादंबरीकडे पाहता येते. यावरून तिचा पस किती व्यापक आहे, याची प्रचीती येते.
शेवटी शेतकरी व माणूस म्हणून आडव्याप्पा संपतो. कोणकेरीचाही शोध लागत नाही. इथं ही कादंबरी संपते. पण त्या दोघांचं नक्की काय होतं, या अस्वस्थ शोधाचा भाग मात्र लेखक वाचकांवर सोपवतो.
जागतिकीकरणाच्या बाजूने बोलणारा रॅशनल-पुरोगामी-आधुनिक व सकारात्मक विचारांचा ठरतो आणि प्रतिकूल बोलणारे विकासाचे विरोधक ठरतात, अशी आजची स्थिती. जागतिकीकरणामुळे ज्यांचा फायदा होतोय ते साहजिकच त्याचा कैवार घेणार. निसर्ग जसा दुष्काळ लादतो तसा भरभरून पुन्हा पाऊसही पाडतो. टोकाला जाऊन एकदम सगळं मुळापासून उद्ध्वस्त करणं, हे ‘अन्यायी तत्त्व’ निसर्गाच्या धोरणात बसणारं नाही. त्या अर्थानं तो सृष्टीला आलटूनपालटून खुलण्याची संधी देतो. पण जागतिकीकरणाला फक्त ओरबाडून घेणंच माहीत असल्यानं निसर्गासारखी ‘देण्याची’ आयपत त्याच्यात नाही, हे सांगायला कोणा अभ्यासकाची-शास्त्रज्ञाची आवश्यकता नाही. तेव्हा अंतिमत: हे सगळं निसर्ग-पर्यावरण व शेतीच्या शोषणातून विनाशाकडंच जाणारं आहे! शेतकरी व निसर्ग हा याचा सर्वात मोठा ‘बळी.’ गांधी म्हणाले होते ‘खेडे संपले म्हणजे भारत देश संपला.’ आजची आपली वाटचाल त्याच दिशेने चालली आहे. ‘ब, बळीचा’ हे या विदारक वाटचालीचं अपरिहार्य विकलांग अपत्य आहे, असं म्हणण्यात बळीचा वा कुळवाडय़ाचा वारसा सांगणाऱ्याला हर्ष-आनंद तो कुठला?
‘ब, बळीचा’ – राजन गवस,
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई,
 पृष्ठे -३०८ , मूल्य – ३५० रुपये.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?