रवीन्द्र दामोदर लाखे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जितंजागतं चिंतन आपसूक काव्यात रूपांतरित होऊ शकतं. आपल्याला सारखं काहीतरी वाटत असतं. वाटणं म्हणजे काय असतं? हे वाटणं प्रत्येकाचं सारखं नसतं. काहींचं केवळ भौतिक असतं. काहींचं वाटणं हे कलात्मकता गाठतं. हे वाटणं जिवंत असेल तर त्यात काव्य अनुस्युत असावं असा निष्कर्ष काढायला लावणारी ही कविता आहे. ‘बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर’ हे कविता संग्रहाचं नावही आशयाचा मोठा पल्ला गाठणारं आहे. ही बायकांवरच्या कवितांची मालिका आहे. रोजच्या अनुभवातून उगवलेल्या या कविता फार मोठ्ठं काही सांगण्याचा आव न आणणाऱ्या आहेत. या सर्व कवितांमधून कवयित्री वजा झाली आहे. या कवितेची प्रकृतीच अशी आहे की ती कवयित्रीच्या ताब्यात न जाणारी आहे. या संग्रहातल्या कवितांना शीर्षक नाही, क्रमांक आहेत.
२७
बायका
उरकत राहतात
दिवसभर असंख्य कामं
आणि रात्रही उरकून टाकतात त्या
दिवसभरासारखीच
घाईघाईत!
या कवितेत बाईच्या रांधा-वाढा-उष्टी काढा अशा दुय्यम कामांवरच्या भाष्याबरोबरच बाईच्या शरीरसंबंधावरचं भाष्य येतं- जे स्त्री-पुरुष नात्यात महत्त्वाचं आहे. किती कमी शब्दात आणि साधेपणाने कवयित्रीने सांगितलं आहे. स्त्रीमुक्तीला धरून लिहिलेली ही कविता नाही. या संपूर्ण संग्रहात कवयित्रीने आपल्या आयुष्याचा अतिशय निर्ममपणे स्वीकार केलेला आहे. या स्वीकारातून येणाऱ्या उद्गारांच्या या कविता आहेत.
२१
बायका
नदीवर कपडे धुवायला जातात
सगळे कपडे धुवून झाले की
आपली अख्खीच्या अख्खी साडी
नदीच्या पाण्यात लांबलचक सोडतात
खळबळतात तिला अगदी हळुवार
मग अलवार हाताने पिळून
तो पिळा अतीव प्रेमाने
खांद्यावर टाकून
त्या घरी येतात
आणि मग अंगभर नदी लपेटून
दिवसभर उन्हातान्हात
झुळझुळत राहतात
नदीसारखं सतत वाहात राहणं हेच बाईच्या मनाला शुद्ध ठेवतं. जीवन हे पाणी समजलं जातं. कुठल्या भावनेच्या जखमेच्या खड्डय़ात ते अडकून पडलं की त्याचं डबकं होतं. त्यात पडूनही त्याला ओलांडून पुढं वाहात राहणं ही वृत्ती स्त्रीसुलभ अशा मानसिक जडणघडणीतून तयार होत असावी का? स्त्री देहाची अंतर्गत रचनाही तशीच असते. तिच्यावर येणारी मासिक पाळी ती टाळू शकत नाही. त्यासाठी ही कविता पाहा.
५
बायका
नवऱ्या मुलात
वाटून टाकतात स्वत:ला
उरल्यासुरल्या वाहून जातात
दर महिन्याला
आणि बघता बघता
पांढरेफटक पुतळे होतात बायका.
थेट स्त्री स्वातंत्र्याच्या नाही, पण तशाही कविता आहेत या कवितासंग्रहात. पण कुठंही कवयित्री त्याविषयीचा आक्रोश आपल्या कवितेत येऊ देत नाही. एका सहा नंबरच्या कवितेत ती म्हणते :
बये सावित्री
तू पाटी पेन्सिल हातात दिलीस
पण लाटणं काही सुटलं नाही बघ
सुशिक्षित डोंबारणी झालो आहोत आता आम्ही
तारेवरची कसरत करणाऱ्या
त्यांच्या हातात बांबू तरी होता
भला मोठा, तोल सावरायला
आम्ही मात्र सावरतो आहोत
एवढुश्या पेन्सिलीवर आपला तोल
कधी कोसळू सांगता येत नाही..
यातली प्रत्येक कवितेची पहिली ओळ एका शब्दाची आहे. तो शब्द म्हणजे बायका. प्रत्येक कवितेत संपूर्ण चांगल्या कवितेसह तुम्हाला विशेष असं काही सापडतंच. एक नंबरच्याच कवितेत ती म्हणते,
‘‘पुरुषाच्या स्पर्शाने शीळावलेल्या बायका’’
याच कवितेचा शेवट पाहा
बायका जात राहतात पार्लरमध्ये
नुसतं सुंदर दिसण्यासाठी नाही तर
तर समेटून घ्यायचं असतं त्यांना
आपलं विस्कटलेलं बाईपण!
अशा पारंपरिक बाईपणाच्या कवितेतून कवयित्री हळूहळू बाहेर येत आधुनिक बाईपणाच्या कवितांमध्ये कशी येते हा प्रवासही अत्यंत चित्रमय आणि लोभस आहे. या संग्रहातल्या अखेरच्या कवितेत आधुनिक स्त्रीच्या मनाचं नि जगण्याचं चित्र कवयित्री उभं करते. कवितेची सुरुवातच अशी आहे की-
बायका
करत नाही आताशा
स्वप्नांना पिनअप
त्या झुळझुळत ठेवतात
आयुष्याचा पदर
आणि कवितेचा शेवट आहे,
त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून
त्या चालतात
स्नीकर्स घालून मस्त रुबाबात
तो सोबत असला काय किंवा नसला काय
काहीच फरक पडत नाही त्यांना
त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत
आपलं स्टेरिंग आपल्याच हातात घेऊन
या कवयित्रीला कळलं आहे की आपल्यापेक्षा आपलं आयुष्य महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यामुळेच आपण आपलं स्वत्व नि सत्त्व कायम शाबूत राखू शकतो. आपला नाही तर आपल्या आयुष्याचा पदर झुळझुळत राहिला पाहिजे हे या कवयित्रीला कळलं आहे. आजचं मानवी जीवनही असं उत्क्रांत होत गेलं आहे की त्यात स्त्रीच्या आयुष्याचा विचार आपोआप झालेला आहे. वॉशिंग मशिन्स किंवा डिश वॉशर, गॅस, मिक्सर ग्राईंडर किंवा अशी अनेक आयुधं बाईच्या सेवेसाठी बनवणारा माणूस बहुतांशी पुरुषच आहे. आधुनिकता आता इतकी पुढे गेली आहे की स्त्री लग्नाशिवायही मातृत्व अनुभवू शकते. लग्न नाकारू शकते. एकटी राहण्याचा निर्णय घेऊ शकते. किंवा लिव- इन- रिलेशनशीप ठेवू शकते. अर्थात यात स्त्री-पुरूष संवाद आणि त्यांच्यातली केमिस्ट्रीचा आनंद ती घेऊ शकत नाही. असो. बायकांवरच्या या कवितांमधून थोडा पुरुषाचा विचार किंवा त्यांच्या अस्तित्वाचं भानही यायला हवं असं कुणाला वाटेल. पण कवयित्रीने आपल्या मनोगतात म्हणून ठेवलं आहे की बाईपणाला घट्ट पकडून ठेवत असतानाच आपल्या संसाराचा, आपल्या आयुष्याचा पदरदेखील झुळझुळता राहावा यासाठी ती कायम दक्ष देखील असते. किंबहुना त्यातूनच ती आत्मभानाच्या वाटेपर्यंत पोहोचत असते. बाईची ही सगळी जडणघडण आणि तिचा हा सगळा प्रवास माझ्या जाणिवेला कायम चुचकारत राहिला. यातूनच ‘बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर’ ही कवितांची मालिका आकाराला आली.
‘बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर’, – संगीता अरबुने, ग्रंथाली प्रकाशन, पाने- ६६, किंमत- १०० रुपये