याखेरीज १९८९ नंतर ओबीसीच्या राखीव जागांचा दबाव वाढत गेला. नव्वदीच्या दशकात ओबीसीच्या सामाजिक न्यायाचा मुद्दा ऐरणीवर आला. या पाश्र्वभूमीवर मुसलमान समाजातील मुस्लीम ओबीसीचा अभ्यास प्रस्तुत लेखकाचा आहे. अर्थातच मुसलमानांची समाजरचना भारतीय जातिव्यवस्थेच्या चौकटीत त्यांनी मांडली आहे. भारतीय जातिव्यवस्था श्रेणीबद्ध आणि विषम स्वरूपाची आहे. हे वैशिष्टय़ मुस्लीम समाजाचेदेखील आहे. या मुद्दय़ाचे विवेचन सखोलपणे केले गेले आहे. प्रदेश, भाषा, जात या घटकांमधूनदेखील मुसलमान समाजाची अस्मिता घडली आहे. केवळ एकच ‘मुस्लीम धर्म’ ही मुसलमान समाजाची अस्मिता नाही. मुस्लीम समाज परका, त्यांची संस्कृती परकी, त्यांच्या निष्ठा भारताबाहेर, अशा स्थिर केलेल्या मिथकांना लेखक सहज वितळवत जातात. लोकसंख्या आणि समाजरचना, मुसलमानांतील जाती-वर्ण आणि भारतीय मुसलमानांची संस्कृती या आरंभीच्या तीन प्रकरणांमध्ये मुसलमान समाजाची अस्मिता भारतीय स्वरूपाची कशी आहे, हे उलगडण्याचा चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे. मुसलमान समाज हा प्रादेशिक स्वरूपात अभिव्यक्त होतो. त्यांचा पेहराव, त्यांचे आचार-विचार, त्यांचे दैनंदिन व्यवहार यावर भारतीय छाप आहे या गोष्टीची निरीक्षणे त्यांनी नोंदविलेली आहेत.
ब्रिटिश पूर्वकालीन धर्म, इतिहास आणि मुस्लीम मानसिकता, ब्रिटिश राजवट-मुस्लीम-ऐतिहासिक घटनाक्रम आणि मुस्लीम मानसिकतेची जडणघडणीतील व्यामिश्रता या चार ते सहा प्रकरणांमध्ये नव्या अस्मिता अशा घडत गेल्या, यांची एक मोठी शृंखला नोंदविली आहे. मुसलमान ही अस्मिता धार्मिक व राजकीय अभिजनाच्या हितसंबंधाची मोट होत गेली. मुस्लीम धर्माचे प्रवाही स्वरूप अभिजनांनी गोठवले.
धर्म स्थल, कालसापेक्ष असतो. काळानुसार व गरजेप्रमाणे बदलतो हा भाग बाजूला गेला. धर्म हा पोथीनिष्ठ व अविवेकी स्वरूपात मांडला गेला. या मुद्दय़ांचे स्पष्टीकरण त्यांनी राज्यकर्त्यांचे आणि मुल्ला-मौलवींची अनेक उदाहरणे देऊन केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुसलमान अभिजनात राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवादाची भावना वरिष्ठ वर्गीय स्वरूपाची होती. धार्मिक अस्मिता हा राष्ट्रवादाचा आधार होता. यातूनच मुसलमान समाजातील प्रश्न गुंतागुंतीचे होत गेले. अस्थिरता हा मुस्लीम मानसिकतेचा स्थायीभाव झाला. मुख्य प्रश्न मुसलमान कोण आहेत, हा आहे. या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भारतीय मुसलमान भारतीय आहेत की, मुसलमान आहेत. भारतीय मुसलमान हे भारतीय नागरिक आहेत. असे असूनही मुसलमान नागरिकांचे नागरिकत्व दुय्यम दर्जाचे, असे िहदुत्ववादी संघटना, अभ्यासक आणि विचारवंत यांनी कसे ठरविले या मुद्दय़ांची सविस्तर चर्चा केली आहे.
भारतीय मुसलमानांची अस्मिता अस्थिर घडण्याची कारणमीमांसा, िहदू जमातवाद, मुस्लीम जमातवाद, आंतरराष्ट्रीय आíथक धोरण, १९९० नंतरचा राजकारणात धर्माचा झालेला वापरही मांडला आहे. िहसा व दंगली यांचे संस्थाकरण झाले. त्यांचा वापर िहदुत्व परिवाराने करण्यातून मुसलमानांची अस्मिता अस्थिरतेकडे झुकली. सच्चर समितीतील निरीक्षणाच्या आधारे लेखकाने शैक्षणिक, आíथक परिस्थितीचे विदारक चित्र मांडले आहे. नागरी सुविधांविषयी भेदभावाची वागणूक, इतिहास लेखनपद्धती ही धार्मिक विभाजनाची पद्धत होती. इतिहास लेखन हा परद्वेषाचा महत्त्वाचा भाग होता. इलियट डाऊसन आणि जेम्स मिल, ख्रिश्चन मिशनरी यांचे इतिहास लेखन ब्रिटिश साम्राज्यवादी स्वरूपाचे होते. या इतिहास लेखनाचा प्रभाव भारतीय अभ्यासकांवर होता, हे त्यांनी नोंदविले आहे.
िहदुत्ववादी आणि उदारमतवादी अभ्यासकांमध्ये फरक नसल्याचेही त्यांनी नोंदविले आहे. उदारमतवादी मुस्लीम अभ्यासकांना त्यांनी छुपा किंवा मवाळ िहदुत्ववाद संबोधले आहे. थोडक्यात, मुसलमान समाजविषयक लेखन हे अभ्यासपूर्ण नाही. ते सहेतुक पद्धतीने केलेले आहे. या लेखनातून वैचारिक प्रभुत्व तयार झाले. मानदंड आणि मिथके आकाराला आली. त्यांचा प्रभाव मुस्लीम समाजावर व मानसिकतेवर होता, अशी मांडणी केली आहे. वहाबी चळवळ ही गुंतागुंतीची होती, परंतु तिचे एक लक्षण होते ते म्हणजे ती चळवळ पुनरुज्जीवनवादी होती. िहदुस्थानातील वहाबी चळवळीचे स्वरूप ब्रिटिशविरोधी आणि धर्मशुद्धीकरणवादी होते. हा प्रकरण सातचा गाभा आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील मुस्लिमांपुढील प्रश्न, भारतीय मुसलमानांची सद्यस्थिती, सच्चर समितीची निरीक्षणे व मुसलमानांचे भारतीयत्व, अपवर्जन, जिहादी मानसिकता या आठ ते दहा अशा तीन प्रकरणांमध्ये मुसलमानांच्या पुढील समकालीन आव्हानांचे विवेचन केले आहे. दारिद्रय़ आणि राहणीमानाचा दर्जा याबाबतीतला मागासलेपणा नोंदविला आहे.
मुसलमान अस्मिता, मिथके, इतिहास लेखनपद्धती, मुसलमान समाजाची मानसिकता या महत्त्वाच्या मुद्दय़ांची सविस्तर चर्चा होत असताना मुस्लीम समाजातील वर्गीय आशय स्पष्ट केला आहे. परंतु मुसलमान समाजात अपवर्जन किंवा वगळण्याची प्रक्रिया राजकीय व आíथक स्वरूपात कशी आहे, याचे विवेचन आणखी खोलात जाऊन करण्याची गरज होती. भारतीयत्व किंवा नागरिकत्वाची चर्चा केली आहे; परंतु नागरिकत्वाचे स्वरूप विषम स्वरूपात अभिव्यक्त होत राहते. त्यामुळे मुसलमान समाजाला सामाजिक न्याय मिळत नाही या मुद्दय़ाची जास्त खोलवर चर्चा करता आली असती. संधीची समानता याबरोबरच ‘क्षमतांचा विकास’ मुस्लीम समाजात होत नाही. यामधील राज्यसंस्थेची भूमिका स्पष्ट होण्याची गरज होती. त्याऐवजी राजकारणाने मुसलमान समाजात कसा भरकटलेपणा आला, याची चर्चा जास्त झाली आहे. मुसलमान समाज हा स्थानिक, प्रादेशिक, जात, वर्ण अशा भारतीय स्वरूपात वावरत असल्यामुळे शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रांपासून तो दूर राहत गेला. शिवाय शहराऐवजी तो ग्रामीण भागात वस्ती करून राहत असल्याने इंग्रजी शिक्षणापासून वंचित होत गेला. याखेरीज भारतात प्रत्येक जिल्ह्यात किंवा राज्यात तो अल्पसंख्याक नाही. ‘अल्पसंख्याक’ या मिथकामधून त्याने बाहेर पडण्याची गरज आहे. जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप, केरळ, पश्चिम बंगाल अशा राज्यांत त्यांचे स्थान अल्पसंख्याक स्वरूपाचे नाही. भारतातील नऊ जिल्ह्यांत त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ३० जिल्ह्यांत २० टक्क्यांपेक्षा जास्त व ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामुळे सर्रासपणे भारतात त्यांची अस्मिता अल्पसंख्याक अशी उभी केली गेली, हेदेखील एक मिथकच आहे. येथील मुसलमानांनी विकासाची कल्पना स्वीकारणे गरजेचे होते. येथे ‘विकासाचा’ प्रश्न मुस्लिमांनी का स्वीकारला नाही, यांची चर्चा होण्याची गरज आहे.
बहुविधता हा मुस्लीम समाजाचा लोकशाहीला पोषक गुण आहे. एकजिनसीकरणाची प्रक्रिया लोकशाहीविरोधी ‘बहुसंख्याकांची’ हुकूमशाही स्वरूपाचे तत्त्व आहे. यामध्ये मुस्लीम समाजाची मानसिकता किती गुंतलेली आहे, अशा प्रश्नांच्या अभ्यासाला या पुस्तकामुळे वाचा फुटू शकते. भारतीय मुस्लिमांचा प्रश्न हा भारतीय आहे, तो बाहेरचा प्रश्न नव्हे. हे नवे ज्ञान मुसलमान समाजाबरोबर िहदू समाजात येण्यासाठी पुस्तक उपयुक्त आहे. हे पुस्तक संशोधक, विद्यार्थी, चळवळीतील कार्यकत्रे, राजकीय नेते, पत्रकार यांच्यासाठी आहे. शिवाय मुस्लीम हे ‘भूमिपुत्र’ किंवा ‘मूलनिवासी’ नाहीत, अशी मिथ्या चर्चा करणाऱ्यांनीही वाचायला हवे.
‘भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता’ – फकरुद्दीन बेन्नूर,
प्रतिमा प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – २२४, मूल्य – २५० रुपये.
प्रकाश पवार
स्र्१स्र्ं६ं१90@ॠें्र’.ूे
मुस्लीम समाजाची मिथके आणि अस्मिता
मुस्लीम समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी आíथक (विकास) आणि सांस्कृतिक अशा दोन अंगांनी विचार केला जातो. या पुस्तकात या दोन्हीही गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळाचे एक जळजळीत सत्य म्हणजे ‘भारतीय मुसलमान समाज राजकीय आणि आíथक क्षेत्रामधून वगळण्याची प्रक्रिया सातत्याने घडत आली आहे.’ त्यामुळे भारतीय मुसलमान समाजाचे राजकीय आणि आíथक समावेशन कसे करावे, हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुसलमानांचे राजकीय व आíथक समावेशन का होत नाही,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review bhartiya muslamananchi samahrachana ani mansikta