कम्युनिस्टांचा सर्वात जास्त सत्ताकाल असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय पटलावर ममता बॅनर्जी या नव्या नेतृत्वाचा उदय झाला आणि त्यांच्या झंझावाती नेतृत्वामुळे तिथे बदलाचे वारे वाहू लागले. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या संघर्षमय दिवसांची टिपणे, जीवनातील अनेक नाटय़पूर्ण प्रसंग आणि आठवणी ‘माँ.. माटी.. मानुष..’ या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्याचा अनुवाद ‘अमेय प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश-
स न २००६ आणि २००७ या वर्षांत काय काय घडलं? कोणत्या दिव्यातून जावं लागलं, याचा मी विचार करत होते. आम्ही जे अनुभव घेतले. त्यामुळे आमच्यातील सदसद्विवेक बुद्धी जागी झाली. एक प्रकारे या ‘बंदबुद्धी’च्या दाराला धक्के मारल्यासारखंच हे होतं. कमालीची क्रूरता, क्रौर्य, निर्ममता यांच्याविरुद्ध आतापर्यंत मनात खोलवर दडपलेला आवाज, जोरकसपणे बाहेर आला होता. आता बंडखोरीचा रस्ता पकडण्याची गरज होती. दबून, दडपून चालणार नाही. त्रासाचा, सोसण्याचा काळ आता मागे टाकणे आवश्यक होतं. इतिहासात थोडं डोकावून पाहिलं आणि विचार केला तर स्पष्ट होतं. भव्यदिव्य दृष्टिकोन ठेवला नाही, तर काहीच घडत नाही. मग आता गतस्मृतींमध्ये रंजन करण्यात काय अर्थ?
जीवन म्हणजे रोज श्वास घेत जगत राहणं नक्कीच नाही, तर आत्मसन्मानाने तुमचं मस्तक उंच राहिलं पाहिजे. खाली मान घालून जगण्याला कसला अर्थ आहे? जे लोक आपलं आयुष्य रडत-रडत घालवतात आणि मृत्यू यावा, म्हणून प्रार्थना करतात त्यांना संघर्ष ठाऊकच नसतो. लढणं माहीत नसतं. श्वास चालू आहे अन् हृदयाची धडधड चालू आहे म्हणजे तुम्ही जिवंत असता. पण रडणं, खालमानेनं जगणं खरं नसतं, असं जगणं मृत्युइतकंच वाईट आहे. तुम्ही जगण्यातला खरा अर्थ शोधला पाहिजे. आयुष्याचं मोल तुम्हाला समजलं पाहिजे. झगडून, संघर्ष करून आयुष्याला नवं परिमाण, मूल्य मिळवून दिलं पाहिजे. मरणाची भीती कसली बाळगायची? मरणाच्या भीतीवर विजय मिळवणं, हेच तर खरं जगणं आहे. त्याच वेळी तुम्ही खरे अजिंक्य असता.
‘‘तुम्ही इतके दिवस उपोषण कसं करू शकला?’’ असा प्रश्न मला अनेकांनी विचारला आहे. आमचा ‘सत्याग्रह होता किंवा सत्यासाठी उपवास होता,’ याची कोणालाही कल्पना नसते. त्यामुळे २६ दिवस उपोषण होऊ शकलं. लोकशाहीवादी देशाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी, उपवास हा एक अतिशय शांततापूर्ण लोकशाहीवादी मार्ग आहे. गोरगरीब, जनतेची होणारी पिळवणूक, त्यांचे प्रश्न, समस्या, त्यांना दिली जाणारी निर्दयी वागणूक, त्यांचे अश्रू, यातना यांमुळे माझ्या मनाला खूप वेदना होत. त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असा विचार करून मी स्वस्थ बसले नाही. शक्य असेल ते शक्य तेव्हा सगळं काही केलं. त्यामुळे मला त्याचा न्याय कधी ना कधी नक्की मिळेल, असं वाटलं. पण प्रत्यक्षात मलाही न्याय नाकारला गेला. ‘‘न्यायासाठी तू कशाला इकडे-तिकडे पाहतेस, तो तुला कधीच मिळणार नाही. ज्या लोकांसाठी तू काम केलंस, त्यांच्याकडूनही नाही,’’ असं माझं दुसरं मन म्हणत होतं..पण तरीही मी लढले, उपोषण केलंच!
अशी परिस्थिती एकदम कशी बदलली? माझा निर्णय कसा आणि का बदलला? नेमक्या कोणत्या घटनेनं मला पूर्ण बदलवलं? मला वाटतं, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याची गरज आहे. मी काय केलं, कसं केलं, हे सविस्तर सांगण्याची आज आवश्यकता वाटतेय. ज्यांच्यावर सतत अन्याय होतो, ज्यांची पिळवणूक होते. त्यांना संघर्ष करण्याची इच्छा तर असतेच. न्यायाची तृष्णा त्यांना लागलेली असते आणि त्यामुळेच आता काहीही झालं तरी चालेल, पण हा संघर्ष थांबवायचा नाही, अशी खूणगाठ बांधून ते मार्गक्रमण करत असतात. एक प्रकारे न परतीची वाट त्यांनी धरलेली असते. त्यांच्या मनात अपमानाचा ज्वालामुखी खदखदत असतो. आता असे धगधगते विचार मनात घेऊन कोणी कसं शांतपणे मागच्या बाकावर बसू शकेल? मनात विचारांचा आगडोंब उसळलेला असताना निष्क्रिय, कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्प बसताच येत नाही आणि जर कोणी असं गप्प बसत असेल तर माझ्या मते तो पळपुटेपणा झाला. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला जे प्रश्न पडतात, त्यांना उत्तरंच नसतात. मानवी हक्काचं मूल्य जाणून घेण्याची आपल्याला गरज नाही, असा याचा अर्थ होतो का? ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, त्यांनी मनात आलं, म्हणून पसा-शक्तीच्या जोरावर गरिबांच्या झोपडीवर बुलडोझर चालवायचा का? कोटय़वधी लोकांनी असहाय होऊन हे स्वस्थपणे पाहायचं का? त्यांचीही काही स्वप्नं असतील. काही आशा, आकांक्षा असतील. त्यांचा चुराडा होऊ द्यायचा का? आता या लोकांनी विरोध केला तर त्यांना श्रीमंत लोक आपल्या शक्तीने, पशाने शांत करणार. एक प्रकारे ‘पॉवर थेरपी’ त्यांच्यासाठी वापरणार. बाहुबलींनी गरिबांना जमिनीत गाडलं तरी कसलाही प्रतिकार करायचा नाही. अशा वातावरणात या गरिबांचं जीवन अगदीच कष्टमय होऊन जातं. दुसऱ्याचं आयुष्य असं दु:खद बनवावं की, तुम्ही शपथ घेऊन त्याचं पालन करावं, असं काही घटनेत नोंदवलेलं नाही. म्हणजे केवळ सत्ता आहे, म्हणून तुम्ही हे करता, याचा अर्थ, तुम्ही घटनेचा, कायद्याचाही अनादर करता. एकाच समाजात राहून इतकं स्वार्थी तुम्ही कसं बनू शकता? हे सगळं मी तरी अजिबात सहजपणे स्वीकारू शकत नाही. कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करून, त्यांच्या आशा-आकांक्षांना पायदळी तुडवून, त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव करून रक्तरंजित झालेल्या जमिनीवर काहीही उभं करून विकास होऊ शकतो, हे मान्य करण्यास माझं मन अजिबात तयार नाही.
सुदैवाने आपल्या समाजात फक्त स्वार्थी, स्वत:ची तुंबडी भरणारी मंडळी नाहीत. मृत्यूला अजिबात न घाबरणारी मंडळीही आहेत. ‘जन्म-मृत्यू’ हे त्यांच्या दृष्टीने फक्त शब्द आहेत. जीवन कसं जगायचं, हे त्यांना खऱ्या अर्थाने समजलं आहे. आपल्या देशातच नाही, तर परदेशातही अशी उत्तुंग माणसं आहेत. नि:स्वार्थ भावनेने कार्य करणारी ही मंडळी म्हणजे आशेची छोटी-छोटी रोपटीच आहेत आणि या मंडळींमुळेच विरोधकांचा आवाज कधीच शांत होणार नाही. होऊ दिला जाणार नाही.
बंगालमध्ये माझा जन्म झाला, याचा मला कायमच अभिमान वाटतो. या संपूर्ण जगामध्ये मानवी वसाहती वसायला प्रारंभ झाला त्या काळापासून हा भूप्रदेश संपन्न बनतोय आणि वृद्धीचा मीसुद्धा एक भाग आहे, असा विचार मला खूप खूप समाधान देतो. आजूबाजूला पाहिलं, की माझे तणाव, माझी उदासी कुठल्या कुठे पळून जाते. खऱ्या अर्थाने माझा जीव इथेच रमतो. पण या आयुष्यालाही दु:खाची किनार आहे. काही वेळेस ती खूपच गडद होते. कधी बरं? संस्कृती आणि सुशिक्षितपणा विषाच्या पुरामध्ये वाहून जातात, त्या वेळी मला खूप यातना होतात. माझ्या प्रिय राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जाते, त्यावेळी भयंकर वेदना होतात. गरीब, कष्टकरी जनतेकडून त्यांचे मूलभूत हक्क-अधिकार हिरावून घेतले जातात, त्या वेळी मला खूप त्रास होतो. मग आता मला सांगा, हे सगळं होत असताना मी विरोध करायचा नाही का? कसं गप्प बसायचं?
आगामी : मग अंगार फुलणारच!
कम्युनिस्टांचा सर्वात जास्त सत्ताकाल असलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय पटलावर ममता बॅनर्जी या नव्या नेतृत्वाचा उदय झाला आणि त्यांच्या झंझावाती नेतृत्वामुळे तिथे बदलाचे वारे वाहू लागले. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या संघर्षमय दिवसांची टिपणे, जीवनातील अनेक नाटय़पूर्ण प्रसंग आणि आठवणी ‘माँ.. माटी.. मानुष..’ या पुस्तकात सांगितल्या आहेत.
First published on: 06-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review book on mamata banarjee