अंजली कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कवी व लेखक मनोहर सोनवणे यांचा ‘ब्रँड फॅक्टरी’ हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. हा कथासंग्रह जरी आता प्रकाशित होत असला तरी सोनवणे यांचे कथालेखन जवळपास १९८० पासून सुरू आहे. एक चिंतनशील लेखक, कवी अशी त्यांची ओळख आहे.

जागतिकीकरणाच्या प्रभावाने म्हणा, रेटय़ाने म्हणा; बदललेला भोवताल ही ‘ब्रँड फॅक्टरी’ या संग्रहातील बहुतांश कथांची आधारभूमी आहे. जागतिकीकरणाने बदललेल्या भोवतालाचा  कलात्म आविष्कार हा या कथांचा मुख्य गाभा आहे. साधारणपणे ९०च्या दशकात जागतिकीकरणाने संपूर्ण जगावर आपली पावले रोवायला सुरुवात केली आणि त्यानंतर आलेल्या नवभांडवलशाहीमुळे झपाटय़ाने जगभरातील देशांमध्ये आणि पर्यायाने भारतात अर्थव्यवस्था, सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्था, लोकांची जीवनशैली आणि त्यांची जीवनमूल्ये, तसेच जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये आमूलाग्र बदल झाला. माणसाच्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही संपूर्ण बदल झाला. पैसा हाच मानवी जीवनाचे केंद्रस्थान बनला आणि साधनांचा विधिनिषेध न बाळगता जास्तीत जास्त धन कमावणे, धनसंचय करणे आणि धनसंपत्तीचे अवाजवी, गलिच्छ प्रदर्शन करणे, पैशाच्या जोरावर सामाजिक प्रतिष्ठा, सत्ता प्राप्त करणे हाच माणसांच्या जगण्याचा फंडा बनला. एकंदरीत मानवी जगण्याचेच बाजारीकरण, यांत्रिकीकरण आणि वस्तुकरण होण्याच्या या भयंकर काळात माणसामाणसांतील संबंधांमध्येदेखील उपयुक्तता हे मूल्य प्रभावी ठरू लागले.

मनोहर सोनवणे आपल्या कथांमधून याच वास्तवाचा पट मांडतात. गेली ३०-३५ वर्षे सभोवताली दिसणारे हे सगळे विपरीत वास्तव हेच मनोहर सोनवणे यांच्या कथांचे आशयद्रव्य आहे. या संग्रहातील सगळ्याच कथांमधून जागतिकीकरण आणि खासगीकरणामुळे बदललेल्या वास्तवाचे विविध तुकडे मांडून समाजाचा एक कोलाज साकारण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. यातील साऱ्याच कथांचे आस्थाकेंद्र सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाच्या जीवनानुभूतीचे, त्याला रोजच्या जीवनात सामोरे जाव्या लागणाऱ्या वास्तवाचे असंख्य तुकडे आपल्याला इथे पाहायला मिळतात.

हातात पैसा खेळणाऱ्या आणि मॉल संस्कृतीत ब्रँडेड वस्तूंच्या रेलचेलीत जगण्याचा उपभोग घेणाऱ्या माणसांकडे काहीशा दीनवाणेपणाने, असूयेने, हतबलतेने बघणारा हा घटक स्वत:ला पराभूत आणि कुटुंबीयांसमोर अपराधी समजू लागला. अशा घटकातील एका माणसाची आणि त्याच्या कुटुंबीयांची कहाणी यात सांगितली आहे. ती समाजातील तीव्रतम होत चाललेल्या विदारक विषमतेचे दर्शन घडवते, त्याचबरोबर समाजातील बाजार संस्कृती किती धूर्ततेने कुठल्याही गोष्टीचा ‘ब्रँड’ बनवू शकते यावरही ही कथा अचूक प्रकाश टाकते.

‘वेलकम टू कस्टमर केअर’ या कथेत सोनवणे नव्वद सालानंतर आलेल्या कॉल सेंटर संस्कृतीचा वेध घेतात. अमेरिकी ग्राहकांना त्यांच्या घडय़ाळानुसार सेवा पुरवणारी असंख्य कॉल सेंटर्स या काळात भारतात उगवली. त्यांच्या संस्कृतीशी जुळतील अशी जॉन, मारिया अशी नावं घेऊन त्यांच्या अ‍ॅक्सेंटमध्ये बोलत त्यांना विनम्र सेवा पुरवणारी कॉल सेंटर्स ही एक वेगळीच आभासी दुनिया आहे. त्या दुनियेत आपली स्वत:ची ओळख, आपले नाव, आपले राष्ट्रीयत्व, भाषा, संस्कृती सारेच लपवून एक वेगळाच मुखवटा धारण करणे, काम करत असताना मानवी भावनांना बिलकूल थारा न देता संपूर्ण व्यवहारी दृष्टिकोन बाळगणे, पब संस्कृतीत मिसळून जाणे या सगळ्याची तिथे एक प्रकारे सक्तीच आहे. या कथेत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या आणि स्वओळखीच्या प्रचंड द्वंद्वात सापडून गोंधळलेल्या संवेदनशील अर्चनाची गोष्ट सांगितलेली आहे. ‘मी स्टेला आहे की अर्चना? मी कोल्हापूरची आहे की इलिनॉईसची? मी नक्की कोण आहे?’ असे प्रश्न तिला पडतात. नव्या युगातील आधुनिक आणि संवेदनशील पिढीचे प्रतिनिधित्व अर्चना करते. ‘‘चायना जगाचं प्रॉडक्शन हाऊस आहे आणि इंडिया ‘बॅक ऑफिस’! जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे दोन देश जगातल्या श्रीमंत लोकांनी आपल्या सेवेला जुंपून घेतलेत..’’ अशी वाक्यं वर्तमानाचे भेदक चित्र समोर उभे करतात.

या संग्रहातील बहुतेक कथांचा घडण्याचा काळ हा जागतिकीकरणाच्या उंबरठय़ावरचा आहे. जागतिकीकरण दारात आल्यानंतर समाजात त्याविषयी जी एक धक्का पचवण्याचा प्रयत्न करणारी मानसिकता व्यापून राहिली होती, त्या मानसिकतेला मुखर करण्याचे काम या कथा करतात. एक प्रकारच्या संक्रमणाच्या, जागतिकीकरण पूर्णपणे वृत्तीत न भिनलेल्या काळाच्या टप्प्यावर या कथा घडतात. म्हणूनच त्यातील व्यक्तिरेखांमध्ये जागतिकीकरणपूर्व संवेदनशीलता शाबूत आहे. म्हणूनच अर्चनाला स्वओळख हरवण्याचे, पब संस्कृतीविषयी नैतिकतेचे प्रश्न पडतात. दोन संस्कृतींतील टकरावाच्या वादळात सापडलेल्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व अर्चना करते.

‘अधांतर’ ही कथा डोळ्यात स्वप्नं घेऊन शहरात आलेल्या ग्रामीण भागातील मुलाच्या मानसिक ओढाताणीचे आणि घालमेलीचे प्रत्ययकारी चित्रण करते. एकूणच सद्य:स्थितीत ग्रामीण भागात शेतीत काही राम उरलेला नाही.  त्यामुळे सर्व बाजूंनी नाडलेला शेतकरी मुलांच्या शिक्षणाकडे डोळे लावून बसतो. असे हजारो तरुण आज पारंपरिक शेतीव्यवसाय सोडून आशेने शहराकडे येत आहेत. शिकून मोठे होऊ, नोकरी करू हे स्वप्न बघत जगत आहेत. शिक्षणासाठी त्यांचे कुटुंबीय जवळ असलेल्या तुटपुंज्या जमिनीचा तुकडाही विकून जमिनीशी, गावाशी परके होत आहेत. परंतु एवढे करूनही नोकरी मिळण्याची कोणतीच शाश्वती या मुलांना दिसत नाही. एकीकडे भविष्याची सुंदर स्वप्नं त्यांना खुणावत आहेत आणि दुसरीकडे गावापासून तुटलेपणाची भावना त्यांना घायाळ करते आहे. आपण ना इथले, ना तिथले; अधांतरी. अशा अधांतरात  सापडलेल्या एका तरुणाच्या मनाची आंदोलने ही कथा टिपते. सोनवणे यांनी ग्रामीण भागात गरीब कुटुंबांत घरोघरी जाणवणारे वास्तवाचे हे चटके, फटके अत्यंत उत्कट भाषेत शब्दांकित केले आहेत.

‘रेणूची गोष्ट’ या कथेत कारखान्यातील मॅनेजमेंटचे युनियनविरोधी, कामगारविरोधी विषारी राजकारण कामगारांना कसे उद्ध्वस्त करते यासंबंधीचे अनुभवकथन आले आहे. ‘मॉलमध्ये एकटे एक मूल’ या कथेत वर्तमान वास्तवाचा एक वेगळाच तुकडा वाचकांसमोर येतो. एकीकडे झगमगत्या श्रीमंतीत जगणारा एक वर्ग, तर दुसरीकडे डोळ्यांत स्वप्नं, जिद्द, आशा-आकांक्षा घेऊन अनेक प्रश्न, समस्या, दु:ख, निराशा, हतबलता यांच्याशी संघर्ष करणारा दुसरा वर्ग.. या वर्गीय विषमतेचे वास्तववादी चित्रण या कथा करतात. गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गातील सामान्य माणसांच्या जागतिकीकरणामुळे बेहाल झालेल्या जिंदगीचे चित्रण करताना सोनवणे यांची लेखणी हेलावून जाते.

सोनवणे यांची कथनशैली प्रवाही आहे. कथांची रचना अत्यंत बांधेसूद आहे. एखाद्या चलत्चित्रकथेप्रमाणे ती आपल्या डोळ्यासमोर साकारते. तिला तळमळीचा, उत्कटतेचा, करुणेचा स्पर्श आहे. या कथांमधून सोनवणे यांचे वर्तमानाविषयीचे खोल चिंतन आणि जाणकारी जाणवते.

कथेचे वेगवेगळे फॉम्र्स ते हाताळतात. उदा. ‘मॉलमध्ये एकटे एक मूल’ या कथेत त्यांनी मॅजिकल रिअ‍ॅलिझमचा आधार घेतला आहे. ‘तुमचीच गोष्ट’मध्ये वाचकालाच कथेचा भाग बनवून कथागत निवेदक वाचकाचीच कथा त्याला ऐकवतो आणि कथेच्या शेवटी त्याच्या विपरीत वर्तनाचे दर्शन घडवून एक प्रकारे चपराक देतो. या सगळ्या कथांमधून सोनवणे यांनी उपहास, उपरोध, एक प्रकारचा ब्लॅक ुमर आदीचा केलेला वापर कथांना कलात्मक मूल्य बहाल करतो. वास्तवाचे केवळ उघडेवाघडे प्रदर्शन न करता अत्यंत संयमितपणे आणि सूचकतेने या कथा बरेच काही सांगून जातात.

या पुस्तकात अंबरीश मिश्र यांनी प्रस्तावनेच्या निमित्ताने मांडलेले जागतिकीकरणासंबंधीचे मूलभूत चिंतन वाचलेच पाहिजे असे आहे. चित्रकार अन्वर हुसेन यांचे प्रत्ययकारी मुखपृष्ठ पुस्तकाच्या मूल्यांत भर घालणारे आहे.

ब्रँड फॅक्टरी’- मनोहर सोनवणे, विश्वकर्मा प्रकाशन, पाने- १९०, किंमत- २५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review brand factory author manohar sonawane zws