या पुस्तकाचे शीर्षकच  त्याचा आशय आणि विषय स्पष्ट करणारे आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील साधेपण, स्पष्टता आणि सर्वव्यापीपणा हा जगभर औत्सुक्याचा आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक बुद्धचरित्राचा, परंपरांचा वेध घेत बुद्धचरित्रात उल्लेखिलेल्या वृक्षांचा बुद्धाच्या आयुष्याशी किंवा प्रसंगोपात घटनांशी संबंध व संदर्भ जोडते.
पुस्तकात सुरुवातीच्या प्रकरणात बुद्धचरित्र मांडताना महत्त्वाच्या शिल्पांचा आधार घेतला आहे, हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. बुद्धाचे चरित्र प्रकरणातून उमटत असताना सोबतच्या शिल्पचित्रांनी ते अधिक परिणामकारक होत जाते. या शिल्पचित्रांना बौद्ध स्थापत्य आणि शिल्पकलेत अनन्यसाधारण स्थान आहे. ही शिल्पे प्रादेशिक तत्कालीन आर्थिक संपन्नता, राजकीय स्थिरता, शिल्पकलेतील प्रगती, शैली आणि सामाजिक संदर्भ उलगडणारी आहेत. त्यांचा स्वतंत्र अभ्यास चालूच आहे, पण त्याला तितके महत्त्व दिलेले नाही. त्यांची स्थळे आणि काळ यांचा संदर्भ देणारे परिशिष्ट आवश्यक होते. जे परिशिष्ट दिले आहे ते एका शासकीय प्रकाशनातून. त्यानुसार एकंदर २३ शिल्पचित्रांपैकी १३ शिल्पचित्रांचा स्थलउल्लेख दिला आहे. कोणत्याही शिल्पाचा काळ दिलेला नाही. त्यांना ‘शिल्पचित्र’ असा शब्दप्रयोग अधिक उचित झाला असता. कारण ही चित्रे नसून शिल्पांची छायाचित्रे आहेत.
बुद्धचरित्रही दंतकथेच्या आधारे मांडले आहे. बुद्धाला मान्य नसणाऱ्या अनेक कल्पना त्यात येतात. उदा. पुनर्जन्म आणि आनुषंगिक दंतकथा. पुस्तकातील दुसऱ्या भागात बुद्धपरंपरेशी निगडित वृक्ष आणि त्यांची माहिती आहे. ती देताना जी छोटी बुद्धचरित्रे दिली आहेत ती बहुतांशी सामायिक आहेत, दंतकथाप्रधान आहेत. मात्र प्रत्येकाशी संबंधित वृक्ष निराळे आहेत. बुद्धपरंपरेत एकंदर २८ बुद्ध होऊन गेले. त्यांची दंतकथास्वरूप अल्पचरित्रे आणि संबंधित बोधिवृक्ष दिले आहेत. हा पुस्तकाचा सर्वात मनोहारी भाग.. अगदी गाभा!
वरवर चाळल्यावर आपल्या या पुस्तकाविषयीच्या अपेक्षा वाढू लागतात, कुतूहल निर्माण होऊ लागते; मात्र पुस्तक प्रत्यक्ष वाचताना अपेक्षाभंग होऊ  लागतो.
अपेक्षाभंगाची कारणे अनेक आहेत. काही कारणे पुस्तकाच्या बलस्थानातू निर्माण झाली आहेत. पुस्तक दोन भागांत विभागले आहे. पहिल्या भागाला अनुक्रमणिकेत नाव दिले नाही, पण त्या भागाच्या सुरुवातीला मात्र ‘बुद्धचरित्र आणि कार्य’ असे नाव दिले आहे. या भागात चरित्रासोबतच काही संकल्पना स्पष्ट करणारी प्रकरणे आहेत. उदाहरणार्थ, बुद्धाचा धर्म, बुद्धपूर्व भारतातील धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय.. भिक्षू होणे म्हणजे काय, अष्टमहास्थाने, बौद्ध देवता संघ आणि बौद्ध वाङ्मय इत्यादी इत्यादी. चरित्र वगळता बाकी प्रकरणे छोटेखानी आहेत. त्यांत संकल्पना मांडल्या आहेत. पण त्यातून समाधान होण्यापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात आणि अपेक्षाभंगाला सुरुवात होते. याचे मुख्य कारण म्हणजे पुस्तकात वापरलेली पारिभाषिक भाषा. ही भाषा तीन विषयांतील आहे. एक म्हणजे बौद्ध धर्म ज्या भाषेसह विकसित आणि प्रसारित झाला ती पालीभाषा, दुसरी, बौद्ध परंपरेतून विकसित झालेली संकल्पना मांडणारी तत्त्वज्ञानाची परिभाषा आणि तिसरी वनस्पतीशास्त्राची परिभाषा. या परिभाषांशी परिचित नसणाऱ्या वाचकांचा हे पुस्तक अंत पाहते. याचे कारण म्हणजे आवश्यक परिशिष्टांचा अभाव, अपेक्षित वाचकवर्गाचे नसलेले भान आणि वाचकाला गृहीत धरणारी पुस्तकाची भाषा आणि मांडणी. संदर्भसूचीत केवळ दहाच पुस्तकांची यादी दिली आहे, तीही ढिसाळ पद्धतीने. त्यातील अशास्त्रीयता, घाई आणि गांभीर्याचा अभाव अवाक करणारा आहे. पुस्तकभर अनेक संदर्भपुस्तकांचा उल्लेख प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाचताना येतो. त्या सर्वाची एक सर्वसमावेशक सूची अत्यंत आवश्यक होती.
विषयातील नावीन्य म्हणून हे पुस्तक स्वागतार्ह आहे. अशा पुस्तकांतून विविध क्षेत्रांतील वाचकांना प्रेरणा, कल्पना सुचू शकतात. म्हणून अशा पुस्तकांची विषय मांडणी अधिक संदर्भयुक्त आणि काळजीपूर्वक केली पाहिजे. पण या शक्यतांचा विचार लेखिकेने केलेला नाही, याची खंत वाटते.
  ‘बुद्धपरंपरा आणि बोधिवृक्ष’ – हेमा साने, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे – १३३, मूल्य – १५० रुपये.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा