डॉ. सिसिलिया कार्व्हालो

जागतिकीकरणानंतरच्या तीस-बत्तीस वर्षांनंतर आणि आता कृत्रिमप्रज्ञेच्या प्रवेशाच्या काळात आजच्या पिढीचे संवेदन ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ नामक कवितासंग्रहात गीतेश गजानन शिंदे या नव्या दमाच्या कवीच्या कवितेतून प्रतीत झालेले आहे. माती, माणूस, माणुसकी यांपासून दुरावलेला समाज, भावविश्वाची पडझड, मूल्यव्यवस्थेची कोलमड, तंत्रज्ञानाच्या ताब्यात गेलेली पिढी, यामध्ये हेलकावे खाणाऱ्या संवेदनशील मनाच्या आयुष्यात अनुभवास आलेल्या समुद्रातील भरती-ओहोटीची गाज प्रस्तुत कवितासंग्रहात ऐकू येते. केवळ ऐकू येत नाही तर कवितागत नायकाच्या अंतर्बाह्य भावविश्वातील आंदोलने, अदृश्य अशा नजरांच्या सीसीटीव्हीने नेमकी पकडलेली आहेत. आणि या सीसीटीव्हीचे सारे फूटेज अत्यंत प्रभावीपणे एकूणच कवितासंग्रहात उमटलेले आहे.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

या फूटेजमधील संघर्षाचे विविध स्तर कवितागत नायक दृष्टिपथात आणून देतो. यात गतकाल आणि आजचे तंत्रज्ञानसमृद्ध वास्तव, नेहमीची रूढ भाषा आणि आजची बदललेली परिभाषा, समाजव्यवस्था आणि ‘स्व’ची घुसमट, नातेसंबंधांतील फारकत आणि त्यातही बापाच्या हृदयाची होणारी फरपट, विध्वंस आणि नवनिर्मिती, पर्यावरण आणि त्यात साकळलेली दूषितता या साऱ्यांचे कल्लोळ आणि सागराच्या पोटात उसळलेला वडवानल अत्यंत समर्थपणे आणि तरीही सारा तोल सांभाळीत हे सारे आंदोल शब्दांकित होतात ते छंदबद्ध आणि छंदमुक्त अशा रचनांमधून!

शहरात पूर्वीसारखी सावली पडत नाही, चिमण्या परागंदा झाल्याहेत, नदीच्या पात्रातली वाळू सरकून गेलेली, अस्तित्व टिकवून असलेली झाडं मूक उभी असलेली, दोन घरांची सामाईक भिंत, उन्मळून पडलेली डेरेदार झाडं, उतारवयातील थिजलेली माणसे, नांगरून पडलेली शेतं, आदिम काळात पूर्वजांनी उच्चारलेली भाषा विस्मृतीत जात चाललेली, विहिरीत पडणारे पोहरे, गर्दीतही बासरीचे सूर छेडणारा अशा विस्मृतीत गेलेल्या अनेक नोंदी सीसीटीव्हींच्या गर्द छायेत लख्ख झालेल्या आहेत.

हेही वाचा >>> निमित्त : समर्पित समाजसुधारक

तशीच लख्खता आजच्या समाजवास्तवात असली तरी प्रगत तंत्रज्ञानाच्या परिभाषेत त्यातील भगभगीतपणा अधिक जाणवतो. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टा अकाउंटसवरील लाइक्स, कमेंटस्, मेसेजेस यांच्या नोटिफिकेशनला अधीन झालेली पिढी, डिअॅक्टिवेट, डिलीट, ब्लॉक करणं, रिसायकल बीनमधून हद्दपार करणं, इटालियन फ्लोरिंग, फ्रें च विंडो यात अडकून पडणं, नार्को टेस्ट, सीटी स्कॅन, लाय डिटेक्टर चाचणी यांच्या सापळ्यात सापडणं, सेल्फीतील सेल्फिश वृत्ती, स्क्रीनवर सतत चमकण्याचा लगलेला छंद, वॉलवर, चॅट बॉक्समध्ये स्वत:ला लटकवणं, सतत स्क्रोल करीत आत्मभान हरपणं, इमोजींच्या प्रभावात भाषेपासून दूरावणं, मॉलमध्ये रेंगाळत वेळ घालवणं, गॅझेटसच्या कचाट्यात सापडल्याने आपली विचारशक्ती गमवू पाहणाऱ्यांविषयीची खंत कवितागत नायकाला वाटते. तो म्हणतो,

‘कितीही गेलो उंचावर

तरीही मनात बाळगून

मोहाचे सरकते जिने

मिळत नाही आयुष्याला’

परिपूर्णतेची लिफ्ट

बदलत्या वा बिघडत्या पर्यावरणाचे परिणाम व्यक्तिगत आयुष्यही विस्कटून टाकतात. तात्कालिकता आणि तकलादूपणा यात आपले स्वास्थ्य गमवून बसतात. आपली विचारशक्ती हरवून बसतात, प्रदूषित राजकारण आणि सत्ताकारणात बाह्य गोष्टी आणि रंगावरून, जाती-धर्मावर येतात. वाहती नदी गुलाल आणि कुंकवाच्या रक्ताने रंगून जाते, प्रत्येकाच्या डोळ्यात सीसीटीव्ही बसवलेले आणि त्यांच्यावरही आणखी अतिसंवेदनशील अशा सीसीटीव्हींचा पहारा! त्यामुळे एकाच वेळी प्रत्येक व्यक्ती अतिमहत्त्वाची आणि त्याच वेळी ती संशयितही अन् असुरक्षिततेच्या भीतीने ग्रासलेलीही!

मनाचे उसवलेले टाकेही या सीसीटीव्हीने अत्यंत चाणाक्षपणे टिपलेले आहेत. नातेसंबंधांतील फारकत, विस्कटलेपण आणि त्यात कोमेजून गेलेले निर्मितीचे, संवदेनशीलतेचे अंकुर… नव्हे त्याचा झालेला चोळामोळा हे या विध्वंसकारी वातावरणाचा परिणाम असल्याची पावती हा कवितानायक आपल्यापुढे सादर करतो. नात्याची हरवलेली ओल त्याच्या वाट्याला आलेली आहे.

नात्यांची कन्नी सोडवून ‘पतंग’ ढगात पोहोचल्यासारखी त्याची अवस्था आहे. नवरा-बायकोच्या फारकतीत, त्यांच्यातूनच निर्माण झालेला धागा असलेले त्यांचे अपत्य, त्यासाठी चाललेली मनाची कुतरओढ आणि कातर अवस्था इथपासून त्यांच्या भावनांचा चोळामोळा होण्याची सुरुवात होते. एका बापाच्या मनाची उलथापालथ अशा कवितांत अत्यंत समर्थपणे चित्रित आणि सूचित होते. झाडानं जपलेलं घरटं रिकामं झाल्याची खंत त्याला जाणवते. मनाला झालेल्या जखमांवर तो तान्ह्या मुलाच्या निरागस हसण्याची हळद लावू इच्छितो. तुटलेल्या संवादाला सांधू इच्छितो. म्यूट झालेल्या नात्याला संजीवनी देऊ इच्छितो आपल्या बाळाच्या माध्यमातून!

प्रकृति आणि पुरुष यातूनच निर्मिती संभवते; तथापि पुरुषी अथवा स्त्रीची प्रवृत्ती प्रभावी झाली तर त्याला जबाबदार असलेली समाजव्यवस्था ‘नवरा वारल्यानंतर’ या कवितेतील वागण्यातील फरक, फक्त आई-बाप गेल्यानंतरच रडण्याची मुभा असलेला पुरुष ‘अनाथा’सारखा, नवरा-बायकोच्या नात्याचा पूल कोसळल्यावर बाप-मुलाचे नाते दृढ न ठेवणारी ‘कुटुंबव्यवस्था’, ‘शाप’, आई अंगाईसारखी, तर बाप असतो ‘पाळणा’, चिमुकल्या डोळ्यांना भेटण्यासाठी तासांचे अंतर मिनिटात पार करणारे ‘घड्याळ’, कानात प्राण आणून वाट पाहणारा ‘संवाद’, ‘उभ्या जन्माचे देणे’, ‘डोक्यावर हंडे घेऊन फेडणारी बाई’ अशा काही कवितांतून आपल्यासमोर येतो.

आजच्या तंत्रज्ञानाच्या कचाट्यातील वास्तवाचे विचलन करीत आणि त्याचबरोबर त्याच्याशी साहचर्य साधत ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेतील’ कविता कधी छंदबद्ध तर कधी मुक्तछंदात आपल्यासमोर साकार होतात. मानवी मूल्यांची चाललेली पडझड तर यात चित्रांकित झालेली आहेच, परंतु कवितागत नायकाच्या काळजातली तलखलीही अत्यंत उत्कटपणे शब्दात अवतरलेली आहे.

‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’, – गीतेश गजानन शिंदे, शब्दालय प्रकाशन, पाने- १२८, किंमत – २५० रुपये.