मीना गुर्जर
‘चारचौघी’ हे नाटक प्रथम आलं तेव्हा आणि आता आलं तेव्हा काय घडलं याचा मागोवा घेताना राजकीय, सामाजिक, आर्थिक, तांत्रज्ञानिक, सांस्कृतिक अशा सर्व थरांवर दोन्ही काळात काय चालू होतं, त्यावेळच्या लोकांची मानसिकता, परंपरेचं जोखड, १९७५ साली आलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं वादळ यांतून जागं होणारं आत्मभान याचा आढावा घेऊन या पार्श्वभूमीवर या नाटकाने दोन्ही वेळा काय जादू केली? समीक्षक, विचारवंत, नाटय़रसिक या सर्वाना एकाचवेळी भिडणारं असं काय आहे त्यात की ज्यामुळे हजार-हजार प्रयोग हाऊसफुल्ल व्हावेत, इतका भरघोस प्रतिसाद मिळावा? आजची स्थिती तर अजूनच वेगळी आहे. एकाच बटणावर मनोरंजनाची अनेक साधनं हात जोडून उभी आहेत- ज्यात मेंदूला फारसे कष्ट नाहीत. असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तरीही.. तरीही चर्चात्मक, वैचारिक, स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करणारं हे नाटक आजच्या काळातही तरुण, प्रौढ, वृद्ध सर्व तऱ्हेचा प्रेक्षकवर्ग बाळगतो हे काय गारूड आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘चारचौघी.. प्रवास सहसंवेदनाचा’ या पुस्तकात मिळतं. या पुस्तकाचे संपादन नाटय़ समीक्षक रवींद्र पाथरे यांचे आहे.
‘चारचौघी.. प्रवास सहसंवेदनाचा’ या पुस्तकाचे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात २०२२ मधील ‘चारचौघी’, तर दुसऱ्या भागात १९९१ मधील ‘चारचौघी’. हे पुस्तक अंतर्बा देखणं आहे. आणि अशा पुस्तकाकडे मन ओढलं गेलं की- ‘आशय प्रधान नाटकाची पाठराखण करणाऱ्या असामान्य प्रेक्षकांना’ अशी अर्पण पत्रिका दिसते. अनुक्रमणिका वाचतानाच आपण अशा एका दालनात प्रवेश करत आहोत की येथून बाहेर पडताना आपण समृद्ध होणार आहोत याची जाणीव होते. आणि एक खोल श्वास घेऊन आपण पुढचं पान उलटतो.
लेखक प्रशांत दळवी हे नाटक पुन: पुन्हा करताना ‘नाटक कालबा तर ठरणार नाही ना’ म्हणून झालेली घालमेल, त्याचं वाचन, कलाकारांची निवड, झालेल्या खणखणीत तालमी इ. सांगून ते प्रत्येकाच्या सहभागाचं त्यांचं त्यांचं श्रेय देतातच, पण त्यांनी आपल्याला काय दिलंय हेही सांगतात. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची आसमंत उधळवून टाकणारी लख्ख सुस्पष्टता, नेपथ्याचं उबदार घर करण्याची त्यांची किमया, आशयाला दिलेलं दृश्यरूप, व्यक्तिरेखांची झालेली हाडामांसाची जिवंत माणसं, तर रोहिणी आणि मुक्ता घेऊन आलेल्या अनुभवाचं समृद्ध अवकाश, ‘पर्ण’ची अभिनय समज, कादंबरीने जपलेला भावनांचा आलेख, विचारी निनादने पकडलेला श्रीकांतचा अविचारीपणा, आपल्या वावरण्यातून झऱ्याची खळखळ जाणू देणारा पार्थचा विरेन आणि प्रकाशचं अंतरंग जाणून घेतलेला श्रेयस यांच्याबद्दल ते सांगतातच, पण तांत्रिक बाबी विचारपूर्वक आणि सर्जनशीलपणे सांभाळणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांनाही ते श्रेय देतात. निर्मात्यांचे नियोजन, सल्ले यांचाही ते आवर्जून उल्लेख करतात.
एक उत्तम मुद्दाही त्यांनी यानिमित्ताने मांडला आहे. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक नाटक बघणारा प्रत्येक जर सवंग करमणूक टाळून रंगभूमीच्या ओढीनं येत असेल तर त्याला ‘सर्वसामान्य’ प्रेक्षक म्हणू नये. तसेच प्रेक्षकांचीच अशी मागणी आहे असं गृहीत धरून त्यांच्या बुद्धय़ांकावर शंका घेऊन, तडजोड करून एकेक पायरी उतरणं योग्य नाही, अशीही भूमिका ते मांडतात. एकूणच या नाटकाला कोणा कोणाचा जादूई स्पर्श झाला आणि ‘चारचौघी’ ने काय दिलं याचा आढावा घेतला आहे.
स्वत:चं पुरुषनिरपेक्ष कुटुंब निर्माण करणारी, चाकोरीबाहेरचे निर्णय घेणारी, परिणामांचीही जबाबदारी घेणारी आई जितकी लेखकाची निर्मिती असते, तितकीच एका व्यापक पर्यावरणाचीही निर्मिती असते. माझ्या नाटकातली स्त्री ही व्यक्तिरेखा न राहता तिने घेतलेले निर्णय हे केंद्रबिंदू ठरू लागले असे ते म्हणतात.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना ३१ वर्षांनंतर पुन्हा हेच नाटक करताना लेखकाला पडलेले प्रश्न पडले नाहीत. टप्प्यांवरची नाटकं पुन:पुन्हा करावीत, कारण यामधल्या काळानं दिग्दर्शकाला बरंच काही दिलेलं असतं आणि ते संचित नाटकाला मिती देऊ शकतं असं त्यांना वाटतं. या नाटकाच्या दोन्ही नटसंचाबद्दल तो कसा मिळाला, तो वेगवेगळ्या पठडीतून कसा आला होता हे सांगून नेपथ्यातल्या प्रत्येक वस्तूची मांडणी – तिच्या वापरा मागचा विचार कसा आणि का केला? २२ मिनिटांचं फोन संभाषण एकसाची होऊ नये म्हणून काय बदल केले, पेहेरावाचं स्वरूप आणि रंगसंगती, प्रकाशयोजना, संगीत त्या त्या प्रसंगाला कसा उठाव आणि मूड देतात याची उकल करून ज्याचं त्याचं श्रेय मनापासून देतात. प्रतिमा जोशी (पेहराव) संदेश बेंद्रे (नेपथ्य) यांच्या खणखणीत योगदानाची नोंद घेतात.
‘परिवर्तनाची पालखी’ या लेखाचे लेखक डॉ. नंदू मुलमुले नाटकाच्या आशयाबद्दल किती आणि कसं उत्खनन करून विचार करता येऊ शकतो याचा वस्तुपाठच समोर ठेवतात. ‘‘मानवी संस्कृतीमधील विषमद्वैताचा प्रस्तर खोदून काढणारे, मानवी संस्कृतीने जन्म दिलेल्या समाजाला जन्मजात चिकटलेल्या तीन व्यवस्थांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारे हे नाटक आहे,’’ असे ते म्हणतात. या व्यवस्थांची पाळेमुळे शोधून उत्क्रांतीच्या अंगाने ते जो मागोवा घेतात तो विलक्षणच!
अरुणा ढेरे या चळवळी, आत्मचरित्र, कविता, कथा यांचा वेध घेत चारचौघींच्या जन्माची पार्श्वभूमी सांगतात.
‘‘स्वत:चे अनुभव सांगून त्यातल्या व्यक्तिरेखांनी मला कसं असावं हे सांगितलं, पण यातल्या श्रीकांत या पात्राने कसं नसावं हे शिकवलं,’’ असं निनाद लिमये म्हणतात. तर श्रेयस राजे ‘‘वाक्यांवर स्वार व्हा, ते मेंदूत घोळवा, आपली भूमिका कळायची असेल तर त्याच्याबद्दल इतर पात्रे काय म्हणतात ते जाणून घ्या,’’ अशा अनेक सूचना चंद्रकांत कुलकर्णी करत असत असे म्हणतात.
या पुस्तकाच्या वाचनानंतर नाटय़रसिक प्रेक्षक नाटकाकडे अधिक सजगपणे पाहतील. अनेक सांदीकोपरे दृश्यमान होतील, नवेनवे पैलू आकळतील. एकूणच जाणिवा समृद्ध करणारं सर्वागसुंदर संग्रा असं हे पुस्तक आहे.
‘चारचौघी.. प्रवास सहसंवेदनाचा!’, संपादन – रवींद्र पाथरे, जिगीषा प्रकाशन, पाने- २५१, किंमत- ७५० रुपये.
meenagurjar1945@gmail.com