याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे केवळ प्रेक्षकांमध्येच नाही, तर  सिनेसमीक्षकांतही दृश्यसाक्षरतेचं प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, आजची सिनेसमीक्षा आणि सिनेसाहित्य सिनेमातल्या नट-नटय़ांविषयी अधिक बोलतं आणि प्रत्यक्ष ‘सिनेमा’ नावाच्या कलाप्रकाराविषयी, त्याच्या आस्वादाविषयी कमी बोलतं.
सिनेमा या कलेची जाण असलेले, त्याविषयी अत्यंत गंभीरपणे लेखन करू शकणारे काही मोजके समीक्षक देशात आहेत. मराठीपुरता विचार केला तर अशा मूठभर जाणकार समीक्षकांमध्ये गणेश मतकरींचं स्थान असाधारण आहे. अल्पवयात आणि अल्पावधीत त्यांनी या माध्यमाचे बारकावे शिकून, समजून घेतले. सिनेसमीक्षेतली त्यांची आजवरची कामगिरी या क्षेत्रातल्या ज्येष्ठांना चकित करील अशीच आहे. ‘चौकटीबाहेरचा सिनेमा’ हे गणेश मतकरी यांचं नवं पुस्तक नुसतं वरवर चाळलं तरी सिनेकलेची त्यांना असलेली समज, त्यांचा व्यासंग आणि निरीक्षण याबद्दल कौतुक वाटत राहतं.
हे पुस्तक एका परीनं मराठी सिनेसाहित्याला चौकटीबाहेर नेण्याचा प्रयत्न आहे. अनेक बाबतींत अनोख्या असलेल्या जगभरच्या शंभर सिनेकृतींचा परिचय मतकरींनी या पुस्तकात करून दिला आहे. परिचय हा शब्द खरं तर या लेखनाचं वर्णन करण्यास योग्य ठरणार नाही. कारण कमी शब्दांत असला, तरी हे लेखन त्या- त्या सिनेकृतीच्या गाभ्याला भिडतं आणि सिनेमाचं नेमकं अनोखेपण आपल्या हाती ठेवतं. लेखनासाठी मतकरी यांनी जे सिनेमे निवडले आहेत ते बरेचसे अपरिचित आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांनी त्यांची नावंही ऐकली नसतील. फिल्म फेस्टिव्हलला नियमानं हजेरी लावणाऱ्या प्रेक्षकांनीदेखील यातले फार तर पंधरा-वीस सिनेमे पाहिले असतील, इतके हे सिनेमे अनोळखी आहेत. या पुस्तकाच्या निमित्तानं वाचकांची एका अनोख्या सिनेजगताशी ओळख होऊन जाते.
सिनेनिर्मितीच्या आजवरच्या प्रवासातून सिनेमाच्या पडद्यावरील पेशकशीचे एक भाषाशास्त्र, एक दृश्यलिपी आणि व्याकरण तयार झालं आहे. कळत-नकळत प्रेक्षकांसमोर जे पडद्यावर ठेवायचं आहे ते कशा पद्धतीनं ठेवायचं, याचे संकेत आणि चौकटी निर्माण झाल्या आहेत. काही प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी ही चौकट नाकारली. सिनेमाचे विषय, त्यांचं सादरीकरण याबाबत त्यांच्यापाशी वेगळ्या कल्पना होत्या. या मंडळींनी सिनेक्षेत्रात बंडखोरी करायचे उद्योग आरंभले. सिनेमाचे पारंपरिक संकेत झुगारले आणि नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. या पुस्तकाच्या शीर्षकात सूचित केल्याप्रमाणे सिनेमाच्या रूढ चौकटी मोडून नवनिर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कलाप्रयोगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.
हे पुस्तक या दिग्दर्शकांच्या प्रयोगांचा निव्वळ उल्लेख करून, त्यांचा आढावा घेऊन थांबत नाही; ते या दिग्दर्शकांची त्या प्रयोगांमागची भूमिका वाचकांना समजावून सांगतं. आणि त्याही पुढं जाऊन त्या प्रयोगांच्या बऱ्या-वाईट योगदानाविषयी चिकित्सकपणे चर्चा घडवून आणतं. पूर्वापार परंपरा दूर सारून सिनेनिर्मिती करण्याचे याआधी झालेले प्रयत्नही आपल्यासमोर ठेवतं.. त्यावर स्वत:चं भाष्य करतं. या मंडळींचे हे प्रयोग म्हणजे कथनाची पडद्यावरील रचना, सादरीकरणासाठी योजलेली तंत्रं अशा विविध अंगांतील आहेत. नमुन्यादाखल त्यांचा विशिष्ट सिनेमा समोर ठेवून त्यांच्या प्रयोगाचे मर्म मांडण्याचा मतकरींचा प्रयत्न आहे.
आपण लेखनासाठी निवडलेले सिनेमे अपरिचित आहेत याचं भान त्यांना आहे. त्यांचा परिचय करून देण्याच्या मिषानं ते सिनेमा या कलेकडे पाहायचे सर्जनशील दिग्दर्शकांचे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन वाचकांसमोर मांडतात. आविष्कार- शैलीतल्या प्रयोगातून या माध्यमापाशी असलेल्या अद्भुत शक्यतांचा कसा विस्तार होतो हे ते दाखवतात. सिनेकलेला मिळणारी नवी परिमाणं सूचित करतात. सिनेमाकडे गांभीर्यानं पाहणाऱ्यांच्या दृष्टीनं हे प्रबोधन मोलाचं ठरावं. सिनेमाचे अंतरंग उलगडून सांगताना, पटकथा आणि दृश्यरचनेमागील दिग्दर्शकाची वैचारिकता समजावून सांगताना आपण कोणी सिनेपंडित आहोत आणि समोरचा वाचक हा आपला शिष्य आहे असा आवेश या लेखनात नाही. पुस्तकाचं संपूर्ण लेखन वाचकांशी गप्पा मारत केलेलं.. रीडर्स-फ्रेण्डली आहे. मी म्हणतो ते सत्य माना, माझी निरीक्षणं प्रमाण माना, असा आग्रह त्यात नाही. सिनेकृतीमधल्या ज्या तुकडय़ांचा अन्वय आपल्याला लागलेला नाही ते तुकडेही अनाकलनीय भाग म्हणून ते आपल्यासमोर मांडतात. अशा सिनेमांच्या बाबतीत सगळं काही आपल्याला समजलं पाहिजे असा अट्टहास बाळगून किंवा त्याने अस्वस्थ होऊन चालत नाही असं ते सांगू पाहतात. संगीत, प्रकाशयोजना, छायाचित्रण या घटकांचा सुटा विचार मतकरी करत नाहीत. हे सर्व घटक सिनेआशयाशी किती सुसंगत वा विसंगत आहेत, हे तपासून ते त्याचं मूल्य ठरवतात. पुस्तकातली त्यांची लहानसहान विधानंदेखील सिनेमा या माध्यमाबाबतच्या त्यांच्या प्रगल्भ आकलनाची साक्ष पटवणारी आहेत.
सिनेप्रेक्षकांमध्ये फिल्म फेस्टिव्हलचे सिनेमे पाहणारं जे लहानसं प्रेक्षकवर्तुळ आहे, त्या वर्तुळाचे सदस्य हाच या पुस्तकाचा खरा वाचकवर्ग आहे. नव्या सिनेमाविषयी त्यांच्या मनात असलेल्या बऱ्याच शंकांना या पुस्तकात उत्तरं मिळू शकतील.
शंभर सिनेकृतींच्या दिग्दर्शकांच्या भूमिकेतली प्रायोगिकता स्पष्ट करण्याच्या निमित्तानं सिनेनिर्मितीमागील विविध वैचारिक प्रवाह, त्यात कालानुरूप घडत गेलेले बदल यावरही नकळत चर्चा होते. नव्या लोकांच्या सिनेकामगिरीच्या समीक्षेतकीच ही चर्चाही मोलाची आहे. सिनेमा ज्या देशात चित्रित केला आहे त्या देशाचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र ज्ञात असावं लागतं. कथेतली पात्रं ज्या काळात वावरताहेत त्या काळाचं सामाजिक, सांस्कृतिक वास्तव समजून घ्यावं लागतं. आदर्श समीक्षेच्या या पूर्वअटी मतकरी आपल्या समीक्षालेखनात नेहमी पाळत आले आहेत. या पुस्तकात या समीक्षकी गुणवत्तेचं विशेष दर्शन होतं. शंभर सिनेमांचा.. जगभरातल्या अनोख्या कलाकृतींचं अनोखेपण वाचकांना उमजेल अशा भाषेत आणि किमान शब्दांत वाचकांसमोर ठेवण्याची अवघड जबाबदारी या पुस्तकात त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे.
समीक्षक हा सर्वज्ञ नसतो. मतकरी तर या क्षेत्रात तुलनेनं नवखे आहेत. पण पुस्तकातला मजकूर अधिकाधिक अचूक आणि सखोल असावा यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट पानोपानी जाणवत राहतात. आपल्या समीक्षालेखनाची पुस्तकात पद्धतशीर मांडणी करण्यासाठी त्यांनी जे विभाग पाडले आहेत त्यातूनही त्यांची अभ्यासू बठक दिसून येते.
प्रायोगिक सिनेकृतींविषयींबद्दल कुतूहल निर्माण करायचं काम या पुस्तकानं केलं आहे. आज नेटवर जगातले उत्तमोत्तम सिनेमे उपलब्ध आहेत. पुस्तकात चíचलेले सर्व सिनेमे नेटवरून डाऊनलोड करून पाहताना हे पुस्तक डोळस सिनेप्रेमी तरुण पिढीला एखाद्या गाइडप्रमाणे उपयोगी पडेल.
‘चौकटीबाहेरचा सिनेमा’ – गणेश मतकरी, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- ३५४, मूल्य- ४२४ रुपये.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी