अरुण खोपकर यांची ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत् चित्रव्यूह’ ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी प्रसिद्ध झाली. खोपकर मराठी वाचकांना परिचित आहेत, ते त्यांच्या ‘गुरुदत्त- तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकामुळे. इतकी दृश्यात्मक श्रीमंती असलेले पुस्तक मराठीत त्या काळात तरी दुर्मीळ होते. पुरस्कारविजेते अनेक लघुपट खोपकर यांनी बनवले आहेत. ‘कथा दोन गणपतरावांची’ तसेच ‘हाथी का अंडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तरीही मराठी माणसाला ज्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यक्तींचे कर्तृत्व माहीत नसते अशा माणसांमध्ये खोपकर मोडतात. लघुपट निर्मिती, चित्रपट बनवणे आणि चित्रपटकलेचे अध्यापन यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. वाचनाचे वेड, अफाट पुस्तकसंग्रह (एकदा ते म्हणाले होते, माझ्या लाखभर रुपयाच्या डिक्शनऱ्याच आहेत.) चित्रकला, संगीत, नृत्य यामधील व्यासंग, यामुळे खोपकर अनेक कलावंताना भेटले. त्याबद्दलचे लेख व व्यक्तिचित्रणे आहेत.
लहानपणीच्या आठवणी, फिल्म इन्स्टिटय़ूटमधील दिवस, पंडित शरच्चंद्र आरोलकर, ऋत्विक घटक यांसारख्या दिग्गजांचा सहवास, मनिकौल, सुधीर पटवर्धन, भूपेन कक्कर अशा समकालीन आणि मत्री असलेल्या कलावंतांचे चित्रण आणि स्थापत्यशास्त्रासारख्या विषयावर लेखन असे बरेच काही दोन्ही पुस्तकांत आहे. पण विलक्षण शब्दकळा, दृश्य टिपण्याची तरबेज आणि शिक्षित नजर, नर्मविनोद आणि वेगळा पोत आणि अवकाश ही या लेखनाची वैशिष्टय़े सांगता येतील. दोन्ही पुस्तकं अक्षरश: खिळवून टाकतात, पण ती अधाशासारखी वाचण्याऐवजी, कुमार गंधर्वाच्या भाषेत सांगायचे तर पुरवून पुरवून वाचली पाहिजेत.
शैलीदार लेखन आणि शैलीबाज पुस्तके मराठीत कमी नाहीत पण जितकी शैली सुंदर तितका कंटेन्ट कमी असा अनुभव बऱ्याचदा येतो. खोपकरांची शैली अभिनव आहेच, पण एक सुंदर मराठी गद्याचा नमुना आपल्यासमोर ठेवतात. फिल्म इन्स्टिटय़ूटमधल्या दिवसांबद्दल ते सांगतात- ‘‘खोलीच्या खिडक्या बंद झाल्या आणि बहादूरसाहेबांचा वर्ग सुरू झाला की, सिनेमाच्या विविध रंग इंद्रधनुष्यासारखे आत येत असत. एरवी बाहेरून येणाऱ्या पक्ष्याच्या आवाजाऐवजी विविध भाषातले संवाद, वेगवेगळ्या शैलीतलं संगीत आणि ध्वनी, यांनी एका नवीन ध्वनिविश्वाची ओळख होऊ लागायची. नाना देशातले, सर्व थरांतले, अनेक प्रकारचे लोक, निसर्गाची विविध रूपं, मानवी जीवनातले तऱ्हेतऱ्हेचे गुंते, उकल..जशा थिएटरच्या खिडक्या बंद होत तशा मनाच्या, एक-एक करून उघडू लागत. त्या देण्याचे काम बहादूरसाहेब चाळीसेक बजावीत होते.’’
याच प्रकारे भास्कर चंदावरकरांसारख्या संगीत तज्ज्ञाबद्दल लिहिताना संगीत आणि सिनेमाचे नाते याबद्दल मूलभूत असे खोपकर सांगू पाहतात. घाशीराम कोतवाल या नाटकाला चंदावरकर संगीत देत होते, तेव्हा खोपकर त्या साऱ्या प्रक्रियेला साक्षी होते. ते लिहितात -‘‘घाशीराममध्ये मानवी भावनांचा विस्तृत पट मांडला होता. त्यात तमाशातली रग होती, ठुमरीतली नजाकत होती. मंत्राघोषाची मंत्रमुग्धता होती. लोकसंगीताचा खेळकरपणा होता. स्त्रीगीतातले माधुर्य आणि जिव्हाळा होता. त्याचबरोबर, अग्निदिव्याच्या प्रसंगात वापरलेल्या किंकाळ्यातल्या अमानुष वेदना आणि क्रौर्य होते, असहाय्य नराश्य होते. या श्रीमंत ध्वनिचित्राला उपहासाची, त्वचाकापू जरतार होती. हा वैभवशाली उपहास जाड कातडय़ांनाही झोंबला. घाशीरामात असणारा उपरोध हा मानवी जीवनाच्या आणि नियतीच्या अर्थापर्यंत पोचला.’’
‘जे न देखे रवि’ हा मनी कौलवरचा आणि ‘रॉयल ऑफ बंगाल’ हा ऋत्विक घटक यांच्यावरचा लेख, हे पुस्तकातील दोन्ही लेख आकाराने मोठे आणि चित्रपटांबद्दल बरेच काही सांगणारे. ऋत्विक घटक यांच्या पहिल्या भेटीपासून त्यांच्या सिनेमापर्यंत ते त्यांच्या सिनेविचारापर्यंत सारं काही यात येतं. सिनेमाध्यमाच्या सखोल विचाराबरोबर त्यांचा रोमँटिकनेस, बंगालशी नाते, संगीतावरची पकड आणि त्यांचा विचार हे सार एका गुरूवर अजोड भक्ती असलेल्या शिष्याच्या नजरेतून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी ‘प्रत्येकाने सिनेमा करताना आपले मूलभूत प्रश्न उभे करणे आणि त्यांची आपल्या कृतीतून, विचारातून आणि लिखाणातून उत्तरे देणे कसे आवश्यक आहे, याची जाणीव दिली. सिनेमाच्या व्यापारी आणि बाजारू स्वरूपाला, तडजोड न करता कसे तोंड द्यायचे हे त्यांनी स्वतच्या उदाहरणाने दाखवून दिले.’
एका पहाटे साडेतीन वाजता ऋत्विक घटक यांनी स्टुडिओत विविध वाद्ये हाताळून चित्रविचित्र आवाज निर्माण केले आणि नंतर दोन महिन्यांनी त्याचा लघुपटात कसा वापर झाला असे प्रसंग यात आहेत. पण ऋत्विक घटक यांच्या कलेचा व्यापक पाश्र्वभूमीवर केलेला विचार हा वाचकांची घटक यांची सिनेमाबद्दललची जाणीव वाढवणारे आहे. सत्यजित रे आणि घटक यांच्यातला फरक ते नेमकेपणाने दाखवतात. ते दोघांच्या चित्रपटातील दु:खाचा आर्त स्वर व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या ध्वनीने. पण घटक यांचे ‘थेओ अन्ज्लोपोलास’ यांच्यासारख्या एपिक सिनेमाचा ध्यास घेतलेल्या दिग्दर्शकाशी केलेल्या तुलनेत घटक यांचा विचार अधिक पोचतो. मनी कौलसारख्या प्रतिभावंत मित्राबद्दल लिहिताना त्याच्या सिनेमातील गणितीय आखणीचे वर्णन करताना सहजपणाने खोपकर सुरुवात करतात आणि संगीत, ओव्या याबद्दल बोलत विशिष्ट लेन्सने तयार होणाऱ्या मर्यादांचे मनी कौल कसे सोने करत ते सांगतात. कंटाळवाण्या चित्रपटांचा शिक्का मारला गेलेला मनी कौल त्याच्या सृजन प्रक्रियेबद्दल आणि तंत्राच्या वापराबद्दल किती सजग असतो ते सांगतात.
हे वाचताना लक्षात येते की, मनी कौलसारख्यांचा चित्रपट पोचवायला असे लेखन फार आधी होणे आवश्यक होते. अभिजात कलांमधील दिग्गजांबद्दल लिहिताना तमाशासारख्या कलेतील दादू इंदुरीकरानांही त्याच तोलाचे स्थान देतात. पुस्तकातील पूर्ण वेगळा लेख आहे तो चार्ल्स कोरिआच्या स्थापत्याबद्दल. जयपूरमधील जवाहर कला केंद्र, आयुका, कांचनगंगासारखी इमारत स्थापत्यकलेतील वेगळा विचार मांडत कोरिआंनी काय साधले आहे हे खोपकर समजावून देतात. स्वतच्या निर्मितीबद्दलचे अनुभव खोपकर नारायण सुर्वेवरच्या आणि भूपेन खख्खर, र. कृ. जोशीबद्दलच्या लेखात सांगतात, पण सलगपणे स्वतच्या एखाद्या कृतीवर लिहीत नाहीत. चित्रकला, संगीत, शिल्प, साहित्य, कविता अशा विविध क्षेत्रातील संकल्पना आणि घटना उदा. कवी औडेनने जुळाऱ्याकडून आलेला चुकीचा शब्द तसाच ठेवणे किंवा विमानतळावर सतार आणि तबला सहज वाजवत बसलेल्या रविशंकर आणि उस्ताद अल्लारखा यांनी तरुणीच्या पदन्यासाबरोबर सम गाठण्याचा प्रसंग..अशा बऱ्याच गोष्टी या लेखनात ओघाने येतात.
दोन्ही पुस्तके वाचावीतच, पण चित्रपट आणि चित्रकला शिकणाऱ्याच्या संग्रहीही असायलाच हवीत. ही पुस्तकं कलेबद्दलची आपली समज वाढवतातच आणि उत्कृष्ट गद्य वाचल्याचे समाधानही देतात.
‘चित्रव्यूह’- अरुण खोपकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे- २००, मूल्य- ३५० रुपये.
‘चलत-चित्रव्यूह’- अरुण खोपकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे- २७६, मूल्य- ४२५ रुपये.
कलाविषयक भान जागवणारे संग्रह
अरुण खोपकर यांची ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत् चित्रव्यूह’ ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी प्रसिद्ध झाली. खोपकर मराठी वाचकांना परिचित आहेत, ते त्यांच्या ‘गुरुदत्त- तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकामुळे. इतकी दृश्यात्मक श्रीमंती असलेले पुस्तक मराठीत त्या काळात तरी दुर्मीळ होते.
आणखी वाचा
First published on: 17-02-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review chitravyuha and chalet chitravyuha