बबन मिंडेंची पहिली कादंबरी ‘सत्याग्रह’! १९२१ च्या मूळशी सत्याग्रहींवर झालेल्या कायमस्वरूपी अन्यायाची कहाणी. या पहिल्याच कादंबरीने मिंडे यांना ‘लेखक’ केले. आणि आता त्यांची ही दुसरी – ‘कॉमन मॅन’! ही कादंबरी बारकाईनं वाचावी लागते. कारण आपल्या बहुरंगी, बहुढंगी समाजात ‘कॉमन मॅन’ कोणाला म्हणायचं, हा प्रश्नच आहे. समान हितसंबंध असलेले गरीब, अशिक्षित, अडाणी, अस्वच्छ माणसांचे समुदाय किती ‘कॉमन’ आहेत आपल्या समाजात! त्यांना त्यांचे अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे मूलभूत प्रश्न असतात. क्वचित शिक्षण आणि आरोग्याचेही. ‘आहार- निद्रा- भय- मैथुन’च्या पलीकडे त्यांच्या जीवनात दुसरं काहीच नसतं. आपल्या व्यक्तिगत हिताची त्यांना जाणीव नसते. विवेकापेक्षा अंधश्रद्धा त्यांना आपली वाटते. त्यांची भांडणं, त्यांचे संघर्ष, त्यांचे अपघात या सगळ्या प्रसंगांची कारणंसुद्धा नेहमीचीच असतात. ते सतत कोणावर तरी अवलंबून असतात. मिंधे व्हायला तयार असतात. ते लाचार असतात. असहाय असतात. उपेक्षित असतात.
आपली समाजरचना अनेक प्रकारच्या विषमतांच्या उतरंडींनी बनलेली आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक आदी विषमतांमुळे आपला समाज पोखरून निघालेला आहे. आपली राज्यघटना कितीही जात, पंथ, धर्म, आर्थिक परिस्थिती, लिंगभेद, शिक्षण यांच्या निरपेक्षतेची हमी देत असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाहीए.
विषमतांच्या उतरंडीमध्ये ‘कॉमन मॅन’ कोणाला म्हणायचं, हा एक प्रश्नच आहे. या देशाला ‘इंडिया’ म्हणणारा एक वर्ग आहे. तो स्वत:ला ‘उच्चभ्रू’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. दुसरा वर्ग आहे देशाला ‘भारत’ म्हणणाऱ्यांचा. तो स्वत:ला ‘सामान्य भारतीय’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. या दोन्हीही वर्गात सापेक्षतेने ‘कॉमन मॅन’ आढळतात.
‘कॉमन मॅन’मधला कॉमन मॅन आहे- सनान. नाव कसं सणसणीत वाटतं! पण प्रत्यक्षात ते आहे ‘सदाशिव नारायण नवगिरे’ या नावाचं लघुरूप. तो सतत अस्वस्थ असतो. पुण्यातल्या सदाशिव- नारायण पेठेतल्या वाडय़ात दहा बाय दहाच्या खोलीत त्याचं बालपण गेलेलं. त्यावेळचा काळ आणि परिस्थितीची त्याला आता आठवण होतेय. ती होतेय बदललेल्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थितीमुळे. बोलीभाषा, लिखित भाषा किती बदललीय. भाषा आणि साहित्यव्यवहार पूर्वीचा राहिला नाही. नाटक-सिनेमा, जाहिरातविश्व, टीव्ही, मोबाइल, दुचाकी, चौचाकी वाहनं, नवे सुखसोयींनी परिपूर्ण फ्लॅट्स- यांतील दांभिकता त्याला अस्वस्थ करून सोडते. भारतीय समाज कसा ‘नास्टी, ब्रुटिश, शॉर्ट, सॉलिटरी आणि पुअर’ बनला आहे असं त्याला वाटतं. तर ‘इंडियन सोसायटी’ म्हणताच तोच समाज कसा आधुनिक झाल्यासारखा वाटू लागतो! सनानच्या मग हेही लक्षात येतं की, इंडियन सोसायटीकडून ‘भारतीय समाजा’चं शोषण होत आहे. आश्चर्य म्हणजे येनकेनप्रकारेण सत्ता, संपत्ती, शिक्षण, लौकिक आणि प्रसिद्धी मिळवणारी कालची सामान्य माणसं आता खाली पाहायलादेखील तयार नाहीत. सत्ता, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सारं काही सहज मिळवता येतं अशी त्यांची खात्री आहे.
या कादंबरीत लेखकाने सदाशिव नारायण नवगिरे ऊर्फ सनानसारख्या कॉमन मॅनला पडणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. सनान नायक आहे. पुणे शहरातील सदाशिव-नारायण पेठांतील वाडासंस्कृती, दारिद्रय़रेषेखालील चाळीस टक्क्य़ांची जुग्गी- झोपडी संस्कृती, दादागिरी, दहशतवाद, निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरांवर असलेल्या माणसांचे राग, लोभ, मद, मत्सरादि षड्गुण या कादंबरीत प्रकर्षांने आले आहेत.
सनान हा संवेदनशील, चिंतनशील, कनिष्ठ मध्यमवर्गीय भावनाशील माणूस. पुणेरी समाज, समुदाय आणि वर्ग यांच्या एकेकाळच्या नात्यातलं  त्याला जाणवणारं सौहार्दपूर्ण वातावरण कसं नष्ट झालं आहे, हे या कादंबरीत दिसतं. स्वातंत्र्य, प्रजासत्ताक, लोकशाही, विकास, पुरोगामी कार्यक्रम यांतून घडलं काय आणि बिघडलं काय, हे त्यात मार्मिकपणे सांगितलेलं आहे. सनानला दैनंदिनी लिहिण्याची आवड आहे. रोजच्या रोज ‘तेच ते आणि तेच ते’ अनुभवून त्याला डायरी लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग तो प्रसंग लिहिण्यापेक्षा प्रसंगांना भिडणेच पसंत करतो. कादंबरीतील प्रत्येक पात्राकडे तो त्याच दृष्टीने पाहतो. त्याची वाडासंस्कृतीतील बालमैत्रीण सुमी, शेजारच्या मोडककाकू, आत्माराम, भालेराव, दगडू चांभार, खोटा भिकारी, सुपरवायझर देशपांडे, भाषणबाज माऊली, तांबे, बादशहा, धर्मा, महंमद असे सगळेचजण प्रसंग आणि घटना यांच्या ताण्याबाण्यांत चपखल बसलेले दिसतात.
विचार करकरून सनानचं डोकं भणाणतं आणि शेवटी तो अशा निष्कर्षांला पोहोचतो की, माणसं प्राणी आणि पक्षी यांच्याप्रमाणे मुक्त असावीत. भल्याबुऱ्या प्रसंगांना आणि अनुभवांना त्यांनी सामोरं जावं. शेवटी ‘बळी तो कान पिळी’ हे निसर्गतत्त्वच खरं!
बबन मिंडे यांचा ‘कॉमन मॅन’ हा आशेवर जगणारा आहे. काहीही झालं तरी तो आशा सोडत नाही. पुन: पुन्हा मिंधे व्हावे लागले तरी त्याला त्याची हरकत नाही. वेळप्रसंगी त्याची संघर्ष करण्याची तयारी आहे. तो राग गिळतो. पण अतीच झालं तर तो कसाही व्यक्त करतो. क्रांतीचा भडका उडवून देण्याच्या कल्पना करत राहतो. पण त्याची परिवर्तनाची आशा आणि भाषा काही सुटत नाही!
या कादंबरीच्या टाइम-प्लेस-अ‍ॅक्शनचं गणित लेखकाला छान जमलं आहे. पुणे शहरातील गर्दीत हरवलेल्या, फुटपाथ आणि ऐन रस्त्यात भेटलेल्या असंख्य अस्वस्थ जिवांच्या एकजीव जगण्यातून ते उलगडलं गेलं आहे.
‘कॉमन मॅन’- बबन मिंडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे –  १८६, मूल्य – १९० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा