भारतीय चित्रपट इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या प्रभात फिल्म कंपनी’चे एक संस्थापक, स्वयंशिक्षित तंत्रज्ञ-व्यवस्थापक आणि प्रभातचे कुटुंबप्रमुख’ अशी ज्यांची ओळख होती अशा विष्णुपंत दामले यांचे हे चरित्र. ते स्वागतार्ह आहेच, परंतु त्यांचा कार्यकाल समाप्त झाल्यावर जवळ जवळ सत्तर वर्षांनी ते मराठीत आले याबद्दल खेदही व्यक्त करायला हवा. दामलेमामा’ हा एका व्यक्तीचा चरित्रपट आहे. तरीही दामलेमामांची आणि प्रभातची खासीयत असलेल्या व्यवस्थापन तंत्राची झलक या पुस्तकात दिसते. मनुष्यबळ, संसाधने आणि चित्रनिर्मिती यांच्या नतिक आचारविचारांवर आधारित, यंत्रयुगाला साजेसे व्यवस्थापन करताना या व्यवसायात कसबी माणसे’ काम करतात याची दखल घेणे, काळाच्या पुढे असलेले आणि शेवटी बदलत्या काळापुढे हतप्रभ झालेले व्यवस्थापन तंत्र या सर्वाबद्दलचे एक नवे पुस्तक या पुस्तकात लपलेलेही दिसते.
प्रभातमध्ये वेगवेगळ्या खात्यात, कमी अधिक र्वष काम करणाऱ्या अनेकांनी तसेच व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर या संस्थापकांनी आपापल्या आत्मकथनात वैयक्तिक दृष्टिकोनांतून प्रभातमधल्या अनुभवाबद्दल लिहिलेले आहे . व्ही.दामले-एस.फत्तेलाल’ हा बापू वाटवे यांनी लिहिलेला मोनोग्राफही आहे, परंतु तो इंग्रजीत आहे. विष्णुपंत दामल्यांचे योगदान स्वतंत्रपणे आणि मराठीतून यायला हवे होतेच, कारण ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नोंदवण्यासारखे आहे. संत तुकाराम’ आणि संत ज्ञानेश्वर’ या प्रसिद्ध चित्रपटांच्या दामले-फत्तेलाल या दिग्दर्शकद्वयीतले एक एवढीच ओळख पुरेशी नाही. ते चित्रपट-यंत्रतंत्र विकसित करणारे तंत्रज्ञ, वास्तुरचनाकार, चित्रकार तंत्र अवगत असूनही चित्रपटांच्या साधेपणाची ताकद ओळखणारे दिग्दर्शक, शिस्तशीर, सत्शील व्यावसायिक होते. कंपनीतले पाचांपकी एक मालक’ असले तरी ते सर्वाचे दामलेमामा’ होते. व्यवसायाचे कायदे, नियम आणि रीत सांभाळून माणसांना सांभाळणारे कुटुंबवत्सल एच. आर. मॅनेजरही होते. ही ओळख या पुस्तकातून होते.
याव्यतिरिक्त त्यांच्या स्त्रियांप्रती असलेल्या समंजस दृष्टिकोनाची ओळख तर फारच महत्त्वाची. प्रभातच्या चित्रपटासाठी काम करताना स्त्री कलाकारांना सुरक्षित, कौटुंबिक आपुलकीचं वातावरण मिळत असे. त्यामुळे एरवी सिनेसृष्टीविषयी जी भीती वाटत असे तशी इथे वाटत नसे हे अनेकांनी नोंदवले आहे. याचे बरेचसे श्रेय दामलेमामांना, त्यांच्या पत्नी आक्कांना आणि त्यांचे स्वागतशील घर कंपनीच्या समोरच असण्याला जाते.
दामलेमामांचा वैयक्तिक-कौटुंबिक जीवनपट आणि चित्रपटीय कारकीर्द यांची सरमिसळ सातत्याने येत गेल्याने कथनातली सलगता खंडित होते. कदाचित हे अपरिहार्यही असेल. कारण हातातोंडाशी गाठ असताना ज्यांनी मदत केली त्यांचे ऋण फेडणे, त्या काळातही वेगळे ठरलेले एस. फत्तेलाल यांच्या बरोबरचे मित्रत्वाचे नाते निभावणे, रक्ताच्या आणि विस्तारित कुटुंबातल्या नात्यांची आणि अर्थार्जनाची जबाबदारी निभावणे, आवडलेल्या आणि निवडलेल्या कलाव्यवहाराचा पाया घालून तो विस्तारणे हे सगळे दामल्यांच्या जीवनात एकात एक गुंतलेलेच होते. पेंटरबंधूंसारख्या दिग्गजांबरोबर गुरुकुल पद्धतीने पडेल ते काम करत, पोटाला चिमटा घेऊन शिकत असताना आणि त्या परिघातून बाहेर पडल्यावरही परिचयातल्या, नात्यातल्या अनेक गरजूंना त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे, कौशल्याप्रमाणे उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणारे उद्योजक दामलेमामाही इथे भेटतात.
कलाव्यवहार आणि कुटुंबव्यवहार यांचा तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात थकून हताश होत गेलेला हा माणूस’ या चरित्रपटात लेखिकेनं शब्दांकित केला आहे. त्यामुळे चरित्रनायकाच्या अनेक कौशल्यांबरोबर, कर्तबगारीबरोबर त्यांच्या स्वभावातले नकारात्मक कंगोरेही दिसतात. आलेल्या अपयशांची कारणमीमांसा करताना त्यांच्या निर्णयांचे, कृतींचे, माणसे हाताळण्याच्या पद्धतीचे संक्षिप्त का होईना वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेले आढळते. उपसंहारात उल्लेखलेला या पुस्तकाचा हेतू पाहता हे महत्त्वाचे ठरते. तो उल्लेख असा- या (प्रभातच्या)उज्ज्वल परंपरेचे स्मरण आणि पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न ते (दामले कुटुंबीय) सातत्याने करीत आहेत. प्रस्तुत पुस्तक हा त्याचाच एक अंश आहे.असा हा प्रयत्न असेल तर उपलब्ध माहितीचे संकलन आणि कालसुसंगत पद्धतीने त्याची नोंद-मांडणी शक्य होईल तेवढय़ा अचूकतेने करणे महत्त्वाचे ठरते. ते या पुस्तकात कमी पडते. लेखिकेने त्यामागची अडचण प्रस्तावनेत मांडली आहे. १९१७ पर्यंतच्या व्यक्तींची नावं, गावं, घटना, घटनाक्रम याबाबत खूपच संदिग्धता आहे. दामले-फत्तेलाल या अभिन्नजीव मित्रांनी एकत्रितपणे केलेल्या कामापकी कोणता भाग कोणी केला हे ठरवणं अवघड (काही वेळा अशक्यही)वाटतं.हे लक्षात घेऊनही काही त्रुटी सांगाव्या लागतील. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट एकमध्ये जीवनपट दिलेला आहे. तो फारच तोकडा आहे. विशेषत: दामलेमामांचा कार्यकाल दोन महायुद्धांचा समकाल असल्याने काही घटना, व्यवसाय-व्यवहार, अडचणींवरचे तोडगे महत्त्वाचे ठरले असते. जिथे शक्य आहे तिथे त्यांचे कार्य स्वतंत्रपणे आणि जिथे शक्य नाही तिथे दामले-फत्तेलाल असे उल्लेख करून नोंदवता आले असते. अशी फिल्मोग्राफी-कालसूची-जीवनपट लिहिण्याची पद्धत आता रुळलेली आहे. (उदा. माधुरी पुरंदरे यांचे पिकासो.’) त्यासाठीची माहिती मिळवणे, संकलित करणे हे परिश्रमपूर्वक केलेले पुस्तकात दिसते आहेच. कथासंकल्पना, संहिता लेखन, ध्वनी लेखन-संयोजन, सेट डिझाइन, कॉश्च्यूम डिझाइन, फोटोग्राफी, काही प्रमाणात एडिटिंग अशा सर्व विभागांत दामल्यांचं कार्य आहे. त्याची कार्य-कालसूची संदर्भ म्हणून उपयुक्त ठरली असती. असेच संदर्भसूचीबाबतही म्हणता येईल. पुस्तकाच्या प्रकाशकाचे नाव, प्रकाशनाचे साल हे संदर्भसूचीत अपेक्षित आहे. नियतकालिकांच्या छायाप्रती संदर्भ म्हणून वापरल्याचा उल्लेख आहे. त्यांचीही पुस्तकांप्रमाणेच केलेली सूची अभ्यासकांना उपयुक्त ठरली असती. त्याने संदर्भमूल्य वाढले असते.
विविध स्रोतांकडून तोंडी, लेखी माहिती जमवल्यामुळे असेल पण बरीच पुनरुक्ती आढळते. काही भाषिक आणि आशयाच्या त्रुटीही आढळतात. संपादकीय संस्कार आणि प्रूफ रीिडग अधिक काळजीपूर्वक व्हायला हवे होते असे जाणवते. त्यासाठी काही उदाहरणे-१९११ या सालात डेक्कन सिनेमा’मुळे दामल्यांचा चित्रपटांशी संबंध आला. भागीदारीचा रीतसर करार करून (शंकरराव) वाशीकर आणि (आनंदराव) पेंटर या दोघांनी एकत्र येऊन कोल्हापुरात डेक्कन सिनेमा’ नावाचे चित्रपटगृह सुरू करण्याचे नक्की केले.असा उल्लेख आहे. या उद्योगात मदत करण्यासाठी विष्णुपंत दामले यांना कोल्हापुरात बोलावून घेतले गेले. मुंबईत नाटय़सृष्टीत चित्रकार म्हणून बस्तान बसलेले असताना गुरुनिष्ठेपोटी ते गेले. त्यानंतरचा उल्लेख असा १९१५ साली डेक्कन सिनेमाचा विजापुरात मुक्काम असताना आनंदरावांनी त्या उद्योगातला आपला सहभाग काढून घेतला.यातून हे थिएटर होते का फिरता सिनेमा हे स्पष्ट होत नाही.
अहा प्रभात विराजे’ या प्रकरणाच्या सुरुवातीचे वाक्य आहे – अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट काढणाऱ्या प्रभातकारांना पहिला रंगीत बोलपट काढण्याचा मोह व्हावा हे अगदी साहजिकच होतं. या आधीच्या प्रकरणात जगातला पहिला बोलपट जाझ सिंगर आणि भारतातला पहिला बोलपट आलमआरा यांचा आणि अयोध्येचा राजा चित्रपटाचा िहदी अवतार १९३२ जानेवारीला आणि मराठी फेब्रुवारीत प्रदíशत झाला असे उल्लेख आहेत. या पाश्र्वभूमीवर हे वाक्य खटकते. १९४४ सालात प्रभात परिवारातल्या बाबूराव प यांचा चोरी चोरी’ प्रदíशत झाला त्याच साली प्रभातच्या पडत्या काळातला, मोठय़ा अडचणीतून पूर्ण झालेला रामशास्त्री’ प्रदíशत झाला. दोन्ही चित्रपटांनी १२ लाखांच्या आसपास कमाई केली. या संबंधीचा दामले-प यांचा संवाद येतो तेथे दामल्यांची चित्रपट निर्मितीकडे सकस आशय आणि करमणूक या संदर्भात बघण्याची भूमिका कळते. ते स्पष्टपणे चोरीचोरी’ला घाणेरडा चित्रपट म्हणतात हा उल्लेख आहे. त्यापुढे लेखिकेचे वाक्य येते- आज काळाच्या ओघात चोरी चोरी’ शोधूनही सापडत नाही. पण रामशास्त्री’ लँडमार्क ठरला गेला. ही वाक्यरचना आणि अतिशयोक्ती टाळता आली असती. त्या काळातले भारतीय चित्रपट आशयापेक्षा गाण्यांनी लक्षात राहण्याचं प्रमाण अधिक होतं, त्यामुळे चोरीचोरी’ला काळाच्या ओघात न सापडणारा चित्रपट’ म्हणता येत नाही. अशाच तऱ्हेने तुकाराम चित्रपटासंबंधात एक वाक्य येते-तुका पूर्वी आकाशाएवढा झाला होता आणि त्याच्यावरचा चित्रपट अक्षरश: जगभराएवढा फैलावणारा झाला.हेही भाषिक आणि आशयाच्या दृष्टीने अप्रस्तुत ठरते. प्रभातच्या क्लासिक्स’ ठरलेल्या चित्रपटांबद्दल लिहिताना अशा अतिशयोक्तीची गरज नव्हती. प्रभातचे चित्रपट कितीही उत्तुंग व सामाजिक संदर्भ मांडणारे असले तरी दामले-फत्तेलाल यांनी दिग्दíशत केलेले सर्व चित्रपट आणि एकुणात प्रभातच्या चित्रपटांत चमत्कार दाखविणाऱ्या पौराणिक चित्रपटांची संख्या खूप होती हे नाकारता येत नाही. त्यामुळे पुस्तकाच्या सुरुवातीला केशवसुतांच्या तुतारीशी प्रभातचे साधम्र्य दाखवण्यासाठीचे स्पष्टीकरण तितकेसे चपखल म्हणता येणार नाही. (मराठी कवितेला पौराणिकातून वास्तवाकडे आणण्याचे सामाजिक अन्याय, विषमता, दंभ, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करण्याचे अभूतपूर्व काम केशवसुतांच्या कवितेने केले..साधारणपणे याच प्रकारचे काम मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रभात फिल्म कंपनीने केले..’’)
सध्याची चित्रपटसृष्टी पब्लिसिटी आणि मार्केटिंग’ या आधारे उभी दिसते. तशी ती तेव्हा होती का या संबंधीही बरीच उद्बोधक माहिती या पुस्तकात येते. आमच्या वेळी असे नव्हते’ असे मॉरल’ स्मरणरंजन करणाऱ्यांनी ती जरूर वाचावी. अमृतमंथन’ चित्रपटाबरोबर मेकिंग ऑफ अमृतमंथन’ हा लघुपट दाखवणे किंवा बाबूराव प यांनी केलेला जाहिरातींचा धडाकाही आजच्या जाहिरात तंत्राशी साम्य दाखवतो.
१९०९ ते १९४५ हा दामलेमामांचा कार्यकाळ. म्हणजेच दोन महायुद्धांचा काळ. कुठलाही व्यवसाय विशेषत: यंत्राधिष्टित-कलात्मक चित्रपट व्यवसाय सचोटीने करणे कठीण होते. म्हणून प्रभात आणि दामलेमामांची कार्यसंस्कृती जाणणे महत्त्वाचे. आजच्या भारतीय चित्रसृष्टीतला व्यवहार करोडोंचा आहे, सिनेस्टारांचे मानधन आणि महत्त्व अवास्तव वाढलेले आहे, अधुनिक तंत्र सहज उपलब्ध होते आहे, त्याच्या आहारी जाऊन आशयाचे-कथनाचे महत्त्व हरवते आहे अशा आजच्या परिस्थितीत मराठी चित्रसृष्टीतल्या नव्या दमाच्या चित्रपटकर्त्यांसाठी दामलेमामांचा हा कष्टमय चरित्रपट महत्त्वाचा ठरावा.
दामलेमामा : चरित्रपट आणि चित्रपट’ – मंगला गोडबोले, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २३०, मूल्य – २०० रुपये.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…