प्रमोद मुनघाटे

शेती हे केंद्र मानले तर त्या परिघावर ग्रामीण भागात ज्या समस्या आढळतात, त्यापैकी एक म्हणजे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक-प्राध्यापक म्हणून वर्षांनुवर्षे उमेदवारी करणारे उच्चशिक्षित तरुणांचे तांडे. ‘दयन’ या कादंबरीत युवराज पवार यांनी हीच समस्या फार ताकदीने मांडली आहे. खेडय़ापाडय़ांत शिक्षणाचा अतोनात विस्तार झाला. विनाअनुदान तत्त्वावरील संस्था फोफावल्या. त्यातून शिक्षण घेतलेल्या ग्रामीण तरुणांना शेतीच्या पलीकडे दुसरे कौशल्य नाही. एसएससी होऊनही कामधंदा उपलब्ध नाही म्हणून शेतकरी आईबाप अर्धपोटी राहून पोराला तालुक्याला शिकायला पाठवतात. पोराला पुढची स्वप्ने दिसू लागतात. डीएड-बीएड होऊनही नोकरी त्याच्यापासून फार लांब असते. सरकारची धोरणे बदलत जातात. पात्रता परीक्षेचे निकष बदलत जातात. दहा हात विहीर खोदली तरी पाणी लागले नाही. झालेले कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून शेतकरी आणखी खोदू लागतो. पोरालाही बापाच्या कष्टावर आणखी पुढची स्वप्ने दिसू लागतात. प्राध्यापक होऊन शेतीच्या दुर्दशेतून कुटुंबाला बाहेर काढू या आशेने तो नेट-सेट-पीएचडी करीत राहतो, पण तरीही त्याला नोकरी मिळत नाही.

readers reaction on different lokrang articles
लोकमानस : मध्यमवर्ग हवा, पण शेतकरी नको?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
akola reports 5 suspected cases of guillain barre syndrome
सावधान! ‘जीबीएस’ची अकोल्यात धडक, पाच रुग्ण आढळले; एक रुग्ण व्हेंटिलेटरवर
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?

‘दयन’ या कादंबरीत खेडय़ातील एका महाविद्यालयात ‘सीएचबी’वर प्राध्यापकी करणाऱ्या गणेश जाधव या बंजारा तांडय़ातील उच्चशिक्षित मजुराची कहाणी आहे. त्याला वर्ष वर्ष पगार मिळत नाही. लग्न झालेले आहे आणि दोन मुले आहेत. नाव प्राध्यापकाचे, पण सगळे जगणे भिकाऱ्याचे अशी त्याची अवस्था आहे. घरातील बायको-मुलांच्या गरजा पुरवता पुरवता त्याच्या नाकीनऊ येते. कॉलेजच्या स्टाफरूममध्येही त्याच्या वाटय़ाला तुच्छताच येते. सीनियर प्राध्यापक त्याच्याकडून आपली कामे करवून घेतात. नेटसेट, पीएचडी असूनही कधी या कॉलेजमध्ये तर कधी त्या कॉलेजमध्ये अशी त्याची वणवण सुरू असते. घरी बायकोची बोलणी खावी लागतात. तिचाही नाइलाज असतो. बायको-मुलांच्या किमान मागण्यासुद्धा तो पूर्ण करू शकत नाही. लाखभर पगार असलेले प्राध्यापक सहकारी त्याला दोन रुपयेसुद्धा हातउसने देत नाहीत. मुलाच्या हट्टापायी एकदा तो कॉलेजच्या वर्गातील मुलीची स्केलपट्टी चोरतो आणि पकडला जातो. गरिबी, उपासमार आणि प्रचंड मानहानीमुळे घरी न जाता तो एसटी स्टॅण्डवर झोपतो. बायको-मुलांचे पोट भरावे म्हणून तो ढकलगाडी भाडय़ाने घेऊन शेजारच्या खेडय़ापाडय़ांत कांदे-बटाटे विकण्याचा धंदा करतो. एका बाजूला नेटसेट, पीएचडी झालेला प्राध्यापक आणि दुसरीकडे कांदे-बटाटे विकणारा किरकोळ माणूस अशा विसंगत स्थितीत त्याला कुटुंब आणि त्याचे कॉलेज दोन्हीकडून विरोध होतो. प्राचार्य त्याला प्राध्यापक असून कांदे-बटाटे विकतो म्हणून कॉलेजमधून काढून टाकतात. तो आपल्या आईबापाला आणि गावालाही तोंड दाखवू शकत नाही. विमनस्क अवस्थेत त्याला वेड लागायची पाळी येते. तो बायकोला आणायला सासुरवाडीला जातो. पण अंजू- त्याची बायको परत यायला तयार नसते. सासू त्याचे दरिद्री जगणे आणि बायकोपोरांचे दशावतार पाहून त्याचा पाणउतारा करते. वादावादी होते. भांडण होते. सासरा आणि मेव्हणे त्याला मरेस्तोवर लाथांनी तुडवतात. तो अर्धमेला होतो. कसा तरी जीव वाचवून आपली सुटका करून घेतो.

कादंबरीचा शेवट फार विदारक आहे. बाप मरायला टेकला आहे असे कळल्याने गणेश जाधव गावाला जातो. घरी खायला-प्यायला काहीच शिल्लक नसते. आई तांडय़ातील एका पीठगिरणीत सांडलेले पीठ गोळा करीत असते. त्याचा मामा बापाची काळजी घेत असतो. दूरच्या नात्यातील एका सीएचबी प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची बातमी कानावर येते. पगारी नोकरी मिळण्याची आशा पूर्ण मावळलेली, विस्कटलेला संसार, बायको-मुले सोडून गेलेली, अन्नान्न दशा झालेले आईबाप अशा वास्तवाच्या आगीत होरपळलेला गणेश एका रात्री घरून निघून जातो. अचानक परत येतो तेव्हा व्यवस्थेचा खून करण्याची भाषा बोलू लागतो. त्याच वेडय़ा मन:स्थितीत शेजारच्या माणसाच्या खांद्यावरील कुऱ्हाड घेऊन तो पळू लागतो. लोक त्याच्या मागे धावतात.

स्थानिक बोलीतील भाषिक आविष्कार, हे या कादंबरीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ‘दयन’मधील पात्रांचे मनोगत व संवाद जळगाव परिसरातील स्थानिक बोलीत आहेत. त्यामुळे कादंबरीतील व्यक्तिरेखा अल्प अवकाशातदेखील प्रभावी उतरल्या आहेत. कादंबरीकाराचे निवेदन, नायक गणेश जाधवचे कथन आणि त्याची बायको अंजूचे स्वगत, या तिन्ही गोष्टी बेमालूमपणे एकमेकांत मिसळलेल्या आहेत, हेही या कादंबरीचे मोठे वैशिष्टय़ आहे. गणेशची मुले रडतात, रुसतात, हट्ट करतात, आनंदी होतात किंवा कधी कधी बापाची गरिबी ओळखून समजूतदारपणे वागतात तेव्हा जी भाषा वापरतात, ती खास त्यांची आहे. त्या भाषेला स्थळकाळाचे संदर्भ आहेत तसे पराकोटीच्या आर्थिक दूरवस्थेत सापडलेल्या नायकाच्या कुटुंबाचे सामाजिक संदर्भही आहेत. प्रसंगाचे निवेदन आणि संवाद यांच्या तळाशी नायकाच्या अगतिकतेचे अस्तर सतत कायम राहते. अनुभवाची तीव्रता आणि भाषिक जाणीव यांचा प्रत्यय असा एकजिनसी होतो, हे या कादंबरीचे यश आहे. 

घरच्या दारिद्य्राला पिळून घेतलेले उच्च शिक्षण, सीएचबीची वेठबिगारी, त्यातून आलेले भणंग आयुष्य आणि नैराश्य हे कादंबरीचे मूळ केंद्र राखून कादंबरीकाराने अवतीभोवतीचे जग आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. विवक्षित परिस्थिती आणि व्यक्तिसंबद्ध भावना असल्या तरी त्यातून महाराष्ट्रातील समकालीन ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांच्या जीवनाचे आरसपानी दर्शन त्यातून घडते.

अर्थकारणाने मानवी स्वभाव, जीवनशैली आणि त्यामागील मूल्यव्यवस्था कशी बदलते ते दिसून येते. ग्रामीण भागातील महाविद्यालये, तेथील संस्थाचालकांचे अर्थकारण, कायमस्वरूपी प्राध्यापक आणि सीएचबी प्राध्यापकांतील विषमता, प्राध्यापकांच्या रिकाम्या जागा भरण्याचे सरकारचे बदलते धोरण, त्यासाठी वेळोवेळी निघणारे जीआर, प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, या सगळय़ाकडे व्याकूळतेने पाहणारे आणि विकल्या जाणाऱ्या जागांचा सौदा उघडय़ा डोळय़ाने पाहणारे उमेदवार हे सगळे या कादंबरीत सविस्तर आलेले आहे. एका अर्थाने कादंबरी ही भविष्यातील दस्तावेज असते, या दृष्टीने ते महत्त्वाचेही ठरते.

 गणेशच्याच पिढीतील शिक्षित मुलींची काय अवस्था आहे, त्याचेही दर्शन या कादंबरीत घडते. या तरुणांचे भावजीवन अपेक्षाभंगाच्या वणव्यात जळून खाक झालेले दिसते. गणेश हा बंजारा तांडय़ातील युवक आहे. तांडय़ाचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक वास्तव आणि मागासलेपणाचे वास्तव हाही या कादंबरीतील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे ‘दयन’ कादंबरीचे केंद्र शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि शोषण यापुरते मर्यादित राहत नाही, तर कृषिसंस्कृतीच्या सामाजिक-आर्थिक विस्थापनाची नोंदही महत्त्वाची ठरते. नवभांडवलशाहीमध्ये विकासाच्या संकल्पनेत कृषिसंस्कृतीतून ज्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही, त्यांना काहीच स्थान नाही. खेडय़ापाडय़ांतील उच्चशिक्षित बेरोजगार  तरुण, त्यांचे शेतकरी-शेतमजूर आईबाप आणि  दरिद्री-व्यसनी नवऱ्यांसोबत संसार ढकलणाऱ्या ग्रामीण तरुणी या सगळय़ांची कहाणी या कादंबरीत येते. या विषमतावादी व्यवस्थेच्या परिवर्तनाची कोणतीही दिशा आणि आशा नजीकच्या भविष्यात दिसत नाही, याची जाणीव झाल्याने कादंबरीचा नायक गणेश अखेरीस हातात कुऱ्हाड घेतो. पण त्याचा शत्रू त्याला दिसत नाही, ही खरी अडचण आहे. ही अडचण नोंदवून ही कादंबरी थांबते.

‘दयन’ – युवराज मेघराज पवार, लोकवाङ्मयगृह प्रकाशन, पाने-११८, किंमत- ३००  रुपये.

pramodmunghate304@gmail.com

Story img Loader