श्रद्धा कुंभोजकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोवीस ऑगस्टच्या भल्या पहाटे, झोपाळलेला देशराज आपल्या आई आणि मोठ्या भावांसोबत पोलिसांच्या मागे मागे भारताकडे चालू लागला. आपल्या गायी-म्हशी, पोती-पिशव्या आणि भांडीकुंडी घेऊन निघालेला पन्नास हजार जणांचा एक विशाल कबिला! चार दिवस सतत चालून सगळे एकदाचे फजिल्का नावाच्या शहरात पोचले. तिथून ट्रेननं दिल्ली. स्टेशनजवळ घरदार गमावलेल्यांची तात्पुरती सोय केलेली होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिथं दोन मुठी भात आणि एक पळी डाळ खायला मिळे. पण देशराज आणि त्याचे नातेवाईक होते पंजाबकडचे. त्यांना गव्हाची रोटी खायची सवय होती. त्यांना रोज रोज भात कसा रुचेल? आठ-दहा दिवस असेच काढल्यानंतर देशराजच्या घरच्यांनी ऐकलं की झांसीला गेलं तर हा प्रश्न मिटेल. तिथं म्हणे सरकार त्यांच्यासारख्याच पाकिस्तानहून आलेल्या लोकांना सकाळ-संध्याकाळ रोटी खाऊ घालतंय.

तुम्हाला वाटेल, सर्वत्र फाळणीचा कोलाहल माजलेला असताना ही मंडळी रोटीच्या शोधात वणवण का हिंडत बसली? पण माणूस म्हटलं की असंच असतं. आपल्या ओळखीचं जग अचानक कोलमडलं, दिवसाची चाकोरी पार बदलून गेली की आपली रोजची पिठलं-भाकरी, एखादं जुनं खेळणं, रोज घरी घालतो ते कपडे किंवा घरासमोर असलेल्या कडुनिंबाचा आपल्याला आधार वाटतो.’ ‘इतिहासाची धुळाक्षरे’ या पुस्तक मालिकेतला हा व्याकूळ करणारा प्रसंग.

भारत हा देश म्हणून घडण्याची प्रक्रिया एका दिवशी अचानक घडली नाही. ती एका दिवशी सुरू होऊन पुढे आजतागायत सुरूच आहे. हे ऐतिहासिक वास्तव किशोरवयीन मुलांना समजेल अशा पद्धतीनं आणि इतिहास लेखनाचे नियम पाळून सांगण्याचं आव्हान ‘इतिहासाची धुळाक्षरे’ या पुस्तक मालिकेनं सहज पेललं आहे. शाळकरी मुलांना देशाच्या इतिहासातल्या पायाभूत घडामोडींची ओळख करून देणारी एकूण नऊपैकी ही तीन छोटीशी पुस्तकं मूळ बंगालीमधून आजच्या मराठीत आणलीय ख्यातनाम इतिहासकार प्राची देशपांडे यांनी. देशाची फाळणी, देशाच्या भाषा आणि देशाचे लोक या तीन सूत्रांभोवती ती गुंफलेली आहेत.

देशाची फाळणी रॅडक्लिफ साहेबानं नकाशावर फिरवलेल्या सुऱ्यामुळे सुरू झाली, पण पुढे अनेक वर्षं लाखो माणसांच्या जगण्यात उलथापालथ झाली. हे तथ्य कोरड्या आकडेवारीनिशी न सांगता अन्वेषा सेनगुप्ता यांनी पहिल्या पुस्तकातून काही माणसांच्या जगण्याच्या नोंदी वाचकांसमोर ठेवल्या आहेत. देशराजच्या कुटुंबाला बरीच वणवण करून शेवटी परत दिल्लीत आल्यावर गव्हाची रोटी मिळते. करीम नासिर हा आसाममधला शेतकरी मुस्लीम असल्यामुळे पाकिस्तानी ठरवला जातो. अधूनमधून सीमेवर येऊन आपल्या भातशेतीचं दर्शन घेण्यावरच त्याला समाधान मानावं लागतं. अशी परवड नशिबी आल्याची उदाहरणं कठोरपणे आखलेल्या सीमेच्या दोन्ही बाजूंना दिसतात. पण दुसऱ्या एका अदृश्य सीमेचं बंधन काहीसं सैलावल्याची जाणीवही लेखिका करून देते. बीथी नावाच्या बंगाली शाळकरी मुलीला गावाकडची पारंपरिक हवेली सोडून कोलकात्यातल्या खुराड्यात रहावं लागलं. अर्धपोटी राहून शिक्षण घेऊन शिक्षिकेची नोकरी करून तिनं कुटुंबाला सावरलं. अशाच अनेक स्त्रियांसाठी फाळणीमुळे आपलं जगणं नव्यानं खंबीरपणे घडवण्याची मोकळीक निर्माण झाली हेही या पुस्तकातून उमगतं.

तिस्ता दास यांनी लिहिलेलं दुसरं पुस्तक भारतातल्या लोकांभोवती मांडलेलं आहे. फाळणीपूर्वी लोक हवं तिथे जाऊ शकत. फाळणीनंतर ही मुभा संपली. सीमारेषेच्या दोनही बाजूचे लोक अचानक एकमेकांसाठी परदेशी झाले. पण सीमाभागात राहणाऱ्या लोकांना आपल्या नातेवाईकांना भेटायला, बाजारहाट करायला पलीकडे जावंच लागत होतं. दोनही देशांनी हे जाणं-येणं बेकायदेशीर ठरवलं. सीमेपलीकडच्या लोकांना संशयानं पाहायला सुरुवात झाली. याशिवाय स्वातंत्र्य मिळाल्यावर पलीकडच्या देशात गेलेल्या अनेक लोकांचा काही काळानं विचार बदलला. ते परत इकडे आले. असं येणं आता बेकायदेशीर होतं. त्यामुळे ते घुसखोर ठरले. फाळणीनंतर ताबडतोब भारतात आलेल्या निर्वासितांची किमान पोटापाण्याची सोय सरकार करत होतं, पण घुसखोरांना तर कसलेच अधिकार नव्हते. सीमारेषा आखल्यामुळे माणसांचे अधिकार अचानक हिरावले जातात. जसं की आसाममधल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गंगाधर यांच्याकडे नागरिक असल्याचे काहीच कागद नव्हते, त्यामुळे ते परदेशी ठरले. चार वर्षं आसामातल्या बंदी-शिबिरात राहिल्यावर घरच्यांनी शोधल्यामुळे त्यांना घरी परतता आलं. अशा अनेक उदाहरणांवरून लक्षात येतं की देशाचे नागरिक म्हणजे कोण हे ठरवण्याच्या बदलत जाणाऱ्या गाळण्यांमुळे देशाच्या सर्व नागरिकांना नेहमी समान अधिकारांसहित मुक्तपणे जगणं जमतंच असं नाही.

तिसऱ्या पुस्तकात भारतामधल्या लोकांनी त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असल्याने वेगवेगळी राज्यं निर्माण करण्यासाठी संघर्ष केला त्याची कहाणी देबारती बागची यांनी मांडली आहे. भाषेच्या आधारे सीमा कशा आखल्या जातात? ‘माणसांमध्ये आपोआप तयार झालेल्या, नाहीतर घडवलेल्या अशा असंख्या दऱ्या आणि सीमांच्या मागे लांबलचक इतिहास असतो.’ हे या पुस्तकात बंगाल आणि आसामच्या उदाहरणांवरून स्पष्ट होतं. वंगभंगाच्या चळवळीत सुरुवातीला सगळ्याच बंगाली बोलणाऱ्यांनी पुढाकार घेतला. पण लवकरच पूर्वेकडच्या बंगाली माणसांना ढाका ही राजधानी झाली तर होणारे फायदे लक्षात आले. ‘इतके दिवस सगळ्या सुखसोयींचा फायदा कलकत्त्याजवळचे हिंदू बंगाली जास्त घेत आहेत. आता आम्हालाही थोडा फायदा मिळू दे!’ असं वाटू लागलं. शिवाय कलकत्त्याकडच्या बंगालीभाषेचा वरचढपणाही इतरांना डाचत होता. ती भाषा बोलू शकणाऱ्यांनाच नोकऱ्यांचे फायदे मिळत. अशा धार्मिक, भाषिक, आर्थिक कारणांची उकल करून सत्तेची उलाढाल चालू राहते आणि भाषांमधल्या संघर्षाचा इतिहासही नवनवीन वळणं घेत राहतो ही गोष्ट या पुस्तकातून समोर येते.

भारतीय इतिहासातली काही अप्रिय आणि अस्वस्थ करणारी वळणं वाचकांना समजावून सांगणारी ही पुस्तक मालिका इतिहास म्हणजे काय आणि त्यातून घटनांना विविध अंगांनी कसं समजून घेता येतं याचीही साधार ओळख करून देते. रणजित आणि सिराजउद्दौला चित्रकार या पटचित्रकलेत पारंगत कलाकारांची चित्रं आशयाला अधिक गहिरं करतात. प्राची देशपांडे यांनी मराठीत आशय उतरवताना आणलेली नजाकत पाहता बाकीची पुस्तकंही लवकरच मराठीत यावीत अशी अपेक्षा ठेवायला हवी. फक्त सकारात्मक आणि गौरवशाली गोष्टी इतिहासात न मांडता, अप्रिय गोष्टींचीही उकल करणं, त्यामागचे तपशील मांडणं आणि तोही वारसा आपला आहे हे मान्य करणंही इतिहासाच्या चिकित्सक आकलनासाठी आवश्यक असतं.

‘इतिहासाची धुळाक्षरे’: देशाची फाळणी- अन्वेषा सेनगुप्ता, देशाच्या भाषा- देबारती बागची, देशाचे लोक- तिस्ता दास, अनुवाद- प्राची देशपांडे, पाने अनुक्रमे-४८, ४८, ५१, मनोविकास प्रकाशन, तीन पुस्तकांचा संच- किंमत- प्रत्येकी- १३० रुपये.

shraddhakumbhojkar@gmail.com