सुचिता खल्लाळ हे आजच्या काळातल्या महत्त्वाच्या कवयित्रींपैकी एक नाव. ‘डिळी’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. सामाजिक भान जपणाऱ्या सुचिता खल्लाळ यांनी अतिशय प्रगल्भतेने ग्रामीण व निमशहरी भागातले वास्तव आपल्या कादंबरीत रेखाटून, सध्याच्या काळात लोकांच्या जगण्याचे आयाम कसे बदलत चालले आहेत हे स्पष्टपणे मांडले आहे.

डिळी म्हणजे खांब किंवा मेढ. घर कोणत्याही प्रकारचे असो त्याला भक्कमपणा येतो तो त्याला आधार देणाऱ्या डिळीमुळे. जोपर्यंत डिळी मजबूत, तोपर्यंत घर मजबूत. एकदा का डिळी कोसळली की ते घरही कोसळते. बदललेल्या मूल्यव्यवस्थेच्या काळात ढासळत असणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला तोलून धरणारं जर कुणी असेल तर ती गावखेड्यातली स्त्री आहे. ती ग्रामीण स्त्रीच खरी डिळी आहे. कितीही संकटं आली तरी त्यांवर मात करून ती स्त्री आपला संसार सावरते. हेचं वास्तव सुचिता खल्लाळ यांनी या कादंबरीतून निदर्शनास आणले आहे.

‘डिळी’ ही कादंबरी बहुकेंद्री असली तरी तिची मांडणी स्थूलमानाने ग्रामीण व निमशहरी अशा दोन स्तरांत केलेली दिसते. या दोन्ही स्तरांमधलं जगणं, आर्थिक प्रश्न, सामाजिक राजकारण, नात्यातली घुसमट सगळं वेगळं असलं तरी त्यांचं नातं एकमेकांशी जोडलेलं आहे. खेड्यात शिकून लहानाचे मोठे झालेले गणेश, प्रमोद हे मित्र शहरात सुखासीन आयुष्य जगताना दिसले तरी त्यांचे स्वत:चे संघर्ष सुरू आहेत. हे संघर्ष प्राथमिक गरजेच्या पुढचे आहेत.

गणेश उच्च शिक्षण घेऊन एका श्रीमंत माणसाचा घरजावई झाला आहे. सोन्याच्या पिंजऱ्यातलं आयुष्य त्याच्या वाट्याला आल्याने खोट्या प्रतिष्ठेच्या ओझ्याखाली तो आपला गाव, नाती यांच्यापासून दुरावला आहे. स्वत:च्या मुलांच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्याच्याकडे नाही. प्रमोद गणेशपेक्षा हुशार असल्याने मेहनतीने शासकीय अधिकारी झाला आहे. आपल्या पदावर प्रामाणिकपणे काम करताना त्याची घुसमट होते आहे. त्याच्या बायकोची करियरसाठी छोट्या शहरात होणारी घुसमट, बदललेल्या गरजांमुळे वाढणारी आर्थिक चणचण, कार्यालयात असणारे ताणतणाव यांमुळे प्रमोद प्रशासकीय नोकरी व करिअरिस्टिक बायको यांच्या काचणीत अडकून स्वत:शीच लढताना कादंबरीत दिसतोे.

हेही वाचा >>> बौद्धिक चर्चेच्या पलीकडे

गणेश व प्रमोदचा बालपणीचा मित्र मकरंद अमेरिकेत स्थायिक झालेला असतो. पण आपला संसार स्थिरस्थावर झाल्यावर काहीतरी वेगळं करावं, समाजसेवा करावी असं त्याला वाटायला लागतं. या इच्छेमुळेच तो सेवानिवृत्तीनंतर आपल्या पत्नीसह अमेरिकेतून खेड्यातल्या तरुणांना मदत करण्याच्या उद्देशाने गावात येतो. गावातल्या तरुणांना शेतीबरोबर जोड व्यवसाय शिकवावा, त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित बसवावी म्हणून मकरंद व त्याची बायको गावकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यांच्या प्रयत्नाने गावातले तरुण सुधारले, स्वयंपूर्ण झाले तर आपल्याला सत्तेचं राजकारण खेळता येणार नाही याची जाणीव गावातले पुढारी बेशकराव देशमुख व बाळासाहेब यांना होते. त्यांना गावातल्या तरुणांना सुधारायचं नाही, त्यांना शेतकऱ्यांचं दारिद्र्य दूर करायचं नाही, तर गरीब, गरजू तरुणांचा फक्त स्वत:च्या फायद्यासाठी, आपली सत्त्ता टिकवण्यासाठी, मतं मिळविण्यासाठी वापर करायचा आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक आपल्याला मदत न करणाऱ्या लोकांना त्रास देतात, गावाला मदत करणाऱ्या मकरंदचा अपघात करून गावाला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात.

गावखेड्यांत चालणारं असलं राजकारण, गरीबांना फसवणारं समाजकारण, कमावत्या तरुणांना ऐदी जीवन जगण्याच्या व पुढाऱ्यांची चमचेगिरी करण्याच्या लागलेल्या सवयी, शासकीय योजनांचे होणारे घोटाळे या सगळ्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पोखरत आहे. अशा ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा प्रयत्न ग्रामीण स्त्री कशा पद्धतीने करते हे कादंबरीतील गोदूच्या संघर्षातून आपल्याला जाणवतं. आपल्या मुलांना जगवण्यासाठी, आजारी सासूचा औषधोपचार करण्यासाठी गोदू नवरा असूनही एकटीने कष्टकरून संसाराचा गाडा हाकत राहते. आपल्या घरचं, शेतातलं काम करून ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन पडेल ते काम करत कष्टमय जीवन जगत राहते. खूप कष्ट करूनही आपल्या संसाराची घसरलेली आर्थिक परिस्थिती सावरणं तिला जेव्हा कठीण वाटायला लागतं, तेव्हा मागचा पुढचा विचार न करता ती आपलं गर्भाशय काढून टाकून ऊसतोडणीच्या कामाला जाण्याचा निर्णय घेते. हे वास्तव आपल्या अंगावर येतं. आपला संसार वाचविण्यासाठी, आपलं घर टिकविण्यासाठी स्वत:ची स्त्री म्हणून असणारी ओळखच ती मिटवते. संकटांपुढे न झुकता, हार न मानता, त्यांना सडेतोड उत्तर देणारी गोदू, खऱ्या अर्थाने घरासाठी डिळी झाली आहे. तिच्या जगण्याचा संघर्ष वाचकाला जागं करतो.

हेही वाचा >>> कामगारांच्या व्यथेची मांडणी

कादंबरीत आलेल्या इतर स्त्रिया म्हणजे परिस्थितीने पिचलेली अमीनाबी, चिरेबंदी वाड्यात सुख पदरी न पडलेली बेशकरावची तरुण पत्नी चंदा, खोट्या प्रतिष्ठेपायी घरच्यांना आपल्या तालावर नाचवणारी शोभा, करियरसाठी आपला संसार मोडून जाणारी सोनाली, सेवा निवृत्तीनंतर नवऱ्यासोबत गावात समाजसेवा करणारी गौरी अशा प्रत्येकीचं वेगळेपण सुचिता खल्लाळ यांनी दाखवून दिल्यामुळे या स्त्रियाचं जगणंही वाचकांच्या लक्षात राहतं.

कादंबरीतल्या घटना या गाव आणि निमशहरी अशा दोन्ही स्तरांत घडत असल्यामुळे तिथलं वातावरण, भाषा, आशा-आकांक्षा, जगण्याचे संघर्ष लेखिकेने अगदी समर्थपणे मांडले आहेत. कादंबरीला दिलेले ‘डिळी’ हे शीर्षक आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले मुखपृष्ठही तितकेच समर्पक आहे.

‘डिळी’, – सुचिता खल्लाळ, शब्दालय प्रकाशन, पाने- १६०, किंमत- २९० रुपये.      

mukatkar@gmail.com