रेणू दांडेकर
काही माणसं खूप मोठी असतात, पण त्यांचं मोठेपण कशाकशात असतं हे बऱ्याचदा नेमकं माहीत नसतं. एका उच्चपदावर ही माणसं काम करत असतात; पण ते पदही नेहमीचं नसतं. तिथल्या कामाचं स्वरूप, तिथल्या अडचणी, या माणसांनी त्या पदावर आल्यावर केलेले बदल, कामाला मिळालेली उंची हे आपल्याला समजत नाही. कारण त्यांचं क्षेत्रच वेगळं असतं. सामान्य माणसं या माणसांच्या नावाने भारावून गेलेली असतात. त्या भारावलेपणात श्रद्धा असतेच. अशा वेळी अशी मोठी, नामवंत माणसं समजण्यासाठी त्यांचे चरित्र, आत्मचरित्र खूप मदत करते, नव्हे आपल्या मनातल्या श्रद्धेला अधिक बळकटी येते, डोळसपणा येतो. असेच एक चरित्र म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे. डॉ. सागर देशपांडे यांनी लिहिलेले नि नुकतेच प्रकाशित झालेले चरित्र ‘दुर्दम्य आशावादी’. हे चरित्र माझ्यासारख्या माणसाला डॉक्टर माशेलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवते. सामान्यत: प्रसिद्ध, समाजाला माहिती असलेल्या क्षेत्रातल्या व्यक्तीचे चरित्र आपण वाचतो ते त्याच्या व्यक्तिगत जीवनात डोकावून पाहायची आपली इच्छा असते. खेळ, सिनेमा, छोटा पडदा, राजकारणी, लेखक, कलावंत यांच्या चरित्रापेक्षा हे चरित्र वेगळे आहे. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला विज्ञानाचे क्षेत्र आणि त्यातील संशोधन, त्यातील काम आणि कामाचे बारकावे इ.विषयी फारसे ज्ञान नसते. त्यामुळे डॉ. माशेलकर म्हणजे हळदीचे पेटंट हे फक्त माहीत होते; पण या चरित्रामुळे त्याचा इतिहास, पेटंट म्हणजे काय अशा अनेक गोष्टी मी समजून घेतल्या.
हे चरित्र डॉ. माशेलकर यांच्या व्यक्तिगत आयुष्यातून पटकन बाहेर पडते आणि डॉ. माशेलकरांच्या संघर्षांसंबंधी, त्यांच्या योगदानासंबंधी, त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान यांविषयी आपल्याला अनमोल माहिती देते. डॉ. माशेलकर यांच्यात दुर्दम्य आशावाद आणि जगणं यशस्वी करण्यासाठीची धडपड किती लहानपणापासून होती आणि ती तरुण वयात कायम राहिली (कॅरम खेळाची घटना) हे लक्षात येते. स्वप्नं बघणारा हा मनुष्य देशापरदेशात, गावाघरात कुठेही असला तरी आशावादी होता, सकारात्मक विचार करत होता. म्हणूनच की काय या चरित्रात कुठे फारशा कटू घटना येत नाहीत. त्या ओलांडून चरित्रकार आशावादाचेच वर्णन अधिक करतो. याचं कारण चरित्रनायकात आहे. आपल्या सकारात्मक विचारांचा संसर्ग संपर्कात येणाऱ्या सर्वाना व्हावा असे डॉ. माशेलकरांना वाटते.
विज्ञानविषयक संस्थांमध्ये, तेही परदेशात नवे विभाग उभारताना एखाद्या विषयाची माहिती नसताना डॉ. माशेलकर यांनी त्या विभागासाठी, विषयासाठी खूप तयारी कशी केली, तो विभाग वेगळय़ा पद्धतीने कसा उभा राहिला हे अनेक घटनांतून वाचायला मिळते. अनपेक्षित असे नवीन मार्ग ते शोधत राहिले, भरपूर पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले. परदेशात असताना केवळ काम न करता गुणवत्ता कशी धारण करतात, स्पर्धेत कसे पुढे असतात याचा अभ्यास त्यांनी केला. त्याचा संपूर्ण उपयोग डॉ. माशेलकरांनी आपल्या कामात केला. डॉ. माशेलकर यांना भारतातील अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, कलावंत, गायक अशा अनेक श्रेष्ठ व्यक्तींबरोबर काम करण्याची, विविध स्वरूपांतील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळाली. देशपरदेशातले पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, वैज्ञानिक यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या सगळय़ा प्रसंगांचे वर्णन चरित्रलेखकाने सविस्तर, विविध संदर्भ आणि माहिती देऊन केलेलं आहे. डॉ. माशेलकर ही विज्ञान क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, तेवढय़ाच दिग्गज व्यक्तींच्या सहवासात त्यांचं आयुष्य घडले. अनेक वैज्ञानिक संदर्भ विज्ञान शाखेच्या वाचकाला नीटसे कळतात असं गृहीत धरलं तरी विज्ञानशाखेच्या वाचक नसलेल्यालाही या चरित्रलेखनामुळे ते समजतील इतक्या सोप्या भाषेत ते मांडायचा प्रयत्न लेखकाने केला आहे. मुळात हे सगळेच विश्व वेगळे आहे हे मान्य करू या. भोपाळ वायू घटनेचे एवढे सविस्तर वर्णन इथे येते. त्यामुळे वाचकही अंतर्मुख होतो. यात डॉ. माशेलकरांचे काम आणि भूमिका कदाचित इथे वर्णन केल्याने आपल्याला भोपाळ वायुगळतीची अधिक वैज्ञानिक माहिती मिळाली असे वाटते.
डॉ. माशेलकर हे समाजनिष्ठ वैज्ञानिक आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांचे विचार उद्धृत केले आहेत त्यावरून हे प्रकर्षांने लक्षात येते. एन. सी. एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) हा पुण्यातील एक बस स्टॉप म्हणून अनेकांना माहीत असतो; पण त्याची नवउभारणी ही येथील चरित्रातील आशयामुळे कळते. ‘I’ in India must stand for innovation, not for imitation यांसारख्या उद्गारांतून एका बाजूला वैज्ञानिक विचार सामाजिक भूमिकेतून आणि राष्ट्रउभारणीच्या दिशेने मांडणारा लेखक म्हणून परिचय होतो. विज्ञान संस्था उभी करताना संघटना, संवाद, नातेबंध कसे सादर करावे लागतात, हे डॉ. माशेलकर या व्यक्तीमुळे स्पष्ट होते.
‘दुर्दम्य आशावादी रघुनाथ माशेलकर’ – ‘डॉ. सागर देशपांडे, सह्याद्री प्रकाशन, पुणे, पाने- ६२४ (रंगीत पाने ४८), किंमत- ९९९ रुपये.