-प्रणव सखदेव
‘रँडम रोझेस’ या कादंबरीत्रयीतली ‘खून पाहावा करून’ ही इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर यांची पहिली कादंबरी. त्याआधी त्यांचा ‘५९ ६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहानेही मराठीमध्ये वेगळ्या वाटा धुंडाळायचा प्रयत्न केला आणि वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. ही कादंबरीही या वेगळ्या वाटेवरून जाणारी आहे याची प्रचीती शीर्षकातून, कादंबरीच्या घाटातून आणि त्यातल्या आशयातून येते.
शीर्षकावरून कादंबरीचं कथानक काय असेल, याची आपल्याला साधारणत: कल्पना येते. पण ही कादंबरी केवळ खून कसा करायचा, या प्रक्रियेबद्दलची नाही. (मुळात खून करण्याची प्रक्रिया कादंबरीतून सांगणं ही कल्पनाच मराठी कादंबरीत नवी असावी.) कादंबरीच्या सुरुवातीस निवेदकाला आणि मुख्य कथापात्राला- समीर चौधरीला आपल्या मैत्रिणीचा खून करायचा आहे, आणि त्यासाठी तो काय काय तयारी करावी लागेल याची चाचपणी करतो आहे, आराखडे बांधतो आहे, याची कल्पना वाचकाला येते. पण रहस्यकथेमध्ये जसं रहस्य उलगडण्याला महत्त्व दिलं जातं, तसं या कादंबरीच्या केंद्रस्थानी खुनाची घटना राहात नाही. तर हा खून का करायचा आहे, याबद्दलचा निवेदकाचा दृष्टिकोन, त्यामागे त्याने निर्माण केलेलं किंवा रचलेलं तत्त्वज्ञान आणि त्यातून समोर येणारी मुख्य पात्राची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, त्याच्या मनातल्या सूक्ष्म, तसंच ढोबळ हालचाली, कंपनं या सगळ्या बाबी लेखक एकेक करत आपल्यासमोर ठेवतो.
गोष्ट किंवा कथा कोण सांगतं आहे, म्हणजेच ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ याला कथा-कादंबरीत फार महत्त्व असतं. कारण त्यावरून कादंबरीचा आशय, पोत, रचना, कादंबरीचा आस अशा बहुतांश बाबी ठरतात. या कादंबरीत गोष्ट सांगणारा निवेदक बायसेक्शुअल आहे, तो तथाकथित ‘नॉर्मल’ समाजात विचित्र व विक्षिप्त वाटावा असा आहे. तो काहीसा वेगळा विचार करणारा आहे, पण तरी समाजात उठून दिसणारा नाही. त्याच्यात गुण आहेत तसेच दोषही आहे, किंबहुना दोषच जास्त आहेत. तो बहुतांश मराठी कादंबऱ्यांमध्ये निवेदक अथवा नायक जसा परिपूर्ण, त्यामुळे ‘एकांगी’ दर्शवला जातो, तसा नाही. त्यामुळे तो वाचकांना अनेक करड्या छटा दाखवतो. नको वाटणाऱ्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेतो. त्यामुळे त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘नॉर्मल’ लोकांना तऱ्हेवाईक वाटावा असा आहे. आणि म्हणूनच तर खून करून पाहण्याचा घाट घालून बसलेला आहे.
आणखी वाचा-डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
आणि हा खून त्याने कसा, का आणि कशासाठी केला, हे सांगण्यासाठी तो आत्मकथन लिहितो आहे. हे आत्मकथन म्हणजे ही कादंबरी. यातून लेखकाने आत्मकथन आणि कादंबरी या दोन साहित्य प्रकारांची केलेली मोडतोड आणि सरमिसळ रोचक आहे आणि ती वाचकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देते, कोड्यात टाकते आणि ते सुटल्यावर आनंदही देते. आत्मकथन असल्याने ही कादंबरी एका पातळीवर खरी वाटते आणि त्याच वेळी कादंबरी असल्याने दुसऱ्या पातळीवर खोटी, रचलेली वाटते. या दोन समांतर जाणाऱ्या पातळ्या गुंतागुंतीचं कथन निर्माण करतात. उदाहणार्थ, कादंबरीची सुरुवात अशी आहे- ‘हाय. मी समीर चौधरी. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? अर्थात ते तर सगळ्यांनाच आवडतं म्हणा. गॉसिपिंगचा उगम त्यातूनच तर झालाय. तर मग ऐका. मी तुम्हाला मानसी देसाईच्या खुनाची गोष्ट सांगणार आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन तुमच्या हातात येईल तोवर मी गायब झालेलो असेन…’ कादंबरीची भाषाही अलंकारिक, प्रासादिक नाही. ती रोजची, नेहमी बोलल्यासारखी आणि नेमकी आहे.
कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पॉप्युलर साहित्य, सिनेमे यांचा असलेला प्रभाव आणि ठसे. मराठीत बरेचदा ‘अमुकतमुकचा प्रभाव आहे’ असं म्हटल्यावर भुवया उंचावल्या जातात. पण ज्याअर्थी आपण कोणत्यातरी भाषेत लिहितो, त्याअर्थी आपल्यावर त्या भाषेतल्या उगमापासून लिहिणाऱ्या साहित्यकारांचे प्रभाव पडत असतातच. ते स्वाभाविक, नैसर्गिक असतं. भाषा हीच प्रभावांमधून घडली-बिघडलेली असते. त्यामुळे जो लिहितो, त्याच्यावर त्या भाषेतल्या लेखकांचा प्रभाव असतोच असतो. पण लेखक या प्रभावांतून काय घडवतो, हे जास्त महत्त्वाचं असतं. तो ते प्रभाव जसेच्या तसे पुढे नेऊन अनुनय करतो की, त्यांची मोडतोड करून वेगळं काही रचू पाहतो, हे पाहणं रोचक ठरतं. इमॅन्युअल यांनी या कादंबरीत हे प्रभाव चांगले पचवून, त्यांना आत्मसात करून त्यांचा वापर आपल्या रचनेत केला आहे. आणि त्यांच्यावरचे हे प्रभाव केवळ मराठी, किंवा भारतीय नाहीत, तर ते जगभरातले आहेत. त्याअर्थी ते ‘ग्लोबल’ मराठी लेखक आहेत.
आणखी वाचा-शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
जागतिकीकरणोत्तर काळात मराठी साहित्यात वेगळ्या ठराव्यात अशा साहित्यकृती निर्माण झाल्या. प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ‘मंत्रचळ ऊर्फ वास्तुशांती’ (दामोदर प्रभू), ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ (गणेश मतकरी), ‘चाळेगत’ (प्रवीण बांदेकर), ‘विश्वामित्र सिंड्रोम’ (पंकज भोसले), ‘गॉगल लावलेला घोडा’ (निखिलेश चित्रे), भरकटेश्वर (हृषीकेश पाळंदे), ‘मनसमझावन’ (संग्राम गायकवाड), ‘कानविंदे हरवले’ (हृषीकेश गुप्ते), ‘निळावंती स्टोरी ऑफ अ बुकहंटर’ (नितीन भरत वाघ) यांसारख्या साहित्यकृतींची नावं घेता येतील. ज्यांची मेटाफिक्शन, नैकरेषीयतेचा वापर, कादंबरीच्या लवचीकतेच्या शक्यता तपासणं, कल्पिताचा वापर, ठरीव, साचेबंद साहित्य प्रकारांचा सीमारेषा धूसर करण्याचा प्रयत्न यांसारखी काही मुख्य वैशिष्ट्यं सांगता येतील. या प्रवाहात ‘खून पाहावा करून’ ही कादंबरी वेगळी आणि लक्षणीय ठरते. तिची चर्चा होणं आणि ती जास्तीत जास्त वाचली जाणं, मराठी साहित्य वाहतं राहण्यासाठी आवश्यक आहे.
‘खून पाहावा करून’ – इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर, सांगाती प्रकाशन, पुणे, पाने- १४०, किंमत- २२० रुपये.