मंगल कातकर
ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी मोठे असणारे राज्य म्हणजे आसाम. १९७०चे दशक सरता सरता या राज्यात घुसखोरी, आंदोलनं, हिंसाचार, जातीय-वांशिक तेढ आणि त्यातून निर्माण झालेले संघर्ष सगळय़ा जगाने पाहिले आहेत. त्या संघर्षांची दाहकता आजही स्थानिकांना जाणवते आहे. प्रादेशिक अस्मितेसाठी घुसखोरांना हाकलण्यासाठी झालेल्या आंदोलनात असामी, बोडो, बंगाली अशा अनेक आसाममधल्या जनजातींना भरडून काढलं. गावंच्या गावं जाळून बेचिराख केली गेली. माणसांच्या कत्तली झाल्या. हजारोंच्या संसाराची राखरांगोळी झाली. जे जगले-वाचले त्यांचे जीवनही अतिशय खडतर, दु:खद बनले. मात्र यात जास्त सोसावं लागलं ते बायकांना. भयंकर आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आलं. ते जगताना त्या बायकांना कोणकोणत्या संकटांना कसं सामोरं जावं लागलं हे दाहक वास्तव मांडणारी कादंबरी म्हणजे ‘फेलानी’.
प्रसिद्ध आसामी लेखिका अरूपा पतंगिया कलिता यांच्या ‘The Story of Felanee’ या इंग्रजी पुस्तकाचा मेघना ढोके यांनी ‘फेलानी’ नावाने मराठी अनुवाद केला आहे. ही कादंबरी आसाममधल्या सत्य घटनांवर आधारित आहे. त्यामुळे यात चित्रित झालेला संघर्ष, दंगली, राजकारण, निर्माण झालेला आक्रोश, सामान्यांची वाताहत हा सगळा त्या काळातल्या आसामचा इतिहास आहे. हे क्रूर उघडंनागडं सत्य वाचकांपर्यंत पोहचते ते फेलानीच्या गोष्टीतून. फेलानी शब्दाचा अर्थ आहे ‘फेकून दिलेली’. जन्माला आल्यानंतर दंगलीत फेकून दिलेल्या लहान मुलीला आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सांभाळणाऱ्यांनी ‘फेलानी’ नाव दिले. फेकलेल्या आयुष्यावर जगणारी ही फेलानी मोठी झाल्यावर आयुष्य जिथे जिथे तिला फेकत गेलं, तिथे तिथे वास्तवाची दाहकता अनुभवत कशी जगली याचं मनाला चटका लावणारी थरार कथा म्हणजे ‘ फेलानी’ कादंबरी.
कादंबरीची सुरुवात फेलानीची आजी रत्नमाला हिच्या कहाणीने होते. तिला आलेलं अकाली वैधव्य, किनाराम माहुताबरोबर तिचं पळून जाणं, एका मुलीला जन्म देऊन तिचा झालेला मृत्यू, त्या मुलीला म्हणजे ज्युतीमालाला कुणीतरी सांभाळणं, तिच्याबरोबर खितीश घोष नावाच्या तरुणानं लग्न करणं या सगळय़ा घटना कादंबरीत घडत राहतात. त्यानंतर जातीय दंगली सुरू होतात. त्यात खितीश घोष मारला जातो. ज्युतीमालेला झालेल्या तान्ह्या मुलीला तळय़ात फेकून हल्लेखोर तिच्या घराला आग लावतात. त्या आगीत ज्युतीमाला संपते, पण तिच्या फेकून दिलेल्या मुलीला रतन नावाचा एक भला माणूस वाचवतो, ती मुलगी म्हणजे फेलानी. आजी, आईच्या कथेनंतर सुरू होते फेलानीची कहाणी.
एखाद्या सामान्य स्त्रीसारखंच फेलानीचं आयुष्य पुढे जात असतं. कोच जमातीचा नवरा लंबोदर, लहान मुलगा मोनी आणि दुसऱ्यांदा गर्भार असणारी फेलानी असं सुखी कुटुंब असताना जातीय आंदोलन, दंगली भडकतात. लंबोदर दंगलीत गायब होतो. लहान मोनीला घेऊन गरोदर असणाऱ्या फेलानीची झालेली फरफट, जगण्यासाठी करावा लागणारा भयानक संघर्ष वाचकाला धडकी भरवतो. दंगलग्रतांसाठी असणाऱ्या कॅम्पमधलं भयानक वास्तव वाचकांना अस्वस्थ करतं. या कॅम्पमधून बाहेर पडून निर्माण झालेल्या निर्वासितांच्या छावण्या, त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कादंबरीत फेलानीच्या कहाणीसोबत काली बुरा, जॉनची आई, मिनौती, जग्गू व त्याची बायको, बुलेन व सुमला, नबीन अशा अनेकांच्या उपकथानकांतून उलगडत जातो. वारंवार होणारी आंदोलनं, जातीय दंगली, पुकारले जाणारे बंद, लागणारे कर्फ्यू यांचा परिणाम लोकांच्या वस्तीवर किती भयानक होत असतो हे कादंबरी वाचताना ठायी ठायी जाणवत राहतं. या भयान वातावरणात स्त्रीला आपलं अस्तित्व टिकवून राहायचं असेल तर मिरचीसारखं तिखटं जगावं लागतं, असं सांगणारी कादंबरीतली काली बुरा एकटय़ा स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याची जणू दिशा दाखवते आहे असं वाटतं.
या कादंबरीचं कथानक जरी आसामच्या मातीत घडत असलं तरी ते माणसाच्या जगण्याच्या संघर्षांचं कथानक असल्याने ते आपल्या अंत:करणात खळबळ माजवतं. कादंबरी जरी अनुवादित असली तरी ती आपल्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेली आहे. कादंबरीतले हादरवून टाकणारे वास्तव डोळय़ांसमोर उभी करणारी, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रवाही भाषा पुस्तकात आहे. ती वाचताना वाचकाचा कुठेही रसभंग होत नाही हे लेखिका मेघना ढोके यांचं लेखन कौशल्य आहे.
फेलानी कादंबरी फेलानीच्या आयुष्यातल्या चढ-उतारांची कहाणी आहे. त्यामुळे वाचक तिच्या नजरेने वाचत राहतो व कादंबरी अनुभवत राहतो. हेच विचार डोळय़ासमोर ठेवून सरदार जाधव यांनी मुखपृष्ठ तयार केले असावे. दंगलीच्या दाहक पार्श्वभूमीवर काटेरी कुंपणाच्या आत निर्माण झालेल्या परिस्थितीला धीराने तोंड देत मुखपृष्ठावर चितारलेली स्त्री कादंबरीतल्या कथानकाचं प्रतिबिंब दर्शविते आहे.
परिस्थिती कशीही असो, मरण येत नाही तोपर्यंत माणूस जगत राहतो. आयुष्याची लक्तरं झाली तरी शिवत राहतो. आशेचे पंख लावून नव्याने रुजण्याचा प्रयत्न करतो. हे जीवनातलं सत्य सांगत कादंबरीचा केलेला शेवट आशावादी आहे.
थोडक्यात काय, तर जीवांच्या वेदना सांगणाऱ्या या कादंबरीत जगण्याची उमेद कायम ठेवणारं जगणं, माणुसकी आपल्याला दिसत राहते आणि माणूस जगत राहतो. जातीय आंदोलनं, संघर्ष, समाजा-समाजामधली तेढ शेवटी राजकारणाचा एक भाग होते आणि सामान्यांच्या नशिबी वाताहतच येते. हे दाहक वास्तव दाखविणारी ‘फेलानी’ ही कादंबरी अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचायला हवी.
‘फेलानी’- मूळ लेखिका- अरूपा पतंगिया कलिता, अनुवाद- मेघना ढोके, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने- २९१, किंमत- ४५० रुपये.
mukatkar@gmail.com