मुकुंद टाकसाळे
डॉ. अंजली जोशी या ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ (‘आरईबीटी’) या मानसोपचारशास्त्राच्या अभ्यासक. अमेरिकेतील डॉ. अल्बर्ट एलीस या मानसोपचारतज्ज्ञानं प्रथम ही उपचारपद्धती शोधली. तीत प्रयोग केले. तीवर अनेक पुस्तके लिहिली. ही पद्धत प्रथम भारतात आणली ती कि. मो. फडके यांनी. त्यांचा त्या काळात डॉ. अल्बर्ट एलीस यांच्याशी ‘आरईबीटी’ची सैद्धांतिक चर्चा करणारा बराच पत्रव्यवहार होता. (हा चाळीसहून अधिक वर्षांचा, १३५१ पृष्ठांचा, ४ खंडातील पत्रव्यवहार सध्या कोलंबिया विद्यापीठाच्या अर्काइव्हजमध्ये अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे.) त्या दोघा विद्वानांच्या या विषयातील अनेक मुद्दय़ांवर चर्चा चालायच्या. या विषयातील कि. मो. फडके यांची रुची, अभ्यास लक्षात घेऊन डॉ. अल्बर्ट एलीस यांनी फडकेसरांना स्वत:चे अनेक ग्रंथ पाठवून दिले. फडकेसरांची ‘आरईबीटी’तील कामगिरी इतकी मोलाची होती की ‘अल्बर्ट एलीस इन्स्टिटय़ूट’नं संस्थेचे अनेक नियम बाजूला सारून त्यांचा सन्माननीय अपवाद म्हणून विचार केला आणि त्यांना ‘फेलो’ आणि ‘सुपरव्हायझर’ हे दोन सन्मान बहाल केले. त्यासाठी त्यांच्या वतीने स्वत: अल्बर्ट एलीस यांनी त्यांची बाजू मांडली. त्या दोघांचे नाते पुढे इतके जिव्हाळय़ाचे झाले की कि. मो. फडके यांनी १९८० साली अल्बर्ट एलीस यांना भारतात बोलावले, त्यांची व्याख्याने ठेवली. त्यांचा प्रवासखर्च आणि ताजमध्ये राहण्याचा खर्च स्वत: फडकेसरांनी केला. हे कि. मो. फडके हे ‘गुरू विवेकी भला’ या पुस्तकाच्या लेखिका अंजली जोशी यांचे ‘आरईबीटी’तील गुरू. लेखिकेची यापूर्वी आलेली ‘मी अल्बर्ट एलीस’ ही कादंबरी मराठीत बरीच नावाजली गेली. तिची सतरावी आवृत्ती सध्या बाजारात आहे. या कादंबरीद्वारे एकाच वेळी अंजली जोशी आणि अल्बर्ट एलीस आणि त्यांची ‘आरईबीटी’ यांची ओळख महाराष्ट्राला घडली. या कादंबरीत भेटणारे अल्बर्ट एलीस हे नेटवरून मिळवलेल्या माहितीतून घडलेले नाहीत. अल्बर्ट एलीस हे लेखिकेचे परात्पर गुरू असल्याने त्याचा परिचय, त्यांची उपचारपद्धती हे सारं ज्ञान लेखिकेला थेट अल्बर्ट एलीस यांचे भारतातील शिष्य आणि लेखिकेचे गुरू कि. मो. फडके यांच्या मुखातून त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्यातला पत्रव्यवहार लेखिकेला थेट अभ्यासायला मिळालेला होता. ‘गुरू विवेकी भला’ या अंजली जोशी यांच्या नव्या पुस्तकात कि. मो. फडके यांच्याबरोबरचा गुरू-शिष्या हा नातेप्रवास रेखाटण्यात आला आहे.
फडकेसरांचे ‘आरईबीटी’चे प्रायमरी आणि अॅडव्हान्स्ड कोर्सेस करण्याच्या निमित्ताने लेखिकेचा प्रथम कि. मो. फडके यांच्याशी ‘गुरू’ म्हणून संबंध आला. त्या त्यांच्या पीएचडीच्या अभ्यासात ‘आरईबीटी’चा वापर करणार होत्या. सरांच्या शिकवण्याचा, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्यावर एवढा काही प्रभाव पडला की ‘आरईबीटी’तील सखोल ज्ञान फक्त फडकेसरांकडूनच मिळू शकेल, याची त्यांना खात्री पटली. विद्यापीठीय प्राध्यापकांबद्दल फडकेसरांच्या मनात अढी होती. या प्राध्यापकांना ज्ञानप्राप्तीपेक्षा इतर व्यावहारिक गोष्टींतच जास्त रस असतो, हे त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे जेव्हा लेखिकेनं त्यांना त्यांच्याकडे ‘शिकायला येऊ का’ असं विचारलं तेव्हा त्यांनी ताडताड बोलून त्यांना नकार तर दिलाच, पण ‘आता परत मला फोन करू नका. परत तेच बोलण्यात मला वेळ घालवायचा नाही,’ हेदेखील कठोरपणे सुनावलं. सरांकडून शिकण्याचं लेखिकेचं स्वप्न भंग पावलं होतं. तिच्या डोळय़ांतून अश्रूधारा वाहू लागल्या. सरांनी तिच्या तोंडावर ज्ञानाचाच दरवाजा खाडकन् आपटला असं म्हणायला हरकत नाही. हा अभेद्य खडक अंजली जोशी यांनी कसा फोडला ते आपल्याला पुस्तकात वाचायला मिळते.
लेखिका आणि फडकेसरांच्या भेटीगाठीतून सुरू झाला त्यांचा हा दीर्घकाळचा विशुद्ध ज्ञानाचा प्रवास वाचक या नात्याने आपल्याला अनुभवायला मिळतो. लेखिका दर शनिवारी सरांकडे जाऊ लागली. या शिष्येची ज्ञानाची भूक फडकेसरांना उमगली.
फडकेसरांबरोबर झालेल्या अनेक बौद्धिक चर्चामध्ये अंजली जोशी यांनी आपल्याला सहभागी करून घेतले आहे. फडकेसरांनी सांगितलेली पुस्तकं त्यांनी लगेचच विकत घेतली, भारतात मिळत नाहीत ती परदेशातून मागवली. यांत अल्बर्ट एलीस यांची सारी पुस्तकं तर आहेतच. पण फडकेसरांनी वारंवार जी पुस्तकं सुचवली, ती अंजली जोशी यांनी झपाटल्यासारखी वाचून काढली. उदाहरणार्थ, सर सांगायचे ‘आरईबीटी’ पक्की करायची असेल तर तत्त्वज्ञान वाचलं पाहिजे. तिची नाळ तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. म्हणून लेखिकेने विल डय़ुरांटचं ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ वाचणं सुरू केलं. ती एके ठिकाणी म्हणते, ‘.. सॉक्रेटिस, प्लेटो, स्पिनोझा, कांट, शॉपेनहॉवर, नीत्शे यांची नावं तोपर्यंत ऐकलेली होती, पण त्यांच्या तत्त्वज्ञानात एक अंत:प्रवाह आहे, हे हळूहळू कळत गेलं. अठराव्या शतकातला ‘क्लासिकल रॅशनॅलिझम’ हा तत्त्वज्ञानातला प्रवाह, एलिसना अभिप्रेत असलेल्या ‘मॉडर्न रॅशनॅलिझम’पेक्षा कसा वेगळा आहे, अस्तित्ववादी तत्त्वज्ञानात आणि ‘आरईबीटी’त काय साम्यस्थळं आणि फरक आहेत, हे शोधणं बुद्धीला एक वेगळंच खाद्य होतं. ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाचा साने गुरुजींनी केलेला ओघवता अनुवाद पुढे वाचनात आला तेव्हा या पुस्तकाच्या माधुर्याची लज्जत अजूनच वाढली..’
वरील परिच्छेद उद्धृत करण्याचा हेतू एवढाच की अंजली जोशी यांचं वाचन फडकेसरांमुळे किती वैविद्यपूर्ण आणि प्रगल्भ होत गेलं हे आपल्या लक्षात येतं. या अनुषंगाने अस्तित्ववादी मानसशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन, इंटलेक्चुअल फॅसिझम, काउन्सििलग सायकॉलॉजी, विवाहसंस्था, लैंगिकता, बर्टाड रसेलचे ‘मॅरेज अॅन्ड मॉरल्स’, अश्लीलता, र. धों. कर्वे, एरिक फ्रॉम, जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, अलीकडच्या काळातील दि. य. देशपांडे, में. पु. रेगे, आ. ह. साळुंखे, अशोक चौसाळकर, इहवाद, विवेकवाद, अनुभववाद, विज्ञाननिष्ठा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दि. के. बेडेकर असे किती तरी विषय त्यांच्या चर्चेत (आणि या पुस्तकात) आले. फडकेसरांना विवेकवादी भूमिकेत सातत्य राखणाऱ्या दि. य. देशपांडे, नरेंद्र दाभोलकर या ‘कन्सिस्टंट रॅशनॅलिस्ट’ माणसांबद्दल विशेष प्रेम होते.
या संदर्भात सरांबरोबर होत असणाऱ्या लेखिकेच्या चर्चा आपल्याला अजिबात जड वाटत नाहीत. डोक्यावरून जात नाहीत. याचं कारण आपण हे पुस्तक सर्वसामान्य वाचकासाठी लिहितो आहे, याचं लेखिकेला पुरेपूर भान आहे, सरांकडून शिकण्याचा अनुभव वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘..आपल्याला काहीतरी खोलवर समजतंय आणि आपल्याला ते आवडतंय हा प्रत्यय फार सुखद होता. असा प्रत्यय आला की आनंदाची लाट अंगावर यायची. अशा अनेक लाटा अंगावर घेत बसून राहावंसं वाटे.’ हे पुस्तक वाचताना आपलीही अवस्था काहीशी अशीच होते. सरांशी चर्चा करण्यातून लेखिकेला तिच्या मनातील एका सुप्त भीतीचा शोध लागला. ‘लोक काय म्हणतील’ ही ती भीती! त्या भीतीवर तिने सरांच्या मदतीने कशी मात केली, हे मूळातून वाचण्याजोगे आहे.
मात्र या पुस्तकाचा विषय फक्त या ‘बौद्धिक चर्चा’ हा नाही. विषय आहे लेखिकेला सरांचं हळूहळू उमगत गेलेलं व्यक्तिमत्त्व. फडकेसर अविवाहित होते. एकटे होते. तीव्र बुद्धिमत्ता, अफाट वाचन ही त्यांची वैशिष्टय़े होती. मराठी, इंग्रजी भाषेवर त्यांचं अफाट प्रेम होतं आणि प्रभुत्वही. त्यांचा ‘स्पष्टवक्तेपणा’ ‘फटकळपणा’ हा या साऱ्याचाच कदाचित अविभाज्य भाग असावा. त्यांचा स्वभाव काहीसा निरागस होता. फडकेसरांच्या एका केसमधील माणूस ब्लू फिल्म्स पाहत होता. त्या केसचं विश्लेषण करायचं तर सरांना ब्लू फिल्म्स माहीत करून घेणं आवश्यक वाटलं. ते घराच्या जवळच्या एका व्हिडीओ कॅसेट्स् भाडय़ाने देणाऱ्या दुकानात गेले. दुकानातला मालक लांब उभा होता. त्याला ऐकू जावं म्हणून त्यांनी मोठय़ानं विचारलं, ‘‘अहो, मला ब्लू फिल्म्स भाडय़ाने हव्या आहेत. तुम्ही देता का भाडय़ाने?’’ दुकानदार एकदम चपापला. दुकानातील माणसंही त्यांच्याकडे पाहू लागली. दुकानदार घाईघाईने म्हणाला, ‘छे! छे! असलं काही ठेवत नाही आम्ही इथं!’ पुढे त्या दुकानदाराने त्यांना गुपचूप ‘त्या’ कॅसेट पुरवल्याही. केवळ या केससाठी सरांनी व्हीसीआरही विकत घेतला. (पुढे तो धूळ खात पडून राहिला.) पण ब्लू फिल्म्स पाहिल्यानंतर सर लेखिकेला म्हणाले, ‘‘या अनुभवाने केसला मदत झालीच, पण मला स्वत:च्या लैंगिकतेच्या एका गोष्टीचा पत्ता लागला.’’ ती गोष्टही इन्टरेिस्टग आहे. ती मुळातूनच वाचायला हवी.
‘आरईबीटी’मध्ये व्यक्तीची समस्या जाणून घेताना त्या समस्येमागची खरी समस्या काय आहे हे जाणण्यापासूनच सुरुवात होते. फडकेसरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंजली जोशी यांनी मानसशास्त्रीय अंगाने घेतलेला वेध हा या पुस्तकाचा खरा विषय आहे. अंजली जोशी यांना फडकेसर माणूस म्हणूनही अधिकाधिक उमगू लागतात. त्यांच्या स्वभावातील गंड, गाठी, त्यांच्यातील न्यूनभावना हे सारं त्यांच्या लक्षात येऊ लागतं. त्यांच्या वागण्यात एवढी शिस्त, एवढा सुसंस्कृतपणा का, त्यांनी चांगल्या नोकऱ्या धडाधडा का सोडल्या हे उमगू लागतं. त्यांच्या वरपांगी कठोर व्यक्तिमत्त्वामागे दडलेल्या प्रेमळपणाची अंजली जोशी यांना साक्ष पटू लागते. सरांनी लग्न का केलं नाही, एकटय़ा पुरुषाची लैंगिकता या अनुषंगाने लेखिकेने त्यांना काही थेट प्रश्न विचारले आणि त्यांनीही त्या प्रश्नांची मनमोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे उत्तरं दिली. हा सारा भाग वाचकालाही अंतर्मुख करणारा आहे, वाचक या नात्यानं स्वत:च्या लैंगिकतेकडे मनमोकळेपणाने पाहायला लावणारा आहे.
अंजली जोशी या फडकेसरांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या संपर्कात होत्या. फडकेसरांचं ‘अल्बर्ट एलीस -विचारदर्शन’ हे मराठीतील अपूर्ण पुस्तक त्यांनी पूर्ण केलं. सरांचं REBT Integrated हे इंग्रजी पुस्तकही त्यांनी असंच पूर्ण केलं. भारताखेरीज इतर सात देशांतही हे इंग्रजी पुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशकांकडून प्रसिद्ध झालं आहे आणि रशियन भाषेतही त्याचा अनुवाद होतो आहे. फडकेसरांची ही दोन पुस्तकं पूर्ण करून लेखिकेनं त्यांचं ऋण अल्पांशाने का होईना फेडलं, असं म्हणता येईल. गुरू-शिष्य नात्याचा हा अनोखा, बुद्धिगम्य तरीही भावनात्मक प्रवास इतक्या तरलपणे मराठीमध्ये तरी पहिल्यांदाच आलेला असावा.
‘गुरू विवेकी भला’, अंजली जोशी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने-२९०, किंमत-४५० रुपये.
mukund.taksale@gmail.com