सुरेश भट यांचं नाव साहित्यरसिकाला माहीत नाही असं सहसा होत नाही. त्यांच्या प्रणयोत्फुल्ल गज़्ाला आणि तितकीच प्रणयोत्फुल्ल गाणी मराठी माणसाच्या कानांवरून कधी ना कधी गेलेली असतात. आयुष्यभर आपल्या गज़्ालांप्रति प्रतिभा राबवणाऱ्या या गज़्ालकाराला ७१ वर्षांचे आयुष्य लाभले. वयाच्या १४व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केलेल्या भटांचे या प्रदीर्घ काळात केवळ ‘रूपगंधा’ (१९६१), ‘रंग माझा वेगळा’ (१९७४), ‘एल्गार’ (१९८३), ‘झंझावात’ (१९९४), आणि ‘सप्तरंग’ (२००२) हे पाचच कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या निधनानंतर २००३ साली ‘रसवंतीचा मुजरा’ हा शेवटचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. इतकं कमी लिहूनही भटांच्या कवितांनी मराठी साहित्यात स्वत:ची वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘तहज़्ाीब’ आणि ‘तरक्की’ असलेल्या उर्दू गज़्ालेला त्यांनी खासा मराठी साज देऊन तिला शिखरावर नेऊन ठेवलं. इतकं की तिथपर्यंत त्यांच्या समकालीनांना जाता आलं नाहीच, पण त्यानंतरच्या कुणालाही जमेल असं वाटत नाही.
‘िहडणारा सूर्य’ हे भटांच्या निधनानंतर प्रकाशित झालेलं त्यांचं दुसरं पुस्तक. शीर्षकावरून हे पुस्तक कवितासंग्रह असावं, असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते त्यांचं गद्यलेखन आहे. भटांनी काही काळ विविध वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. एक-दोन साप्ताहिकंही चालवली आणि केवळ पशाखातर सदरलेखनही केलं. प्रस्तुत संग्रहात एकंदर ५० लेख आहेत. त्यात डॉ. अक्षयकुमार काळे, नंदा सुर्वे इत्यादींनी घेतलेल्या त्यांच्या सहा मुलाखती आहेत. त्यांतील शेवटची मुलाखत िहदीत आहे. मुलाखतींच्या या विभागात मध्येच कवी नरेंद्र बोडके यांचा भटांविषयीचा लेखही आहे. त्यामुळे निव्वळ भटांच्या लेखांची संख्या ४२ एवढीच भरते. त्यांतील काही लेख वैयक्तिक स्वरूपाचे, काही व्यक्तिचित्रणात्मक, काही राजकीय-सामाजिक विषयावर टिप्पणी करणारे, तर काही संकीर्ण म्हणावे, असे आहेत. या लेख आणि मुलाखतींमधून भट नावाचं गारुड जाणून घ्यायला मदत होते. भटांच्या आवडीचे, प्रेमाचे आणि द्वेषाचे विषय कोणते होते, याची कल्पना येते. गज़्ाल म्हणजे नेमकं काय, ग़जल कशी नसते इथपासून ते ग़ालिब, मिराज़्ा, उर्दू गज़्ाल इथपर्यंत आणि स्वत:च्या गज़्ालविषयक दृष्टिकोनापासून काव्यलेखनापर्यंत अनेक विषय आले आहेत. ते रोचक आहेत. या लेखसंग्रहामुळे भट नावाचं अजब रसायन आणि अचाट प्रतिभेचा गज़्ालकार समजायला काही प्रमाणात मदत होते.
या संग्रहात राजकारण, खाणं, जातीयवाद, फॅसिस्ट विचारसरणी या विषयांवरही एकेक लेख आहे, तर आशा भोसले यांच्याविषयी तीन लेख आहेत. त्यांपकी एकाचीच निवड वा त्यांचं संपादन करायला हवं होतं.
शिवाय लेखांची विषयानुसार अधिक नेटकेपणाने विभागणी केली असती, तर पुस्तक वाचताना होणारा गोंधळ टाळता आला असता. सुरुवातीचे १२-१३ लेख हे भटांचे आत्मचरित्र म्हणावे, असे आहेत. त्यातही त्यांचा चढा सूर लागलेला आहेच, पण त्यांच्या सांगण्यातला थेटपणा आणि प्रांजळपणा भिडतो. अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या भटांनी बरेच टक्केटोणपे खाल्ले आहेत. त्यामुळे त्यांच्या सामाजिक विषयावरील गज़्ाला जरा चढय़ा सुराच्या का असतात, याचा अदमास लावता येतो. स्वत:च्या तऱ्हेवाईकपणापासून पत्नीच्या सोशिकपणापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी या लेखांत मनमोकळेपणाने सांगितल्या आहेत. हे सर्व लेख वाचल्यावर ‘विक्षिप्त असूनही माणूस चांगला आहे’, अशी अनभिज्ञ वाचकांचीही स्वाभाविक प्रतिक्रिया होईल.
भटांची लेखणी चंचल आहे. ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत एकाच मुद्दय़ावर न राहता, नवनव्या मुद्दय़ांना भिडण्याचा प्रयत्न करत राहते; भावनिक आवाहन करते; टोमणे मारते; तसेच विनोदही करते. ‘ज्ञानेश्वर आणि मी’ या लेखात ते लिहितात, ‘माझा संत ज्ञानेश्वरांशी एक वेगळा संबंध आहे. माझ्या लग्नात संत ज्ञानेश्वर हजर होते. श्रीक्षेत्र आळंदी येथे माझे लग्न झाले.’ पण भटांच्या लेखनात विचार व वैचारिक चर्चा फारशी येत नाही. ‘मला बाळासाहेब ठाकरे आवडतात’ किंवा ‘एक अर्थशून्य हास्यास्पद शब्द – जातीयवाद’ यांसारखे लेख क्षणिक प्रतिक्रियेवजा आहेत. ‘मराठी खाद्यसंस्कृतीचा गाजावाजाच अधिक’ हा लेख विचार करायला लावणारा आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आवडतात, कारण ते ढोंगी नाहीत; पण त्यांच्या िहदुत्ववादी फॅसिस्ट विचारसरणीशी आपले पटत नाही’, असे भट रोखठोकपणे सांगून टाकतात. त्यांचा हा फटकळपणा बऱ्याच लेखांत दिसून येतो. ‘मी पाहिलेल्या दीदी’ या लेखात लता मंगेशकर यांचं कौतुक केलं आहे, तर त्यांच्या एका विधानाचा समाचार ‘किती ‘परकीय’ शब्द काढणार?’ या लेखात घेतला आहे.
भटांचं व्यक्तिगत जीवन, काव्यविषयक दृष्टिकोन आणि गज़्ालविषयक चिंतन या पुस्तकात एकत्रित केलं गेलं असल्याने त्याचा अभ्यासकांना, तरुण कवी-गजलकारांना, तसाच भटांच्या रसिक श्रोते आणि वाचकांनाही फायदा होईल. भटांनी गज़्ाला लिहू पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन केलं आहे, तसंच भ्रष्ट नकला करत शेखी मिरवणाऱ्यांना चांगलं फटकारलंही आहे. एकंदरीत भटांना इतरांना फटकवायला आवडतं, असं वाटतं. भाजप, फॅसिस्ट शक्ती, राजकीय दांभिकपणा, जातीयता, भ्रष्टाचार आणि ढोंगी माणसं हे तर त्यांचे कट्टर शत्रू! त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या लेखणीत बऱ्याचदा बोचरा विखार येतो.
‘समुद्र अंतरातला’ या शीर्षकाखालील आठ लेख हे भटांचं आत्मचरित्र म्हणावं असं लेखन आहे. त्यातल्या एका लेखात त्यांनी लिहिलं आहे, ‘मी सुरेश भट कडुिनबाचे गाणारे एक झाड आहे.’ काही वर्षांपूर्वी प्राचार्य राम शेवाळकर यांनी भटांबद्दल ‘करपलेला झंझावात’ या नावानं लेख लिहून मत्री आणि दुश्मनी या दोन्ही गोष्टी टोकाच्या पद्धतीनं करण्याच्या त्यांच्या स्वभावाविषयी लिहिलं होतं. भटांचं हे व्यवच्छेदक लक्षण या संग्रहातही बऱ्याच प्रमाणात उतरलं आहे. मात्र या लेखसंग्रहामुळे एक गोष्ट नक्की सिद्ध होऊ शकेल. ती म्हणजे सुरेश भट ही व्यक्ती, त्यांची कविता, त्यांचं गद्यलेखन आणि त्यांचं प्रत्यक्ष जीवन यात फारसं अंतर नाही.
आता थोडंसं शीर्षकाविषयी. अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या मुलाखतीत भट आपल्या कवितेत येणाऱ्या ‘मी’ या शब्दाविषयी म्हणतात, ‘‘हा मी पुष्कळदा विश्वव्यापी मी म्हणून येतो. मी स्वतला वापरतो, मी म्हणून.’’ म्हणजे भटांच्या कवितेतला ‘मी’ हा प्रातिनिधिक ‘मी’ आहे. ते भट नव्हेत. मग ‘िहडणारा सूर्य’ या शब्दांची शीर्षक म्हणून का निवड केली गेली असावी? कदाचित ‘आकर्षक शब्द’ याच निकषावर ही निवड झाली असावी, नपेक्षा भटांच्याच कवितेतील शब्द आहेत म्हणून. संपादक माळोदे यांनीच प्रस्तावनेत या संग्रहाचं नाव आधी ‘रोखठोक’ असं निश्चित झालं होतं, याची कबुली दिली आहे आणि तेच खरं योग्य, समर्पक आणि विषयाला न्याय देणारं शीर्षक होतं. असो. असं असलं तरी भटांचं हे गद्यलेखन त्यांच्या चाहत्यांना आणि निस्सीम वाचकांना नक्की आवडेल असं आहे.
‘हिंडणारा सूर्य’ – सुरेश भट, संपादक – डॉ. पुरुषोत्तम माळोदे, विजय प्रकाशन, नागपूर, पृष्ठे – ३९८, मूल्य – ४५० रुपये.
सडेतोड आणि रोखठोक
सुरेश भट यांचं नाव साहित्यरसिकाला माहीत नाही असं सहसा होत नाही. त्यांच्या प्रणयोत्फुल्ल गज़्ाला आणि तितकीच प्रणयोत्फुल्ल गाणी मराठी माणसाच्या कानांवरून कधी ना कधी गेलेली असतात.
आणखी वाचा
First published on: 12-01-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review hindanara surya