कवी, गज़लकार सदानंद डबीर गेली पंचवीस-तीस वर्षे गीत-गज़ल लिहीत आहेत. सुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील गज़लकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. भटांचे फारसे अनुकरण न करता स्वतंत्र वाटेने जाणारी त्यांची गज़ल आहे.
नुकताच डबीर यांचा ‘काळिजगुंफा’ हा गीत-गज़ल संग्रह प्रकाशित झाला आहे. गज़ला, गीते, मुक्तके अशा एकंदर ५९ रचनांच्या या संग्रहातून प्रेम, विरह, दु:ख, समाजव्यवस्था, राजकारण्यांच्या समांतर न चालणाऱ्या उक्ती, कृती, त्यांचे समाजसेवेवर असणारे बेगडी प्रेम, आदी विषयांवर डबीरांनी मार्मिक भाष्य केले आहे.
या जगण्याने कला शिकवली मला अशी की-
दु:खाचाही उत्सव करतो खुशाल आता
डबीरांची गज़ल शब्दांचा गुलाल उधळत नाही. जगण्याने शिकवलेल्या लेखनकलेतून ती दु:खाचा उत्सव साजरा करते. काळिजगुंफेतील वारा जरासा जरी हलला तरी तिच्या डोळ्यांपुढे आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा तरळतो. डोळ्यांवरच्या काचा धूसर झाल्यावर तिच्या बुबुळावर आठवणींचे ओघळ जमा होतात. उन्हाचे शब्द अन् सावल्यांचे सूर घेऊन ती नवे गीत गाते. स्वत:च्या डोळ्यातले आषाढ-श्रावण पापण्यांत कोंडून जगाच्या आसवांनी चिंब भिजते. चेहरा सतत हसता ठेवते. शब्दांचा पाऊस केवळ जगण्याच्या ढगांमुळेच पडत असतो यावर तिचा विश्वास असतो.
या गज़लेचे हृदय असे आहे-
भूतकाळाच्या भुतांचा मुक्त वावर
हृदय माझे एक पडकेसे जुने घर
डबीरांच्या गज़लेतून, गीतांतून निसर्गाच्या प्रतिमा येतात. त्या निसर्गाचे मानवीकरण करतात. पावसावर, झाडांवर सुरेख भाष्य करतात. निसर्गही डबीरांच्या शब्दांना आपल्या अंगणात खेळू देतो. प्रेम या सनातन विषयांवरील त्यांची गीते प्रसन्न प्रेमानुभव देणारी आहेत.
 या संग्रहात ग्रेस, कुसुमाग्रज या कविवर्यावरही एक एक गीत आहे. त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता डबीरांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल, मानवी नातेसंबंधांबद्दल डबीर पोटतिडिकेने लिहितात. त्यांनी वापरलेल्या प्रतिमा आशयाचा पट विस्तारतात. संवेदनशील मनावर भावनिक तरंग उठवतात. विचार प्रवृत्त करतात.
शब्दात सत्य नसेल तर ते निर्जीव प्रेतासारखे भासतात. शृंगारलेले कलेवर भल्याभल्यांनी खांदा दिला तरी सजीव का होते? कविता जीवनावरचे भाष्य असते. मानवी आयुष्यातील अपरिहार्य प्रश्नांची दखल कवी घेत असतो, म्हणून त्याच्या अनुभूतीची प्रत वरच्या दर्जाची असावी लागते. अनुभवाची सत्यता आशयघन शब्दांना खुणावत असते. आपण बोलतो त्या भाषेचे संस्कारित कलात्मक रूपांतर म्हणजे कवितेची भाषा असते. ती हृदयाची मातृभाषा असते. साचेबंद निष्कर्षांला आणि तात्कालिक माळ्याला भुलणारे शब्दजुळारी कलप लावून आपली कविता तरुण ठेवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात.
कवीच्या मनाची मशागत माणसांच्या क्षितिजावरच रुंद होत जाते. जगण्याच्या पसाऱ्यातच कविता सापडते. काव्यलेखन म्हणजे माणसाने माणसाचा घेतलेला शोध असतो. हा शोध कष्टप्रद असला तरीही आनंददायी असतो. ज्या कवीला माणसाची नस पकडता येतो तो वाढत जातो. कवितेचा संबंध जीवनाशी असतो. आयुष्याच्या अंगाने जमीन-अस्मानामधले अंतर मोजण्याची क्षमता संवेदनशील प्रतिभावंतात असते. जीवनाच्या व्यामिश्रतेचा पेच सोडवण्यास अल्प प्रमाणात का होईना ती साहाय्यभूत ठरते. डबीर यांचा संग्रह वाचकाला आनंद देतो.
‘काळिजगुंफा’ – सदानंद डबीर, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे- ७० , मूल्य- ७५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा