डॉ. उज्ज्वला दळवी

लहान मुलांसाठी लिहिलेल्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी अनेक आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती यांच्यातल्या कथा प्राण्यांची पात्रं वापरून काही तरी उपदेश गळी उतरवतात. अलीकडच्या गोष्टींपैकी काहींमधून तसेच वागणुकीचे धडे दिलेले असतात. इतर बऱ्याचशा गोष्टींत प्राण्यांना लहान मुलांसारखं वागायला लावून नुसतीच गंमतजंमत करतात. विद्या डेंगळेंची ‘कुत्रा नव्हे मित्रच’ आणि ‘डायनोचा डिस्को’ ही पुस्तकं त्याहून जरा वेगळी आहेत. त्या पुस्तकांत प्राण्यांना प्राण्यांसारखंच वागू दिलं आहे. खऱ्याखुऱ्या प्राण्यांचं जग कसं असेल त्याची एक चुणूक त्या पुस्तकांतून बघायला मिळते.

एखाद्या साध्याशा घटनेचा घरातल्या प्राण्यांवर वेगळाच परिणाम होतो. ‘कुत्रा नव्हे मित्रच’मधल्या ‘उपास’ कथेतली समस्या तशीच आहे. ब्रँडोच्या आधीच्या लाडक्या गुगीला पटकन विसरणं कुटुंबातल्या माणसांना जमत नव्हतं. गुगीचा वासही सोफ्यात रेंगाळत राहिला होता. एका अर्थी गुगीचं ‘भूत’च अजूनही घरात वावरतं होतं. पण ब्रँडोला ‘गुगी’ म्हटलेलं अजिबात आवडत नव्हतं. त्याचा त्याने केलेला निषेध माणसांना समजलाच नाही. शेवटी नाइलाज होऊन ब्रँडोनेच आपला मार्ग शोधला. ती गोष्ट प्राण्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखायला शिकवते.

आणि मग गुगीचं भूत प्रत्यक्ष अवतरलं तेव्हा ब्रँडोने त्याला वासावरून ओळखलं. ते स्वप्न होतं की सत्य हे अध्याहृतच ठेवलं आहे. पण त्यातून ब्रँडोला गुगीबद्दल वाटणारं आकर्षण, कुतूहल आणि प्रेमसुद्धा समजतं.

लेखिका उत्तम चित्रकर्त्री आणि व्हायोलिनवादिकाही आहे. त्यानिमित्ताने तिने जगप्रवास केला आहे. त्या प्रवासातही तिचा प्राण्यांविषयीचा जिव्हाळा तिच्यासोबत पोहोचतोच. युरोपमध्ये कुत्र्यांसाठी WBTB ( Who Bites The Best) नावाची स्पर्धा असते. त्या कल्पनेवरून, ‘चावण्यात श्रेष्ठ कोण?’ या कथेत लेखिकेने चक्क कॉन्फरन्स भरवली. तिला कुत्र्यामांजरांखेरीज इतरही अनेक चावऱ्यांचे प्रतिनिधी हजर राहिले. त्यांनी आपापली चावण्याची कारणं मांडली.

डायनोचा डिस्को या पुस्तकातही लिली, मनी, गुब्ब्या ही मांजरं आहेतच. पण त्याखेरीज खारीपासून डायनोसॉरपर्यंत इतर प्राण्यांशीही मुद्दाम ओळख करून दिली आहे.

प्राण्यांची आणि माणसांची विचार करायची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून तर गैरसमज होतात. ‘सापाचे कुतूहल’ या कथेतला साप माणसांच्या घरात शिरला तो केवळ कुतूहलामुळे! तो दुष्ट होता म्हणून नाही, डूक धरल्यामुळे नाही, सूड घेण्यासाठी तर नाहीच नाही. कुठल्याही प्राण्यावर ‘तो दुष्ट आहे’ असा शिक्का मारून त्याला जिवे न मारता त्याला आपल्यापासून दूर, त्याच्या जगात, सुखात राहू द्यावं असा संदेश त्यातून मिळतो.

पण ‘पोटूचे मित्र’मध्ये मात्र बाळ हिप्पोपोटॅमस गुटगुटीत, गोंडस हसरा दिसला तरी त्याचे आईबाबा कारणाशिवाय, एकाएकी सैरावैरा धावू शकतात आणि त्यांच्या पायांखाली कुणीही चेंगरू शकतं अशी व्यवस्थित धोक्याची सूचनाही मिळते.

‘गमतीदार लामा’ हे उंटाचे चुलतभाऊ. थुंकीची पिचकारी हेच त्यांचं बचावाचं एकमेव शस्त्र आहे. त्यांना ‘थुंकू नये’ अशी शिस्त कशी लावायची? दक्षिण अमेरिकेतल्या भटक्या लामांना गोळा करून नेणारी गाडी, लामांचं सामूहिक थुंकणं, पिचकाऱ्या, हत्तींबरोबरची होळी याचं रसभरित वर्णन या लामांच्या कथेत आहे. शिवाय त्या पुस्तकात टीव्ही बघणारी खार, पुस्तक वाचणारी लिली मांजरी, कावळ्याच्या ज्या घरट्यात अंडी घातली त्याचा पत्ताच विसरणारी कोकिळा, ‘पडली’ शब्दाचा बरोब्बर वापर करणारा पोपट हरी अशी अनेक खाशी मंडळी, त्यांच्या खऱ्याखुऱ्या सवयींसकट भेटतात. शाृंगे कुटुंबीयांनी प्रवासाला निघताना उंदीर, बेडूक, साप शिदोरी म्हणून बांधून घेतले; ‘पहाट झाली की बहिणीकडे निजानीज होईल’ याची शाृंगेबाईंना काळजी वाटली; तांबडं फुटायच्या आत परतीची वाट धरली वगैरे तपशील घुबडांची मस्त ओळख करून देतो. डायनोसॉर आता कुणालाही भेटणार नाहीत हे दु:खद सत्यही मनावर ठसतं.

त्या दोन्ही पुस्तकांतल्या सुरस, मनोरंजक आणि गमतीशीर गोष्टींतून नीतीचे आणि रीतीचे नेहमीचे धडे मिळत नाहीत, पण आपल्या युगायुगांच्या सोयऱ्यांविषयीच्या, प्राण्यांविषयीच्या आपुलकीची शिकवण मिळते.

‘पोलिसांच्या कुत्रीचं खूप कौतुक झालं. मला आणि मंजूला फक्त खाऊच मिळाला’ , ‘गुगी पुन्हा कधीच आला नाही. मला शाबासकी द्यायलासुद्धा आला नाही’, ‘जीवनातलं कुतूहल मात्र संपलं’, अशांसारख्या गोष्टींच्या शेवटच्या वाक्यांतून त्या प्राण्यांच्या मनातली खंत जाणवते आणि त्यांच्याशी जवळीक वाढते.

लेखिकेचं प्राण्यांवर प्रेम आहे आणि तिने प्राणी जवळून अनुभवले आहेत. ते पुस्तकांतल्या छोट्या छोट्या उल्लेखांतून जाणवतं. ‘कुत्र्यांना मास्क लावल्यावर थोड्याच वेळात गल्लीभर मास्कच्या असंख्य चिंध्या पसरल्या’, ‘गुगीच्या भुताची ओळख पटवायला ब्रँडोने त्याला दात लावून बघितलं’, ‘कॅस्पर लॅब्रॅडॉर असल्यामुळे त्याचं उपासाचं नाटक एकच दिवस घडलं’, ‘मंजू कुत्री मगरीसारखी विसावली होती’, ‘यशोदाबाई आल्या म्हणून मी आनंदाने गिरक्या घेऊन त्यांना चाटून काढलं’ वगैरे वाक्यं सगळ्या कुत्रेवाल्यांना मनापासून पटतील. वानरांना, कावळ्यांना आरशातलं प्रतिबिंब आपलंच आहे हे समजतं. कुत्र्यांना ते समजत नाही. प्रत्येक कुत्रा प्रतिबिंबाशी वेगळा वागतो. त्याचीही गोष्ट मजेशीर आहे. हरी पोपट, ‘पडली, पडली’ इतकंच ओरडत राहिला, अतिशय कडक साळुंकेबाई चिडल्या, लिली मांजरीने चित्रांच्या पुस्तकातलं फक्त कुत्र्यांचं पान फाडलं हे सारं त्या त्या प्राण्याच्या स्वभावाला धरून आहे.

त्याखेरीज इतरही शैली छान आहे. वाकब हा सर्रास वापरात नसलेला शब्द अगदी योग्य रीतीने वापरलेला पाहून कौतुक वाटलं. ‘मासे खायला आपण काय मांजर आहोत का?’ असं कुत्र्यांनी म्हटलं, ‘अधिक अंधारात पारदर्शक भूत अधिक स्पष्ट दिसलं’ ही तर टाळीची वाक्यं आहेत. ‘उलटी टांगलेली वटवाघळं शी कशी करत असतील?’ हा छोटू शाृंगेने विचारलेला प्रश्न सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच. दोन्ही पुस्तकांतली चित्रं जशी हवीत तश्शी आहेत. सगळ्या कुत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झकास आहेत. कॉन्फरन्समध्ये घाबरलेला उंदीर आणि चक्रावलेला ब्रँडो बरोब्बर दिसताहेत. पडीक शाळेच्या चित्रातले भारद्वाज सर, घारे बाई, कावळे सर, साळुंके बाई, शेळी ताई हे तर चांगले काढलेच आहेत, पण वाढलेलं तण, माजलेल्या वेली, कोळिष्टकं आणि कोळी यांनाही आवर्जून चित्रात घेतलं आहे. हल्ली साडी नेसलेली आई क्वचित दिसते. पण सगळ्या आया टॉप आणि पँट्समध्येही नसतात. काही आया तरी पंजाबी पोशाखात आणि आज्या साडीत असतात. पुस्तकातली, मांजर नेणारी आजी साडीत दाखवली असती तर चाललं असतं.

‘कुत्रा नव्हे मित्रच’ हे ओळखीच्या, घरातल्या, पाळीव प्राण्यांच्या मनोगताबद्दल आहे. ते प्राणी मुलांचे सवंगडी असतात. त्यांच्या मनात जे काही चालतं ते, त्या पुस्तकातल्यासारखं समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती दोस्ती अधिक गहिरी, सुंदर होईल. तशा प्रयत्नांमुळे त्या मुलांच्या मेंदूत लाभदायक रसायनं वाढतात आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही अधिक प्रभावी बनतं. घरातल्या पाळीव प्राण्यांना सांभाळून घ्यायची सवय असली तर लहान मुलं अधिक जबाबदारीने वागतात, स्वावलंबी आणि स्वाभिमानी असतात, त्यांना इतरांच्या भावना सहज समजतात.

या दोन्ही पुस्तकांतले सगळे प्राणी अगदी प्राण्यांसारखे असूनही त्यांच्या गुणदोषांसकट आपलेसे वाटतात. त्यांच्याविषयी प्रेम वाटतं. या पुस्तकांचं उद्दिष्टही तेच आहे. आठ-दहा वर्षांच्या मुलांना या पुस्तकांतून प्राणिप्रेमाचं बाळकडू मिळेल. सगळ्या प्राण्यांचा ती प्रेमाने विचार करतील. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचं बीजारोपण तिथंच होईल.

‘कुत्रा नव्हे मित्रच’ , ‘डायनोचा डिस्को’

विद्या डेंगळे, दिलीपराज प्रकाशन, पाने- अनुक्रमे- ६४, ५६, किंमत- अनुक्रमे- २०० रुपये, १८० रुपये.

ujjwalahd9@gmail.com

Story img Loader