वयाची नव्वदी पार केलेल्या डॉ. लीला गोखले-रानडे यांचे ‘माझी गोष्ट’ हे आत्मकथन म्हणजे एका विशाल कालपटातील त्यांच्या वाटचालीचे चित्रण आहे. ही जरी त्यांची गोष्ट असली तरीही गेल्या शतकभरात भोवतालच्या वातावरणात सामाजिकदृष्टय़ा – सांस्कृतिकदृष्टय़ा झालेले मोठे बदल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कसे अलवार झिरपतात, आयुष्य बदलून टाकतात याचेही हृद्य दर्शन यात आहे.
स्त्रीशिक्षणासाठी अनुकूलता नसताना पुण्यातल्या लीला रानडे या मुलीने एम.डी.पर्यंत घेतलेले उच्च शिक्षण आणि घडवलेल्या यशस्वी वैद्यकीय कारकीर्दीचे चित्रण यात आहेच, पण त्यापलीकडच्या आणि अलीकडच्या प्रवासाची साक्षीदार असलेली लीला तिच्या वाटय़ाला आलेल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याशी समरस झाल्याचे जाणवते.
शंभरजणांच्या रानडे कुटुंबात जन्माला आलेली लीला, तिचे रम्य बालपण, आधी सेवासदन आणि नंतर हुजूरपागेत झालेले शालेय शिक्षण, फग्र्युसनमधील कॉलेज जीवन, त्यानंतर मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झालेले वैद्यक शिक्षण आणि त्याद्वारे मुंबईच्या, तिथल्या हॉस्टेलच्या आणि अभ्यासाच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. आज वयाची ९५ वर्षे पार केलेल्या डॉ. लीला गोखले यांनी या आठवणी कथन करताना त्यातील व्यक्तींची नावे, स्थळे इतकेच काय लहानपणी कुणाच्या ना कुणाच्या तोंडून ऐकलेली अख्खी गाणी, ओव्या, शिकलेल्या कविता यांचे इतके बारीकसारीक तपशील आणि संदर्भ दिले आहेत, की त्यांच्या स्मरणशक्तीला भरभरून दाद द्यावीशी वाटते.
सोवळेओवळे पाळणाऱ्या रानडेंच्या वाडय़ापासून मुंबईला वैद्यक शिक्षण घेताना चिकन खायला शिकणे, पुण्यातल्या वाडय़ातील मोठय़ा कुटुंबात राहिलेल्या लीलाचं मेडिकलच्या शिक्षणादरम्यान मुंबईत हॉस्टेलमध्ये एकटीने राहणे, हाउसमन असताना कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळताना होणारी दमछाक.., कम्युनिस्ट पार्टीचे काम करणाऱ्या बंडू गोखलेंशी झालेले लग्न, पुण्यात थाटलेले स्वत:चे रुग्णालय, त्यांची रशियावारी..  हे सारे टप्पे वाचताना त्यांच्या आयुष्याच्या लंबकाने केलेला टोकाचा प्रवास आणि त्यातील वेगळेपण जाणवत राहते.  
त्यांची अचूक निदानक्षमता आणि निष्णात डॉक्टर असण्याचे संदर्भ पुस्तकात जसे डोकावतात, तसेच त्यांचे सुगरण असणे, शिवणकामातील कौशल्य यांचेही ओझरते संदर्भही पुस्तकात आले आहेत. रुग्णांचे अनुभव, कामानिमित्त त्यांनी केलेला प्रवास, आकाशवाणीवर सादर केलेले वैद्यक विषयावरील कार्यक्रम, वैद्यक महाविद्यालयातील अध्यापन, खेडय़ापाडय़ांतील रुग्णांसाठीची तपासणी शिबिरे अशी त्यांच्या कारकीर्दीच्या विस्तृत पटाची झलक या पुस्तकातून दिसते. त्यांची रशियन भाषा शिकणे आणि त्यात पारंगत होणे, वयाची ८० पार केल्यानंतर साहित्यप्राज्ञ होणे, ९०व्या वर्षी शोधनिबंधाचे लिखाण करणे हा सारा प्रवास केवळ विस्मयकारी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतचा विशाल पट पाहिलेल्या लीलाबाई पुस्तकभर नवलकथा वाटत राहतात. त्यांच्या आयुष्याचा हा सारा प्रवास त्यांनी आठवण सांगितल्यासारखा शेअर केल्याने तो कुठेही त्यांच्या कर्तृत्वाची थोरवी सांगण्याचा अट्टहास भासत नाही. उलटपक्षी, त्यांचे लहानसहान गोष्टींमध्ये चिकित्सक असणे, व्यक्तिमत्त्वातील धारदारपणा आणि सडेतोडपणा जाणवत राहतो. त्यांचे उत्तम डॉक्टर असणे, उत्तम पालक असणे, नवनव्या गोष्टी आत्मसात करण्याची त्यांची आवड आणि क्षमता याचे दाखले पुस्तक वाचताना पानोपानी मिळतात.
आज ९५ वर्षे पार केलेली ही सुपरवुमन तिच्या वाटय़ाला आलेले आयुष्य समरसून जगत असल्याची साक्ष हे पुस्तक देते. विशाल कालपटाच्या साक्षीदार असलेल्या लीला गोखले (रानडे) यांची शतकी आणि शतकोत्तर खेळीही तितकीच प्रेरणादायी ठरो, या शुभेच्छा नक्की द्याव्याशा वाटतात.
‘माझी गोष्ट’ – डॉ. लीला गोखले (रानडे), सुकृत प्रकाशन, पृष्ठे – २६०, मूल्य – २५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा