स्त्रियांच्या आत्मचरित्रांचे समृद्ध दालन मराठीत आहे. मराठीभाषकांच्या वैचारिक, सामाजिक प्रगतीचा आलेख स्त्रियांच्या आत्मचरित्रांतून काढता येतो, इतके समृद्ध हे दालन आहे. या वैचारिक समृद्धीचा, तिने दिलेल्या संस्काराचा लाभ मराठी वाचकाला होतोच असे नाही. याचे एक कारण म्हणजे अनेक पुस्तके उपलब्ध नसतात आणि त्यामुळे जनसामान्यांच्या स्मृतिकोशांतून जणू बाद झालेली असतात. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र मराठीतील पहिले (१९१०); परंतु आजच्या काळात त्यावर ‘चित्रवाणी’ मालिका झाल्यानेच ते पुन्हा लोकांसमोर आले. तसेच मराठीतील अवघे दुसरे स्त्री-आत्मचरित्र ठरलेले पार्वतीबाई आठवले यांचे ‘माझी कहाणी’ हे पुस्तक (प्रथमावृत्ती : १२ मार्च १९२८) गेली काही वर्षे वाचकांना उपलब्ध नव्हते. त्याचे नव्या रूपातील पुनर्मुद्रण (किंवा नवमुद्रण) आता ‘राजहंस’ने केले आहे. पार्वतीबाईंच्या आत्मचरित्राकडे पुन्हा आणि ८५ वर्षांनंतरच्या नजरेने पाहण्याची संधी पुनर्मुद्रणामुळे उपलब्ध झाली आहे. पार्वतीबाईंनी चरित्रात लिहिलेल्या आणि धूसरच सोडून दिलेल्या धाग्यांचे तटस्थ विवेचन विनया खडपेकर यांनी नवमुद्रणाच्या प्रस्तावनेत केले असून त्यातही ही आजची नजर दिसते. ‘स्त्रियांच्या विवाहित स्थितीपेक्षा त्यांची नोकरी ही त्यांची मोठी गुलामगिरी आहे..’ यासारखी वाक्ये आज वादग्रस्तच ठरतील, असे खडपेकर म्हणतात. लेखिकेची ‘वैचारिक पातळी सामान्य होती’ इतका परखड अभिप्राय याच प्रस्तावनेत अन्यत्र असूनही ‘काही प्रसंगांची धूसरता आणि विचारांच्या मर्यादा यांमुळे या आत्मकथनाचा कस मुळीच उणावत नाही’ अशा अभिप्रायापर्यंत वाचकाला नेऊन सोडणारी ही प्रस्तावना आहे.
इथून पुढले काम वाचकाचे. देवरुखातील जोशी कुटुंबात १८७० साली जन्मल्या, महादेव आठवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि १८९० मध्ये तीन वर्षांचा मुलगा पदरी असताना आलेले वैधव्य त्यांनी माहेरी राहून, केशवपनाची ‘संन्यासदीक्षा’ पत्करून स्वीकारले. परंतु त्यांची बहीण बाया कर्वे यांचा पुनर्विवाह (महर्षी)धोंडो केशव कर्वे यांच्याशी झाल्यानंतर पारंपरिक ब्राह्मणी विचारांना सुधारकी आव्हाने मिळण्याची संधी घरातच आली. मनात गोंधळही उडाला, परंतु मुलाच्या उत्कर्षांची संधी महत्त्वाची मानल्याने त्यातून वाट काढता आली आणि पार्वतीबाई हिंगणे येथील आश्रमात येऊन पोहोचल्या. ही कलाटणी मिळाल्यानंतरचे आयुष्य संघर्षमय असले, तरी समाधान देणारे होते. विधवांची स्थिती, ती बदलण्याची गरज आणि आश्रमाचे काम याविषयी गावोगावी व्याख्याने देऊन निधी संकलन करण्याचे काम करताना गावोगावची माणसे आणि त्यांच्या तऱ्हा कशा पाहिल्या, याचा तपशील पार्वतीबाई देतात. जपानमार्गे अमेरिकेत आणि तेथून इंग्लंड व पॅरिसमार्गे भारतात अशा सुमारे अडीच- पावणेतीन वर्षांच्या परदेशवारीचे बरे-वाईट अनुभव त्या सांगतात. आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत स्वत:चा सहभाग कसा होता याचा तपशील देतात आणि परतीचा प्रवास कसा झाला हे सांगून आत्मचरित्रातील अखेरच्या चार प्रकरणांत मात्र तत्कालीन स्त्रियांच्या प्रश्नांवर त्या स्फुटनिबंधवजा मतप्रदर्शन करतात. हे सारे आपण आत्ता कसे वाचतो आहोत, याचा विचार करून या आत्मकथनातून आपापले आत्मबिंब शोधणे, हे वाचकाचे एक काम ठरते. त्यासाठी प्रस्तावनेने पुरेशी मदत केलेली आहेच.
चार पिढय़ांपूर्वी ‘पार्वतीबाई आठवले यांचे चरित्र म्हणजे एक कादंबरीच आहे’ असा अभिप्राय धोंडो केशव कर्वे यांनी दिला होता. ‘नायकांचे संघर्ष आणि त्यातून होणारे शीलसंवर्धन’ हे ज्या काळातील कादंबरीचे गुणविशेष ठरत त्या काळचा (‘माझी कहाणी’ प्रकाशित होण्यापूर्वीचा) हा अभिप्राय आहे. त्याच दृष्टीने ‘माझी कहाणी’ आजही वाचता येतेच. परंतु एवढय़ा एकाच अभिप्रायाशी सहमत न होता वाचकांनी पुढली पावले उचलल्यास पुस्तक आजचे ठरेल. समाजदर्शन, पार्वतीबाईंवर झालेल्या नव्या वैचारिक संस्कारांची वाटचाल, अशी वैशिष्टय़े या पुस्तकात आहेतच. पण त्याही पुढे जाऊन आपण आज या पुस्तकाचा विचार कसा करणार हे तपासताना स्वत:लासुद्धा तपासण्याची वाचकाची तयारी असेल, तर एक उपाय सुचवावासा वाटतो : अखेरचे तीन स्फुट लेख आधी वाचावेत आणि नंतर या सुधारकी विचारांमध्ये समाजघडी मोडली तरी चालेल अशी तडफ का नाही याचे सहृदय आकलन होण्यासाठी म्हणून ‘माझी कहाणी’ अथपासून वाचावी.
ही सूचना कुणाला उफराटी वाटेल. पुस्तकाचे वाचन एकरेषीय (पहिल्यापासून शेवटपर्यंत) पद्धतीने झाले तरीही त्यातून अर्थाचे पदर, पातळ्या समजणारच असतात, हे खरे असल्यामुळेच नंतरची प्रकरणे सहसा कुणी आधी वाचत नाही. परंतु या पुस्तकाबाबत वाचकाने स्वत:ला तपासायचे असेल, तर  हा उफराटा उपाय उपयुक्त ठरेल. ‘सामाजिक प्रश्नांवर माझे काही विचार’, ‘आमची विवाहपद्धती’, ‘स्त्रियांच्या संस्था व त्यापुढील प्रश्न’ आणि ‘अबलोन्नतीची भावी दिशा’ या चार स्फुटलेखांच्या केंद्रस्थानी असलेले प्रश्न आजही बदललेले नाहीत. त्यांवरील आपली मते आजची आहेत;  तर पार्वतीबाईंनी मांडलेली मते ८५ वर्षांपूर्वीची. त्यापैकी काही आज पटत नाहीत. मात्र त्या काळच्या स्त्रियांचा विचार या बाईंनी आत्मीयतेनेच केलेला असणार, असे वाटत राहते. तसे नसते तर प्रचलित सुधारकी विचारांना वेळप्रसंगी विरोध करण्याचे बळ पार्वतीबाईंना कोठून मिळणार होते? कदाचित हिंगण्याच्या आश्रमातून, महर्षि कर्वे यांच्या विचारांतून.. पण आपल्या विचारांचे निव्वळ अनुकरण पार्वतीबाईंनी कधीच केलेले नाही, असा सूर कर्वे यांनीच त्यांच्या ‘आत्मवृत्ता’त लावला आहे आणि तो संबंधित मजकूरही ‘माझी कहाणी’ची ही प्रत वाचकांहाती ठेवतेच आहे.
अखेर लक्षात येते की, हे एका सक्रिय कार्यकर्तीचे वैचारिक बळ आहे.. हे विचार म्हणजे केवळ बुद्धीला पटणाऱ्या कल्पना नव्हेत. पार्वतीबाईंच्या जीवनदृष्टीचा तो परिपाक आहे. ही जीवनदृष्टी स्वत:च्या जगण्याने जशी घडवली, तशीच विविध तीर्थक्षेत्रीच्या विधवांपासून अमेरिकेतील ‘मालकिणीं’पर्यंत अनेक महिलांच्या स्थितीकडे भागिनीभावाने (हा शब्द तेव्हाच्या समाजशास्त्रात नसला, तरी) पाहिल्यामुळे ती घडली आहे.
‘माझी कहाणी’ हे केवळ त्या काळच्या एका महिलेचे आत्मकथन नसून एका कार्यकर्तीचे मनोगतही त्यात आहे. आजन्म सेविका म्हणून काम सुरू  केल्यानंतर कर्तृत्व दाखवण्याचीच नव्हे तर मन गुंतवण्याचीही मोठी संधी पार्वतीबाईंना मिळाली असावी. एक संस्था आपल्यावर विश्वास टाकते आहे आणि आपण तो सार्थ करून दाखवायचा आहे, या ईर्षेने त्या कार्यरत झाल्याचे दिसते. मात्र अमेरिकेत गेल्यावर त्या काहीशा खचल्या. यामागे अनेक कारणे असू शकतात. संस्थेचे प्रत्यक्ष साहचर्य दुरावल्यामुळे त्या काहीशा खचल्या असाव्यात, हा प्रवास पुरेसा योजनापूर्वक होणे शक्य न झाल्याने भवितव्य काय आणि परतीची वाट कशी याचा घोरही त्यांना असावा. परंतु खचणे- घोर लागणे या भावनिक स्थितींचे अस्तित्वही नाकारण्याची मनोभूमिका कार्यकर्तेपणातून येते. हेतूची आठवण स्वत;ला देणे, विहित कर्तव्य पार पाडले की नाही याचा ऊहापोह, यांचे धागे ‘वर्गणी मिळविण्याचे काही अनुभव’नंतरच्या दहा प्रकरणांतून दिसतात.
कार्यकर्त्यांचे अनुभव आवर्जून वाचले जाण्याचा काळ एकविसाव्या शतकात उरला नाही. ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ची मात्र चलती आहे, त्याहीसाठी म्हणून  ‘माझी कहाणी’ वाचले, तरीही स्त्रीची धैर्यशीलता आणि कार्यकर्तीची निष्ठा यांचा स्पर्श वाचकाला झाल्याखेरीज राहाणार नाही.
‘माझी कहाणी ’- पार्वतीबाई आठवले,
राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १००, मूल्य – १०० रुपये.

crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
mamta kulkarni first post after being expelled from kinnar akhara
किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्यावर ममता कुलकर्णीने केली पहिली पोस्ट
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
Hemangi Sakahi And Mamta Kulkarni
ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरून वाद; किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांचे संतप्त सवाल
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
Story img Loader