‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका लक्ष्मी म्हणजेच  लक्ष्मीनारायण त्रिपाठी ही एक सेलिब्रिटी असलेली तृतीयपंथी. अनेकदा टीव्हीवर तिला पाहिलेलं. तिचं बोलणं ऐकलेलं. तिनं ठासून मांडलेले विचार येऊन मनावर आदळलेले.. या पाश्र्वभूमीवर पुस्तक हाती घेताना तिच्याबद्दलचं कुतूहल मनात होतंच.
बालपणीच्या निरागस जगण्याचे वर्णन करताना ‘बालपणीचा काळ सुखाचा’, ‘बालपण देगा देवा..’ असं जरी आपण म्हणत असलो तरी सर्वच मुलांच्या वाटय़ाला आलेलं बालपण हे सुखाचं नसतं. अनेक कटु आठवणींनी, वेदनांनी भरलेल्या या बालपणाच्या आठवणी वेदनाच देणाऱ्या ठरतात. लक्ष्मी अशांपैकीच एक. लहानपणीचे एक-दोन आनंद देणारे प्रसंग सोडले तर बाकी सगळीकडेच काळवंडलेला अंधार..
ठाण्यात एका छोटय़ा घरात आई-वडील आणि भावंडांसोबत राहणारा लक्ष्मीनारायण त्रिपाठी हा मुलगा. इतर मुलांसारखाच तो शाळेत जाणारा, आनंदाने शिकणारा. तिथल्या गॅदरिंगमध्ये रमणारा. असं सारं मजेत सुरू असतानाच वयाच्या सातव्या वर्षी त्याच्यावर मोठा आघात झाला तो लैंगिक शोषणाचा. चुलतभावाच्या लग्नात गावी गेला असताना त्याच्यावर हा प्रसंग ओढवला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. या प्रसंगाने शांत, आत्ममग्न असलेला लक्ष्मीनारायण हादरतो आणि हा सिलसिला पुढेही तसाच सुरू राहतो. शोषण करणाऱ्या व्यक्ती मात्र बदलत जातात. या शोषणातून कधी स्वेच्छेने तर कधी जबरदस्तीने पुरुषांशी आलेले शरीरसंबंध, विश्वासाला तडा देणारी माणसं, आपण ‘गे’ असल्याची समजूत करून त्यांच्यात वावरताना आलेले संबंध आणि दुसरीकडे जिवापाड प्रेम असलेल्या आपल्या कुटुंबापासून हे सगळं लपवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड.. अशा अनेक स्तरांवर लक्ष्मीचा जीवनप्रवास उलगडत जातानाच दुसऱ्या बाजूला आपल्या सुसंस्कृत म्हणून फुशारकी मिरविणाऱ्या समाजाबद्दलच्या प्रतिमेलाही तडा जातो. पुरुषांकडून पुरुषावरच होणारी लैंगिक शोषणाची अज्ञात बाजू समोर येते.
बालपण ते वयात येतानाच्या टप्प्यात लक्ष्मीला एक जाणवतं ते आपल्यातील नृत्यकलेबद्दलची आस्था आणि प्रेम. या कलेवर तिचा प्रचंड विश्वास. आपण नृत्य करण्यासाठीच जन्मलो आहोत, अशीच तिची धारणा. नृत्याचे रीतसर धडे आणि नृत्याचे क्लास हे तिच्यासाठी केवळ रोजीरोटी नाही तर नृत्यसाधनाच. येथे नृत्यात मनसोक्त जगणारी आणि फुलणारी लक्ष्मी प्रकर्षांने जाणवते.
लक्ष्मीचा जीवनप्रवास वाचताना जाणवतं ते तिचं कुटुंबावर असलेलं नितांत प्रेम. कुटुंब हे तिचं पहिलं प्राधान्य. आपले आई-वडील आणि भावंडांचं सुख हेच तिच्यासाठी महत्त्वाचं. त्यामुळे आपण गे आहोत वा हिजडा समाजात प्रवेश करताना तिला समाजापेक्षाही आपल्या कुटुंबाकडून येणारी प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची वाटते. त्या काळातली तिची मनोवस्था हेलावून टाकते.
एका टप्यावर लक्ष्मीला आपण गे नसल्याची जाणीव होते. त्यामुळे त्या ग्रुपपासून ती बाजूला होते. आपण तृतीयपंथीच आहोत, त्यामुळे ती तसंच जगण्याचा निर्णय घेते. घरातल्यांना याविषयी कळल्यावर होणारा कल्लोळ आणि तरीही आपल्याला असंच जगायचंय हा अट्टहास, याविषयीची लक्ष्मीमध्ये ठासून भलेलेली व्यक्तिस्वातंत्र्याची आस जाणवते. प्रत्येक व्यक्तीला हवं तसं त्याच्या मनासारखं (दुसऱ्याला हानी न पोहोचविता) जगता यावं, हेच तिच्या जगण्याचं खरं तत्त्वज्ञान आहे आणि तशी ती जगलीही. त्याचे चांगले-वाईट परिणाम तिने समर्थपणे भोगले आणि पेललेही.
नेहमीच समजात उपेक्षित आणि हास्याचेच कारण ठरलेल्या तृतीयपंथी समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी लक्ष्मीची चाललेली धडपड, या समाजाचे रुदन प्रतिष्ठित समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची तसेच त्यांना समाजाने स्वीकारावे तसेच त्यांच्या आरोग्यासाठी तिने केलेले प्रयत्न याबद्दल वाचताना तिच्यातील सामाजिक कार्यकर्तीचा चेहरा अधिक स्पष्ट होत जातो.
सामाजिक काम करीत असताना लक्ष्मीचं व्यक्ती म्हणून अधिकाधिक समृद्ध होणं, परदेशवारी, परदेशात काही माणसांशी जुळलेलं अनोखं नातं असे अनेक हळवे क्षण या आत्मकथनात टिपले आहेत. त्यातून लक्ष्मीत दडलेलं एक मायाळू मन अलवारपणे उलगडत जातं. पण पुन्हा या हळव्या क्षणांमुळे ओढवणारं दु:ख वाटय़ाला नको म्हणून सारी शक्ती एकवटून या हळव्या क्षणांना मुठीत ठेवणारी लक्ष्मी.. तिच्या आयुष्यातील अनेक भावनिक प्रसंग चांगले शब्दांकित झाले आहेत.
हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यावर आपल्याला ज्ञात असलेल्या सेलिब्रिटी लक्ष्मीचा चेहरा हळूहळू मागे सरतो आणि एक मनस्वी आणि स्वतंत्रपणे जगू पाहणारी निखळ मनाची लक्ष्मी अधिक लक्षात राहते. या आत्मकथानातून प्रकर्षांनं जाणवतं, ते लक्ष्मीची बिनधास्त जीवनशैली.. एका शांत, आत्ममग्न ते तडकफडक व्यक्तिमत्त्वाची वाटचाल.
पुस्तकाच्या शेवटी ‘हिजडा म्हणजे काय’ या प्रकरणात हिजडा या पंथाविषयी माहिती मिळते. तसेच या ओघात ट्रान्सजेंडर आणि भारत व अन्य देशांमध्ये असलेली परिस्थिती मांडली आहे. मुखपृष्ठावरील तिचा स्कूटीवरचा बिनधास्त फोटो तिच्या खुल्या जगण्याचीच साक्ष देऊन जातो. वैशाली रोडे यांनी ओघवत्या भाषेत या मनोगताचं शब्दांकन केलं आहे.
लैंगिक शोषणातून ओरबाडलं जाणारं बालपण, समजातील ठोकताळ्यांपेक्षा वेगळं असल्यास समाजाच्या टिंगलीचा वा हास्याचा विषय ठरणाऱ्या व्यक्तींची मनोवस्था, तृतीयपंथी म्हणून जगताना होणारा त्रास अशा अनेक अंगांना हे आत्मकथन स्पर्श करतं. या पुस्तकात केवळ लक्ष्मी या व्यक्तीचं आत्मचरित्र नाही, तर आपल्या सामाजिक परिस्थितीचं भेदक चित्रणही आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकाच्या मनात समाज, व्यवस्था, कुटुंब या पातळीवर अनेक प्रश्न निर्माण करते. तसेच माणूस म्हणून समाजातील आपले जबाबदारीचे वर्तन अधिक अधोरेखित करते.
‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ – लक्ष्मीनारायण त्रिपाठी,
मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १८६, मूल्य – २०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा