धनंजय जोगळेकर

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचं ‘नवी पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सध्याच्या नकारात्मक बातम्यांच्या वातावरणात आश्वासक दिलासा देणारं हे पुस्तक आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात सलग तीन पिढ्यांनी पन्नास वर्षांत साकारलेल्या कामाची ही कहाणी आहे. म्हटलं तर ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाचा हा पुढचा भाग आहे आणि म्हटलं तर हा स्वतंत्र दस्तावेज आहे.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

१९७३ साली भामरागड, जि. गडचिरोली येथील अत्यंत दुर्गम अशा आदिवासी विभागात, लोकबिरादरी या प्रकल्पाची सुरुवात झाली. पद्माभूषण डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने त्यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आणि सून डॉ. मंदा आमटे यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन या प्रकल्पाची धुरा स्वीकारली व अक्षरश: जीवापाड मेहेनत, आपल्या वैद्याकीय ज्ञानाचा यथोचित वापर करत अनेक कार्यकर्त्यांना बळ देऊन हा प्रकल्प यशस्वीपणे उभा केला.
बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या कार्याचा समृद्ध वारसा डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी अथक परिश्रमाने पुढे नेला, तर त्यांच्या दोन्ही मुलांनी हाच वारसा केवळ पुढे नेला नाही, तर प्रकल्पाच्या कार्यकक्षा विस्तारत अधिक प्रभावीपणे कार्य करून हेमलकसा प्रकल्प राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आणला. या नव्या पिढीच्या कार्याची, त्यांच्या बांधिलकीची आणि नव्या गरजांप्रमाणे नवी उत्तरे शोधण्याच्या त्यांच्या कल्पकतेची ओळख डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात करून दिली आहे.

प्रकाश-मंदा आमटे यांनी शक्य असूनही दोन्ही मुलांना म्हणजे दिगंत आणि अनिकेतला शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवलं नाही. उलटपक्षी दोघंही हेमलकसाच्याच आश्रम शाळेत आदिवासी मुला-मुलींबरोबर शिकले. त्यातूनच त्यांची प्रकल्पाशी घट्ट नाळ जुळली. डॉ. दिगंतने १९९८ साली म्हणजे प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात डॉ. बाबा आमटे यांच्या उपस्थितीत प्रकल्पावरच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्याला डॉक्टर असलेल्या व प्रकल्पावर काम करू शकणाऱ्या मुलीशी लग्न करावयाचे आहे असे जाहीर केले. २००३ मध्ये त्याचे डॉ. अनघा या गोव्यातील मुलीबरोबर लग्न झाले व ते दोघेही प्रकल्पाच्या रुग्णालयात व प्रकल्पाच्या व्यवस्थापनात सहभागी झाले. डॉ. अनघा या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचा विशेष फायदा प्रकल्पास झाला, तसेच हेमलकसातील वैद्याकीय सेवा सशक्त होऊ शकल्या.

डॉ. दिगंत व डॉ. अनघा यांनी स्वत:ला तर प्रकल्पकार्यात झोकून दिलेच, पण प्रकल्पावर उमेदीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली. प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीत या व्यवस्थापन कौशल्याचाही महत्त्वाचा वाटा आहे. ‘मॅगसेसे’ अॅवॉर्ड मिळाल्यानंतर (२००८ साली) डॉ. प्रकाश व डॉ. मंदा यांनी प्रकल्पाच्या दैनंदिन जबाबदारीतून अंग काढून घेतले. अनेक भागात दौरे करून, परदेशी भेटी देऊन त्यांनी प्रकल्पासाठी आर्थिकस्रोत उभे करण्याचे कार्य काही प्रमाणात सुरूच ठेवले. पण एकूण प्रकल्प व्यवस्थापनाच्या जबाबदारीत अनिकेतनेही महत्त्वाचा सहभाग सुरू केला. यात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून प्रकल्पाकरिता देणग्यांचा ओघ सुरू करण्याचे शिवधनुष्य अनिकेतने स्वत:च्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले. नंतर त्याने शाळेच्या संचालक पदाची जबाबदारीही सांभाळली. प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या पुण्याजवळच्या निगडी येथील समीक्षाशी, अनिकेतची ओळख झाली व या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात आणि विवाहात झाले. एम. ए. (इकॉनॉमिक्स) असे शिक्षण घेतलेल्या समीक्षानेही प्रकल्पावरच काम करण्याचा निर्णय घेतला व अशा तऱ्हेने आमटे घराण्यातील तिसऱ्या पिढीनेही पूर्णपणे समाजविकास कार्यात ठामपणे पदार्पण केले.

डॉ. दिगंत व अनिकेत यांनी अगदी सहज प्रक्रियेतून त्यांच्या वयाच्या अनेक कार्यकर्त्यांना जोडून घेतले. प्रकल्पाच्या कामात कोठलाही खंड पडू न देता ते प्रकल्प क्षेत्राबाहेरही वाढविले. हेमलकसाला भेट देणाऱ्या एकट्या दुकट्या पाहुण्यांप्रमाणेच ट्रिप्सने येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था सचिन मुक्कावार हा कार्यकर्ता बघतो, तर प्रफुल्ल पवार हा तरुण प्राण्यांच्या गोकुळाची देखभाल तसेच अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापनात अनिकेतला मदत करतो. अशा अनेक निरलस कार्यकर्त्यांचा एक संच आता या तिसऱ्या पिढीने सज्ज केला आहे. या संबंधीची अतिशय रोचक माहिती या पुस्तकात डॉ. प्रकाश यांनी दिली आहे. प्रकल्प राबविताना अनेक अडचणी आव्हाने येतात, पण प्रकल्पाच्या कामात आपुलकीने सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर या अडचणी, आव्हानांना यशस्वीपणे तोंड देता येते हे आमटे यांच्या तिसऱ्या पिढीने दाखवून दिले आहे.

आदिवासी महिलांना तान्हे बाळ हातात घेऊनच घरातील स्वयंपाक व इतर कामे करावी लागतात. अशा वेळी मूल हातातून निसटून चुलीवर किंवा गरम पाण्याच्या भांड्यावर पडल्याच्या दुर्घटना घडतात. यासाठी अनघाने बाळंतिणींसाठी जॅकेट गाऊन डिझाइन केला व नागपूरच्या एक संस्थेतर्फे बाळंतविड्याचा एक भाग म्हणून देण्याची व्यवस्था केली, अशी उपक्रमशीलता प्रकल्पाच्या यशस्वीतेमध्ये भर घालत आहे.

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनीच लिहिलेल्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाने त्यांच्या कामाला महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. अनेकांना आर्थिक व वस्तुरूपात देणगी देण्यास प्रवृत्त केले. अशा अनेक देणगीदारांची व त्यांनी प्रकल्पाला आपलेपणाने केलेल्या साहाय्याची मनोज्ञ नोंद नवी पिढी, नव्या वाटा या पुस्तकात जागोजागी केली आहे. या कार्यकर्त्यांत नव्याने स्नेहबंध निर्माण होणे, त्यांचे विवाह होणे व नव्या दाम्पत्यांनीही प्रकल्प कार्यात समरसून जाणे, अशा अनेक जोडप्यांच्या कहाण्याही या पुस्तकात आल्या आहेत.

आरोग्याबरोबरच शिक्षणाची सोय करणे हे अतिशय जिकिरीचे काम होते. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे, त्यासंबंधी नोंदी ठेवणे अशी अनेक आव्हाने शैक्षणिक कार्यातही होती. अनिकेत व समीक्षा यांनी समर्थपणे ही जबाबदारी स्वीकारून ते दोघे ती पार पाडत आहेत. प्रकल्पातील टाकाऊ वस्तूंची ‘स्क्रप बँक’ बनवून, त्यातील सामग्रीचा वापर कल्पकतेने मुलांच्या शिक्षणासाठी करणे काय किंवा माडिया गोंड मुलांना सहजतेने समजू शकेल अशा तऱ्हेने इंग्रजी शिक्षणाची सोय होण्यासाठी ‘लँग्वेज लॅब’ सुरू करणे काय, अशा अनेक कल्पक, नवोपचार आधारित (इनोव्हेटिव्ह) उपक्रमांनी प्रकल्पाचे कार्य विस्तारत आहे. हेमलकसापासून २५-३० किमी अंतरापर्यंत काही शैक्षणिक सुविधा, स्थानिकांच्या मदतीने सुरू केल्या आहेत. हेमलकसाच्या ‘लोक बिरादरी’ प्रकल्पाची विस्तारणारी क्षितिजे आणि त्यासाठी काम करणाऱ्या अनेकानेक कार्यकर्त्यांचे आणि आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे कार्य ठसठशीतपणे मांडणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे ‘नवी पिढी, नव्या वाटा’ हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे.
‘नवी पिढी नव्या वाटा’ – डॉ. प्रकाश आमटे, शब्दांकन- गौरी कानेटकर, प्रीती छत्रे, समकालीन प्रकाशन, पुणे, पाने- १३६, किंमत- २०० रुपये.