शलाका देशमुख
पालकत्वाची नीती सांगणारं ‘पालकनीती’ हे मासिक १९८७ साली पुण्यात सुरू केलं. त्या गटाला म्हणायचं होतं की, पालकत्व ही एकटय़ादुकटय़ाने निभावण्याची गोष्ट नाही. एकमेकांच्या सोबतीने त्याचे आयाम शोधत गेलो तर जगणं आनंदी होऊन जाईल. पालकत्वाच्या कक्षा विस्तारतील. आपलं मूल अनेकांचं होईल आणि सभोवतालची मुलं आपली होतील. मोठय़ांनी लहानांना सांभाळावं आणि लहानांनी मोठय़ांना. फक्त पालक होण्यातली नीती उमजली पाहिजे. यासाठी मुलांचं वेगवेगळय़ा अंगांनी आणि अर्थानी वाढणं याकडे ज्यांनी ज्यांनी सजगतेनी पाहिलं, त्याचा अभ्यास केला, अशा अनेकांना ‘पालकनीती’ने लिहितं केलं. देशभरातल्या आणि जगभरातल्या तज्ज्ञांचे विचार इथल्या मातीचे संदर्भ घेऊन या अंकांतून आपल्यापर्यंत पोहोचवले.
‘निवडक पालकनीती’च्या दोन्ही भागांत १९८७ ते २०१४ पर्यंतच्या अंकांतल्या काही लेखांचं संकलन केलेलं आहे. वाचकांच्या सोयीसाठी लेखांचं विषयवार वर्गीकरण केलं आहे. त्यामुळे वाचताना हव्या त्या विषयापासून सुरुवात करता येतेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही पुस्तकांचं मूल्य वाढलंय.
‘पालकत्व’ या विभागात ‘सुजाण पालकत्व’ म्हणजे काय? या देवदत्त दाभोळकरांच्या लेखात पहिलंच वाक्य आहे- ‘या प्रश्नाला उत्तर या लेखात नाही.’ खरं सांगायचं तर पालकनीतीच्या कोणत्याच अंकात वाचकांना ते डायरेक्ट सापडणार नाही. या विभागात अगदी हलक्याफुलक्या शब्दांत पालकत्वाचा ऊहापोह केलेलाही लेख आहेत. ‘कृपा करून आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून द्या’ असं म्हणणाऱ्या प्रियदर्शिनी कर्वे असोत किंवा ‘पाल्याच्या भविष्याबद्दलच्या अनेक चिंता पालकत्वाबाबतच्या आपल्या एकारलेल्या वा साचेबंद कल्पनेतून उद्भवत असतात,’ असं म्हणणारे यशवंत सुमंत असोत, या सगळय़ांनीच रूढ पालकत्वाबाबतचे प्रश्नही समोर उभे केलेत. त्यांची कारणमीमांसाही केलीय.
‘बालविकास’ विभागात तीन लेख आहेत ते तीन बालमानसतज्ज्ञांच्या कामाची ओळख करून देणारे आहेत. ही ओळख माहितीवजा नाही. त्या त्या तज्ज्ञांनी केलेले प्रयोग, त्यांचे अनुभव याच्या जोडीने त्यांनी मांडलेले सिद्धांत आपल्या समोर येतात. अगदी सहज समजतील अशा भाषेत.
मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व तर कळतंय, पण इंग्लिश भाषेचा बागुलबुवा आ वासून समोर उभा आहे. बाळासाठी शाळा निवडताना निर्णय कसा घ्यावा? पुस्तकातल्या धडय़ांपलीकडे नेणारं भाषा शिक्षण नेमकं कसं? ‘भाषामाध्यम’ विभागात यांसारख्या प्रश्नांच्या वेगवेगळय़ा आयामांचा ऊहापोह केलेले लेख आहेत.
त्यापुढचा विभाग आहे ‘लैंगिकता’. मुलांच्या संदर्भातला हा अतिशय नाजूक, पण महत्त्वाचा विषय. यातला पहिला लेख आहे र. धों कर्वे यांचा- लैंगिकता शिक्षणातले महर्षी म्हणावेत असे. त्यांनी लहान मुलांच्या अंघोळीचा लैंगिकता शिक्षणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल फार सुरेख मांडणी केलीय. पालकत्वाच्या संदर्भात लैंगिकता हा विषय हाताळण्याची गरज ‘पालकनीती’ने अधोरेखित करणं हे संपादक मंडळाचा सुदृढ दृष्टिकोन दर्शवतो.
‘निवडक पालकनीती’च्या दुसऱ्या भागातला पहिला विभाग आहे ‘शिक्षणविचार’. शिकण्याची औपचारिक जागा म्हणजे शाळा. तिथलं शिकणं – शिकवणं कसं असतं? कसं असावं? ते फक्त तिथेच असतं की मुलांच्यात आपलं आपणही असतं? त्याला वाट कशी देता येईल? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अशा प्रश्नांचा वेध या विभागात घेतलेला दिसतो. पाठय़पुस्तकातून डोकावणारी हिंसा हा तर तसा अपरिचित विषय. किशोर दरक यांच्या लेखातून ते पाठय़पुस्तक म्हणजे शिकण्याचं अंतिम साधन या समजुतीला छेद देतात.
‘कलाशिक्षण’ या पुढच्या विभागात चित्रपट, संगीत, चित्रकला अशा वेगवेगळय़ा कलांकडे पाहण्याची दृष्टी देणारे लेख आहेत. सतीश बहादूर आपल्या शिकवण्यातल्या आनंदाचं रहस्य या लेखात म्हणतात, ‘‘माझ्यासमोर जिवंत विद्यार्थी आहेत आणि मी जे काही करीन त्यातून काही शिकण्याची इच्छा त्यांनी धरलेली आहे. किती उघड गोष्ट आहे ना! शिक्षक म्हणून माझं अस्तित्वच या विद्यार्थी सक्षमतेत सामावलेलं आहे.’’ हे फक्त कला शिक्षणापुरतं आहे असं म्हणताच येणार नाही. भास्कर चंदावरकर त्यांच्या मुलाखतीत, ‘‘जोपर्यंत तुम्ही कोणाशी स्पर्धा करत नाही तोपर्यंत तुम्ही नैपुण्याशी पोचत नाही, असं जे आपल्या डोक्यावर मारलेलं आहे, तेच मुळात आक्षेपार्ह आहे.’’ असं महत्त्वाचं विधान करून जातात. आधीच्या सर्व संदर्भासह हे समजून घेण्यासाठी ती पूर्ण मुलाखतच वाचायला हवी.
पालक म्हणून, मूल म्हणून, शिक्षक म्हणून किंवा आणखी कोणत्याही नात्यांनी मोठय़ांना मुलांबरोबर आणि मुलांना मोठय़ांबरोबर येणारे प्रसंगाधारित अनुभव, किंवा मुलांबरोबर मोठं होत जाणं ‘अनुभव’ या विभागातल्या लेखांतून वाचायला मिळतं. मुलांबरोबरचे अनेक निरागस प्रसंग डोळय़ात पाणी येईपर्यंत हसू आणतात. हसण्यानी वाचायला सुरुवात करायची असेल तर जरूरच या विभागापासून करावी.
‘जीवनविचार’ हा शांतपणे वेळ काढून वाचण्याचा विभाग आहे. कुटुंबातली लोकशाही, एकंदरीत जातव्यवस्था, रोजच्या जगण्यात मध्ये येणारा आणि आसपास असणारा धर्म, स्वातंत्र्य अशा मूलभूत विषयांना इथे हात घातला आहे; पण विषयांना बिचकायचं कारणच नाही, कारण लिहिणाऱ्यांनी स्वत:च्या अनुभवांच्या, सभोवताली घडणाऱ्या प्रसंगाच्या मदतीने
हे गंभीर विषय उलगडत नेले आहेत. हे
वाचता वाचता व्यक्ती म्हणून सजग होणं हे प्रगल्भ पालक होण्याच्या वाटेवरचं पाऊल म्हणता येईल.
‘पालकनीती’ सुरू झालं तेव्हा ज्यांचा जन्मही झाला नव्हता ती पिढी आता पालक झालेली किंवा होऊ घातलेली आहे. त्यांच्यासाठीही यातले विषय कालबा झालेले नाहीत. येणारा काळ भुलवणाऱ्या बाजारपेठेचा आहे. अशा वेळी स्वत:चे स्वत: शांतपणे निर्णय घेण्याची दिशा दाखवणारी ‘पालकनीती’ सोबत करणारी आहे. कारण हे काही फक्त मासिक नव्हे, ती पालकत्वाची चळवळ आहे. म्हणूनच ‘निवडक पालकनीती’चा दोन भागांचा संच प्रत्येकाने आवर्जून खरेदी करून वाचावा. त्यातून
जुने अंक वाचण्याची इच्छा प्रत्येकाला होईलच. ते ‘पालकनीती’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
निवडक पालकनीती – भाग १, भाग २, ज्योत्स्ना प्रकाशन, पाने- ३९२ (दोन्ही मिळून), किंमत – ७५०/- (पूर्ण संच)