अल्फ्रेड नोबेल हा स्वीडनमधील अत्यंत श्रीमंत आणि बुद्धिमान घराण्यात जन्मलेला संशोधक. डायनामाईट या स्फोटकाचा त्याने शोध लावला. आयुष्यभर आपल्या संशोधनात गढून गेलेल्या या संशोधकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ नोबेल पारितोषिक दिले जाते. १८९६ साली आल्फ्रेडचे निधन झाले. १९०१ पासून शांतता, वैद्यकशास्त्र, रसायनशास्ज्ञ, पदार्थविज्ञान आणि साहित्य या पाच विषयांतील सर्वोत्तम कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार दिले जाऊ लागले. १९६९ साली अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठीही हा पुरस्कार दिला जाऊ लागला. म्हणजे हा पुरस्कार सुरू होऊन ११२ वर्षे झाली आहेत.
नोबेल हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आजवर ६७ देशांतल्या ८५०हून अधिक जणांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ३५० पारितोषिके अमेरिकन नागरिकांनी मिळवलेली आहेत. आजवरच्या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी निवडक ४७ जणांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. त्यात वैद्यकशास्त्रातील १६, रसायनशास्त्रातील पाच, पदार्थविज्ञानातील ११, शांततेसाठी पाच, साहित्यासाठी पाच आणि अर्थशास्त्रातील पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय आल्फ्रेड नोबेलचे अल्पचरित्र आणि नोबेल पारितोषिकांचा संक्षिप्त इतिहास आणि शेवटी सहाही विषयांतील महत्त्वाच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींची परिशिष्टे जोडली आहेत. एकंदर हे पुस्तक ‘नोबेल लॉरिट’ म्हणवल्या जाणाऱ्या दिग्गजांची तोंडओळख करून देणारे आहे. जगातली कुठल्याही व्यक्तीला हे पारितोषिक मिळू शकते. त्या संदर्भात डॉ. चोबे मनोगतात लिहितात, ‘‘सर्वोत्कृष्ट काम करताना सुविधांपेक्षा वैयक्तिक गुण महत्त्वाचे ठरतात. सर्व नोबेल पारितोषिकं म्हणजे चिकाटी, दृढ आत्मविश्वास, कठोर श्रम, शांतपणे विचार, धाडस, विज्ञाननिष्ठा, चिकित्सक बुद्धी आणि आयुष्यभर त्या कामात स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती या साऱ्याचं फळ आहे.’’
हरगोविंद खुराणा (वैद्यकशास्त्र), चंद्रशेखर व्यंकटरमण (पदार्थविज्ञान), सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (पदार्थविज्ञान), मदर तेरेसा (शांतता), रवींद्रनाथ ठाकूर (साहित्य), अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) अशा भारतीयांचा या ‘नोबेल लॉरिटां’मध्ये समावेश आहे आणि या पुस्तकातही. याशिवाय क्षयरोगाला वेसण गालणारे डॉ. रॉबर्ट कॉक, इंद्रियरोपण शस्त्रक्रिया शोधणारे डॉ. जोसेफ मरे व डॉ. डॉनल थॉमस, रेडियमचा शोध लावणारी मादाम मेरी क्युरी, अल्बर्ट आईनस्टाईन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, जॉर्ज बनार्ड शॉ, बट्र्राड रसेल, सर आर्थर लुईस या मान्यवरांचाही समावेश आहे.
प्रत्येक व्यक्तीचं अल्पचरित्र, तिच्या कामाची ओळख असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. डॉ. चोबे यांनी विषयानुसार पुस्तकाचे भाग केले असल्यामुळे त्या त्या क्षेत्रातील लेख एकसलग वाचता येतात. म्हणजे वैद्यकशास्त्र हा पहिलाच विभाग वाचताना हिवताप, क्षयरोग, मधुमेह यांसारखे आजार, त्यांच्यावरील औषधांचा शोध लागण्याआधीची परिस्थिती, त्यावर संशोधन करत असताना संबंधित संशोधकांना आलेले अनुभव आणि नंतरची परिस्थिती असा आलेख उभा राहतो. असाच प्रकार इतर विभागांबाबतही होतो. साहित्य विभागाबाबत मात्र तसे होत नाही. कारण या विभागातून विश्वसाहित्याचा जो अंदाज यायला हवा तो फारसा येत नाही. पण तरीही हा विभाग वाचनीय आहे.
जगातील भव्यदिव्य, नेत्रदीपक कामं ही बहुतकरून एकटय़ादुकटय़ा माणसांच्या अथक प्रयत्नांतून उभी राहतात. अशी माणसं ही आपल्या कामात अनिवार ओढीने आणि वेडाने बुडून गेलेली असतात. त्यासाठी ते आर्थिक लाभ, फायदा-नुकसान, मान-अपमान, अडी-अडचणी, साधनं-संदर्भसाहित्य अशा कुठल्याही कारणांच्या सबबी न देता त्यातून मार्ग काढत पुढे जातात. अशा माणसांच्या कामाचा यथोचित सन्मान केला जातो. कारण त्यांनी जगाला ऋणको करून ठेवलेलं असतं. मानवी जगणं उन्नत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. माणसांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांच्या या यशोगाथा अतुलनीय आहेत आणि आदर्शवतही. अशा माणसांची चरित्रं ही नंतरच्या पिढय़ांसाठी प्रेरणा देणारी.. त्यांच्यातील स्फुल्लिंग चेतवणारी.. त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारी असतात. आपल्याला हवं ते करण्यासाठीचा अमर्याद आत्मविश्वास अशी चरित्रं देतात. म्हणून अशा अचाट माणसांची ही अफाट कामं जाणून घ्यायची असतात.
‘नोबेल कथा’- डॉ. प्रबोध चोबे, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २८३, मूल्य- २४० रुपये.