अलीकडच्या काळात मराठीच्या भवितव्याची चर्चा सातत्याने होते असते. मराठीला भवितव्य नाही इथपर्यंत ही चर्चा जाते. पण त्याचबरोबर मराठीला ज्ञानभाषा करण्याची आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या गरजेची आवश्यकताही प्रतिपादित केली जाते. मराठीला ज्ञानभाषा बनवायचे असेल तर नेमके काय काय करण्याची गरज आहे, या हेतूने डॉ. सदाशिव देव यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे. डॉ. देव हे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. सात वर्षे त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्चस्तरीय गणित विषयाचे अध्यापन केले आहे. मुंबई, मराठवाडा आणि गोवा विद्यापीठातही त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले आहे. त्यांनी २००२ साली ‘कोशवाङ्मय : विचार आणि व्यवहार’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतरचे त्यांचे हे दुसरे पुस्तक. कोशनिर्मिती आणि भाषा याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक अभ्यासकाच्या दृष्टीने ते पाहतात. त्याचा प्रत्यय त्यांच्या या पुस्तकातही येतो.
या पुस्तकाची एकंदर दहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात ज्ञानाची विविधता, ज्ञानमीमांसा, माहिती, विशेष माहिती आणि ज्ञान आणि ज्ञानाचे आध्यात्मिक स्वरूप या मुद्दय़ांचा परामर्श घेत त्यांनी दुसऱ्या प्रकरणात मराठीला ज्ञानभाषा बनवायचे असेल तर तिचा संस्कृतचा आधार तोडता येणार नाही, असे मत नोंदवले आहे. तिसऱ्या प्रकरणात भाषेची विविध स्वरूपे स्पष्ट करत ज्ञानभाषा ही प्रमाणभाषेपेक्षा अधिक विकसित असते हे स्पष्ट करत ज्ञानभाषेची ठळक वैशिष्टय़े सांगितली आहेत. हे प्रकरण वाचल्यानंतर मराठीला या मार्गावरून प्रवास करण्यासाठी बराच पल्ला मारावा लागणार आहे, याची प्रचिती येते. त्यापुढील प्रकरणांत मराठी भाषेची पूर्वपरंपरा सांगत, तिचा लोकभाषा, मातृभाषा आणि राजभाषा हा प्रवास सांगत ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्यात कुठल्या प्रयत्नांची भर पडण्याची आवश्यकता आहे, याची मांडणी केली आहे. भाषेला परभाषिक आणि अंतर्गत आक्रमणे मोडून काढावी लागतात, असे डॉ. देव म्हणतात, बाहेरच्या आक्रमणासोबत अंतर्गत आक्रमण म्हणजे मराठी भाषेला तिच्या राज्यातच अनेक क्षेत्रांत मिळणारे दुय्यम महत्त्वही चिंताजनक आहे. त्यामुळे मराठीला ज्ञानभाषेपर्यंत जाण्यासाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागेल याची प्रातिनिधिक रूपरेषा या पुस्तकातून उलगडत जाते.
‘ज्ञानभाषा मराठी’ – डॉ. सदाशिव देव, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २९५, मूल्य – ३०० रुपये.
मराठी व्हावी ज्ञानभाषा
नुकत्याच प्रकाशित झालेल्या आणि बाजारात आलेल्या नव्याकोऱ्या पुस्तकांची ओळख करून देणारे साप्ताहिक सदर...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review nyanbhasha marathi