-सलील चिंचोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्याकशास्त्रासंबंधी वाचनाशी आपल्यासारख्या सामान्य माणसांचा मर्यादित संबंध असतो. शाळेतील विज्ञानाचे विषय, विज्ञान कथांचे वाचन आणि काही वर्षांपूर्वीचा कोविडचा अनुभव इतकेच काय ते आपले भांडवल. त्यात कोविडचे बहुतेक ज्ञान व्हॉट्सअॅप विद्यापीठातून मिळालेले! अशातच वैद्याकशास्त्राची भाषा आणि संज्ञा अत्यंत दुर्बोध असतात. शिवाय शरीरातील अवयवांची आणि रोगांची ‘आतली गोष्ट’ आपल्याला फारशी कळत नसते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या डोळे मिटून निमूटपणे घेणे एवढीच आपली वैद्याकशास्त्राबाबत भूमिका! त्यामुळे बहुतेकदा वाचक अशा अवघड विषयांना बगल देऊन वाचनासाठी इतर साध्या सोप्या पर्यायांना पसंती देतात. या पार्श्वभूमीवर डॉक्टर शंतनु अभ्यंकरांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘आधुनिक वैद्याकीची शोधगाथा’ हे पुस्तक म्हणजे सुखद वाचिक अपवाद आहे.

डॉक्टर शंतनु अभ्यंकर हे नाव मराठी वाचकांसाठी सुपरिचित . निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ असण्याबरोबरच ते तेवढेच कुशल मराठी लेखकही आहेत. ललित अंगाने वैद्याकीय विषय समजावून सांगण्यात त्यांची हातोटी आहे. पु. ल. देशपांडे, डॉक्टर जयंत नारळीकर, रिचर्ड डॉकिन्स यांचे वैचारिक व वाङ्मयीन संस्कार त्यांच्या लेखनात विपुलतेने आढळतात. या सर्वांकडून स्फूर्ती घेऊन डॉक्टर अभ्यंकरांनी स्वत:ची संवादी,ओघवती लेखनशैली सिद्ध केली. त्यामध्ये मराठीतील म्हणी, वाक्प्रचार, कविता, पुलंच्या कोट्या यांचा सढळ वापर आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचक त्यांच्या रसाळ लेखणीने लेखात गुंतून जात असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांच्या चिकित्सक व वैचारिक वैज्ञानिक बैठकीला नकळत आपलेसे करतो.

आणखी वाचा-बालरहस्यकथांचा प्रयोग

वैज्ञानिक शोधांप्रमाणेच वैद्याकविश्वातील शोधांना अनेक आर्थिक, धार्मिक व सामाजिक परिमाणे असतात. या शोधामागे संबंधित व्यक्तींचा ध्यास, धडपड व अनेक यशापयशांनी भरलेले अनुभव असतात. या क्रांतिकारी शोधांमुळे बऱ्याचदा तत्कालीन सामाजिक धारणा व समजुतींना धक्का बसतो. त्यामुळे होणाऱ्या सामाजिक विरोधानंतर वैज्ञानिक विचारांचा व पुरावाधिष्ठित वैद्याकशास्त्राचा यथावकाश स्वीकार होऊन तो शोध सगळ्यांच्या अंगवळणी पडतो. मग त्या शोधाचा सर्वदूर प्रसार होऊन मानवजातीवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. अशा विविध शोधगाथा धुंडाळण्याचा डॉ. अभ्यंकर यांचा ध्यास. त्यावर संशोधन करून या कथा अत्यंत रंजक शैलीत त्यांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत.

पुस्तकात डॉ. अभ्यंकर यांनी वेगवेगळ्या १७ शोधकथांचा प्रवास सांगितला आहे. ‘जन्मरहस्य’ शोधण्याच्या हजार वर्षांच्या मोठ्या प्रवासाच्या कथनाने या पुस्तकाची सुरुवात होते. पुंबीज आणि स्त्रीबीज यांच्या मीलनातून होणाऱ्या गर्भधारणेच्या आजच्या वैज्ञानिक सत्याला स्वीकारण्यासाठी वेळोवेळी किती अडथळे आले याची ही कथा आहे. सीम्स या स्त्रियांच्या अंतर्गत तपासणीसाठी उपयोगी उपकरणाची तसेच सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारा प्रसूतीच्या कथांमधून वैज्ञानिक उपायांच्या अभावाने झालेले स्त्रियांचे हाल वाचून मन अस्वस्थ होते. अशा संशोधकांना व त्यांच्या संशोधन पद्धतीला झालेल्या तत्कालीन विरोधाने समाज म्हणजे चौकटीत बंदिस्त असलेले पण सदोदित प्रवाहित असलेले रसायन असल्याचा प्रत्यय येतो.

आणखी वाचा-घिसाडी जीवनाचं वास्तव

स्टेथोस्कोप हा तर डॉक्टरांच्या गळ्यातल्या ताईत! त्याची कथा अफलातून आहे. त्या काळच्या डॉक्टरांना रुग्णतपासणी करताना येणाऱ्या अडचणी, त्यातून संशोधकांनी केलेले वेगवेगळे प्रयोग आणि सद्या:कालीन तयार झालेला स्टेथोस्कोप हा प्रवास वाचनीय आहे. कोविडच्या साथीमुळे आपल्या सर्वांना ‘हात धुणे’ या कृतीमागचे कारण व महत्त्व पटले. ही एक छोटीशी कृती संभाव्य रोगराईला कशी हातभर दूर ठेवू शकते यासंबंधी डॉ. अभ्यंकरांनी निर्जंतुकीकरण प्रक्रियेचा संपूर्ण प्रवास छान उलगडून सांगितला आहे. वायग्रा, प्रेग्नेंसी टेस्ट, गर्भनिरोधक गोळ्या अशा शोधांनी राजकीय सत्ता, मानवी मूल्ये व सामाजिक मान्यतांमध्ये संघर्ष निर्माण केला. नवीन शोधामुळे धक्का बसलेले मानवी मन त्यातील वैज्ञानिक सत्यता व त्यातून साधले जाणारे मानवी हित याची खात्री पटल्यावर त्या शोधांना कसे आपलेसे करते हे या कथांमधून नीट समजते. नव्वदीच्या दशकात भारताला एड्ससारख्या जीवघेण्या रोगाने विळखा घातला होता. मात्र वैद्याकीय क्षेत्राने, सरकारी यंत्रणांनी व डॉक्टरांनी मोठ्या निर्धाराने वर्तन, सवयीसंबंधी नागरिकांमध्ये जागृतीकरण केले. एड्सवर आपल्या देशाने नियंत्रण मिळवले. एड्स व्हायरस समजून घेताना या रोगाच्या चढउताराची कथा रोमांचकारक आहे.

आणखी वाचा-नक्षलग्रस्त परिसराचा मागोवा

अॅस्परिन, मलेरिया, मोतीबिंदू, अल्सर अशा आजच्या आपल्याला परिचित असलेल्या अनेक गोष्टींवर डॉ. अभ्यंकरांनी लिहिलेले लेख या पुस्तकात आहेत. या गोष्टी आपल्याला परिचित असल्या तरीही त्यामागील शोधांच्या कथा मात्र अत्यंत मनोरंजक आहेत. या लेखांमधून वैद्याकशास्त्रात एखाद्या रोगावर दशकानुदशके होत असलेले संशोधन, या प्रवासात संशोधकांनी दाखवलेली चिकाटी, भारतीय संशोधक व डॉक्टरांचे मौलिक योगदान, संशोधनात येणारे दोष, अडथळ्यांना वैज्ञानिक वृत्तीने सोडवून पुढे जाण्याची वैद्याकीय शास्त्राची धडाडी हे सर्व आपल्याला थक्क करते. टेस्ट ट्यूब बेबीच्या संशोधनात डॉ. सुभाष मुखर्जी या स्त्रीरोगतज्ज्ञाच्या योगदानाची आणि न मिळालेल्या श्रेयाची कथा आपल्याला एक भारतीय म्हणून व्यथित करते. या कथांमधून वैद्याकशास्त्रातील उपकरणे, औषधे, आजार यांच्या नावाच्या व्युत्पत्तीचे रहस्यही लेखकाने उलगडले आहे. उदाहरणार्थ, सिझेरियन ऑपरेशनचे नाव हे सिझेरिअस नावाच्या संतावरून पडले आहे. याची करुणा भागल्यास सिझेरियन सुखरूप पार पडते अशी श्रद्धा होती. सिम्स उपकरणाचे जन्मदाते म्हणजे जे मॅरिअन सिम्स. मात्र प्रत्येकच संशोधकाला आपले नाव त्या उपकरणाला किंवा औषधाला देण्याचे भाग्य लाभले नाही. डॉक्टर अभ्यंकर अशा गोष्टी नमूद करताना संवेदनशीलपणे या संशोधकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

वैद्याकशास्त्रातील अशा शोधकथांचा मागोवा घेत असतानाच डॉक्टर अभ्यंकर त्यांच्या ठाम वैज्ञानिक विचारसरणीने वाचकांमध्ये विज्ञानप्रसार करत असतात. नुकत्याच एका कुठल्याशा कथित संताच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरीत शेकडो भाबडे भक्त आपला जीव गमावून बसले. अशा अंधश्रद्ध व अधोगामी वातावरणात डॉक्टर अभ्यंकरांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या विज्ञानप्रसार पालखीचे खासच महत्त्व आहे. या पुस्तकाद्वारे आपल्यासारख्या वाचकांना या विज्ञानवारीत सहभागी होण्याची मोठी संधी आहे.

‘आधुनिक वैद्याकीची शोधगाथा’: डॉक्टर शंतनु अभ्यंकर, पाने १४८, किंमत २०० रुपये.