‘मी आत्मचरित्र लिहिणार नाही, कारण ते कोणत्या तरी कपाटात धूळ खात पडेल आणि ते मला आवडणार नाही..’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीतरी एका मुलाखतीत व्यक्त केलेले हे विचार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मनात इतके घट्ट रुतून बसले, आणि ज्या सुरांनी संगीतालादेखील स्वर्गीय मोहिनी घातली, ज्या सुरांच्या लगडी कानात उलगडताना असंख्य श्रमांचे ओझेदेखील हलकेहलके होऊन गेले, त्या सुरांची साधना लतादीदींनी कशी केली, ते गुपित त्यांच्याकडूनच उलगडून घेण्याच्या भाग्याला रसिकांना कायमचे मुकावे लागले. लतादीदी हा संगीत क्षेत्रातील एक चमत्कार आहे, सुरांच्या स्वर्गातील एक जादू आहे. त्यामुळे लतादीदींविषयी रसिकांच्या मनात एक आगळे कुतूहलदेखील आहे. लतादीदींचे एकएक गाणे म्हणजे, संगीत क्षेत्राचा एकएक दागिना आहे. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला ७१ वष्रे पूर्ण झाल्याचे एक आगळे औचित्य साधून गेल्या जून महिन्यात हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि लतादीदींची ओळख व्हावी, अशी रसिकांची आस किंचितमात्र निमाली.
लता मंगेशकरांचं आयुष्य आणि त्यांचं घरगुतीपण फारच थोडय़ा लोकांनी जवळून पाहिलं आणि अनुभवलेलं आहे. पद्मा सचदेव या त्यापकी एक. लता मंगेशकर यांच्या सुरांच्या झोक्यावर िहदोळतच लहानपण घालविलेल्या पद्मा सचदेव यांची लतादीदींशी झालेली पहिली भेट आणि नंतर एका सख्ख्या मत्रीत झालेलं रूपांतर हा एक अद्भुत प्रवास आहे. पद्मा सचदेव यांनी हे प्रवासवर्णन िहदीत शब्दबद्ध केलं आणि ते शब्द जयश्री देसाई यांनी ‘अक्षय गाणे’ या नावाने मराठीत आणले. लतादीदींच्या असंख्य मराठी चाहत्यांना आणि रसिकांना लतादीदी नावाच्या जादूई सुरांची, एका मनस्वी स्त्रीची आणि एका सच्च्या कलावंताची नेमकी ओळख करून देणारा एक खजिना या पुस्तकाच्या रूपाने खुला झाला. आपण आत्मचरित्र लिहिणार नाही, असे लतादीदींनी निक्षून सांगितल्याने खट्ट झालेल्या असंख्य मनांवर या पुस्तकामुळे दिलाशाची फुंकर पडली.
‘लतादीदींच्या गाण्यात, त्यांच्या सुरात जीवघेणी कोवळीक आहे,’ असं ज्येष्ठ पत्रकार गोिवद तळवलकर यांनी म्हटलं होतं. त्या सुरांच्या लगडी उलगडू लागल्या की, नेमका तोच अनुभव येतो. खचाखच गर्दीने भरलेल्या गाडीत तोल सावरत कसरत करत होणारा असा प्रवास या सुरांच्या साथीने सुसह्य़ होतो.. अशाच एखाद्या रखरखलेल्या दुपारी, भणाणत्या उन्हातून रस्ता पार करत असताना, आजूबाजूला गर्दीचा प्रचंड कोलाहल आणि कानठळ्या बसविणारा वाहनांच्या कर्कश कण्र्याचा आवाज घुमत असताना, रस्त्याकडेच्या एखाद्या झाडाच्या पानाआडून कोकीळकंठी सूर पाझरावा आणि शिणलेल्या शरीराला लगेचच चमत्कार झाल्यासारखी उभारी मिळावी तशी जादू या सुरांमध्ये आहे. ही जादू या पुस्तकाने उलगडली.
या पुस्तकातून ‘लतादीदींचं, एका गानसम्राज्ञीचं घरगुती रूप, त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि सांगीतिक कारकिर्दीतील असंख्य किस्से इतकं सहजपणे उलगडत गेलं की, प्रत्येक पानागणिक लतादीदी नव्याने उलगडत गेल्या,’ असं जयश्री देसाई म्हणतात. वाचकांनाही तोच अनुभव आणि तोच आनंद या पुस्तकानं दिला.
लतादीदींबद्दल संगीतसृष्टीत आणि सामान्यांच्या जगातही अनेक प्रवाद आहेत. काही गायक, संगीतकारांशी झालेले त्यांचे वाद आजही चविष्टपणे चíचले जातात. लतादीदींनी मात्र त्यावर कोणतंही भाष्य आजवर केलेलं नाही. ‘अक्षय गाणे’च्या निमित्ताने त्यापकी काही वाद-प्रवादांवर लतादीदींनीच प्रकाश टाकला आहे. या स्वरसम्राज्ञीच्या ऐन बहराच्या काळातील काही काळाचा हा पट आहे, तरीही तो उलगडणारं प्रत्येक पान नवं काहीतरी देऊन गेल्याचा आनंद वाचकाला मिळतो. अनुवादित पुस्तकात अनेकदा भाषेच्या रसाळपणाला लगाम बसतो. तसे होऊ नये, इतका सहजपणा भाषेत आणणे हे लेखकाचे कौशल्य असते. जयश्री देसाईंना ते साधले. लतादीदींनीदेखील जयश्री देसाईंना तशी पसंतीची पावती दिली. पद्मा सचदेव यांनी मूळ िहदीत लिहिलेल्या पुस्तकात इतक्या बारीकसारीक आठवणी लिहून ठेवल्या आहेत की, ती एक आठवणींची रोजनिशीच झाली आहे. जयश्री देसाईंनी लतादीदींशी मारलेल्या गप्पांमधून टिपलेल्या काही क्षणांची ‘अक्षय गाणे’मध्ये भर पडली आहे. अनुवादाचं काम करताना भाषेचा लहेजा सांभाळावा लागतो. एका भाषेतला भाव जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत उतरवणे हेच कौशल्याचं काम असतं. ते या अनुवादात ते साधलं गेलं आहे.
लता मंगेशकरांचं गाणं हे त्यांचं जीवन आहे, पण त्यांचं जगणं मात्र गाण्याहून वेगळं आहे. त्यांचं गाणं अत्यंत समृद्ध, श्रीमंत आहे, तर त्यांचं जगणं अत्यंत साधं.. संगीतक्षेत्रात पदार्पण केल्यानंतरचा सुरुवातीचा काळ संघर्षांचा. त्या काळात, एकापाठोपाठ एक रेकॉìडगमुळे दिवस घाईगडबडीचा असे. तो एक श्रीमंत अनुभव असायचा, पण दिवस संपवून घरी परतल्यानंतरचं जगणं मात्र साधं, घरेलू असायचं. गरिबीच्या काळात मुरमुरे खाऊन लोटलेले दिवस त्या नंतरही विसरल्या नाहीत, किंबहुना त्या दिवसांचा विसर कधीही पडू नये, असं त्यांच्या त्या घरेलू जगण्याचं सूत्रच होतं.
‘मी देवी नाही. माणूस आहे. माझ्या स्वत:च्या काही अडचणी आहेत, सुखदु:खं आहेत, नातेवाईक, जवळची माणसं आहेत आणि त्यांच्या सुखदु:खांशी मी जोडलेली आहे’, हे लतादीदींचे विचार ऐकल्यावर ज्येष्ठ हिंदूी साहित्यिक (कै.) प्रभाकर माचवे यांचे डोळे चमकले. असा विचार करणं हाच दैवी गुण आहे, असं तेव्हा माचवेंच्या मनात आलं असावं, असं त्या क्षणाच्या साक्षीदार असलेल्या पद्मा सचदेव यांना वाटून गेलं. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही दुसऱ्याच्या सुख-दु:खांना स्थान देणाऱ्यांनाच देवता मानलं जातं. एका लहानशा प्रसंगातून पद्मा सचदेव यांना या गायिकेच्या व्यक्तिमत्त्वातील देवत्वाचा साक्षात्कार झाला. असे अनेक लहानलहान प्रसंग लतादीदींची ओळख करून तर देतातच, पण वाचकांच्या विचारांनादेखील दिशा देतात. म्हणून हे पुस्तक केवळ लतादीदींविषयीच्या उत्सुकतेचं उत्तर नव्हे, तर विचारांना दिशा देणारं ठरतं.
प्रभाकर माचवेंसोबतच्या गप्पांच्याच प्रसंगाची एक नोंद या पुस्तकात आहे. अश्लील गाणी हा विषय त्या गप्पांच्या ओघात निघतो, तेव्हाचा.
‘संगीताला शब्द नसतात. केवळ नाद असतो, लय असते. त्यामुळे संगीत अश्लील होऊ शकत नाही. गीतातल्या अश्लील शब्दांमुळे संगीतावर अश्लीलतेचा ठपका बसतो. त्यामुळे कवींनी गीतासाठी शब्दांची निवड करताना अश्लील शब्द जाणीवपूर्वक टाळले पाहिजेत. जरा दक्षता घेतली पाहिजे. मी अश्लील गीत गायिलं नाही, तर दुसरा कुणीतरी गाईल. त्यामुळे कुणा एकानं ते न गाऊन फारसा फरक पडणार नाही. चित्रपटांतून जी अश्लील गोष्ट सांगितली जाऊ शकत नाही, ती गीतांच्या माध्यमातून सांगितली जाते’.. लतादीदींचं जगणं आणि त्यांचं गाणं याविषयीची उत्सुकताच नव्हे, तर त्यांचे विचारही या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचतात, आणि प्रत्येक विचाराला चालना देतात. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं!
‘संगीताच्या क्षेत्रात वावरतानाचा एक दिवसदेखील मी स्वत:साठी जगलेली नाही. गाण्यांसाठी, त्यांच्या चालींसाठी, वाद्यांसाठी, एकूणच संगीतासाठी मी माझ्या आयुष्याची र्वष वेचली.. मी कधी कोणाचं वाईट चिंतीत नाही, जाणीवपूर्वक मी कधी कुणाला त्रास दिलाय असं मला आठवत नाही. पण मीही शेवटी एक माणूस आहे, मशीन माही. पण काही लोक इतके स्वार्थी असतात की तोंडावर एक बोलतात आणि मागे दुसरंच..’  एका हळव्या क्षणाच्या कोणत्या तरी कटू आठवणींत बुडालेल्या लतादीदींचं हे स्वगत. आपल्यातल्या माणूसपणाची प्रांजळ कबुली देणारं.. आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यातल्या प्रांजळ माणूसपणाचं दर्शन घडवणारं.. अशी पारदर्शक रूपेही या पुस्तकात प्रतििबबित झालीत. म्हणूनदेखील, हे पुस्तक वाचनीय.
लतादीदी जेवढय़ा हळव्या आहेत, तेवढय़ा हट्टीदेखील आहेत. अनेकदा त्यांचा संगीतकारांशी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून झगडा व्हायचा आणि संगीतकार त्यांची मनधरणी करत त्यांना राजी करायचे.. लतादीदींच्या या स्वभावाचे काही पलूही या पुस्तकात दिसतातच. पण असं झालं, रागावून रेकॉìडग अर्धवट सोडून घरी परतलेल्या लतादीदींची मनधरणी करण्यासाठी संगीतकारानं त्यांच्या घरी धाव घेईपर्यंत त्यांचा राग निवळलेला असायचा आणि रेकॉìडग पार पडायचं..
लतादीदींनी देवत्व बहाल करणाऱ्यांना त्यांच्यातील माणूस दिसावा, यासाठी असे काही प्रसंग या पुस्तकात जागोजागी दिसतात, म्हणून हे पुस्तक वाचनीय!
राजकारणात लतादीदी फारशा रमल्या नाहीत; पण अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदी नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘अंतर्नाद’ या अल्बमच्या उद्घाटन समारंभात अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या भेटीचे एक विलक्षण बोलके छायाचित्र या पुस्तकात दिसते. लतादीदी अटलबिहारी वाजपेयींना पितृस्थानी मानतात. इंग्रजीतील अटल हा शब्द उलटा वाचला, की लता असा होतो. आपल्या मानसपित्याविषयीच्या भावना इतक्या मोजक्या शब्दांत लतादीदीच बोलक्या करू शकतात. क्रिकेट आणि सचिन हा लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हळवा कोपराही या पुस्तकात हळूच डोकावून जातो.. हे या पुस्तकाचं एक वेगळेपण!
‘आजकाल दीदी अतिशय आरामात राहतात. आराम करतात, वाचतात, पूजा करणं हा तर त्यांचा परिपाठ आहे. घरात त्या मुलांमधलं मूल होतात. त्यांच्यापाशी सांभाळून ठेवलेली हजारो पत्रं, लेख, फोटो, त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या असंख्य कविता यांचा खजिना त्यांच्या सूटकेसमध्ये बंद करून ठेवलेला आहे. जेव्हा ही सूटकेस उघडली जाते, तेव्हा भूतकाळातल्या असंख्य कहाण्याही जिवंत होतात. प्रत्येक गोष्टच जतन करण्यासारखी..’
‘अक्षय गाणे’ या पुस्तकाच्या अखेरच्या पानावरचा हा परिच्छेद! अक्षय गाणी हादेखील एक असाच, जतन करण्यासारखा खजिना आहे. रसिकांसाठी!!
‘अक्षय गाणे’ – पद्मा सचदेव, मराठी अनुवाद- जयश्री देसाई, मैत्रेय प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १९२, मूल्य – ३०० रुपये.

Story img Loader