काही योगायोग मोठे विचित्र असतात. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन आणि उदारमतवाद या परंपरांचे पाईक न्या. रानडे यांच्या पत्नीचे आत्मचरित्र प्रकाशित होऊन आता शंभराहून अधिक र्वष उलटून गेली आहेत. या काळात या पुस्तकाला महाराष्ट्रातील वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण गेल्या वर्षांपासून ‘उंच माझा झोका’ ही रमाबाईंविषयीची टीव्ही मालिका सुरू झाली अन् या पुस्तकाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. शिवाय त्या निमित्ताने त्यांची दोन जुजबी चरित्रंही प्रकाशित झाली आहेत. आणि आता रमाबाई यांच्या आत्मचरित्राचीही नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी १९१० साली ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आपलं आत्मचरित्र लिहून प्रकाशित केलं. रानडे यांचं निधन झालं १९०१ साली. म्हणजे त्यांच्या निधनानंतर तब्बल नऊ वर्षांनी त्यांनी या आत्मपर आठवणी लिहिल्या. महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं हे पहिलंच आत्मचरित्र असा त्याचा उल्लेख केला जातो. शिवाय त्या रानडेंच्या सहधर्मचारिणी. त्यामुळे रानडेंविषयीही या पुस्तकात बरीच माहिती आहे.
ग्रंथकार संमेलन, ग्रंथोत्तेजक सभा अशा अनेक सार्वजनिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे न्या. रानडे हे उदारमतवादी परंपरेचेही आद्यप्रवर्तक मानले जातात. म. फुले यांनी सावित्रीबाईंना जसं स्वत: घरीच शिकवून इतरांना शिकवण्यास प्रेरित केलं, त्याच काळात तसाच प्रयोग रानडे यांनीही रमाबाईंच्या बाबतीत केला. पुढे रमाबाईंनी अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीतही पुढाकार घेतला. असं असूनही या पुस्तकात रमाबाईंनी आपल्या कामाचा फारसा डिंडिम न वाजवता आपल्या पतीच्या दैनंदिन आयुष्याविषयी खासगी माहिती देण्यावरच भर दिला आहे. सत्तावीस र्वष त्यांनी रानडेंबरोबर त्यांची सहधर्मचारिणी म्हणून व्यतीत केली. त्या काळातील रानडेंचं त्यांनी काहीसं भक्तिभावपूर्ण चित्रण केलं असलं तरी त्यातून रानडे यांची खरी ओळख होते. त्यांचे आदर्श, प्रेरणा आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कळतं. त्यांच्या विचारामागची कारणपरंपराही काही प्रमाणात जाणून घेता येते. त्यामुळे हे एका अर्थाने रानडय़ांचं चरित्रही आहे. रानडय़ांच्या निधनानंतर रमाबाईंनी हे पुस्तक संपवले आहे. त्यानंतरच्या त्यांच्या कामाविषयी त्यांनी या पुस्तकात काहीही लिहिलेले नाही, हेही लक्षणीय आहे. तसं पाहिलं तर या पुस्तकात रमाबाईंनी स्वत:पेक्षा रानडय़ांविषयीच जास्त लिहिले आहे. त्यामुळे यातून रानडेंचे मोठेपण सतत जाणवत राहते.
एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनपरंपरा समजावून घेताना आधी न्या. रानडे समजावून घ्यावे लागतात. त्यामुळे या पुस्तकाचं वाचन हे अनिवार्य ठरतं. रमाबाईंनी न्या. रानडे यांच्या पश्चात त्यांची ‘धर्मपर व्याख्याने’, ‘व्यापारविषयक व्याख्याने’ अशी काही पुस्तकंप्रकाशित केली. ज्येष्ठ चरित्रकार-पत्रकार न. र. फाटक यांच्यावर रानडे यांच्या चरित्राची जबाबदारी सोपवून त्यांच्याकडून ते लिहवून घेतलं. वयाच्या पंचविसाव्या वर्षी फाटकांनी लिहिलेलं हे चरित्र आजही न्या. रानडे यांच्यावरील सर्वात चांगलं चरित्र मानलं जातं.
आज स्त्रीशिक्षण आणि समाजसुधारणा याबाबत स्त्री-पुरुषांना फारसा सामाजिक संघर्ष करावा लागत नाही. पण एकोणिसाव्या शतकात अशी परिस्थिती नव्हती. फुले-रानडे हे समकालीन. या दोघांनाही त्यासाठी संघर्ष करावा लागला. पतीनिधनानंतरही रमाबाईंनी ते काम निष्ठेने पुढे चालवलं. हा सर्व इतिहास या पुस्तकातून जाणून घेता येतो. ‘उंच माझा झोका’ या मालिकेत दाखवला जातो, तसा केवळ पतीचा उल्लेख ‘स्वत:’ असा करणं आणि त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करणं, एवढय़ापुरतंच रमाबाईंचं काम नव्हतं. तर आजच्या समाजावर आणि स्त्रीवर्गावर रमाबाईंनी मोठेच उपकार करून ठेवले आहेत. आज त्यांना ज्या स्वातंत्र्याचा श्वास आणि आत्मनिर्भरतेचा स्वर मिळाला आहे, त्याची पायाभरणी करण्यात रमाबाईंचा महत्त्वाचा वाटा आहे.
या पुस्तकातून त्याकाळचे पुणे, त्यावेळचा पुणेरी समाज, त्याच्या चालीरीती, समज, रूढी-परंपरा आणि सुधारणांविषयीची मते यांचीही ओळख होते. अतिशय कर्मठ म्हणाव्या अशा सामाजिक वातावरणात रमाबाईंनी पतीच्या पाठिंब्याच्या जोरावर जे प्रयत्न स्त्रीशिक्षण व सुधारणांसाठी केले, त्यांचे विशेषत्व मनात भरत जाते. आज प्लेगच्या साथीची भयावहता कुणाला सांगूनही पटणार नाही, पण एकेकाळी या आजाराने कुटुंबांवर कशी दहशत बसवली होती, याचं चित्रणही रमाबाईंनी चांगल्याप्रकारे केलं आहे. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे रमाबाई आणि रानडे यांच्या उदारमतवादाचा उत्सव आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकाची पहिली आणि दुसरी आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित झाली होती. मासिक ‘मनोरंजन’चे संपादक का. र. मित्र यांनी या आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या. १९२६पर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ३५ पर्यंत सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. (१९८९मध्ये रमाबाई यांचे नातू माधवराव विद्वांस यांनी ‘श्रीमती रमाबाई रानडे – व्यक्ती आणि कार्य’ हे चरित्र सरोजिनी वैद्य यांच्या सहकार्याने लिहून प्रकाशित केलं.) त्यानंतर मात्र रमाबाईंच्या आत्मचरित्राला काहीसं उतरतं वळण लागलं. २००२ साली ‘वरदा’ने त्याची नवी आवृत्ती प्रकाशित केली. ती संपायला पुढची दहा र्वष जावी लागली. पण गतवर्षी ‘उंच माझा झोका’ सुरू झाली आणि पुढच्या तीन आवृत्त्या तीन तीन महिन्यांनी प्रकाशित झाल्या. या मालिकेला त्याचं श्रेय दिलंच पाहिजे, यात काही वाद नाही.
मालिका पूर्णपणे सत्यावर आधारित नाही, ही गोष्ट जगजाहीर आहे. पण हे पुस्तक पूर्णपणे वास्तव आणि सत्याने भरलेलं आणि भारलेलं आहे. तेव्हा रमाबाईंचे कर्तृत्व आणि न्या. रानडे यांचं मोठेपण समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. अर्थात या आवृत्तीत बऱ्याच चुका आहेत. त्यांचं शुद्धिपत्रक पुस्तकाच्या शेवटी जोडलं आहे आणि रविप्रकाश कुलकर्णी यांचं काही अधिक माहिती देणारं परिशिष्टही दिलं आहे. सुरुवातीला ‘प्रकाशकाचं निवेदन’ दिलं आहे. त्यात ‘महत्त्वाची व दुर्मीळ पुस्तकं’ छापण्याच्या धोरणाचा उल्लेख आहे. रमाबाईंचं हे पुस्तक महत्त्वाचं नक्कीच आहे, पण ते दुर्मीळ मात्र अजिबात नव्हतं. केवळ पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध नसलेल्या पुस्तकांना दुर्मीळ म्हणत नाहीत. असो.
‘उंच माझा झोका’ पाहून काहींना हे पुस्तक वाचावंसं वाटेल आणि हे पुस्तक वाचून काहींना ‘उंच माझा झोका’ पाहावीशी वाटेल. ज्याला जे सोयीचं वाटेल त्याने ते करावं. पण तारतम्य ठेवून करावं. रमाबाई रानडे आणि न्या. रानडे हा काही घटकाभर करमणुकीचा विषय नाही. तो समाजावरील आणि एकमेकांवरील पराकाष्ठेच्या प्रेमाचा विषय आहे. त्यासाठी त्याग कराव्या लागलेल्या कित्येक गोष्टींचा इतिहास आहे. आणि भोगलेल्या हाल-अपेष्टांचाही. एकोणिसाव्या शतकातील एका असामान्य स्त्रीविषयी एकविसाव्या शतकात जाणून घेताना तो काळही नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर रमाबाईंच्या मातब्बरीची यथायोग्य कल्पना येईल.
आमच्या आयुष्यातील काही आठवणी – रमाबाई रानडे, वरदा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २७२, मूल्य – ३०० रुपये.
राजा पिंपरखेडकर