आनंद विनायक जातेगांवकर यांची सत्तरीच्या दशकातील महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळख आहे. लक्षणीय व वेगळ्या संवेदनेची कथा त्यांनी लिहिली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबजीवनाचे त्यांनी घडविलेले दर्शन अतिशय वेगळे होते. तसेच किशोरवयीन मुले व स्त्रियांचे भावविश्व त्यांच्या कथांमधून फार भेदकपणाने आलेले आहे. अलीकडेच त्यांची ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.
कादंबरी आणि वैचारिक गद्याच्या सीमा पुसट करणारी ही कादंबरी आहे. गेल्या दीडशे वर्षांचा काळ या तिच्या घडणीमागे आहे. विशेषत: एकोणिसावे शतक, ब्रिटिश साम्राज्यशाहीची भारतात झालेली रुजुवात, लयाला जाऊ पाहणारी व काही तग धरून असलेली संस्थाने, या वसाहत काळातील धामधुमीचा व त्या काळातील महाराष्ट्रीय समाजवास्तवाचा कादंबरीशी जवळचा संबंध आहे. गेल्या दीडशे वर्षांतील लोकरूपी वस्त्राची घडण इथे जातेगांवकरांनी उलगडून दाखवली आहे. वर्तमानाच्या नजरेतून इतिहास न्याहाळणारी ही कादंबरी आहे.
अशोक नारायण गोरे या पात्राच्या माध्यमातून अस्वस्थ वर्तमानाचा पट न्याहाळला आहे. गोरे इतिहासाचे प्राध्यापक आहेत. जाणीवपूर्वक इतिहासाचा प्राध्यापक निवडून त्यांनी या काळातील मराठी सामूहिक मनाचा पट साकार केलेला आहे. वर्तमानातल्या अस्वस्थ करणाऱ्या एकेका गोष्टीचे नाते भूतकाळात दडून बसलेले आहे. त्यावर धूळ बसलेली आहे. ती झटकून त्या सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न या गोष्टीत आहे. वर्तमानातल्या अनेक अस्मितेच्या दुखऱ्या जागांना या संहितेत महत्त्वाचे असे स्थान आहे. भारतीय समाजातील अनेक उघडे आणि बंदिस्त आवाज या गोष्टीत आहेत. प्रबोधनाचा इतिहास अधुरा राहिल्याची सल जातेगावकरांच्या या लेखनामागे आहे.
गेल्या दीड शतकातील विविध घडामोडींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव भारतीयांच्या जीवनावर पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय सीमावाद, अणुकरार, स्त्रीशिक्षण, ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाची हाडामासी रुजलेली जाण, प्रभावी असे जातकारण, पारंपरिकता आणि आधुनिकतेतील पेच, वासाहतिक मनोवृत्ती, स्त्रीदास्य व दलित मुक्तीचे फसलेले प्रयत्न, झुंडशाहीचे मानसशास्त्र व या पाश्र्वभूमीवर फसलेले तत्त्वचिंतनाचे प्रयत्न या जाणीवरूपांनी ही कादंबरी घडली आहे. या साऱ्या घडणीची मुळे नजीकच्या काळात होती. त्यामुळे सध्याचा वर्तमान भूतकाळाने नियंत्रित केलेला आहे.
‘अस्वस्थ वर्तमान’ ही एका अपूर्ण क्रांतीच्या साठा उत्तराची कहाणी आहे. जातकारण हा भारतीय व्यवस्थेतील एक दुखरी सल आहे. या सामूहिक जातभानाचा प्रभाव भारतीय जीवनशैलीवर मोठा आहे. मानवी संबंध या जातभानाने नियंत्रित केले जातात आणि प्रभावित केले जातात. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत हे जातभान अधिकाधिक तीव्रतर होत गेले आहेत. त्याची पाश्र्वभूमी या निर्मितीमागे आहे.
या लेखनात इतिहासकाळातील घटनांचा फार प्रभावी वापर केला गेला आहे. वर्तमानाच्या या घडणीला सतत भूतकाळाची पाश्र्वभूमी आहे. वर्तमान भूतकाळाच्या कक्षेतून न्याहळला गेला आहे. लेखनात सतत भूत आणि वर्तमान खेळता ठेवला आहे. या दोन काळांच्या ताणातून, अंतर्वरिोधातून वर्तमानातल्या विरूपाची चित्रे अधिक गडद आणि उठावदार केली आहेत. इतिहासाचे आकलन बऱ्याच वेळेला एकांगी केले जाते. अस्मितांचे वणवे टोकदार करण्यात व दूषित करण्यातच ही आकलने बऱ्याचदा खर्ची पडलेली दिसतात. इथे मात्र या इतिहासकाळाचा, त्यातल्या अनेक अंगांचा विवेकी उपयोग केला गेला आहे. तो ठामपणाचा नाही; कारण त्यातून लेखकाला इतिहास संवेदनेच्या अनेक शक्यता सूचित करावयाच्या आहेत. भूतकाळाप्रमाणेच वर्तमान हा धर्मसत्ता, जातसत्ता व राजसत्तेने प्रभावित आहे. त्याची मुळे भूतकाळातील विविध घटनांत दडलेली आहेत. त्यातून हे जाणिवेतील लोकमन बाहेर पडू इच्छित नाही. या वास्तवतेची जाणीव हे लेखन करून देते.
या दृष्टीने कादंबरीत आंबेडकरी प्रबोधपर्व, स्त्रीसुधारणा, ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद, १८५७ चे बंड, अणुस्फोट, गांधीहत्या, बुद्धविचार, आधुनिकतेचा प्रवेश या घटनांचा लावलेला अन्वयार्थ व तिच्या विविध अर्थाच्या सूचित केलेल्या शक्यता व त्यांचे अंतिम साफल्य या कादंबरीत मांडले गेले आहे.
सबंध वर्तमान हा वरकरणी सुसंगत दिसणाऱ्या घटनांतून दिसतो. मात्र त्याच्या पोटात अंतस्थ स्फोटक अशी अस्वस्थता पेरलेली आहे. या अस्वस्थतेचा शोध विविध गोष्टींतून इथे घेतला गेला आहे.  नायकाच्या अस्वस्थ अशा विविध जाणीवरूपांतून ही गोष्ट घडली आहे. ‘आपण आहो तिथंच आहोत, त्याच त्या वर्तुळात फिरतो आहोत. पुस्तकाच्या जगात आपण युधिष्ठिर आहोत आणि पुस्तकाबाहेर दुर्योधन’ या द्वंद्वपेचाचा आविष्कार ही कादंबरी घडवते. शेवटही असाच शोकमय केला आहे. हळूहळू इथल्या माणसाला भयस्वप्नाची सवय माणसांना झाली आहे व ती भयस्वप्ने सत्यात उतरली आहेत. या शोकजाणिवेत या लेखनाचा विराम होतो.
आजच्या दुखऱ्या वर्तमानाबद्दलचे हे चिंतनशील स्वरूपाचे एक दीर्घ स्वगत आहे. या लेखनातील प्रभावी अशा शैलीमुळे वाचक या कथनात गुंतत जातो. चिंतनशील गद्य निवेदन, कथनात्मता, प्रवाही अशी गद्यलय हे तिचे विशेष होत. कादंबरीच्या पोटात त्यांनी वैचारिक गद्य मुरवले आहे. त्यामुळे कादंबरीत गद्य निवेदन प्रभावी ठरले आहे. शाहू महाराजांचे वेदोक्तप्रकरण, टिळक-गांधी कालखंडातील महाराष्ट्रीय मन व त्यातील विविध घडामोडी, १८५७ चे बंड आणि उत्तरेकडचे वातावरण या गोष्टी कादंबरीत फार वेधकपणे आल्या आहेत. लोकमनात वसलेल्या व वर्तमानाला विरूप करणाऱ्या घटनांचे भूतकालीन धागेदोरे इथे खरवडून काढले आहेत. तसेच कथनात्म साहित्याला तर्कप्रधान, विचारप्रधान गद्याचे रूप दिले आहे. ‘अस्वस्थ वर्तमान’ हे कादंबरीचे शीर्षक मात्र फारच ढोबळ वाटते. एकूणच प्रबोधनाच्या अधुऱ्या कहाणीची अस्वस्थ कैफियत जातेगांवकरांच्या या लेखनात आहे.
अस्वस्थ वर्तमान – आनंद विनायक जातेगावंकर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे – २२३, मूल्य – २५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा